एक प्रेम सज्ञानी दुजा घमेंडी अज्ञानी

विवेक मराठी    26-Apr-2023   
Total Views |
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघशाखेची उपज आहेत. या शाखेवर मिळणारे शिक्षण कुठल्याही शाळेत मिळत नाही. आपला देश काय आहे, आपले लोक काय आहेत, आपली संस्कृती कोणती आहे, आपले पूर्ववैभव कसे होते, आपले श्रेष्ठ तत्त्वज्ञान काय आहे, आपला भव्य वारसा काय आहे, तो कसा समृद्ध करायचा, आणि त्यासाठी मला काय केले पाहिजे, याचे ही शाखा शिक्षण देते. सतराशेसाठ आयआयटीयन केजरीवाल जरी एकत्र आले तरी, या ज्ञानाची बरोबरी ते करू शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी असे ज्ञानी आहेत.

modi

अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली विधानसभेत 17 एप्रिलला भाषण झाले. ‘एक होता राजा..’ असे म्हणून त्यांनी भाषणाची सुरुवात करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कहाणी सांगितली. नरेंद्र मोदी यांचे शिक्षण चौथी पास आहे, ते अत्यंत घमेंडखोर आहेत, त्यांना विरोध सहन होत नाही, या महान देशाच्या राजाला राणी नाही, गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला, बालपणी तो स्टेशनवर चहा विकत होता, त्यांना अर्थशास्त्रातले काही समजत नाही, नोकरशहा त्यांच्यापुढे फाइल ठेवतात आणि ते त्याच्यावर सह्या करतात, देश कसा चालवायचा त्यांना समजत नाही, महागाई प्रचंड वाढली असून जनता त्यात होरपळून निघत आहे..’
 
 
भाषण करणारे अरविंद केजरीवाल आणि ऐकणारे त्यांच्या पक्षातील सभासद आणि मंत्री होते. ते टाळ्या पिटून केजरीवालांच्या भाषणाची प्रशंसा करीत होते. तेव्हा मला या संस्कृत सुभाषिताची आठवण झाली.
 
 
 
उष्ट्राणां च गृहे लग्नं गर्दभा: स्तुतीपाठका:।
 
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपंमहो ध्वनि:॥
 
 
याचा अर्थ असा होतो की, उंटाच्या घरी लग्न होते आणि गाढव त्याची प्रशंसा करीत होते. तो म्हणत होता, काय उंटाचे सुंदर रूप आहे आणि उंट गाढवाला म्हणत होता, गाढवाचा आवाज किती गोड आहे. अशी एकमेकांची स्तुती चालली होती. दिल्ली विधानसभेत हे संस्कृत सुभाषित त्याच्या अर्थासहित अवतरले, असे म्हणायला पाहिजे.
 
 
त्याच वेळी मला भगवान गौतम बुद्धांची एक जातक कथा आठवली. बोधिसत्त्व पक्षिकुळाचा राजा होता. त्याने आपल्या उपवर मुलीचे लग्न काढले. तो मुलीला म्हणाला की, “मी सर्व पक्ष्यांची सभा बोलवितो, तुझ्या पसंतीचा नवरा तू निवड.” याप्रमाणे सर्व पक्षी एकत्र आले. राजकन्येने मोराची निवड केली. आपली निवड झाली हे पाहून मोराला खूप आनंद झाला आणि तो पिसारा वर करून नाचायला लागला. त्यामुळे त्याचे ढुंगण उघडे पडले. हे पाहून राजकन्या ओशाळली आणि ती म्हणाली, “असला बेशरम नवरा मला नको.”
 
 
दिल्ली विधानसभेतील केजरीवाल यांचा नंगानाच पाहून दिल्लीतील जनता काय निर्णय करील, हे आपण बघू या, त्यासाठी वाट बघावी लागेल. जनतेच्या शहाणपणावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही.
 
