वाढत्या दबदब्यावर पुन्हा शिक्कामोर्तब

विवेक मराठी    16-Feb-2023   
Total Views |
 देशाच्या संरक्षण दलाचे असे आश्वासक चित्र उभे राहत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण होणे अपरिहार्य आहे. संरक्षणसिद्धता आणि आत्मनिर्भरता याचा आग्रह धरणारे, त्याचे महत्त्व सातत्याने बिंबवणारे स्वातंत्र्यवीर आज देश ज्या दिशेने मार्गक्रमणा करतो आहे त्याने खचितच संतुष्ट झाले असते. ‘संरक्षणसिद्धता म्हणजे युद्धखोरी नव्हे. दुर्बळाच्या अहिंसेला जगात किंमत नसते’ असे सांगून त्यांनी त्यावेळच्या राज्यकर्त्यांना वारंवार सावध केले होते. मात्र अहिंसेचा कैफ चढलेले राज्यकर्ते त्याकडे दुर्लक्ष करत गेले. देशाने, देशवासीयांनी त्याची पुरेशी किंमत चुकवली. आताच्या राज्यकर्त्यांनी मात्र सावरकर विचारांची कास धरली. नुसता विचारांचा स्वीकार केली नाही तर त्यानुसार आचरणही ठेवले. त्यामुळेच आज भारताकडे सगळ्या जगाचे लक्ष वेधले. एरो इंडिया हे प्रदर्शन म्हणजे भारताच्या वाढत्या दबदब्यावर जगाने केलेले शिक्कामोर्तब आहे.
 
vivek
 
 
आत्मनिर्भरता आणि संरक्षणसिद्धता ही देशाच्या प्रगतीची दोन महत्त्वाची चाकेे आहेत, याबद्दलच्या शासनस्तरावर वाढलेल्या सजगतेचे आपण सर्व जण साक्षीदार आहोत. या दोन्ही गोष्टींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची अधिकाधिक उजळ होत चाललेली प्रतिमा आणि त्या अनुषंगाने घेतली जाणार गंभीर दखल हेही आपण अनुभवत आहोत. शस्त्रसज्जतेविषयीचे शासनपातळीवरील औदासीन्य ते केवळ शस्त्रसज्जच नव्हे, तर शस्त्रास्त्रांचा निर्यातदार देश असा देशाचा प्रवास झाला आहे. ही दिशा निश्चितच कौतुकास्पद आणि त्यासाठी चालू असलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत.
 
 
अलीकडेच प्रजासत्ताक दिनानिमित्त साप्ताहिक विवेकने ‘आत्मनिर्भर संरक्षण दल, आत्मनिर्भर प्रजासत्ताक’ अशी विशेष पुरवणी प्रकाशित केली होती. त्या वेळी विविध लेखांतून संरक्षण क्षेत्राच्या वाटचालीचा आढावा घेतला होता. आज या विषयावर संपादकीय घेण्याचे कारण.. अगदी अलीकडेच बेंगळुरू येथील हवाई दलाच्या तळावर, ‘एरो इंडिया 2023’ हे आशियातील सर्वात मोठे हवाई प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन. अन्य देशही आपापली उत्पादने, नवनवीन तंत्रज्ञान घेऊन यात सहभागी झाले असले, तरी या प्रदर्शनाच्या निमित्ताने जगाला भारताच्या वाढत्या सामरिक शक्तीचे आणि तंत्रसिद्धतेचे दर्शन घडले, म्हणून याचे महत्त्व अधिक.
भारतासह जगभरातल्या 98 देशांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. एकाच वेळी 32 राष्ट्रांचे संरक्षण मंत्री, लष्कर प्रमुख, हवाई दल प्रमुख आणि भारताच्या तसेच अन्य देशांच्या संरक्षणविषयक उत्पादक कंपन्यांचे 73 मुख्य कार्यकारी अधिकारी एकत्र येण्याची ही एक अभूतपूर्व घटना म्हणावी लागेल.
 
 
युद्धकाळात लागणार्‍या शस्त्रास्त्रांसाठी आतापर्यंत अन्य देशांवर अवलंबून असणारा भारत आता जगातला एक महत्त्वाचा निर्यातदार देश बनला आहे. भारतात तयार होत असलेल्या शस्त्रास्त्रांना जगात मागणी आहे, त्यामागची मुख्य कारणे दोन - एक म्हणजे आपण जी शस्त्रास्त्रे निर्यात करतो, ती आपले संरक्षण दलही वापरते. त्यामुळे त्यांच्या क्षमतेबाबत खरेदीदार नि:शंक असतो. शिवाय, जी शस्त्रास्त्रे वा उपकरणे भारतासारख्या भौगालिक विविधता असलेल्या देशात उत्तम कामगिरी करतात, ती अन्यत्र उत्तम काम करतात, हेही त्यातून सिद्ध होते. आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची उपकरणे/शस्त्रास्त्रे तयार करू शकतो, असाही याचा थेट अर्थ होतो. दुसरे कारण म्हणजे आपल्याकडे निर्माण होणारी युद्धसामग्री आंतरराष्ट्रीय बाजारात तुलनेने कमी असलेली किंमत.
 
