काँग्रेसमुक्त भारत, काँग्रेसनेच केली

विवेक मराठी    04-Sep-2023   
Total Views |
मुंबईमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया गठबंधनची बैठक झाली. यापूर्वी काँग्रेस प्रादेशिक पक्षांना काहीही किंमत देत नसे, ती काँग्रेस आता प्रादेशिक पक्षांबरोबर बसली म्हणजे प्रादेशिक पक्षांपैकी एक झाली. या सर्व विरोधी पक्षांच्या गठबंधनाचे नामकरण इंडिया (i.n.d.i.a.) असे केलेले आहे. काँग्रेसमुक्त भारत ही मोदींची घोषणा काँग्रेस पक्षाने इंडिया असे नामकरण करुन आपणहून अमलात आणली आहे.
 
vivek
 
खरं सांगायचं तर 2024ची लोकसभेची निवडणूक भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी व्हायला पाहिजे होती. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. 125वर्षांहून अधिक त्याचे राजकीय आयुष्य आहे. त्यामुळे काहीजण म्हातारा पक्षही म्हणतात. भारताच्या कानाकोपर्‍यात काँग्रेसचे नाव पोहचलेले आहे. काँग्रेस पक्षाला अखिल भारतीय जनसमर्थनही आहे, त्यामुळे भाजपाची लढाई काँग्रेसशी व्हायला पाहिजे, असे म्हणणे स्वाभाविक ठरेल.
 
 
यापूर्वी काँग्रेस विरुद्ध वेगवेगळे राजकीय दल असा सामना होत असे. एकेकाळी प्रजासमाजवादी पक्ष भारतव्यापी होता. नंतर स्वतंत्र पक्ष भारतव्यापी झाला. कम्युनिस्ट पक्ष भारतव्यापी होता. या तिघांचे अस्तित्त्व आता संपलेले आहे, पण काँग्रेसचे अस्तित्त्व अजून कायम आहे. जनसंघ ते भाजपा असा प्रवास झाला आणि 1990 नंतर भारतीय जनता पार्टी काँग्रेसला पर्याय म्हणून उभी राहिली.
 
 
नरेंद्र मोदी यांनी 2014च्या निवडणुकीत काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिली. मतदारांना ती आवडली आणि 2014च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 44 जागा मिळाल्या. सर्व देशभर काँग्रेसचा दारुण पराभव झाला. 2019च्या निवडणुकीत 2014ची पुनरावृत्ती झाली. राहुल गांधी यांना आपला परंपरागत अमेठी मतदारसंघ सोडून ख्रिश्चनबहुल केरळ मतदारसंघ निवडावा लागला. राहुल गांधी अमेठीतून पळाले असे काहीजण म्हणतात. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा दारुण पराभव केला.
 
  
मुंबईमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया गठबंधनची बैठक झाली. यापूर्वी काँग्रेस प्रादेशिक पक्षांना काहीही किंमत देत नसे, ती काँग्रेस आता प्रादेशिक पक्षांबरोबर बसली म्हणजे प्रादेशिक पक्षांपैकी एक झाली. मराठीतील एका गाण्याच्या ओळी आहेत, ‘कोण होतास तू काय झालास तू’ या प्रादेशिक पक्षांना एकत्रित क़रण्याचे काम नितीशकुमार यांनी केले. ज्या शरद पवारांनी सोनिया गांधींच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली, त्या शरदराव पवारांच्या शेजारी सोनिया गांधी बसल्या होत्या. मजबूरी का नाम सोनिया गांधी असं म्हणायला काही हरकत नाही.
 
 
काँग्रेस पक्षाला पुन्हा उभे करायचे आहे. ती ऊर्जा आता संपली आहे. मोदी नकोत, मोदींना हरवा, या एका विषयाने काँग्रेसचे नेतृत्त्व झपाटलेले आहे आणि ते या ना त्या प्रकारे मोदींना पर्याय म्हणून राहुल गांधींचे नाव पुढे आणीत आहेत. राहुल गांधी मोदींना पर्याय कसे ठरतील? याचा काँग्रेसचे तथाकथित नेते विचारच करीत नाही असं दिसते. एक काळ असा होता की, नेहरु-गांधी नावाने मते मिळत असत, आता तो काळ गेला. आता मतदार विचारतो की, कर्तृत्व दाखवा आणि मते मागा. म्हणजे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असा विषय झाला. राहुल गांधी ज्या दिवसापासून राजकारणात आले आहेत, त्या दिवसापासून त्यांचे कर्तृत्व कोणते? काँग्रेस पक्षाला राज्य, केंद्र, सत्ता मिळवून देणारा नेता अशी त्यांची प्रतिमा नाही. त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचे पराभवच होत गेले आहेत. असा पराभूत चेहरा पक्ष कार्यकर्ते आणि मतदारांना प्रेरणा कशी देऊ शकणार? काही प्रसिद्धी माध्यमांनी राहुल गांधींचे नाणे चालवायचे ठरविले आहे. त्यांची त्यांची काही व्यावसायिक गणिते असू शकतात, परंतु राहुल गांधी हे नाणं मतदार राजाला भावेल असे काही वाटत नाही.
 
