वास्तव आणि दिवास्वप्न

विवेक मराठी    31-Aug-2023   
Total Views |
 
congress
 ‘विरोधकांची ही आघाडी अतिशय शक्तिशाली असून 2024मध्ये भाजपाला सक्षमपणे टक्कर देऊ शकते’ असे भासवण्याचा या मंडळींचा खटाटोप चालू आहे. तो किती व्यर्थ आहे, हे समजून घेण्यासाठी त्यांना ‘प्यू’चे सर्वेक्षण आणि इंडिया टुडेचा अंक वाचावा लागेल, विषय समजून घ्यावा लागेल. मात्र दिवास्वप्नात मश्गूल असलेल्या या विरोधकांना हे वास्तव समजून घ्यायचे आहे का? हा प्रश्न आहे.
  
अमेरिकास्थित प्यू रिसर्च सेंटर या नावाजलेल्या संस्थेने भारतासंबंधी केलेले सर्वेक्षण नुकतेच समोर आले आहे. भारतासहित जगभरातल्या 24 देशांमधल्या 30 हजार प्रौढांकडून मागवलेल्या माहितीच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. भारताबद्दल जगात एक सकारात्मक दृष्टीकोन दिसून येत असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. विविध क्षेत्रांत वाढत असलेल्या सामर्थ्यामुळे भारताकडे जगाची नजर असून सर्वसामान्य भारतीयांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे नोंदवण्यात आले आहे.
 
 
2024मध्ये असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण झाले असले, तरी दिल्लीमध्ये होत असलेल्या G20 शिखर परिषदेपूर्वी हे सर्वेक्षण समोर आले, हे विशेष! पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीयांंमध्ये लोकप्रिय असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. विद्यमान भारतासाठी जगभरातल्या 46 टक्के लोकांचे मत अनुकूल असल्याचे या सर्वेक्षणावरून स्पष्ट होते. गेल्या 9 वर्षांत मोदी सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणा, जाणीवपूर्वक आखलेले व यशस्वी झालेले परराष्ट्र धोरण, विज्ञान-तंत्रज्ञानस्नेही दृष्टीकोन, खेळांना आणि खेळाडूंना देण्यात येणारे प्रोत्साहन-पाठिंबा, त्यातून क्रीडा क्षेत्राची होत असलेली उल्लेखनीय कामगिरी.. अशा प्रकारे भारताची विविध दिशांनी होत असलेली प्रगती, तिची दृश्यमानता.. ही व अशी अनेक कारणे या सर्वेक्षणाचे जे निष्कर्ष समोर येत आहेत त्यामागे आहेत.
 
 
इंडिया टुडेच्या सप्टेंबर महिन्याच्या अंकाची जी मुखपृष्ठ कथा आहे, तीही अशाच सर्वेक्षणावर आधारित आहे. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करतील असा विश्वास व्यक्त केला आहे. मोदी सरकारचे दोन कार्यकाळांतले काम, भारताची उंचावलेली प्रतिमा आणि पंतप्रधानांची वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैली यामुळे कल त्यांच्या बाजूने आहे, असे नमूद केले आहे.
 
