खलिस्तानवाद्यांना वेळीच वेसण घाला!

विवेक मराठी    02-Mar-2023   
Total Views |
पंजाबातील वाढती बेरोजगारी, त्यातून तरुणांमध्ये पसरणारी अस्वस्थता याचा गैरफायदा विघातक शक्ती उठवीत आहे. या विघातक शक्ती पसरविणारा म्होरक्या समवयस्क असेल, तर साहजिकच तरुणांचा ओघ आपसूकच तिकडे जातो. त्यातच राज्य सरकारही कमकुवत असेल, तर अशा शक्तींचे फावल्याशिवाय राहत नाही. या विघातक शक्तींना वेळीच वेसण घालणे गरजेचे आहे.
 
vivek
 
पंजाबातील अजनाला पोलीस ठाण्यावर हजारोंच्या जमावाने नंग्या तलवारी नाचवत केलेला हल्ला, गुरू ग्रंथ साहिबाला ढालीसारखे वापरल्याने पोलिसांचे बांधले गेलेले हात, ज्या आरोपीच्या सुटकेसाठी हा जमाव जमला होता, त्या ’वारिस पंजाब दे’ या संघटनेचा कार्यकर्ता असणार्‍या लव्हप्रीत सिंगची पोलिसांनी केलेली सुटका आणि त्यानंतर ’‘हा हिंसाचार नव्हेच, खरा हिंसाचार तुम्हाला अद्याप पाहायला मिळालेलाच नाही” अशी अमृतपाल सिंगची दर्पोक्ती या सगळ्या घडामोडींमुळे 1980च्या दशकातील रक्तरंजित पंजाबच्या धडकी भरविणार्‍या स्मृती पुन्हा जागृत झाल्याशिवाय राहणार नाहीत. ’वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग हा या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे. तो स्वत:स जर्नेलसिंग भिंद्रानवालेचा अनुयायी मानतो आणि त्याच्याप्रमाणेच शस्त्रधारी तरुणांच्या गराड्यात वावरतो. तो खलिस्तानचा उघड समर्थक आहे. वरकरणी जरी तो प्रवचनकार किंवा धर्मोपदेशक असला, तरी त्याचे अंत:स्थ हेतू मात्र आता लपलेले नाहीत. अमृतपाल सिंग गावोगावी दौरे करतो आणि प्रक्षोभक भाषणे करतो. त्याला तरुणांचा मिळणारा पाठिंबा डोकेदुखी वाढविणारा आहे, म्हणूनच या घडामोडींकडे केवळ अपवाद म्हणून न पाहता गांभीर्याने पाहणे आवश्यक.
 

vivek 
 
अमृतपाल सिंग कोण?
 
 
मुळात अमृतपाल सिंग या मार्गाला का लागला? हा प्रश्न आहे. याचे कारण त्याचे कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध अद्याप तरी पुढे आलेले नाहीत. किंबहुना मोना शीख (दाढी इत्यादी न राखणारा) असणारा अमृतपाल सिंग हा दुबईत वास्तव्याला होता. 1993 साली जन्मलेल्या अमृतपाल सिंगचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले आहे असे म्हणतात. अर्थात त्याबाबतदेखील दुमत आहे. त्याच्या कुटुंबीयांचा दुबईत मालवाहतूक करण्याचा व्यवसाय आहे आणि अमृतपाल सिंग त्याच व्यवसायात ’ऑपरेशनल मॅनेजर’पदी काम करायचा. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना सर्वाधिक विरोध हा पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांतील शेतकर्‍यांनी केला होता. 26 नोव्हेंबर 2020 रोजी पंजाबमधून आंदोलक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर दाखल झाले आणि त्यांनी घेराव घातला. त्यानंतर उणेपुरे वर्षभर ते आंदोलन चालले. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांतील शिखांनी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी त्या त्या ठिकाणी निदर्शने केली. 2021 सालच्या प्रजासत्ताक दिनी काही आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यावर हल्ला केला. आंदोलकांनी तेथे खलिस्तानचा ध्वज फडकविला, अशी वृत्ते समाजमाध्यमांवरून प्रसारित झाली होती. अर्थात त्यात तथ्य नव्हते, हे नंतर सिद्ध झाले. मात्र आंदोलकांनी तेथे शिखांचा धार्मिक ध्वज फडकविला होता. त्या हिंसक आंदोलनात दीप सिद्धू हा अभिनेतादेखील सहभागी होता आणि त्यामुळे तो टीकेचे लक्ष्य ठरला होता. कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी अमृतपाल सिंग दुबईहून भारतात आला होता. पंतप्रधान मोदी यांनी कालांतराने हे तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आणि शेतकर्‍यांचे आंदोलन स्थगित झाले. त्यानंतर अमृतपाल सिंग दुबईला परतला. तथापि ऑगस्ट 2022मध्ये तो भारतात पुन्हा आला आणि तेव्हा मात्र त्याचे स्वरूप पालटले होते, तद्वत पंजाबात राजकीय स्थित्यंतरदेखील झाले होते.
 
