गोव्यातले दुर्मीळ ब्रह्मा मंदिर

विवेक मराठी    13-Feb-2023   
Total Views |
त्रिमूर्तींमधल्या शिव आणि विष्णू ह्या देवतांच्या मंदिरांची संख्या पाहता सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाची मंदिरे संख्येने पुष्कळ कमी आणि दुर्मीळ आहेत. राजस्थानमध्ये पुष्कर येथील ब्रह्मदेवाचे मंदिर, तामिळनाडूमध्ये कुंभकोणममध्ये स्थित ब्रह्मा मंदिरापासून ते कुलू खोर्‍यामधील खोखान गावातील आदिब्रह्मा मंदिरापर्यंत भारतात पाच-सहा तरी वेगवेगळी मंदिरे आहेत. या लेखात आपण उत्तर गोव्यातील ‘ब्रह्मकरमळी’ या निसर्गसंपन्न गावातील ब्रह्मदेवाच्या मंदिराची माहिती घेणार आहोत.
 
goa
सर्वसामान्य हिंदू असे मानतात की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन देव म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या जिवाच्या तीन अवस्थांचे पालक देव आहेत. त्यातला ब्रह्मदेव हा सृष्टिनिर्माता म्हणून तो उत्पत्तीचे प्रतीक मानला जातो. भारतात सर्वत्र असा समज आहे की सहसा ब्रह्मदेवाचे मंदिर बांधून त्याची पूजा केली जात नाही आणि भारतातले ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर राजस्थानमध्ये पुष्कर येथे आहे. ह्याला पुरावा म्हणून पुराणातल्या अनेक कथाही सांगितल्या जातात. त्यातली सर्वात लोकप्रिय कथा म्हणजे ब्रह्मदेवांची पत्नी सावित्री हिने चिडून नवर्‍याला दिलेला शाप.
 
 
 
पण हे अर्धसत्य आहे. हे खरे आहे की त्रिमूर्तींमधल्या शिव आणि विष्णू ह्या देवतांची मंदिरे आपल्याला भारतात सर्वत्र आणि विपुल संख्येने दिसतात आणि त्या मानाने सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाची मंदिरे संख्येने पुष्कळ कमी आणि दुर्मीळ आहेत. पण केवळ पुष्कर येथेच ब्रह्मदेवाचे एकच मंदिर आहे असे मानणे चूक आहे. तामिळनाडूमध्ये कुंभकोणममध्ये स्थित ब्रह्मा मंदिरापासून ते कुलू खोर्‍यामधील खोखान गावातील आदिब्रह्मा मंदिरापर्यंत भारतात पाच-सहा तरी वेगवेगळी मंदिरे आहेत, जिथे ब्रह्मदेव हा मुख्य देव असून त्याची पूजा केली जाते.
 
 
goa
 
ब्रह्मदेवाचे असेच एक दुर्मीळ मंदिर माझ्या राज्यात - म्हणजे गोव्यातही आहे. उत्तर गोव्यात वाळपईपासून फक्त आठ किलोमीटरवर असलेल्या एका छोट्या पण निसर्गसंपन्न गावात हे मंदिर आहे. किंबहुना गावात ब्रह्मदेवाचे मंदिर आहे म्हणूनच ह्या गावाचे नाव ‘ब्रह्मकरमळी’ असे पडले आहे. गोव्यातल्या बहुतेक हिंदू मंदिरांना असतो तसा ह्याही मंदिराला जबरदस्तीच्या स्थलांतराचा कटू इतिहास आहे. मंदिराची सध्याची वास्तू जरी जीर्णोद्धार करून नवीन बांधलेली असली, तरी ह्या मंदिराच्या गर्भगृहातली मूर्ती मात्र अगदी प्राचीन आहे. कदंब राजवटीत घडवली गेलेली ही मूर्ती साधारण 12व्या शतकातली आहे, असे पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे मत आहे. मुळात ही मूर्ती आजच्या जुन्या गोव्याजवळच्या करमळी गावात होती.
 
 

‘अखंड भारत का आणि कसा?

https://www.vivekprakashan.in/books/akhand-bharat/

 
 
सोळाव्या शतकात धर्मांध पोर्तुगीजांची सत्ता जुने गोवे आणि दिवाडी द्वीप ह्या भागात सर्वप्रथम स्थापन झाली आणि त्यांनी हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करायचा सपाटा लावला. त्यात साधारण 1541च्या दरम्यान मूळ मंदिर पाडले गेले. सुदैवाने ग्रामस्थांनी जिवाची बाजी लावून मंदिरातली मूर्ती तेव्हा हिंदूंच्या आधिपत्याखाली असलेल्या सत्तरी तालुक्यात नेली. मूळ करमळी गावाची आठवण म्हणून ह्या नव्या गावाचे नाव ब्रह्मकरमळी असे पडले. आजही ह्या मंदिरात मुद्दाम दर्शनासाठी येणार्‍या लोकांमध्ये मूळ करमळीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने असतात.
 
 
 
ब्रह्मकरमळीच्या मंदिराचे स्थापत्य जरी आधुनिक आणि साधे असले, तरी इथली मूर्ती मात्र खरोखरच अप्रतिम आहे. कदंबकालीन मूर्तिस्थापत्याचा उत्तम नमुना असलेली ही ब्रह्मदेवाची मूर्ती कमालीची आखीवरेखीव आणि प्रमाणबद्ध आहे. मूर्ती चतुर्मुखी आहे. एक मुख मागे आणि तीन मुखे पुढे आहेत. पुढच्या मधल्या मुखाला दाढी कोरलेली आहे. चतुर्हस्त मूर्तीच्या एका हातात कमंडलू, एका हातात वेद, एका हातात अक्षमाला आणि एका हातात ‘श्रुक’ हे स्वयंपाकघरातल्या डावासारखे दिसणारे, यज्ञात हवी देताना वापरायचे उपकरण आहे.
 
 
मूर्ती समस्थितीत उभी असून सालंकृत आहे. मूर्तीच्या पायाशी गायत्री आणि सावित्री ह्या ब्रह्मदेवाच्या पत्नी कोरलेल्या आहेत, तसेच अगदी खाली दोन भक्त स्त्रिया भक्तीत लीन होऊन नमस्कार मुद्रेत दाखवल्या आहेत. त्याखाली हंस कोरलेले आहेत. मूर्तीभोवती अत्यंत देखणी अशी प्रभावळ आहे आणि त्यावर व्याल, हत्ती आणि हंस कोरलेले आहेत. दोन्ही बाजूंना दोन ऋषी आहेत. गाभार्‍याच्या मागच्या छोट्या खिडकीतून मूर्तीचा मागचा चेहरा पाहता येतो.
 
 
 
ब्रह्मदेवाच्या ह्या दुर्मिळ, प्राचीन आणि अत्यंत सुडौल आणि सुघड मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गोव्याला गेल्यावर ह्या मंदिराला नक्की भेट द्या.
छायाचित्र सौजन्य - राजन पर्रिकर