राजकारण कशासाठी करायचे? सत्तेसाठी, मानसन्मानासाठी, पदासाठी की भारताच्या परिपूर्ण आर्थिक विकासासाठी, सांस्कृतिक मानचिन्हांच्या रक्षणासाठी, जगद्गुरू भारत बनविण्यासाठी, याचा विवेक सतत जागा ठेवावा लागतो. लोकशाहीतील राजकीय सत्तेची लढाई ही संख्याबळाची लढाई असते, म्हणून देवेंद्रसारखे चतुर राजकारणी आपले संख्याबळ कसे वाढत राहील याचा विचार करतात. तसे सगळे आपलेच असतात, आपल्यासारखी अभिव्यक्ती दुसर्याची नसते, एवढाच फरक. वेगळी अभिव्यक्ती असणारे आपल्या सहवासात आले पाहिजेत. चंदनाच्या सहवासात येणार्या कडुनिंबाच्या खोडालादेखील चंदनाचा सुवास लागल्याशिवाय राहत नाही.
एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हातमिळवणी केली आहे. राजकारण हे अनेकदा सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अनाकलनीय असते. अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात होते. ’मी पुन्हा येईन’ या वाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची आणि शिवसेनेची मंडळी हसत होती. आम्ही तुम्हाला विरोधी बाकावर कसे बसविले आहे असे म्हणून त्या पक्षांची नेतेमंडळी हसत होती. देवेंद्र फडणवीस तेव्हा शांत होते. तेव्हा त्यांच्या चेहर्यावरील हास्य मावळले नाही, आजही त्यांच्या चेहर्यावरील हास्य मावळले नाही, परंतु हसणारी तोंडे आता काळवंडली आहेत. मीडियाची मंडळी सोडून संजय राऊत यांना कुणी गांभीर्याने घेत नाही. उद्धव ठाकरे गेले वर्षभर रागविलाप आळवीत आहेत. ते अर्थपूर्ण राजकीय वक्तव्य करू शकत नाहीत, वडिलांची थोरवी सांगत ते जगत आहेत. आणि शरदराव पवार नेहमीप्रमाणे ज्याचे अनेक अर्थ निघू शकतात असे बोलत आहेत.
देवेंद्र फडणवीस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना पुरून उरले आहेत. त्यांना नगण्य करण्याचे राजकीय डावपेच आखले गेले. हे सगळे डाव देवेंद्र फडणवीस यांनी उलटून लावले आहेत. शकुनीमामा दर वेळेलाच यशस्वी होतात असे नाही. युधिष्ठिरासारखा भोळसट राजा समोर असेल, तर शकुनीमामा यशस्वी होतो आणि कृष्णनीती आणि शिवनीती खेळणारा प्रतिस्पर्धी असेल, तर सगळे डाव उलटले जातात. रामदासस्वामी म्हणतात,
राजे जाती राजपंथी। चोर जाती चोरपंथे।
वेडे ठकले अल्प स्वार्थे। मूर्खपणे॥
देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण अतिशय थंड डोक्याने चालते. ते उत्तेजित झालेले कधी दिसत नाहीत. त्यांच्या चेहर्यावरील शांत भाव कधी ढळत नाहीत. ते तोंडाळ नेत्यांच्या तोंडी कधी लागत नाहीत. त्यांच्या आरोपांना उत्तरे देऊन त्यांचे महत्त्व वाढवीत नाहीत. जे काही राजकारण करायचे आहे, ते डोके शांत ठेवून करीत राहतात. ते कोणती खेळी खेळत आहेत, हे त्यांच्या सर्व निकटवर्ती लोकांनाही समजत असेल की नाही, माहीत नाही. खेळी झाल्यानंतर परिणाम समोर आले की लक्षात येते.
राजकारण बहुत करावे।
परंतु कळोच नेदावे।
परपीडेवरी नसावे अंत:करण॥
देवेंद्र फडणवीस यांचे हे राजकारण स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी चालले आहे किंवा सत्तेला चिकटून राहण्यासाठी चालले आहे असे म्हणता येणार नाही. या राजकारणाला एक दूरदृष्टी आहे, ध्येयवादी विचारसरणीचे कोंदण आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी मतदारांचा विश्वासघात करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली. अशी आघाडी होईल, हे भाजपालादेखील वाटले नव्हते. तेव्हा 'चाणक्य' म्हणून शरदराव पवार यांचे कौतुक झाले आणि उद्धव ठाकरे हे चाणक्यांचे चंद्रगुप्त आहेत असेही काही लोक म्हणू लागले, फडणवीस तेव्हाही शांत बसले. त्यांनी सरकार चालू दिले. त्यांनी सक्षम विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडली. कृष्णनीती जाणणारा नेता विरोधकांचे दुर्बळ स्थान नेमके जाणतो, संधीची वाट पाहत राहतो. योग्य वेळ येताच असा घाव घालतो की विरोधकाला उठून उभे राहणदेखील कठीण होऊन बसत. गेल्या वर्षी जून महिन्यात अशी संधी आली.
