एखाद्या कलेचा आस्वाद कसा घ्यावा हे समजण्यासाठी आणि कलांविषयी प्रेम रुजवण्यासाठी नाट्य-चित्रकलादी शिबिरांचा उपयोग होतो. एखाद्याला त्यात विशेष रुची निर्माण झाली, तर तो त्या वाटेने पुढे वाटचाल करतो. अशा शिबिरात दाखल होणारे सगळेच कलाकार होत नाहीत, पण त्यांच्यातून रसिक नक्की तयार होतात. आपल्या मुलाचा स्वाभाविक कल ओळखून त्याप्रमाणे शिबिरांची निवड केली, तर मूल तिथे आनंदातही राहील आणि पाठ्यपुस्तकापलीकडचे मोलाचे काही त्याला गवसेल. अशा शिबिरांमध्ये सहभागी होणे हे त्यांना जुलमाचे वा कंटाळवाणे वाटणार नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाला फुलवणारा तो ऋतू असेल.
काही वर्षांपूर्वीपर्यंत घराघरांमधल्या शाळेत जाणार्या मुलांना उन्हाळ्याची किंवा दिवाळीची अशा मोठ्या सुट्ट्या सुरू झाल्या की घरातल्या सर्वांनाच आपापल्या मूळ गावी जाण्याचे वेध लागत. सुट्टीच्या काळात गावच्या घरात जमलेल्या गोकुळात दंगामस्ती करून आणि घरातले पदार्थ नि गावचा मेवा खाऊन ताजीतवानी झालेली मुले शहरातल्या घरी परतत असत. यापलीकडेही खूप काही त्यांच्या पोतडीत जमा होत असे. समूहात आनंदाने राहण्याची कला ते आत्मसात करीत आणि त्याचबरोबर अनेक कौशल्ये शिकण्याची संधी मुलांना मिळत असे. अनौपचारिकपणे होणारे हे सारे शिक्षण मुलांचे भावविश्व समृद्ध करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणारे असे. हळूहळू अनेक कारणांमुळे गावचे घर ही संकल्पना लयास गेली आणि अनौपचारिक शिक्षणाच्या या आनंदवाटा बंद झाल्या.
गावची बंद झालेली घरे, कुटुंबांचा लहान होत गेलेला आकार, शहरातली संपलेली मैदाने आणि आईवडिलांची वाढलेली व्यग्रता यामुळे सुट्ट्यांमधली पूर्वीची मजा कमी झाली. मुलांना सुट्टी, पण आईबाबांना वेळ नाही म्हणून घरात अडकून पडणे वाढले. मैदाने किंवा इमारतीत मोकळी जागा नसल्याने शेजारीपाजारी समवयीन मुले असली, तरी त्यांच्याबरोबर घरातल्या घरात वेळ घालवायचा. त्यातूनच आधी टीव्ही आणि त्यावरच्या वेगवेगळ्या वाहिन्या आणि अलीकडे मोबाइल गेम किंवा तत्सम काही हेच वेळ घालवण्याचे, मन रमवण्याचे एकमेव साधन होऊन बसले. त्यामागे निवडीपेक्षा परिस्थितीमुळे आलेली अपरिहार्यता जास्त होती. यावरचा उपाय म्हणून शिबिरांचा पर्याय समोर आला. अशी स्थिती येण्याआधीपासून नाट्यशिबिरे होती. भोसला मिलटिरी स्कूलची वैशिष्ट्यपूर्ण शिबिरेही होत होती. पण या शिबिरांना जाणार्यांची संख्या मर्यादित होती. जसे शिबिरांमध्ये वैविध्य येत गेले, तशी शिबिरांना जाणार्यांची संख्या वाढू लागली. हळूहळू ती नवी परंपरा वाटावी इतकी समाजजीवनाचा अपरिहार्य भाग झाली.
अनौपचारिक समूह शिक्षणासाठी उपलब्ध असलेला तो एक चांगला पर्याय आहे, हे लक्षात घेऊन विविध विषयांवर दर्जेदार शिबिरे आयोजित करणार्या व्यक्तींचे लेख या अंकात घेतले आहेत. यातून आपापल्या ठिकाणी मुलांसाठी शिबिरे योजताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करून आखणी करता येईल, याचे वाचकांना दिशादर्शन होईल अशी आशा आहे.
शालेय शिक्षणाच्या चौकटीत सर्वांगीण विकासाला आवश्यक अशा सर्वच कौशल्यांचा विकास होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्याला जीवनकौशल्ये म्हणता येतील, ती शिकण्याची बिनाचौकटीची व्यवस्था गरजेची असते. ही गरज अशा शिबिरांतून पूर्ण होते. काही शिबिरांचा उदाहरणादाखल विचार करू.
