देशाचा भावी पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पाहणारी विरोधी पक्षातील अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, शरदराव पवार हे अतिशय धूर्त राजकारणी आहेत. ऐक्याच्या पहिल्या चालीत ते परस्परांचा अंदाज घेतात. एकमेकांना पारखून घेतात. या चौघांनाही एक गोष्ट माहीत आहे की, एकमेकांच्या प्रभावक्षेत्रात दुसर्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे देशव्यापी कोणाताच त्यांच्याकडे पक्ष नाही. काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी याला तसा काही अर्थ नाही. अखिल भारतीय राजकीय संघटन ते बांधू शकत नाही. त्यांची युती म्हणजे मी माझ्या घरात नाचतो तू तुझ्या घरात नाच आणि दूरवरून आपण आपल्या नाचाची प्रशंसा करीत राहू.
इंग्लिशमध्ये एक म्हण आहे - "United we stand, divided we fall' याचा अर्थ होतो, आम्ही संघटित झालो तर उभे राहू आणि वेगळे राहिलो तर पडू. भारतातील विरोधी पक्षांना ही म्हण उलटी लागू होते - ’आम्ही एकत्र आलो तर पराभूत होतो आणि वेगळे राहिलो तर जिंकतो.’ भारतीय राजकारणाचे हे वास्तव असल्यामुळे विरोधी पक्षांनी ऐक्याच्या कितीही घोषणा केल्या, तरी त्यांचे ऐक्य होणे अतिशय कठीण आहे.
राजकीय पक्षांचे ऐक्य करण्यासाठी तीन गोष्टी लागतात -
ज्याच्याविरुद्ध ऐक्य करायचे आहे, तो वेगवेगळ्या कारणाने दुर्बल झालेला असला पाहिजे.
ज्याच्या नेतृत्वाखाली संघटितपणे काम करता येईल, असा विरोधी पक्षनेता हवा.
सर्वांना मान्य होईल असा आर्थिक, सामाजिक कार्यक्रम असावा लागतो.
या तीन सूत्रांचा विचार करता विरोधी पक्षांचे ऐक्य होणे वाटते तितके सोपे काम नाही. एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभात विरोधी पक्षनेते एकत्र येतात, हातात हात घालून फोटो काढतात, हे फोटो त्या क्षणापुरते असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुर्बल करण्यासाठी किंवा दाखविण्यासाठी आतापर्यंत पुढील विषय घेण्यात आले -
अदाणी आणि अंबानी उद्योग समूहांना मोदी यांनी साहाय्य केले. त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे.
मोदींचा नोटबंदी निर्णय फसला. त्याचा लोकांना खूप त्रास झाला.
विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी मोदी ईडी, सीबीआय यांचा उपयोग करीत आहेत.
मोदी यांच्यामुळे लोकशाही धोक्यात येत चालली आहे.
मोदी यांच्यामुळे महागाई प्रचंड वाढत चालली आहे.
यातील ’मोदी यांच्यामुळे लोकशाही धोक्यात येत चालली आहे’ हा विषय घेऊ या. नरेंद्र मोदी हे चौथी पास पंतप्रधान आहेत असे भाषण अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत केले. नरेंद्र मोदी यांची खूप टर उडविली. या भाषणाबद्दल त्यांना काही अटक झाली नाही. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ‘’मोदी हे जहरीला साप आहेत” असे म्हणाले, त्यांनाही अटक झाली नाही. मोदी यांच्यावर विनोद केले जातात, त्यांना अटक होत नाही. वर्षाला कैक हजार चित्रपट प्रदर्शित होतात. ते असंख्य विषयांवरील असतात. राजकीय, धार्मिक, सामाजिक चित्रपटांवर बंदी घातली जात नाही. भारतातील कुणीही सार्वजनिक चौकात उभा राहून मोदी यांची धोरणे कशी चुकीची आहेत यावर भाषण करू शकतो, त्याला अटक होण्याची शक्यता शून्य. ज्या राजनेत्यांना मोदींनी अटक केली, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे फार गंभीर गुन्हे आहेत. त्यांची नावे आपणा सर्वांना माहीत आहेत. लोकसभेच्या सभापतींनी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून टाकले आहे. ही संसदीय प्रक्रिया आहे. ते लोकशाहीविरोधी आहे, असे म्हणणे म्हणजे लोकशाहीचे अज्ञान व्यक्त करण्यासारखे आहे.
नरेंद्र मोदी आणि श्रीमती इंदिरा गांधी यांची तुलना नाही, पण थोडा विचार करू. श्रीमती इंदिरा गांधी कर्तृत्ववान होत्या, धाडसी होत्या, राजकारणधुरंधर होत्या, पण त्यांची प्रवृत्ती हुकूमशहाची होती. त्यांनी देशावर आणीबाणी लादली. राज्यघटनेच्या कलमांचा दुरुपयोग करून त्यांनी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला. सगळी गुणवत्ता असूनही त्या लोकरोषास कारणीभूत झाल्या. त्यामुळे 1977 साली त्यांची सत्ता गेली. नरेंद्र मोदी राजकीय गुणांच्या बाबतीत श्रीमती इंदिरा गांधीपेक्षा चार पावले पुढेच आहेत. सामान्य जनतेला ते हुकूमशहा वाटत नाहीत, प्रजेच्या दृष्टीने त्यांची प्रतिमा रक्षणकर्त्या पित्यासारखी आहे. जनतेने आपल्याला शिव्या घालाव्यात असे एकही काम त्यांनी केले नाही. विरोधी पक्षांच्या ऐक्याचा पहिला मु्द्दा असा निकाली निघतो.
