@रमेश पतंगे
पाटण्याला 23 जूनला 15 विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. 2024ची निवडणूक हा बैठकीचा मुख्य विषय होता. या बैठकीचा वृतान्त सर्व प्रसिद्धीमाध्यमांतून तपशीलवार आलेला आहे. या बैठकीबद्दल दोन तीव्र प्रतिक्रिया आहेत. पहिली प्रतिक्रिया भाजपाची आहे, ती तिखट आहे आणि दुसरी प्रतिक्रिया पंधरा नेत्यांच्या समर्थकांची आणि पंधरा नेत्यांची आहे. ही प्रतिक्रिया एका वाक्यात सांगायची, तर ‘भाजपाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. 2024नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील.’ भाजपाची प्रतिक्रिया एका वाक्यात सांगायची, तर ही ‘महाठगांची बैठक होती. 2024साली भाजपाला लोकसभेच्या 350 ते 400 जागा मिळतील.’ कोणाचे म्हणणे खरे होईल हे ईश्वर जाणे.
लोकशाहीत अनेक पक्ष असतात. त्यांच्या वेगवेगळ्या विचारधारा असतात. सत्तेसाठी ते संघर्ष करीत राहतात. जर्मनी, ब्रिटन आणि इस्रायल यांचे उदाहरण घेऊ या. जर्मनीच्या निवडणूक पद्धतीनुसार कोणत्याही एका पक्षाला कधीही बहुमत मिळत नाही. तेथील राजकीय पक्ष रेड, ग्रीन, यलो या रंगांनी ओळखले जातात. ज्याचे संख्याबळ अधिक असते, तो इतरांना बरोबर घेऊन संमिश्र सरकार बनवितो. त्या पक्षाच्या रंगावरून सरकार ग्रीन, यलो, रेड अशा प्रकारे ओळखले जाते.
ब्रिटनमध्ये आपल्यासारखी संसदीय पद्धती आहे आणि ब्रिटनमध्ये संमिश्र सरकार अपवादाने सत्तेवर येते. 2010 साली कॅमेरॉन आणि क्लेग यांचे संयुक्त सरकार अधिकारावर आले. इस्रायलमध्ये संमिश्र सरकार येण्याची प्रथा आहे. आत्ताचे पंतप्रधान नेत्यानहू हे संमिश्र सरकारचे पंतप्रधान आहेत. या लोकशाही देशांमध्ये राजकीय मतभिन्नता भरपूर आणि कधीकधी टोकाची असते, परंतु राष्ट्रीय मतभिन्नता शून्य असते. देशाचे शत्रू आणि मित्र यांच्याबद्दलच्या सर्व पक्षांच्या धारणा समान असतात. जर्मनीतील कोणताही राजकीय पक्ष रशिया आपल्या जवळचा मित्र आहे असे म्हणत नाही. आणि इस्रायलचा कोणताही राजकीय पक्ष सिरिया किंवा इजिप्त हे आमचे परममित्र आहेत असे म्हणत नाहीत. ब्रिटनमधील कोणताही राजकीय पक्ष असे म्हणत नाही की, आमच्या देशात ज्याला वाट्टेल त्याने स्थलांतरित होऊन यावे. ज्याला इमिग्रेशन म्हणतात, त्यावर बंधने आहेत. राष्ट्रीय हिताच्या बाबतीत सगळे पक्ष एक असतात.
पाटण्याला एकत्र झालेले पंधरा पक्षांचे राजकीय स्वार्थाच्या बाबतीत एकमत आहे, राष्ट्रहित कोणाच्या विषयसूचीवर असेल असे काही वाटत नाही. लालूप्रसाद यादव, ओमर अब्दुल्ला, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, शरदराव पवार यांना राजकीय तीक्ष्ण दृष्टी आहे, त्यांना गहन राष्ट्रीय दृष्टी आहे असे त्यांचा इतिहास सांगत नाही. तसे मानणे म्हणजे औरंगजेब हा धर्मसहिष्णू बादशहा होता असे मानण्यासारखे होईल. या सर्वांचा राजकीय स्वार्थ सत्ता मिळविण्याचा आहे. नितीश कुमार, शरदराव पवार, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी या सर्वांचा डोळा पंतप्रधान या पदावर आहे, असण्यात काहीही चूक नाही. मोदी पंतप्रधानपदाचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत.
या सर्वांना पंतप्रधानरूपी हरणाची शिकार करायची आहे. इसापने एक गोष्ट सांगितली आहे - एका जंगलात सिंह, कोल्हा आणि लांडगा अशा तिघांनी मिळून एक महायुती तयार केली. जंगलात पिंपळ वृक्षाखाली बैठक घेतली. शिकारीची योजना आखली. शिकारीचा दिवस ठरविला आणि खूप प्रयत्न करून एका हरणाची शिकार केली. सिंह महाराज लांडग्याला म्हणाले, “या शिकारीचे चार भाग कर.” लांडग्याने चार भाग केले. नंतर सिंह म्हणाला, “या जंगलाचा राजा म्हणून एक भाग माझा आणि शिकार केली म्हणून दुसरा भागही माझा, तुम्हा सर्वांना एकत्र केले आणि योजना केली म्हणून तिसरा भागही माझाच, आणि तुम्हाला तुमच्या जिवाची काळजी असेल तर चौथा भाग सोडा आणि चालायला लागा.” या महायुतीतील सिंह म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. त्याशिवाय युतीला अखिल भारतीय रूप येत नाही. त्याचे राजे आहेत राहुल गांधी. ते काय म्हणणार हे इसापने दोन हजार वर्षांपूर्वी सांगितले.