 
दरम्यानच्या काळात, म्हणजे 2021च्या उत्तरार्धात दीप सिद्धू याने पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका उंबरठ्यावर असताना ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेचा उद्देश सामाजिक आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देण्याचा नाही असा जरी दीप सिद्धूने दावा केला असला, तरी निवडणुकीत त्याने शिरोमणी अकाली दल (अमृतसर) या खलिस्तानवादी पक्षाचा प्रचार केला होता. विधानसभेत त्या पक्षाला यश मिळाले नाही, तरी मुख्यमंत्री झालेले आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या संगरूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक मात्र या पक्षाने जिंकली. सिमरनजीतसिंग मान यांना तेथे निसटता विजय जरी मिळाला असला, तरी आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या दणदणीत यशानंतर तीनच महिन्यांत हा उलटफेर झालेला होता, हे दुर्लक्ष करण्यासारखे नाही. अकाली दल (अमृतसर) हा पक्ष उघडपणे खलिस्तानचे सामर्थन करतो. अशा पक्षाचा प्रचार करणार्‍या दीप सिद्धूचा विधानसभा निवडणुकांच्या अगोदर काहीच दिवस वाहन अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर पाच महिन्यांनी अमृतपाल सिंगने त्या संघटनेची सूत्रे स्वत:कडे घेतली. वास्तविक दीप सिद्धूच्या कुटुंबीयांनी आपण अमृतपाल सिंगला ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचे प्रमुखपद दिलेले नाही, असे स्पष्ट केले आहे; मात्र अमृतपाल सिंग त्यांना जुमानण्यास तयार नाही. गेल्या काही महिन्यांत याच संघटनेच्या आडून तो फुटीरतावादी भूमिका घेत आहे, वादग्रस्तच नव्हे, तर प्रक्षोभक विधाने करीत आहे. शेतकरी आंदोलनात भाग घ्यायला आलेला अमृतपाल सिंग मोना शीख होता. मात्र आता त्याने आपली वेशभूषादेखील थेट भिंद्रानवालेसारखी केली आहे. तो पगडी घालतो. सहा फूट उंच आणि शिडशिडीत अंगकाठी असलेला अमृतपाल सिंग आपल्या विधानांनी गेला काही काळ चर्चेचा आणि मुख्य म्हणजे चिंतेचा विषय ठरला आहे. मात्र त्याचे हे रूपांतर नेमके कशामुळे झाले, हा कळीचा मुद्दा आहे. कृषी कायद्यांच्या वैधतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना ’खलिस्तानवाद्यांनी आंदोलक शेतकर्‍यांमध्ये घुसखोरी केली असल्याचा आणि बंदी असलेल्या संघटना या आंदोलनाला पेटविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा’ गुप्तहेर संघटनांचा अहवाल असल्याचे केंद्र सरकारने नमूद केले होते. त्याचा हा परिणाम नाही ना, हेही तपासणे गरजेचे. मात्र त्याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंजाबसारख्या सीमावर्ती राज्यात कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा अधिकच गंभीर. 1980च्या दशकातील जखमा विस्मरणात गेलेल्या नसताना भिंद्रानवाले 2.0 असा उल्लेख केला जात आहे, अशा अमृतपाल सिंगचा आकस्मिक उदय व्हावा ही चिंताजनक बाब होय.
 