ऐक्याचा दुसरा मुद्दा समर्थ विरोधी पक्षनेत्याचा आहे. या रांगेत अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, शरदराव पवार, के.सी. राव, नितीश कुमार, अखिलेश यादव इत्यादी नेते येतात. राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या नावांचादेखील विचार करायला पाहिजे. उद्धवभक्तांनी दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनाच पंतप्रधान करून टाकले. देशाचा भावी पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पाहणारी ही मंडळी आहेत. यातील अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, शरदराव पवार हे अतिशय धूर्त राजकारणी आहेत. ऐक्याच्या पहिल्या चालीत ते परस्परांचा अंदाज घेतात. एकमेकांना पारखून घेतात. या चौघांनाही एक गोष्ट माहीत आहे की, एकमेकांच्या प्रभावक्षेत्रात दुसर्याचा काहीच उपयोग नाही. केजरीवालचा उपयोग महाराष्ट्रात नाही, शरदराव पवारांचा दिल्लीत उपयोग नाही. नितीशचा बंगालमध्ये उपयोग नाही आणि ममतांचा बिहारमध्ये उपयोग नाही.
इसापने एक गोष्ट सांगितली आहे. एकदा देवमासा आणि सिंह यांच्यात मैत्रीचा तह झाला. एकमेकांनी एकमेकांच्या मदतीला धावून जायचे, अशी तहाची अट होती. एकदा सिंहाची लढाई दुसर्या सिंहाशी झाली. मदतीसाठी त्याने देवमाशाला बोलाविले. देवमासा समुद्राच्या किनार्यापर्यंत आला, पण तो जमिनीवर येऊ शकला नाही. सिंहाने आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरविले आणि समुद्रकिनारी येऊन देवमाशाला म्हणाला की, “बरा मैत्रीचा धर्म पाळलास तू.” देवमासा म्हणाला की, “अरे, मी पाण्यात बलवान आहे, जमिनीवर मी शक्तिहीन आहे. तू दुसर्या सिंहाला पाण्यात घेऊन आला असतास तर त्याला मी खाऊन टाकले असते.” पवार-केजरीवाल, केजरीवाल-नितीशकुमार, नितीशकुमार-ममता बॅनर्जी यांची युती अशी आहे. पवारांच्या पगडी-पागोट्याचा उपयोग दिल्लीत नाही आणि केजरीवालची फुकटखाऊ वृत्ती महाराष्ट्राला नको आहे.
विरोधी ऐक्याच्या युतीचे तीन पर्याय समोर येतात -
1. काँग्रेसबरोबर सर्व पक्षांनी युती करणे.
2. काँग्रेस सोडून सर्व विरोधी पक्षांनी युती करणे.
3. प्रादेशिक पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मुक्तहस्त देणे.
यापैकी एक पर्यायीं जर प्रत्यक्षात आला, तर नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध भक्कम आघाडी उभी राहू शकते. पहिला पर्याय काँग्रेसशी युती करण्याचा आहे. केजरीवाल, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, के.सी. राव, स्टॅलिन, केरळचे पिनाराई हे काँग्रेसशी युती कशाला करतील? काँग्रेसशी युती म्हणजे त्यांच्या त्यांच्या राज्यात काँग्रेसला बळ देण्यासारखे आहे, ही गोष्ट ते कदापि करणार नाहीत. काँग्रेसला संपवूनच ते ते पक्ष त्या त्या प्रदेशात उभे राहिले आहेत, ते काँग्रेसचे पुनरुज्जीवन कशाला करतील?
काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी याला तसा काही अर्थ नाही. शरद पवार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितीशकुमार, डी.एम.के, के. राव यांचा पक्ष हे शंभर टक्के प्रादेशिक पक्ष आहेत. अखिल भारतीय राजकारणात त्यांना काही स्थान नाही. सगळ्या भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्याइतके कोणाचे प्रभावी व्यक्तिमत्त्व नाही. अखिल भारतीय राजकीय संघटन ते बांधू शकत नाही. त्यांची युती म्हणजे मी माझ्या घरात नाचतो, तू तुझ्या घरात नाच आणि दूरवरून आपण आपल्या नाचाची प्रशंसा करीत राहू.
शेवटचा मुद्दा येतो, समान कार्यक्रम आखण्याचा. त्यांच्या समान कार्यक्रमातील मुख्य मुद्दा ’मोदी नको’ हा राहील. मोदी का नको? तर..
* मोदी यांनी आयोध्येत रामजन्मस्थानावर राममंदिर बांधले आहे, मुसलमानांचा त्याला विरोध आहे.
* मोदी यांनी 370 कलम हटविले. काश्मीरमधील मुसलमानांना ते परत हवे आहे.
* मोदी यांनी काशीचे सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे हिंदू प्रसन्न झाले आहेत.
* मोदी यांनी पाकिस्तानला आणि चीनला त्यांच्या भाषेत उत्तरे दिली आहेत. यामुळे शरणागत वृत्ती संपली आहे.
* मोदी यांनी देशाला आर्थिक महासत्ता बनवीत आणले आहे. त्यामुळे समाजवादातील गरिबी वितरणाचा कार्यक्रम संपला आहे.
* मोदींच्या काळात सर्व साधुसंतांचा सन्मान होऊ लागला आहे. भारतातील अन्य धर्मीय सर्वात सुरक्षित जीवन भारतात जगतात.
* मोदी भारताला विश्वगुरुपदावर घेऊन चालले आहेत.
समान कार्यक्रम आखताना विरोधी पक्षांना या सर्व विषयांना पर्याय द्यावा लागेल. डावे विचारवंत या सर्व विरोधी दलाची डोकी आहेत. ते कोणता पर्याय देतात, हे आपण बघू या.