सत्तेसाठी एकत्र झालेल्या पंधरा पक्षांचा धोका भाजपाला आहे आणि त्यांचे आव्हान पेलण्यास भाजपा समर्थ आहे. भाजपाने कोणती रणनिती आखावी आणि काय करावे, हे भाजपाला कुणी सांगण्याची गरज नाही. निवडणुकांचे रणांगण हा त्यांचा रोजचा विषय आहे. ते या सर्वांना पुरून उरतील का? त्यांचे काय होईल? असल्या प्रश्नांच्या चिंता आपण करण्याचे कारण नाही. त्यांच्या चिंता करण्यास ते सक्षम आहेत. आपल्यापुढील चिंतेचा विषय थोडा वेगळा आणि गंभीर आहे. हा धोका राष्ट्रीय आहे, राष्ट्रापुढचा आहे. राष्ट्रीय अस्मितेपुढील आणि राष्ट्रभावापुढील धोका आहे.
वर ब्रिटन, जर्मनी आणि इस्रायल यांची उदाहरणे दिली आहेत. इथे राष्ट्रीय प्रश्नांवर कुणी राजकारण करीत नाही. आपल्या देशात पाकिस्तानचा उदोउदो करणारे राजनेते आहेत. महाक्रूर औरंगजेबाचे गुणगान करणारे राजनेते आहेत. परदेशात जाऊन भारतीय लोकशाही धोक्यात आहे म्हणून तुम्ही हस्तक्षेप करा असे सांगणारे राजनेते आहेत. चीनचे समर्थन करणारे राजकीय पक्ष आहेत. हिंदूंनी संघटित होऊ नये, वेगवेगळ्या जातींत विभक्त राहावे यासाठी पगडी-पागोट्याचे राजकारण करणारे राजनेते आहेत. राज्यघटनेचे 370 कलम हटविल्याबद्दल विलाप करणारे राजनेते आहेत. समान नागरी कायदा नको म्हणणारे अनेक राजकीय पक्ष आहेत. हे पक्ष त्यांची विचारधारा आणि त्यांचे नेते राष्ट्रापुढे अतिशय भयानक संकटे निर्माण करतील.
इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर एकदा म्हणाल्या, “आमच्याकडे एक गुपित शस्त्र आहे, ते म्हणजे आम्हा ज्यूंना इस्रायलनंतर समुद्राचा तळ आहे.” त्यांना असे म्हणायचे होते की, आपल्याला इंच इंच भूमीसाठी लढावे लागेल, अन्यथा समुद्राच्या तळाशी जावे लागेल. व्हिएतनामचे हो ची मिन्ह म्हणाले होते, “राष्ट्रवाद हे आमचे गुप्त शस्त्र आहे.” भारत हिंदुस्थान आहे. हिंदुस्थानातील हिंदूंना इस्रायलप्रमाणे फक्त समुद्र आता उरला आहे. गांधार गेला, बलुचिस्तान गेला, सिंध गेला, अर्धा पंजाब गेला, अर्धा बंगाल गेला, उरलेला बंगाल घालविण्याचे राजकारण ममता करीत आहेत. आपल्या सुरक्षेचे प्रश्न जबडा वासून समोर उभे आहेत. अनेक वर्षांपूर्वी विवेकने ‘तुमचा नातू हिंदू राहील का?’ या शीर्षकाचा अंक केला होता. तेव्हा त्याने खळबळ माजवून दिली होती.
सत्तेला हपापलेल्या पंधरा जणांना कमी लेखून नाही चालणार. त्यांची हेटाळणी किंवा टिंगळटवाळी करणे सोशल मीडियावर सोपी गोष्ट आहे. सोशल मीडियावरील वीर म्हणजे घरात बायकोच्या नथीतून बाण मारणारे नेमबाज हनुमंतराव असतात. रणांगणात त्यांची विजार ओली होते. आपल्याला 2024ची निवडणूक आपल्या अस्तित्वरक्षणासाठी लढायची आहे. आम्हाला भारत सनातन भारत ठेवायचा आहे. सनातन भारताची संस्कृती वर्धिष्णू करायची आहे. सामाजिक ऐक्य निर्माण करून वैभवसंपन्न भारत उभा करायचा आहे. भारतमातेला विश्वगुरुपदावर नेऊन बसवायचे आहे. नरेंद्र मोदी हे आपल्या आकांक्षाचे प्रतीक आहेत. लढायचे त्यांच्यासाठी नसून आपल्या आकांक्षासाठी लढायचे आहे. ही व्यक्तिमहात्म्याची किंवा व्यक्तिपूजेची लढाई नाही, राष्ट्रभाव संवर्धनाची लढाई आहे आणि ती आपल्यापैकी प्रत्येकाला लढायची आहे.