 
सर्व विरोधी पक्षांच्या गठबंधनाचे नामकरण इंडिया (I.N.D.I.A.)  असे केलेले आहे. काँग्रेसमुक्त भारत ही मोदींची घोषणा काँग्रेस पक्षाने इंडिया असे नामकरण करुन आपणहून अमलात आणली आहे. या इंडिया आघाडीत मुस्लिम पार्टी (एमआयएम) नाही. मायावतीची बहुजन समाज पार्टी नाही. महाराष्ट्राचे प्रकाश आंबेडकर बहुजन वंचित आघाडी देखील नाही. आंध्रचे के. सी. आर. राव नाहीत. ओरिसाचे नवीन पटनाईक नाहीत. एवढी वजाबाकी झाली तरी इंडिया आघाडीचे नेते म्हणतात की, आम्हाला 63%मतदारांचा पाठिंबा आहे. या 63%चे गणित समजून घ्यायला पाहिजे. 2019च्या निवडणुकीत भाजपाला 37% मते मिळाली, 63% मते अन्य पक्षांना मिळाली. निवडणुकीच्या राजकारणामध्ये या आकडेशास्त्राला तसं काहीही महत्त्व नसतं, ते फसवे असतात.
 
 
भाजपाला न मिळालेली 63% मते मोदी विरोधाची मते आहेत असे विधान राजकीय अज्ञानपणाचे लक्षण आहे. आपला मतदार मतदान करताना उमेदवाराची जात बघतो आणि त्याप्रमाणे मतदान करतो. असे मतदान कुणाच्या विरोधातील मतदान नसते. काही पक्षाचे मतदार त्या पक्षाला बांधील असतात. मायावतींचा मतदार, अभंग शिवसेनेचा मतदार, हा पक्षासाठी मतदान करतो, कुणाच्या विरोधात मतदान करीत नाही. मुस्लीम आणि ख्रिश्चन मतदार सामान्यतः आपले धर्मगुरु ज्या उमेदवाराला मतदान करायला सांगतात त्या उमेदवाराला मतदान करतात. काही ठिकाणी ते भाजपाला मतदान करतात तर काही ठिकाणी ते करीत नाहीत. या 63% मध्ये फक्त 20% मतदारांनी काँग्रेसला मतदान केलेले आहे. यामुळे आम्ही 63% मतदारांचे प्रतिनिधित्व करतो हे बोगस वाक्य आहे.
 

vivek 
 
मुंबईच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे, लालूप्रसाद, शरदराव पवार, राहुल गांधी या नेत्यांनी जी भाषणे केली, त्यावरुन ‘बेडकी कितीही फुगली तरी बैल होऊ शकत नाही’ या उक्तीची आठवण झाली. शरदराव पवार कोणत्या राष्ट्रवादी पक्षात आहेत- भाजपाबरोबर गेलेल्या की न गेलेल्या. ते दोन्ही दरडीवर पाय ठेवून उभे आहेत आणि उद्धव ठाकरे यांची स्थिती शोलेतील जेलरप्रमाणे ‘आधे इधर-आधे उधर’ अशी झालेली आहे. आज त्यांच्या बरोबर आहेत, त्यातील उद्या किती सोडून जातील हे त्यांनाही माहीत नाही. नितीश कुमार यांच्या विरोधामध्ये प्रशांत किशोर यांनी आघाडी उघडलेली आहे. त्यांचा चंद्राबाबू नायडू कधी आणि कसा होईल हे सांगता येणार नाही.
 
 
 
सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की, इंडिया आघाडीचा पंतप्रधानाचा चेहरा कोणता? गांधी परिवार भक्त राजनेते म्हणतात की, आमचा चेहरा राहुल गांधी आहेत. केजरीवालचे भक्तगण म्हणतात की, राहुल गांधी नाही तर आमचा चेहरा अरविंद केजरीवाल आहेत. नितीशकुमार आणि शरदराव पवार हे दोघेही महाधूर्त हे पंतप्रधानाच्या शर्यतीत आहेत, पण आपले नाव कधी पुढे आणत नाहीत. ते संधीची वाट बघत राहणार आणि मग आपल्या नावाचा डंका करतील. कोणताही चेहरा पुढे आणला तरी नरेंद्र मोदी यांची बरोबरी करील असे एकही नाव इंडिया गठबंधनात नाही. स्वातंत्र्यापासून भारताचा राजकीय इतिहास असा आहे की, राजकीय परिवर्तनाचा मार्ग गांधी, जयप्रकाश, अण्णा हजारे, या मार्गक्रमिकेने जातो. दोन वाक्यात सांगायचे तर सत्तेचा मोह नसलेला परंतु सत्ताकारणाचे महत्त्व समजणारा, स्वच्छ चारित्र्याचा, निरपेक्ष आणि त्यागी माणूस उभा रहावा लागतो. आज हे स्थान मोदींनी प्राप्त केलेले आहे. म्हणून मोदींविरोधाचा लढा हा कुणाशी आहे यावर अधिक भाष्य करण्याची गरज आहे असे वाटत नाही.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.