त्रिगुणांची मूर्ती अशोकराव चौगुले

विवेक मराठी    02-Mar-2023   
Total Views |
विश्व हिंदू परिषद हे त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाच्या कामाचे क्षेत्र ठरविले. भारतातील उद्योग जगताचे 1990 सालचे वातावरण आणि त्याच सालातील मुख्य धारेतील वैचारिक वातावरण आणि राजकीय विचारधारा पाहता, अशोकराव चौगुले यांचे विश्व हिंदू परिषदेत जाणे हे एक आश्चर्य मानले पाहिजे. भारतातील तथाकथित पुरोगामी, बुद्धिवादी, आंतरराष्ट्रीय, उदारमतवादी विचारवंतांच्या दृष्टीने विश्व हिंदू परिषद ही धार्मिक संस्था आहे. हिंदू संस्था असल्यामुळे प्रतिगामी आणि बुरसटलेल्या विचारांची असायला पाहिजे. हे सर्व या तथाकथित वैचारिक जगताचे नोबेल पुरस्काराला मागे टाकणारे अद्वितीय शोध आहेत आणि त्यांचा बोलबाला प्रचंड असल्यामुळे सर्वांना त्यांच्यापासून घाबरून राहावे लागते. अशोकराव चौगुले असे खमके निघाले की, या सर्व विरोधकांच्या छाताडावर पाय ठेवून ते विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते झाले. आज ते उपाध्यक्ष आहेत.  
VHP
 
 
 
विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष अशोकराव चौगुले यांनी 25 जानेवारी 2023 रोजी वयाची पंचाहत्तरी
पूर्ण केली. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख...
विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष अशोकराव चौगुले यांनी 25 जानेवारी 2023 रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. गोव्यात 26 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या अभीष्टचिंतनाचा कार्यक्रम झाला. अशोकराव चौगुले विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांचे नाव सर्वांना माहीत आहे; परंतु ते एक चिंतक आहेत, विचारवंत आहेत आणि ते सतत लिहीत असतात, याचा परिचय सर्वच मराठी वाचकांना असेल असे नाही. त्यांचे लेखन प्रामुख्याने इंग्लिश भाषेतील आहे.
 

VHP 
 
अशोकराव हे चौगुले उद्योग समूहातील एक आहेत. खाणी, जहाज बांधणी अशा प्रकारचे चौगुले उद्योग समूहाचे उद्योग आहेत. एक यशस्वी आणि नामवंत उद्योजक घराणे म्हणून चौगुले समूहाचे नाव उद्योग जगतात सन्मानाने घेतले जाते. अशा उद्योग समूहाला इंग्लिशमध्ये ‘कॉर्पोरेट जगत’ असे म्हटले जाते.
 
 
उद्योग समूहातील संचालक आपला उद्योग सोडून सामान्यत: राजकारण किंवा समाजकारण यामध्ये क्रियाशील होत नाही. काही उद्योग समूहांचे संचालक राजकारणात प्रवेश करतात. त्यांचे हेतू राजकीय सत्तेचा उद्योगासाठी लाभ करून घेण्याचा राहतो. अशी मंडळी संख्येने कमी आहेत. सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले उद्योजक अपवादानेच असतात. अशोकराव चौगुलेंचे नाव यात घ्यावे लागते.
 
 
विश्व हिंदू परिषद हे त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाच्या कामाचे क्षेत्र ठरविले. भारतातील उद्योग जगताचे 1990 सालचे वातावरण आणि त्याच सालातील मुख्य धारेतील वैचारिक वातावरण आणि राजकीय विचारधारा पाहता, अशोकराव चौगुले यांचे विश्व हिंदू परिषदेत जाणे हे एक आश्चर्य मानले पाहिजे. भारतातील तथाकथित पुरोगामी, बुद्धिवादी, आंतरराष्ट्रीय, उदारमतवादी विचारवंतांच्या दृष्टीने विश्व हिंदू परिषद ही धार्मिक संस्था आहे, म्हणून ती जातीय संस्था आहे. हिंदू धार्मिक संस्था असल्यामुळे, वर दिलेल्या विद्वानांच्या मते ती मुस्लीम-ख्रिश्चनविरोधी असलीच पाहिजे. त्यात ती हिंदू संस्था असल्यामुळे प्रतिगामी आणि बुरसटलेल्या विचारांची असायला पाहिजे. हे सर्व या तथाकथित वैचारिक जगताचे नोबेल पुरस्काराला मागे टाकणारे अद्वितीय शोध आहेत आणि त्यांचा बोलबाला प्रचंड असल्यामुळे सर्वांना त्यांच्यापासून घाबरून राहावे लागते. अशोकराव चौगुले असे खमके निघाले की, या सर्व विरोधकांच्या छाताडावर पाय ठेवून ते विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते झाले. आज ते उपाध्यक्ष आहेत. त्यांचे शिक्षण इंग्लिश शाळेत झाले, उच्च शिक्षण परदेशात झाले. या शिक्षणात कुठेही हिंदू धर्म, हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू संस्कृती अभ्यासक्रमात येत नाही. चुकून आली, तर ती विकृत स्वरूपात येते. परंतु या मातीचा गुण असा आहे आणि भारतमातेच्या स्तनपानाचा गुण असा आहे की, आपली मुळे कोणालाच विसरता येत नाहीत. योग्य वेळ येताच ती जागी होतात.. जसे योगी अरविंदांचे झाले. आपल्या मुलाला भारतीय संस्कृतीचा स्पर्श होऊ नये, म्हणून त्यांच्या पित्याने मुलाला इंग्लंडमध्ये ठेवले. शिक्षण पूर्ण करून हा मुलगा जेव्हा भारतात आला, तेव्हा मातृभूमीवर पाय ठेवताच, कोणती विद्युत लहर त्याच्या शरीरात गेली, काही समजलेच नाही, पुढचा प्रवास क्रांतिकारक ते योगी अरविंद असा झाला.
 
