ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तब्बल 50-55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल नव्याने वेगळं काही लिहिण्याची गरज नाही. पवारांचं गुणगान करणार्या भाटांनी या कारकिर्दीस ‘मुत्सद्दी’, ‘धोरणी’, ‘धुरंधर’ वगैरे मुलामा देण्यात आजवर धन्यता मानली. परंतु या प्रतिमेची वास्तव बाजू काय होती, हे महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदुत्ववादी - राष्ट्रनिष्ठ कार्यकर्ता जाणतोच. या प्रतिमेची आणि त्याच्या आतील खर्या चेहर्याचीही पुरती चिरफाड त्यांचेच पुतणे अजित पवार यांनी एमईटीमध्ये घेतलेल्या राष्ट्रवादीच्या सभेतून केली. अजित पवारांचं हे भाषण अनेकार्थांनी ऐतिहासिक तर ठरलंच, शिवाय ’पवार स्टाइल’चं कौतुक करण्यात हयात घालवलेल्या अनेकांसाठी आरसा दाखवणारंदेखील ठरलं.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या शपथविधीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामध्ये भाजपाच्या एकनिष्ठ कार्यकर्ते-मतदारांसह भाजपाविरोधी घटकांचा, भाजपाला सतत पाण्यात पाहणार्या पत्रकार-विश्लेषकांचाही समावेश होता. विधानसभेत बहुमत असताना आत्ताच अचानक ही शस्त्रक्रिया करण्याची काय गरज उद्भवली? राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्यासोबत का घेतले? इथपासून हा शरद पवारांचाच तर डाव नाही ना? असे असंख्य प्रश्न या निमित्ताने सर्व बाजूंनी उपस्थित झाले. बुधवारी मुंबईत झालेल्या एकाच पक्षाच्या एकाच वेळी झालेल्या दोन सभांमधून या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील.
राष्ट्रवादी काँग्रेस नामक पक्षातून शरद पवार नामक सर्वेसर्वा-अध्यक्षाचं नेतृत्व - त्याला कुणी सद्दी म्हणेल, कुणी बंधन, तर कुणी जोखड - त्यांच्याच पक्षातील त्यांच्याच चेल्यांनी बुधवारी अधिकृतरित्या झुगारून दिलं. विशेष म्हणजे या झुगारण्याच्या प्रक्रियेची सुरुवात त्यांच्याच स्वत:च्या घरातून झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तब्बल 50-55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल नव्याने वेगळं काही लिहिण्याची गरज नाही. पवारांचं गुणगान करणार्या भाटांनी या कारकिर्दीस ‘मुत्सद्दी’, ‘धोरणी’, ‘धुरंधर’ वगैरे मुलामा देण्यात आजवर धन्यता मानली. परंतु या प्रतिमेची वास्तव बाजू काय होती, हे महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदुत्ववादी - राष्ट्रनिष्ठ कार्यकर्ता जाणतोच. या प्रतिमेची आणि त्याच्या आतील खर्या चेहर्याचीही पुरती चिरफाड त्यांचेच पुतणे अजित पवार यांनी एमईटीमध्ये घेतलेल्या राष्ट्रवादीच्या सभेतून केली. अजित पवारांचं हे भाषण अनेकार्थांनी ऐतिहासिक तर ठरलंच, शिवाय ’पवार स्टाइल’चं कौतुक करण्यात हयात घालवलेल्या अनेकांसाठी आरसा दाखवणारंदेखील ठरलं. “तुम्ही 82-83 वर्षांचे झालात, आता तरी निवृत्त व्हा आणि आराम करा.. शिवाय मला जास्त तोंड उघडायला लावू नका” अशा शब्दांत अजित पवारांनी शरद पवारांना सुनावलं. हे सुरू असताना छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, तटकरे, मुश्रीफ वगैरे पवारांनीच कधीकाळी फोडून आणलेली वा स्वत: घडवलेली