करणे असेल अपाय। तरी बोलून दाखवूं नये।
परस्परेचि प्रत्ययो। प्रचितीस आणावा॥
हे रामदासस्वामींचे वचन देवेंद्र फडणवीस यांनी तंतोतंत अमलात आणले. (रामदासस्वामींना हिणविण्यात शरद पवार यांची हयात गेली आहे, त्यांना ही रामदासनीती माहीत नसावी.)
देवेंद्र यांच्यापुढील प्रश्न केवळ महाराष्ट्रातील सत्तेचा नाही, महाराष्ट्राच्या सत्तेइतकीच दिल्लीची सत्ताही महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिघे एकत्र राहिले, तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या अनेक जागा संकटात येण्याची शक्यता होती. त्यासाठी आघाडी फुटणे आवश्यक होते. मतदारांचा विश्वासघात केला, ही राजकीय अनीती आहे, सत्तेच्या स्वार्थासाठी हे पक्ष एकत्र आले आहेत, या वाक्यांचा मर्यादित उपयोग असतो. सत्तेवर बसलेल्यांना त्याचा शून्य परिणाम होतो. यासाठी हे असले रडगाणे सोडून आघात करण्याची नीती अवलंबावी लागते. देवेंद्र फडणवीस यांनी ते केले. महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांच्या पायाखालील सतरंजी काढून घेण्यात आली आणि दोन्ही पक्ष आपटले. विलाप करण्यासाठी उद्धव आता एकटे राहिले नाहीत, तर त्यांना आता जोडीदार मिळाले आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी किमान ४० जागा आता सुरक्षित झाल्या आहेत, असे राजकीय विश्लेषक मानू लागले आहेत.
देवेंद्र यांनी याचा विचार केला असेल की महाराष्ट्रातील सत्ता महत्त्वाची खरी, पण केंद्रातील सत्ता त्याहून महत्त्वाची आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकारणाची दिशा बदलून टाकली आहे. देशाच्या सर्वंकष उन्नतीची विषयसूची त्यांनी विकसित करत पुढे आणली आहे. विरोधी आघाडीतील पंधरा डोक्यांपैकी एकही डोके मोदींची जागा घेण्यासाठी सक्षम नाही. पण ती कौरवसेना आहे. तिच्या एकत्रित शक्तीकडे दुर्लक्ष करता येत नाही. म्हणून त्यांच्यात कशी फाटाफूट होईल याची रणनीती आखणे हा या वेळेचा राजधर्म आहे. हा राजधर्म हे सांगतो की ’पदरी पडले पवित्र झाले’ असे मानून पुढे गेले पाहिजे.
नष्टाशी नष्ट योजावे। वाचाळासी वाचाळ आणावे।
आपणावरी विकल्पांचे गोंवे। पडोंच नेदी॥
ही रामदासांची समर्थनीती आहे.
भाजपाबरोबर आधी एकनाथ शिंदे आले. आता अजित पवार आले आहेत. दोघांचीही राजकीय ओळख स्वतंत्र राहणार आहे. दोघांचेही पक्ष भाजपात विलीनीकरण करणार नाहीत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तिघांनाही एकत्रितपणे लढायची आहे. जागावाटपाचा प्रश्न येईल. भाजपाच्या अनेक इच्छुक उमेदवारांची नाराजी निर्माण होईल. बाहेरच्या लोकांना सन्मान आणि आम्हाला काही नाही ही भावना सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली, तर त्याचे आश्चर्य वाटू नये. एका व्यापक लक्ष्यपूर्तीसाठी काही तडजोडी कराव्या लागतात आणि काही जणांना त्यागही करावा लागतो. याशिवाय राजकीय यश प्राप्त होत नाही.
राजकारण कशासाठी करायचे? सत्तेसाठी, मानसन्मानासाठी, पदासाठी की भारताच्या परिपूर्ण आर्थिक विकासासाठी, सांस्कृतिक मानचिन्हांच्या रक्षणासाठी, जगद्गुरू भारत बनविण्यासाठी, याचा विवेक सतत जागा ठेवावा लागतो. लोकशाहीतील राजकीय सत्तेची लढाई ही संख्याबळाची लढाई असते, म्हणून देवेंद्रसारखे चतुर राजकारणी आपले संख्याबळ कसे वाढत राहील याचा विचार करतात. तसे सगळे आपलेच असतात, आपल्यासारखी अभिव्यक्ती दुसर्याची नसते, एवढाच फरक. वेगळी अभिव्यक्ती असणारे आपल्या सहवासात आले पाहिजेत. चंदनाच्या सहवासात येणार्या कडुनिंबाच्या खोडालादेखील चंदनाचा सुवास लागल्याशिवाय राहत नाही.
शेवट समर्थांच्याच एका श्लोकाने करतो -
जो बहुतांस मानला। तो जाणावा शहाणा जहाला।
जनी शहाण्या मनुष्याला काय उणे॥
बहुतांची मान्यता ही या काळाची गरज आहे, त्यातच शहाणपण आहे आणि अशा शहाण्या मनुष्याला काय उणे पडणार आहे?