लोकशाहीवादी पक्ष म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेत असले, तरी ते एकाधिकारशाही, घराणेशाही जपणारे पक्ष आहेत. शरद पवार यांचा पक्ष त्याला अपवाद नाही. त्यामुळे शरद पवार यांनी राजीनामा दिला असला, तरी शेवटपर्यंत सूत्रे पवारांकडेच असणार आहेत, हे उघड सत्य आहे. आता फक्त पवार आपल्या जागी कोणाला बसवतात हे पाहणे बाकी आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील सत्तासंघर्षातून शरद पवार मार्ग काढणार की आपल्या आज्ञेत राहील अशा व्यक्तीला पुढे करणार, हे लवकरच कळेल.
‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या आत्मकथनाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. 2015नंतरच्या राजकीय परिस्थितीवर या सुधारित आवृत्तीत भाष्य केले असून महाविकास आघाडीची स्थापना, शरद पवारांनी नेमलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेला कारभार यावर पवारांनी आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. इतके दिवस विरोधी पक्षांनी आणि सर्वसामान्य लोकांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी जे म्हटले, त्याला आपल्या लेखनातून शरद पवार यांनी दुजोरा दिला आहे. याच पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. खरे तर तेच अध्यक्ष आणि सर्वेसर्वा असलेल्या पक्षात त्यांनी राजीनामा कोणाकडे सादर केला, हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. मात्र शरद पवार यांनी राजीनाम्याचा मनोदय व्यक्त केला आणि मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात एका वेगळ्या राजकीय नाट्याला प्रारंभ झाला, असे म्हणायला हरकत नाही. शरद पवार यांची कोणतीही कृती निरर्थक नसते. त्यांच्या प्रत्येक कृतीस अर्थ असतो आणि संबंधित तो अचूकपणे घेत असतात. पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील राजीनामा नाट्यही अशा अनेक अर्थांचे सूचक आहे. शरद पवार यांनी नुकताच भाकरी फिरवण्याचा मनोदय व्यक्त केला होता आणि पवार आता कुणाचा पत्ता कट करणार, याची अटकळ बांधण्याआधीच त्यांनी स्वत:च्या राजीनाम्याची घोषणा करून धक्का तंत्र अवलंबले आहे. अर्थात हे सहजासहजी झाले नाही. मागील काही दिवसांत घडलेल्या घटना लक्षात घेतल्या, तर शरद पवारांनी अशी भूमिका का घेतली असावी, हे लक्षात यायला वेळ लागणार नाही.
नुकताच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून यापुढे पक्षाला काम करावे लागणार आहे. शरद पवारांनी निर्माण केलेल्या महाविकास आघाडीमध्ये सारे आलबेल आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आघाडी टिकवून ठेवण्याचे दिव्य पवारांना करावे लागते आहे. स्वपक्षात असणारी धुसफुस हीसुद्धा शरद पवारांसमोरची डोकेदुखी आहे. अजित पवारांनी आपली राजकीय अभिलाषा लपवून न ठेवता याआधी वेगळे मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मुलगी की पुतण्या?’ हे द्वंद्व शरद पवारांसमोर कायम उभे आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. शरद पवारांनी आपल्या राजीनाम्याचा पुन्हा विचार करावा, अशी मागणी त्याच सभागृहात जोर धरू लागली. या घटनाक्रमात दोन वेगवेगळी दृश्ये समोर आली आहेत. सुप्रिया सुळेंच्या चेहर्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव नव्हता, होते हास्यच. सुप्रिया सुळेंचा वावर एकूणच घटनाक्रमाविषयी आनंद व्यक्त करणारा होता. अजित पवारांनी शरद पवारांच्या राजीनाम्याचे जोरदार समर्थन केले असून नवीन नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. तर दुसर्या बाजूला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड अशा दिग्गजांच्या डोळ्यात गंगा-यमुना प्रकट झाल्या. जणू काही शरद पवारांनी पद सोडले आणि खूप मोठी राजकीय उलथापालथ झाली. पक्षाच्या स्थापनेपासून तहहयात अध्यक्ष असलेले शरद पवार स्वखुशीने अध्यक्षपदाचा राजीनामा देतात, तेव्हा केवळ वय, आरोग्य याच गोष्टी कारणीभूत असतात असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
परदेशी नेतृत्वाचा मुद्दा पुढे करत शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केली, तेव्हा त्यांच्यासोबत तारिक अन्वर आणि पी.ए. संगमा हे नेते होते. मात्र पक्ष पवारांच्या ताब्यात राहिला. लोकशाही, संविधान यांचे उठता-बसता स्मरण करणारे शरद पवार स्थापनेपासून कायम अध्यक्ष राहिले. मी सांगेन ती दिशा आणि मी ठरवेन तो नेता अशी एकाधिकारशाही शरद पवार आपल्या नेतृत्वाखाली राबवत आले आहेत. पक्षाला त्यांच्या या एकाधिकारशाहीची इतकी सवय लागली की पक्ष त्यांना राजीनामा द्यायला विरोध करत आहे. शरद पवार यांनी तहहयात अध्यक्षपदी राहावे असा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला असला, तरी शरद पवार काय भूमिका घेतील हे शेवटपर्यंत सांगता येत नाही. शरद पवारांनी या निमित्ताने अनेक पातळ्यांवर चाचणी घेतली असून पक्षाची संभाव्य फूट कशा प्रकारे टाळता येईल, याचे प्रात्यक्षिक केले आहे.
देशातील सर्व प्रादेशिक पक्षांचा इतिहास पाहिला, तर असे लक्षात येते की हे पक्ष लोकशाहीवादी पक्ष म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेत असले, तरी ते एकाधिकारशाही, घराणेशाही जपणारे पक्ष आहेत. शरद पवार यांचा पक्ष त्याला अपवाद नाही. त्यामुळे शरद पवार यांनी राजीनामा दिला असला, तरी शेवटपर्यंत सूत्रे पवारांकडेच असणार आहेत, हे उघड सत्य आहे. आता फक्त पवार आपल्या जागी कोणाला बसवतात हे पाहणे बाकी आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील सत्तासंघर्षातून शरद पवार मार्ग काढणार की आपल्या आज्ञेत राहील अशा व्यक्तीला पुढे करणार, हे लवकरच कळेल. शरद पवार यांनी काहीही निर्णय घेतला, तरी तो जनाधार, विश्वास आणि सत्ता यासाठी किती पूरक असेल, हे काळच ठरवेल.