 
केवळ संरक्षण क्षेत्रावरील आयातीचे जोखड हळूहळू दूर करण्यात आपण यशस्वी झालेलो नाही, तर निर्यातदार होण्याची क्षमता विकसित केली आहे. अतिशय गांभीर्याने राबवण्यात आलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचे हे यश आहे. निर्यातदार होण्याचा आणखी एक अर्थ म्हणजे देशांतर्गत वाढलेल्या रोजगाराच्या संधी. त्यातून इथल्या मनुष्यबळाचा होत असलेला कौशल्यविकास. हे विकसित झालेले कौशल्यच या तंत्रकुशल होत असलेल्या मनुष्यबळाला जगाच्या पाठीवर आणखीही संधी उपलब्ध करून देईल. अशी ही एकात एक गुंतलेली प्रगतीची कडी आहेत. या कडीत डीआरडीओची महत्त्वपूर्ण भूमिका निश्चितच आहे, त्याचबरोबर, ‘आयडेक्स - इनोव्हेशन इन डिफेन्स फॉर एक्सलन्स’ या संकल्पनेचाही मोठा सहभाग आहे. संरक्षण क्षेत्रासाठी आयात करत असलेल्या तंत्रज्ञानापेक्षा वेगळे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ‘स्टार्ट अप्स’ दिले गेलेले प्रोत्साहन आणि विविध योजनारूपी सहकार्य या सगळ्याचे हे फलित आहे. संरक्षणविषयक प्रदर्शने देशाच्या विविध भागात सातत्याने भरवण्याने, या विषयाकडे सरकार किती गांभीर्याने पाहत आहे हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला मदत झाली. तसेच नागरिकांनाही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने शस्त्रसज्जता किती महत्त्वाची आहे, याची जाणीव रुजायला मदत झाली.
 
 
 
बेंगळुरू इथे झालेले एअरो इंडिया 2023 हे आशिया खंडातील सगळ्यात मोठे प्रदर्शन समजले जाते. केवळ जगातली अनेक मोठी राष्ट्रे सहभागी झाल्याने असे समजले जात नाही, तर भारताच्या वाढत्या सामरिक ताकदीची जाणीव सगळ्यांना झाली असल्याने हे देश सहभागी झाले, असा याचा अर्थ.
 
 
 
‘रोड टु बिलियन अपॉर्च्युनिटीज’ असे या प्रदर्शनाचे घोषवाक्य होते. म्हणजेच फक्त सामरिक ताकद दाखवण्यासाठी नाही, तर व्यापारी करारांच्या उद्देशाने हे प्रदर्शन योजले होते. या निमित्ताने भारत सरकार, भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्या दरम्यान 80 हजार कोटी रुपयांचे झालेले सुमारे 201 सामंजस्य करार हेच दर्शवते. ‘आत्मनिर्भर भारत, संघटित भारत आणि सुरक्षित भारत’ अशी या शासनाची त्रिसूत्री आहे. त्याचे प्रतिबिंब या सर्व कृतीयोजनांमध्ये पडलेले दिसते. कृतीच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेचा चाललेला मंत्रजप आता या देशाचा स्वभावधर्म बनतो आहे.
 
 
 
देशाच्या संरक्षण दलाचे असे आश्वासक चित्र उभे राहत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण होणे अपरिहार्य आहे. संरक्षणसिद्धता आणि आत्मनिर्भरता याचा आग्रह धरणारे, त्याचे महत्त्व सातत्याने बिंबवणारे स्वातंत्र्यवीर आज देश ज्या दिशेने मार्गक्रमणा करतो आहे त्याने खचितच संतुष्ट झाले असते. ‘संरक्षणसिद्धता म्हणजे युद्धखोरी नव्हे. दुर्बळाच्या अहिंसेला जगात किंमत नसते’ असे सांगून त्यांनी त्यावेळच्या राज्यकर्त्यांना वारंवार सावध केले होते. मात्र अहिंसेचा कैफ चढलेले राज्यकर्ते त्याकडे दुर्लक्ष करत गेले. देशाने, देशवासीयांनी त्याची पुरेशी किंमत चुकवली. आताच्या राज्यकर्त्यांनी मात्र सावरकर विचारांची कास धरली. नुसता विचारांचा स्वीकार केली नाही तर त्यानुसार आचरणही ठेवले. त्यामुळेच आज भारताकडे सगळ्या जगाचे लक्ष वेधले. एरो इंडिया हे प्रदर्शन म्हणजे भारताच्या वाढत्या दबदब्यावर जगाने केलेले शिक्कामोर्तब आहे.