 
 
विश्व हिंदू परिषदेने 84-85 सालापासून रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात उडी घेतली. हिंदू विचारधारेकडे अशोकराव खेचले जाण्याचा हा कालखंड आहे. त्यांचा मूळचा पिंड तार्किक विचार करण्याचा आहे, ते बुद्धिमान आहेत आणि प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेण्याची त्यांची वृत्ती आहे. इंग्रजी शिक्षणाने ते बाटले नाहीत की आपले स्वत्व गमावून बसले नाहीत, की काळे इंग्रज झाले नाहीत. रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन काय आहे? अयोध्येत कशासाठी मंदिर बांधायचे? बाबरी मशिदीच्या जागी रामाचे मंदिर होते, ते का होते? त्याचा इतिहास काय? रामायण काय सांगते? अशा सर्व विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास सुरू केला आणि बघता बघता ते राममय झाले, हिंदू श्रद्धांशी एकरूप झाले.
 
 

VHP
 
हिंदू विवेक केंद्राची स्थापना झाली आणि 1990च्या दशकापासून अशोकराव यांच्या असंख्य छोट्या पुस्तिका प्रकाशित झाल्या. बहुतेक पुस्तिका इंग्लिशमध्ये आहेत आणि सर्व पुस्तिकांचा विषय, एका वाक्यात सांगायचे तर, हिंदू समाजापुढील विविध प्रश्नांचा आहे. रामजन्मभूमी, हिंदू संस्कृती, दहशतवाद, डावे बुद्धिजीवी आणि त्याचे युक्तिवाद, संघापुढील कालसापेक्ष प्रश्न, भारतातील ख्रिस्ती संप्रदाय, या संप्रदायातील युक्तिवादाच्या विसंगती अशा असंख्य विषयांवर त्यांनी अत्यंत तार्किक भाषेत लेखन केलेले आहे. डावे विचारवंत लेखन करीत असताना कौशल्याने वेगवेगळ्या संदर्भांचा वापर करतात. पुस्तक, पृष्ठ क्रमांक वगैरे सर्व देतात. स्वत:ला सोयीचे असेल ते निवडतात. संदर्भातील पुढचे-मागचे संदर्भ गाळतात. याला तोडून-मोडून दिलेला संदर्भ म्हटले जाते. अशा या समुदायाला अशोकराव यांनी एक शब्दप्रयोग वापरला आहे - ‘खान मार्केट गँग.’ या खान मार्केट गँगमध्ये देशातील तथाकथित डावे विचारवंत - मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो, येतात. ही खान मार्केट गँग अतिशय संघटित असते. त्यांच्यावर जे टीका करतात, त्यांना नगण्य करण्याचे त्यांचे काही मार्ग आहेत. दुर्लक्ष करणे, टीका करणार्‍याला जातीयवादी म्हणणे, टीका करणार्‍याला संघाचा आणि भाजपाचा हस्तक मानणे, त्याचे लेख न छापणे इत्यादीत्यांचे मार्ग आहेत अतार्किक विचार खूप तार्किक आहेत, अशा घमेंडीत तो मांडणे आणि आपण जे काही म्हणतो तेच शंभर टक्के खरे असून अन्य सर्व लोक ‘इडियट’ आहेत असे म्हणणे, ही त्यांची मानसिकता आहे. अशोकराव चौगुले यांनी या मानसिकतेचे केवळ वस्त्रहरण न करता शवविच्छेदनही केलेले आहे. ते करीत असताना त्यांनी कधीही युक्तिवादाच्या नियमांना फाटा दिलेला नाही. ज्याची मांडणी करायची ती तार्किक करायची, आपल्या प्रतिपादनासाठी पुरावे द्यायचे. प्रतिपक्षाच्या प्रतिपादनातील विसंगती उघड करायच्या. त्यांच्याच प्रतिपादनातील अंतर्विरोध स्पष्ट करायचा. प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी त्यांच्यापुढे नवीन प्रश्न ठेवायचे आणि त्याची उत्तरे त्यांच्याकडून मागायची ही अशोकरावांनी पद्धती अवलंबिली आहे. याचे एकच उदाहरण सांगायचे, तर त्यांच्या आर्य आक्रमण सिद्धान्तावरील इंग्लिश लेखाचे देता येईल. आर्य आक्रमण सिद्धान्त मांडणारे (विकृत) इतिहासकार सांगतात की, मध्य आशियातून रानटी आर्य आक्रमक आले, त्यांनी सुसंस्कृत सिंधू संस्कृती नष्ट केली आणि पुढे 200 वर्षांत वैदिक वाङ्मय तयार केले. अशोकरावांनी पहिला प्रश्न उपस्थित केला - ‘सुसंस्कृत सिंधू संस्कृतीतील लोकांचे वाङ्मय काहीच नाही का? रानटी आर्य लोक केवळ 200 वर्षांत वेद वाङ्मय निर्माण करू शकतात का?