 
फुटीरतावादाची बीजे
 
याचे कारण पंजाबात भिंद्रानवालेचा उदय अशाच राजकीय साठमारीतून झालेला होता. पंजाबात स्वातंत्र्यापासूनच काहीशी अस्वस्थता होती आणि पंजाबींचा स्वतंत्र ’सुभा’, पंजाबी भाषा आणि गुरुमुखी लिपी अशा मागण्या होऊ लागल्या होत्या. या मागण्यांमागे युक्तिवाद होता, तो म्हणजे हिंदुत्वाच्या प्रभावाखाली शीख म्हणून असलेली ओळख पुसली जाईल असा. मास्टर तारा सिंग आणि संत फतेह सिंग या अकाली दलाच्या दोन गटांच्या नेत्यांनी पंजाबचे राजकारण व्यापून टाकले होते. अर्थात नंतर तारा सिंग यांचे महत्त्व कमी झाले. अकाली दलालादेखील काहीशी पडती बाजू घ्यावी लागली, विशेषत: 1971च्या बांगला देश युद्धात भारताने मिळविलेल्या निर्णायक विजयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकप्रियता कमालीची वाढलेली होती. तेव्हा काही काळ जरी अकाली दलाने नमते घेतले, तरी त्यानंतर सातच वर्षांत अकाली दलाने संमत केलेल्या आनंदपूर साहिब ठरावाने पुन्हा फुटीरतावादाची बीजे रोवली गेली, असे म्हटले जाते. त्या ठरावामध्ये फुटीरतावादी सूर जरी अस्पष्ट असला, तरी शिखांचा स्वाभिमान, स्वयंनिर्णयाचा हक्क आदी मुद्दे होते. त्यानंतर पंजाबात हिंसाचार आणि त्यापुढे जाऊन दहशतवाद फोफावला, हे नाकारता येणार नाही. अर्थात अकाली दलाने केलेल्या आततायीपणा याबरोबरच काँग्रेसचे अंतर्गत कुरघोड्यांचे राजकारण आणि अकाली दलाला शह देण्याचे डावपेच या सगळ्याचादेखील त्यात वाटा होता. पंजाब समस्या जटिल होती आणि तिला अनेक पदर आहेत. तेव्हा त्या समस्येचे इतके सुलभीकरण करणे गैर. तथापि अकाली दल आणि काँग्रेस यांनी या समस्येच्या उग्रतेकडे वेळीच लक्ष दिले नाही, हेही विसरता येणार नाही. आताच्या स्थितीत त्या राजकीय साठमारीचे स्मरण होणे क्रमप्राप्त. शीख पंथातील बंडखोर समाज असणार्‍या निरंकारी समाजाला अकाली दल सरकारने 1978 साली अमृतसर शहरात बैसाखीच्या दिवशी मेळावा घेण्यास दिलेली अनुमती, त्यामुळे भिंद्रानवाले याने आपल्या अनुयायांसह त्या ठिकाणी काढलेल्या मोर्चाला लागलेले हिंसक वळण आणि एका अर्थाने पंजाब समस्येची पडलेली ठिणगी, पुढे पंजाबात हिंसाचाराचा आगडोंब उसळण्यात त्याची परिणती होणे हा सगळा इतिहास फार जुना नाही.
 