वाढीच्या वयात धाडस करण्याची जी खुमखुमी मुलांमध्ये असते, तिला योग्य वळण देण्याचे काम साहस शिबिरांमधून होते. जंगले ही आपल्या परिसंस्थेचा अविभाज्य भाग असतात. मात्र शहरी वातावरणात वाढणारी मुले या जगापासून सर्वार्थाने कोसो दूर असतात. त्यांना हात धरून तिथवर नेण्याचे काम अरण्यवाचन शिबिरे करतात. जंगल वाचायची पद्धत शिकवतात. त्यांच्यामध्ये निसर्गाविषयी डोळस प्रेम रुजवतात. त्यातूनच काहींना आपल्या आयुष्याचे ध्येय गवसते. पुढे जाऊन या विषयात सखोल अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होते. सगळेच जण या वाटेवर पुढे गेले नाहीत, तरी अशी शिबिरे निसर्गाविषयी-प्राण्यांविषयी संवेदनशीलता, आस्था रुजवण्याचे काम करतात. मनुष्य हा निसर्गाचा एक भाग आहे, एकमेव नाही ही समज आयुष्यभरासाठी विचारांची दिशा बदलते. गडकिल्ल्यांवर घेऊन जाणारी साहस शिबिरे पराक्रमी इतिहासाचे दर्शन तर घडवतातच, शिवाय अशा भटकंतीसाठी शारीरिक तंदुरुस्ती किती महत्त्वाची आहे, याची जाणीवही मुलांमध्ये रुजवतात.
जीवनव्यवहार कौशल्ये प्रत्येक मुलामुलीने शिकणे ही काळाची गरज आहे. अगदी घरातल्या ज्येष्ठांपासून बाहेरच्या व्यक्तीच्या श्रमांचे मूल्य त्यांना समजणेही आवश्यक असते. हे घरातल्या वडीलधार्यांनी पोहोचवायचा प्रयत्न केला, तरी बरीच मुले त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र शिबिरातल्या सत्रांमधून असे विषय जर त्यांच्यापर्यंत पोहोचवले, तर त्याचा उपयोग होतो. इथे एक उदाहरण द्यावेसे वाटते. सहावी ते नववीच्या वयोगटातल्या मुलांसाठी एका निवासी शिबिरात एक सत्र स्वयंपाकाचे असे. त्यांच्या वयाला जमतील असे पदार्थ करण्याची संधी त्यांना दिली जाई. उदाहरणार्थ - डाळ-तांदळाची खिचडी करण्याचे काम ज्या गटाकडे येई, त्या गटाने या पदार्थासाठी कोणते घटक पदार्थ लागतात आणि ते किती प्रमाणात लागतील याचा अंदाज बांधून त्याप्रमाणे पदार्थ मागावेत आणि या कामात गटातल्या सगळ्यांचा सहभाग असावा, अशी अट असे. शिवाय तयार झालेली खिचडी पूर्ण संपवण्याची जबाबदारीही गटाचीच असे. या एकाच सत्रातून खूप काही पोहोचवले जाई. पदार्थातील घटक माहीत असणे, त्यांचे नेमके प्रमाण माहीत असणे, त्यातले कामाचे टप्पे करता येणे, ती कामे वाटून घेता येणे, पदार्थ उत्तम होण्यासाठी नेमकी कृती माहीत असणे या सगळ्याची परीक्षा होई. एक साधा पदार्थ चविष्ट करायला किती कौशल्य आणि सराव लागतो, याची जाणीव या सत्रामुळे होई आणि त्यातून रोज प्रेमाने जेवू घालणार्या आईच्या कामाचे मोलही लक्षात येई.. एवढे सगळे एका सत्रातून, तेही हसतखेळत त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाई. शिबिर संपल्यावरही त्याचा परिणाम पुसला जात नसे.
एखाद्या कलेचा आस्वाद कसा घ्यावा हे समजण्यासाठी आणि कलांविषयी प्रेम रुजवण्यासाठी नाट्य-चित्रकलादी शिबिरांचा उपयोग होतो. एखाद्याला त्यात विशेष रुची निर्माण झाली, तर तो त्या वाटेने पुढे वाटचाल करतो. अशा शिबिरात दाखल होणारे सगळेच कलाकार होत नाहीत, पण त्यांच्यातून रसिक नक्की तयार होतात. पालकांनी शिबिरांची निवड डोळसपणे करावी. मुलाला कुठेतरी अडकवण्याची भूमिका असू नये. आपल्या मुलाचा स्वाभाविक कल ओळखून त्याप्रमाणे शिबिरांची निवड केली, तर मूल तिथे आनंदातही राहील आणि पाठ्यपुस्तकापलीकडचे मोलाचे काही त्याला गवसेल. अशा शिबिरांमध्ये सहभागी होणे हे त्यांना जुलमाचे वा कंटाळवाणे वाटणार नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाला फुलवणारा तो ऋतू असेल.