 
या केजरीवालांनी सर्व संकेत रसातळाला घालवून देशातील सर्वांत लाडक्या पंतप्रधानांची विधानसभेसारख्या पवित्र जागी खिल्ली उडविली. त्यांनी कोट्यवधी भारतीयांचा घोर अपमान केला आहे. प्रत्येकाने जोडे मारले, तरी त्याची भरपाई होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आई-बाप तर काढलेच, पण पत्नीलादेखील त्यांनी गोष्टीत आणले. चौथी पास मुख्यमंत्री, चौथी पास राजा अशी त्यांची खिल्ली उडविली.
 
 
modi
 
अरविंद केजरीवाल हे खडकपूर आयआयटीचे मेकॅनिकल इंजीनिअर आहेत. आयआयटीत शिकणार्‍या बहुसंख्य मुलांना असे वाटत असते की, आपण म्हणजे समाजातील बुद्धिमत्तेचे लोणी आहोत. आपल्यासारखे आपणच, बाकी सर्व चौथी पास. केजरीवाल हे राजकारणात येण्यापूर्वी नोकरशहा होते. इनकम टॅक्स विभागात मोठे अधिकारी होते. राजकारणाचा किडा त्यांना कधी चावला हे नाही सांगता येणार, पण अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनात सहभागी होऊन, अण्णांसोबत राहून त्यांनी भरपूर प्रसिद्धी मिळवून घेतली. आम आदमी पार्टीची स्थापना करून त्यांनी हा प्रसिद्धीचा चेक वटविला. अण्णांना गांधी टोपी घातली आणि स्वत:च्या डोक्यावर आपची टोपी ठेवली. ही टोपी म्हणजे अण्णांचा विश्वासघात. सत्तेची हाव आणि इतरांना कमालीचे तुच्छ लेखण्याची मनोवृत्ती. आपच्या टोपीचे हे तीन रंग आहेत.
 
 
 
केजरीवाल आयआयटीयन असल्यामुळे जगातील सर्व ज्ञान माझ्याकडेच आहे, अर्थशास्त्राचे ज्ञान माझ्याकडे आहे, प्रशासकीय ज्ञान माझ्याकडे आहे, कायद्याचे ज्ञान माझ्याकडे आहे ही त्यांची उतू जाणारी घमेंड आहे. हे घमेंडीचे पाणी आज ना उद्या त्यांना डबके करून बुडवील. तोपर्यंत आपण थांबू या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मी किती महान आहे, तर मी आयआयटीयन आहे आणि मोदी काहीच नाहीत. त्यांचा चेहरा त्यांचे डोळे आणि त्यांचे ओठ, ओठांची रचना, नाकाला असलेला थोडासा बाक याचे बारकाईने निरिक्षण करा, त्यावरून व्यक्तीच्या स्वभावाचे काही ठोकळे बांधता येतात.
 
 
अरविंद केजरीवाल अत्यंत धूर्त आहेत. कोणतीही राजकीय विचारसरणी नसलेला हा राजनेता आहे. त्यांची नीती एकच - जनतेला फुकट देण्याची वचने द्यायची. वीज फुकट, पाणी फुकट, अन्न-धान्य फुकट, सर्व काही फुकट मिळेल. फुकट द्यायला त्यांच्या बापाचे काय जाते? आहे ते सर्व जनतेचे. अशी फुकट वाटप करून, मतदारांना गुंगवून ते दोनदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी दिल्लीचा विकास केला म्हणजे काय केले? फुकट खाणारी एक पिढी तयार केली.
 
 
 
फुकट खाण्याची वृत्ती असंख्य शारीरिक आणि सामाजिक रोगांना जन्म देणारी आहे. आळस, काम न करण्याची वृत्ती, काम टाळण्याची वृत्ती, मोकळा वेळ भरपूर असल्यामुळे व्यसनाधीनता, समाजघातक उद्योग हे सर्व फुकट्या मनोवृत्तीतून तयार होते. केजरीवालांना सत्ता पाहिजे. व्यक्तीच्या आर्थिक आणि नैतिक तसेच सामाजिक उन्नतीचे त्यांना काही पडलेले नाही. त्यांच्यावर बदनामीचे असंख्य खटले झाले आणि यातील बहुतेक खटल्यात त्यांनी तक्रार करणार्‍यांची बिनशर्त माफी मागितली. जेटली यांची त्यांना माफी मागावी लागली आणि गडकरींचीदेखील माफी मागावी लागली. राहुल गांधी यांना माफीवीर हवे आहेत. त्यांच्या घराशेजारीच मॅगसेसे पुरस्कारप्राप्त माफीवीर राहात आहे. गुजरात विद्यापीठाने केजरीवाल यांना कोर्टात खेचले आहे. विद्यापीठाने मोदींना खोटी पदवी दिली, असा केजरीवाल यांचा आरोप आहे. पिसारा फुलवून नाचण्याची सवय झाली की काय उघडे पडले आहे, हे नाचणारा बघत नाही.
 