 
विद्यमान सरकारसाठी तसेच पंतप्रधान मोदींसाठी देशभर सकारात्मक वातावरण असल्याचे निष्कर्ष एका परदेशी सर्वेक्षण संस्थेने आणि भारतातील प्रतिष्ठित नियतकालिकाने अभ्यासाच्या आधारे जाहीर केलेले असतानाच, देशातल्या 28 पक्षांचा समावेश असलेल्या I.N.D.I.A. आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होते आहे. ‘देशात सुरू असलेल्या हुकूमशाहीच्या बेड्या तोडण्यासाठी भाजपाविरहित आघाडीची आवश्यकता असून आम्ही या बेड्या तोडूच’ असा विश्वास ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी बैठकीपूर्वी मुंबईत व्यक्त केला. आघाडीबद्दलचा हा विश्वास बिनबुडाचा आहे आणि हास्यास्पदही. राजकीय लोभापायी ज्यांना वडिलांनी बांधलेला पक्ष एका राज्यापुरतादेखील टिकवता आला नाही, ज्यांनी स्वार्थासाठी पक्षाच्या मूळ उद्दिष्टांशी काडीमोड घेतली, अशा उद्धव ठाकरेंच्या घोषणा सर्वसामान्य नागरिक गांभीर्याने घेत नाहीत. त्यातच केवळ नावाचा बदल केलेल्या या आघाडीत इतकी मतमतांतरे आहेत आणि पंतप्रधानपदाचे इतके (किंवा बहुतेक सर्वच.. काही उघडपणे तर काही छुपे.. इतकाच फरक!) दावेदार आहेत की केवळ मोदींना हरवण्यासाठी ही मोट शेवटपर्यंत बांधलेली राहणे हेच सगळ्यात मोठे आव्हान आहे. अनेक दशके पंतप्रधानपदाच्या आशेवर असलेले शरद पवार यांच्यासह नितीशकुमार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता, अरविंद केजरीवाल यांच्यासारखी अनेक विषयांत परस्परविरोधी मते असलेली मंडळी पंतप्रधान होण्यासाठी उत्सुक आहेत. या सावळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसनेही गेली अनेक वर्षे न चाललेले आपले कार्ड पुन्हा एकदा टाकले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी ‘काँग्रेसकडून राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील’ असे जाहीर केले आहे. या नावाला अन्य घटक पक्षांचे किती समर्थन मिळेल ते लवकरच स्पष्ट होईल, पण काँग्रेस पक्षाला मात्र युवराज्याभिषेकाची स्वप्ने पडू लागली आहेत. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अलीकडच्या काळात करण्यात आलेल्या ट्वीट्सवरून हे स्पष्ट होते. ‘राहुल गांधींना संसदेत पंतप्रधान मोदी घाबरले आहेत आणि एनडीए I.N.D.I.A.ला घाबरला आहे’ असे काँग्रेसने अलीकडेच केलेले एक ट्वीट असून अन्य एका ट्वीटमध्ये राहुल गांधींची जननायक म्हणून भलामण केली आहे. तर, राहुल गांधी आणि मोदी यांच्यातील लढत म्हणजे जननेता विरुद्ध अभिनेता अशी लढत असल्याचे एका ट्वीटमध्ये म्हटले आहे. थोडक्यात, राहुल गांधी हेच काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, हाच या आरती ओवाळण्याचा अर्थ आहे. सोशल मीडिया हे आजच्या काळातले लोकांशी जोडले जाण्याचे सर्वात वेगवान आणि प्रभावी माध्यम. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचे झालेले. मात्र हे माध्यम अतिशय काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक हाताळावे लागते. त्यातून सर्वसामान्यांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करायची असेल, तर ते वापरताना बुद्धिकौशल्य पणाला लागते. म्हणूनच ते चालवणार्‍या व्यक्तींची निवडही विचारपूर्वक करावी लागते. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून करण्यात येणारी ट्वीट्स पाहता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांप्रमाणेच हँडल चालवणारेही पोरकट असावेत असे वाटते. एरव्ही मोदी राहुल गांधींना घाबरले असे हास्यास्पद विधान करण्याचा बालिशपणा त्यांनी केला नसता.
 
 
त्यातही गंमत अशी की आघाडीच्या आधीच्या दोन बैठकांमध्ये काँग्रेस याबाबत काही बोलली नव्हती. कदाचित तेव्हा नाव घोषित करण्यात जोखीम वाटत असल्याने आणि मुंबईतील बैठकीचे यजमान आता काँग्रेसचे अंकित असल्याने त्यांनी मुंबईचा मुहूर्त साधला असावा.
 
 
बसपाच्या मायावती आघाडीत सामील झालेल्या नाहीत आणि वंचित बहुजन आघाडीला आघाडीकडून अद्याप निमंत्रण नाही. असा सगळा सावळा गोंधळ असतानाही, ‘विरोधकांची ही आघाडी अतिशय शक्तिशाली असून 2024मध्ये भाजपाला सक्षमपणे टक्कर देऊ शकते’ असे भासवण्याचा या मंडळींचा खटाटोप चालू आहे. तो किती व्यर्थ आहे, हे समजून घेण्यासाठी त्यांना ‘प्यू’चे सर्वेक्षण आणि इंडिया टुडेचा अंक वाचावा लागेल, विषय समजून घ्यावा लागेल. मात्र दिवास्वप्नात मश्गूल असलेल्या या विरोधकांना हे वास्तव समजून घ्यायचे आहे का? हा प्रश्न आहे.