मंडळी टाळ्या वाजवत होती. पाच-सहा दशकांच्या राजकारणाचं फळच जणू शरद पवारांना या घटनेतून मिळालं. ही सभा संपते न संपते, तोच 30 जून रोजी अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर त्यांची निवड करत निवडणूक आयोगाकडे तसं पत्र दिल्याची बातमी आली. ही सभा व त्यानंतरच्या या बातमीने हा सगळा प्रकार शरद पवारांचा डाव नव्हे, तर पुढील काळात आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीचा संघर्ष असणार आहे, हे सिद्ध केलं.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी शरद पवार कराडला गेले, त्यांनी पुन्हा पक्ष उभारण्याची भाषा केली, याबद्दल अनेकांनी त्यांची प्रशंसा केली. या वयात अशा परिस्थितीत उमेद आणि लढण्याची जिद्द प्रशंसेस पात्र ठरतेच. परंतु, त्यानंतरच्या घडामोडी पाहता शरद पवार आपल्या हातून निसटून गेलेल्या गोष्टीच्या मागे पळण्याचा प्रयत्न करत आहेत, हे स्पष्ट होतं. आणि याकरिता त्यांच्याप्रती सहानुभूती असण्याचं मुळीच कारण नाही, कारण कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून पवारांनी सरकारं आणि पक्षसंघटना फोडूनच आपलं राजकारण घडवलेलं आहे. 1978पासून ते 2019च्या महाविकास आघाडीपर्यंत भलीमोठी यादीच सांगता येईल. एकेकाळी याच पवारांनी स्व. गोपीनाथ मुंडेंचं घर फोडत त्यांच्या पुतण्याला आपल्या पक्षात आणलं, आज तोच पुतण्या शरद पवारांच्या पुतण्यासोबत बंड करून उभा आहे आणि भाजपासोबत सरकारमध्ये मंत्रीही बनला आहे, हे नियतीच्या काव्यगत न्यायाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत अजित पवारांवर खापर फोडून शरद पवार नामानिराळे राहिले, त्याच अजितदादांनी पवारांच्या कोलांट्याउड्यांची जंत्रीच मांडली. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळही यात सामील झाले. भुजबळ, पटेल, वळसे, मुश्रीफ ही माणसं अजितदादा गटाची नाहीत, तर ती पवारांच्या मनमानी धोरणाला व सुप्रिया सुळेंना झुकतं माप देण्याला कंटाळलेली राष्ट्रवादीची ’सिंडिकेट’ ठरली. थोडक्यात, ’आयुष्य ओघळोनी, मी रिक्तहस्त आहे’ या ओळींप्रमाणे विलाप करण्याची वेळ शरद पवारांवर येण्याची शक्यता दिसत आहे. राजकारणाला विचारांची, तत्त्वाची बैठक नसेल, तर कितीही कुरघोडी करून उभारलेला डोलारा आपलाच कुणीतरी येऊन क्षणात उद्ध्वस्त करू शकतो, हा धडादेखील केवळ पवारांनाच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला या निमित्ताने मिळाला आहे.
या सर्व राजकीय नाट्यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीचं गणित जुळवण्यासाठी, महाराष्ट्रातील भाजपाचा विजय सुरक्षित करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ही राजकीय शस्त्रक्रिया घडवली, हे खरेच. परंतु, या निमित्ताने शरद पवारांच्या मागील पन्नास-साठ वर्षांचा हिशेब त्यांच्याच मंडळींकडून चव्हाट्यावर आणून पुढील पन्नास-साठ वर्षं लक्षात राहील असा धडा देण्याचं कामही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आता पुढील अनेक वर्षं कुणी वाचाळवीर ’अकेला फडणवीस क्या कर सकता है’ म्हणून विस्तवात हात घालण्यास धजावणार नाही, याचीही तरतूद या निमित्ताने झाली आहे.