 
 
देश मोदींच्या पदवीची चर्चा करीत नाही आणि तसेही पदवीला काहीही अर्थ नसतो. कागदाचे एक भेंडोळे याशिवाय तिला फारशी किंमत नसते. नोकरी मिळविण्यासाठी पदवी असणे आवश्यक असते, म्हणून पदवी मिळवायची. पदवीने ज्ञान मिळत नाही. ज्ञान मिळविण्यासाठी साधना करावी लागते. आणि पदवीसाठी परीक्षेतील प्रश्नांचा अभ्यास करावा लागतो. परीक्षेचे ज्ञान पुस्तकातून येते आणि साधनेतून ज्ञान आतून येते. ते अतिअतिश्रेष्ठ असते. रामकृष्ण परमहंस कुठल्याही शाळेत गेले नाहीत, पण त्यांनी देशाला विवेकानंद दिले. शिवाजी महाराजांच्या चरित्रात बाल शिवाजी शाळेत जात होता, असा उल्लेख नाही. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची प्रखर ऊर्जा निर्माण केली. आयआयटीच्या या केजरीवाल नावाच्या पदवीधराने फुकट खाऊंची फौज तयार केली. आयआयटी असेच शिक्षण देते का? असा प्रश्न जर कोणी विचारला तर अन्य आयआयटीयन्स यांनी रागावू नये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघशाखेची उपज आहेत. या शाखेवर मिळणारे शिक्षण कुठल्याही शाळेत मिळत नाही. आपला देश काय आहे, आपले लोक काय आहेत, आपली संस्कृती कोणती आहे, आपले पूर्ववैभव कसे होते, आपले श्रेष्ठ तत्त्वज्ञान काय आहे, आपला भव्य वारसा काय आहे, तो कसा समृद्ध करायचा, आणि त्यासाठी मला काय केले पाहिजे, याचे ही शाखा शिक्षण देते. सतराशेसाठ आयआयटीयन केजरीवाल जरी एकत्र आले तरी, या ज्ञानाची बरोबरी ते करू शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी असे ज्ञानी आहेत.
 
 
हा देश माझा आहे, मी देशाचा आहे आणि मला देशासाठीच जगायचे आहे, या एका वाक्यातून त्यांचे ज्ञान प्रकट होते. देशातील गरिबी आणि अज्ञान मिटवून देशाला सक्षम करणे, उद्योगप्रवण करणे, कष्टाची आवड निर्माण करणे आणि सामूहिक शक्तीने भारतमातेला विश्वगुरू पदावर नेऊन बसविणे हे माझे ध्येय आहे. उगवता प्रत्येक दिवस ते यासाठी खर्च करतात. दारूच्या परवान्यामध्ये घोटाळे करून आणि भ्रष्टाचार करून आपल्या उपमुख्यमंत्र्याला तुरुंगात पाठविणार्‍या केजरीवाल यांना हे समजणे फार अवघड आहे.
 
 
पोथी पढि पढि जग मुआ, पंडित भया न कोय।
ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय॥
संत कबीर म्हणतात, ‘मोठमोठी पुस्तके वाचून जगातील अनेक जण काहीही ज्ञान न मिळविता स्मशानघाटावर जातात. यातील कोणीही विद्वान होत नाही. परंतु प्रेम या शब्दातील अडीच अक्षरे योग्य प्रकारे जाणून घेतल्यास तो पंडित झाल्याशिवाय राहात नाही.’ कबीरांना सांगायचे आहे की, मी तसा इतर या भावनेने सर्वांवर प्रेम करावे. कोणाचेही आई-बाप, बायको काढू नये. त्याच्या शिक्षणाची चर्चा करू नये. त्याच्या गुणाची चर्चा करावी. त्याल पंडित म्हणायचे. आणि याविपरीत जो वागेल, त्याला अरविंद केजरीवाल म्हणायचे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.