 
vivek
 
राजकीय साठमारीतून भिंद्रानवालेचा उदय
 
 
काँग्रेसने अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल, संत हरचंद सिंग लोंगोवाल आणि गुरुशरण सिंग तोहरा यांचे वर्चस्व कमी करण्याच्या दृष्टीने भिंद्रानवाले यांना पुढे आणले आणि नंतर अकाली दलाने त्याच भिंद्रानवालेला केंद्रातील काँग्रेस सरकारला विरोध करण्यासाठी उद्युक्त केले. या साठमारीत भिंद्रानवाले याची दहशत एवढी वाढली की या दोन्ही पक्षांना तो डोईजड झाला. मात्र पंजाबमधील कायदा सुव्यवस्थेवरच याचा प्रतिकूल परिणाम झाला असे नाही, तर अतिरेक्यांना पाकिस्ताननेदेखील दिलेल्या समर्थनाने परिस्थिती चिघळली. हिंदू आणि शीख यांच्यात दरी निर्माण झाली आणि हिंदूंचे शिरकाण ही नित्याची बाब बनली. भिंद्रानवाले याच्या खालसा दलाला जे विरोध करीत, त्यांना कंठस्नान घालणे हे राजरोस घडू लागले. भिंद्रानवाले याच्या हस्तकांनी अगदी संपादक लाला जगतनारायण यांचीही हत्या केली, ती जगतनारायण हे आपल्या वर्तमानपत्रातून खलिस्तानवाद्यांच्या विरोधात ठामपणे मते व्यक्त करू लागल्याने आणि निरंकारी समाजाला असणार्‍या त्यांच्या सहानुभूतीमुळे. त्यानंतर भिंद्रानवालेला अटक झालीही, पण तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री झैल सिंग यांनी अचानक एक दिवस कोणत्याही पुराव्याअभावी भिंद्रानवालेची सुटका करण्यात येत असल्याचे जाहीर केले. मात्र त्याचा परिणाम असा झाला की भिंद्रानवालेचे प्रस्थ आणखीनच वाढले आणि तो ना काँग्रेसच्या नियंत्रणात राहिला, ना अकाली दलाच्या. भिंद्रानवालेने काही निवृत्त लष्करी अधिकार्‍यांनादेखील आपल्या गोटात सामील करून घेतले होते. अखेरीस सुवर्णमंदिरात लष्करी कारवाई करण्यात या सगळ्याची परिणती झाली आणि भिंद्रानवाले याला ठार मारण्यात आले. तथापि त्यानंतरदेखील भिंद्रानवाले ठार झालेला नसून तो पाकिस्तानमध्ये आहे अशा अफवा पाकिस्तानच्या दूरचित्रवाणीवरून वृत्ताच्या स्वरूपात पसरविण्यात येत होत्या. अर्थातच, भारतात अस्थैर्य कायम राहावे हाच त्यामागील हेतू होता. भिंद्रानवाले ठार झाल्यानंतरदेखील पंजाबमधील स्थिती पूर्वपदावर येण्यास काही कालावधी जावा लागला. दरम्यानच्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शीख असलेल्या अंगरक्षकांनीच त्यांची हत्या केली, सुवर्णमंदिरावरील ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’च्या वेळी लष्करप्रमुख असणारे जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात हत्या करण्यात आली. 1990च्या दशकानंतर पंजाब हळूहळू निवळायला लागला. त्या कटुपर्वाचे स्मरण व्हावे याची बीजे पुन्हा पेरली जात नाहीत ना? अशी शंका यावी अशीच स्थिती पंजाबात उद्भवत नाही ना, यावर यंत्रणांनी लक्ष ठेवणे म्हणूनच गरजेचे.
 
 
भिंद्रानवाले 2.0?
 
 
याची कारणे दोन. एक म्हणजे भिंद्रानवाले याच्या पावलावर पाऊल ठेवून अमृतपाल सिंग आपले वर्चस्व वाढवीत आहे. आपण भिंद्रानवालेचे अनुयायी असलो, तरी त्याच्या पायाच्या धुळीचीही सर आपल्याला नाही असे अमृतपाल सिंग म्हणतो. दुसरे म्हणजे भिंद्रानवालेचे जवळपास समांतर सरकार चालविण्याइतपत धाडस वाढण्याचे कारण म्हणजे राजकीय पक्षांमधील कुरघोड्यांचे तारतम्यहीन राजकरण आणि इच्छाशक्ती नसलेल्या सरकारांनी घेतलेली बघ्याची भूमिका. तसेच आता अजनाला येथील प्रकरण पंजाबातील आम आदमी पक्षाच्या सरकारकडून घडले नाही ना हा येणारा संशय. नंग्या तलवारी नाचवत हजारोंचा जमाव पोलीस ठाण्यावर हल्ला करतो आणि सरकार आरोपीला कोठडीतून मुक्त करते, हे अनाकलनीय आहे. वेळीच सरकारने कठोर भूमिका घेतली नाही, तर त्याची परिणती किती भयावह आणि दूरगामी होते, याचे उदाहरण असताना आम आदमी पक्षाच्या सरकारने बघ्याची भूमिका घ्यावी हे कोणत्याही स्थितीत समर्थनीय नाही. एका सीमावर्ती राज्यात आपल्याला सत्ता मिळाली आहे, आम आदमी पक्षाने मोफत विजेपासून आरोग्य व्यवस्थेपर्यंत कितीही आश्वासने दिली असतील; पण देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता हे सर्वोपरी आहे, याचे भगवंत मान सरकारने भान ठेवावयास हवे. मुळात मान हे सरकार चालवितात की आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा हेच सगळे निर्णय दिल्लीतून घेतात, हाही प्रश्न आहे. पण निर्णय कोणीही घेत असले, तरी अजनाला प्रकरणाने भगवंत मान सरकारमधील कठोरतेचा अभाव दृग्गोचर झाला आहे, हे नाकारता येत नाही.
 