‘ आर्य आक्रमणवाल्यांनी काही काळानंतर आपला सिद्धान्त थोडा बदलला. ते सांगू लागले - मध्य आशियातील टोळ्यांनी स्थलांतर केले. ‘स्थलांतर करून हे आर्य एकदम भारतात प्रकट झाले का? अध्ये-मध्ये कुठे थांबले असतील, तर त्यांच्या खाणाखुणा सापडतात का?‘ हा अशोकरावांचा प्रश्न आहे. आक्रमणांचा सिद्धान्त असो की स्थलांतराचा सिद्धान्त असो, दोन्ही सिद्धान्तांचा अंतिम हेतू एकच, तो म्हणजे आर्य भारतात बाहेरून आले हे सांगण्याचा. या सिद्धान्ताला गंभीर आव्हान देणारे असंख्य विषय पुढे आलेले आहेत. ते दुर्लक्षाने मारायचे, हे या खान मार्केट गँगचे धोरण असते.
याच प्रकारे कॅथरिन मेयो या अमेरिकन लेखिकेच्या ‘मदर इंडिया’ या पुस्तकाचा अशोकरावांनी समाचार घेतलेला आहे. कॅथरिन मेयो ही गोरी महिला आहे आणि गोर्‍या कातडीचे सर्व पवित्र हे मानणारी बौद्धिक गँग भारतात फार मोठी आहे. 1920 साली हे पुस्तक प्रकाशित झाले. हे पुस्तक म्हणजे ‘गटाराचा शोध घेणार्‍या तपासनिसाचा अहवाल आहे’ असे महात्मा गांधींनी या पुस्तकाचे वर्णन केले. लेखिकेने या पुस्तकात भारतीय समाजजीवनातील फक्त घाणच काढली आणि ही घाण म्हणजे भारत, असे प्रतिपादन केले. ते प्रमाण मानून आयडिया ऑफ भारतवाले या पुस्तकाचा संदर्भ देतात. अ‍ॅनी बेझंट या पुस्तकाविषयी म्हणतात, ‘कुमारी कॅथरिन मेयो यांनी दुष्ट पुस्तक प्रकाशित केले आहे, या पुस्तकाने सगळ्या भारतीय जनतेची बदनामी केलेली आहे. 1893पासून मी या देशात वास्तव्य करते आहे. मी त्यांच्या देशातील नसले, तरी माझे प्रत्येक घरात आदरयुक्त स्वागत असते. कॅथरिनच्या पुस्तकातील एकही अनुभव मला भारतात आलेला नाही.’
 

VHP 
 
अशा प्रकारचे अनेक दाखले अशोकराव चौगुले यांच्या लेखातून आणि पुस्तिकांतून वाचायला मिळतात. ते जसे उद्योग सेनापती आहेत, तसे बौद्धिक योद्धादेखील आहेत. त्यांच्याच एका लेखातील शब्दप्रयोग वापरायचा, तर ते ’क्षत्रिय योद्धा’ आहेत. योद्धा त्यालाच म्हणायचे, ज्याला शस्त्रांचे ज्ञान असते, ते चालविण्याचे कौशल्य असते आणि रणांगणात बेडरपणे उभे राहण्याची हिंमत असते. अशोकराव चौगुले या त्रिगुणांची मूर्ती आहेत. नामवंत लेखकांचे विच्छेदन करीत असताना ते कोणाला घाबरत नाहीत, मग ते रामचंद्र गुहा असोत की संजय बारू असो, राजदीप सरदेसाई असो की दिलीप पाडगावकर असो, त्यांच्या त्यांच्या प्रतिपादनातील विसंगती ते अत्यंत मार्मिकपणे दाखवून देतात आणि त्यांच्यासमोरच प्रश्न उपस्थित करतात, ज्यांची उत्तरे येणार नाहीत, हे त्यांना माहीत असते. कारण खान गँगला प्रश्न विचारण्याचीच फक्त सवय असते. इतर सर्व प्रश्न विचारणारे त्यांच्या दृष्टीने तुच्छ असतात. अशोकरावांनी या तुच्छतेला ‘तुच्छ’ ठरविण्याचा बौद्धिक पराक्रम केला आहे.
 
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.