 
vivek
 
वास्तविक गेले काही महिने अमृतपाल सिंग पंजाबात चिथावणीखोर भाषणे देत आहे. भिंद्रानवाले यानेही धर्मोपदेशक म्हणूनच सुरुवात केली होती आणि तोही प्रारंभी पंजाबमधील तरुणांना ’खालसा’ परंपरेचा अंगीकार करावा, दाढी कापू नये, धूम्रपान करू नये, अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे असा उपदेश करीत असे. अमृतपाल सिंग यापेक्षा काही निराळे सांगत नाही. मात्र त्याबरोबरच तो अन्य जी विधाने करतो, ती दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत. हिंदुराष्ट्राची मागणी होत असेल, तर खलिस्तानची मागणी करण्यात गुन्हा काय? असा प्रतिप्रश्न तो विचारतो. खलिस्तानवादी शक्तींना कठोरतेने हाताळले जाईल असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला, तेव्हा अमृतपाल सिंगेने ’शहा यांनाच परिणाम भोगावे लागतील’ अशी दर्पोक्ती केली. आपल्याला दहशतवादी म्हणणे हाच दहशतवाद आहे, असा अजब युक्तिवाद तो करतो. मोठे उद्योग स्थानिक उद्योगांना मारक आहेत असे म्हणून तो मोठ्या उद्योगांना विरोध करतो. शीख धर्माच्या मर्यादांचे उल्लंघन करून काही गुरुद्वारा भाविकांना अतिरिक्त सुविधा देतात, याला अमृतपाल सिंगने आक्षेप घेतला आहे. किंबहुना काहीच महिन्यांपूर्वी त्याच्या समर्थकांनी जालंधरमधील एका गुरुद्वारातील सोफे आणि खुर्च्या जाळून टाकल्या होत्या. भाविकांनी जमिनीवर बसूनच प्रार्थना करायला हवी हा त्यामागील युक्तिवाद. मात्र हा कट्टरतावाद किती टोकाचा आणि म्हणूनच धोक्याचा आहे, हे लक्षात येईल. आपण भारतीय नाही आणि पारपत्र म्हणजे केवळ प्रवासाचा एक दस्तऐवज आहे, असे तो उघडपणे म्हणतो. पंजाबातील तरुणांनी परदेशात न जाता पंजाबातच राहावे, असे तो आवाहन करतो. काहीच दिवसांपूर्वी ब्रिटनमधील अनिवासी भारतीय असणार्‍या किरणदीप कौर यांच्याशी स्वत: अमृतपाल सिंगचा विवाह झाला. यापुढे आपण पंजाबातच राहणार आहोत असे त्याने जाहीर केले आहे. विवाहसोहळ्यावर पाण्यासारखा पैसा खर्च न करता ते साधेपणाने व्हावेत असेही आवाहन त्याने केले आहे. अर्थात या आवाहनांमध्ये वरकरणी काही आक्षेपार्ह आढळणार नाही. मात्र याची दिशा अखेरीस लोकप्रिय होणे, त्यातून तरुणांना खलिस्तानच्या मागणीच्या मार्गावर नेणे, अशांतता पसरविणे, सरकारी यंत्रणांना न जुमानणे ही तर नाही ना? हे चिंताजनक. पंजाबातील बेरोजगारी, त्यातून तरुणांमध्ये पसरणारी अस्वस्थता याचा गैरफायदा विघातक शक्ती उठवीतच असतात. त्यातच राज्य सरकारही कमकुवत असेल, तर अशा शक्तींचे फावल्याशिवाय राहत नाही. तेव्हा अमृतपाल सिंगच्या रूपात नवा भिंद्रानवाले तयार होण्याअगोदरच त्यावर कठोर कारवाई करणे निकडीचे. पंजाबात पुन्हा दहशतवादाची बीजे पेरली जाणे कदापि सहन केले जाता कामा नये. ठिणग्या वेळीच विझविल्या नाहीत, तर त्याचे रूपांतर वणव्यात कसे होते, याचा धडा विसरणे परवडणारे नाही.
 
 

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार