प्रभू रामचंद्रांच्या वनवासाच्या काळातील स्थळांचा मागोवा हा निकष ठरवून श्रीरामांच्या प्रवास-अनुभवांवर आधारित पुस्तक लेखक द्वयी विक्रांत पांडे आणि नीलेश कुलकर्णी यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे ’इन दि फूटस्टेप्स ऑफ रामा’. श्रीराममंदिराचे उदघाटन होत असताना प्रभू रामचंद्रांच्या वनवासातील मार्गाचा मागोवा घेणारे हे पुस्तक वाचकांना नक्कीच समयोचित वाटेल.
येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. गेल्या अनेक शतकांपासून राम मंदिराच्या पुन:प्रतिष्ठापनेचा लढा सुरू होता, त्याची यशस्वी सांगता मंदिराच्या उभारणीने होईल. रामायणाचे गारूड भारतीय जनमानसावर मोठ्या प्रमाणावर आहे. राज्य कसे करावे याचा आदर्श म्हणून रामराज्याचा दाखला दिला जातो. ठोस उपाय हवा, तर रामबाणाची अपेक्षा केली जाते. माणसाचा व्यवहार कसा हवा? तर रामासारखा - एकवचनी! तरीही रामायण जेथे जेथे घडले ती ठिकाणे कुठे आहेत हे विचारले, तर मात्र अनेक जण निरुत्तर होतील. दोन लेखकांनी आपल्या मित्रांना असेच काही प्रश्न विचारले. त्यातील एक प्रश्न होता - वाल्मिकी रामायणात ज्या चित्रकूटचा उल्लेख आहे, ते भारतात नेमके कुठे आहे हे आपल्याला माहीत आहे का? हा प्रश्न त्यांनी शंभरेक जणांना विचारला. पण त्यातील एकही जण उत्तर देऊ शकला नाही. मग जेव्हा मध्य प्रदेशात हे स्थळ आहे, एवढेच नव्हे, तर ते एक पर्यटन स्थळ आहे असे या लेखकांनी सांगितले, तेव्हा समस्तांस अचंबा झाला. तीच बाब किष्किंधाची. हे नाव ऐकले होते, त्या सर्वांनाच ते स्थान हंपीच्या अगदी निकट आहे हे मात्र ठाऊक नव्हते. या अनुभवाने या लेखकद्वयाला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. हे लेखक म्हणजे विक्रांत पांडे आणि नीलेश कुलकर्णी आणि त्यांनी लिहिलेले पुस्तक ’इन दि फूटस्टेप्स ऑफ रामा’.
या पुस्तकाची पूर्वपीठिका लेखकांनी विशद केली आहे, ती या पुस्तकाचे वाचन सुरू करण्यापूर्वी माहीत असणे आवश्यक. लेखक लिहितात - ‘रामायणातील कथा लहानपणापासून सगळ्यांनी ऐकलेल्या असतात. वाल्मिकी रामायणाचे भाषांतर अनेक भाषांत झाले आहे. तुलसी रामायण विख्यात आहे. इंडोनेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम, तिबेट येथेही रामायण उपलब्ध आहे. जैन आणि बौद्ध रामायणेही आहेत. कीर्तनकार अनेक मौखिक कथा रामायणातील म्हणून सांगतात. यात प्रभू रामचंद्रांच्या कथेचे मूळ बीज कायम असले, तरी त्यात जागोजागी लोककथा जोडल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, लक्ष्मणरेषा ही रामायणातील सर्वश्रुत कथा. पण वाल्मिकी रामायणात ती कथा नाही. शबरी आणि उष्टी बोरे ही कथा लोकप्रिय. पण तिचाही वाल्मिकी रामायणात उल्लेख नाही. अश्वमेध यज्ञात सोडलेले अश्व प्रभू रामचंद्रांची मुले पकडले, तेव्हा युद्धभूमीवर प्रभू रामचंद्रांची त्याच्या मुलांशी भेट झाली, असे तुलसी रामायण सांगते, तर वाल्मिकी रामायणात ’लव कुश रामायण गाती’ अशी प्रभू रामचंद्र आणि लव-कुश भेट दरबारात झाली, असे म्हटले आहे.’ काही निकष असावा, म्हणून वाल्मिकी रामायण आणि तुलसी रामायण या सर्वाधिक लोकप्रिय असणार्या ग्रंथांत उल्लेख असणार्या स्थळांना भेट देण्याचे या लेखकद्वयाने निश्चित केले. अयोध्येपासून सुरू झालेला हा मागोवा लंकेवाटे अयोध्येत संपला. प्रभू रामचंद्रांच्या वनवासाच्या काळातील स्थळांचा मागोवा हा निकष लेखकांनी ठरविला आणि त्याच प्रवास-अनुभवांवर आधारित हे भन्नाट पुस्तक!
भुशुंडी नावाच्या कावळ्याच्या कथेपासून लेखक वर्णनाला सुरुवात करतात. लोमाश ऋषींचा अपमान केला, म्हणून भुशुंडी कावळ्याला भगवान शंकरांनी शाप दिला की पुढचे हजार जन्म याच रूपात जन्म घ्यावा लागेल. पण जरा शांत झाल्यावर शंकर भगवानांनी उ:शाप दिला की भुशुंडी कावळ्याला कालातीत जगता येईल. रामकथा ही सर्वांत प्रथम भुशुंडीने सांगितली, असे मानले जाते. अर्थात भुशुंडी कावळ्याचे आशीर्वाद आपल्या या प्रवासाला मिळतील अशी कोणतीही शक्यता नव्हती, असे लेखक गंमतीने लिहितात. हनुमान गढी म्हणजे एखादा गड वाटावा अशीच. लेखक तेथील हनुमानाच्या मूर्तीचे वर्णन करतात - ‘येथील हनुमानाची मूर्ती अगदी भिन्न. हातात गदा धरलेली किंवा तळहातावर पर्वत घेतलेली नाही. हे रूप वीर मारुतीचेही नाही किंवा छाती फाडून आपल्या रामभक्तीचे दर्शन घडविणार्या हनुमानाचेही नाही.. या मूर्तीत एक प्रकारची शांतता आहे - जणू काही एका सिंहासनावर बसून अयोध्येचे रक्षण करणार्याची!’ 1797अखेरीस याचे बांधकाम पूर्ण झाले! हनुमान गढीमागील कथा लेखकांनी सांगितली आहे, ती मुळातूनच वाचायला हवी. त्या ठिकाणी भेटलेले महंत ग्यान दास लेखकांना माहिती देतात - ‘वाल्मिकी रामायणात काक भुशुंडीचा उल्लेखही नाही, तुलसीदास मात्र काक भुशुंडीला खूपच महत्त्वाचे स्थान देतात.’
पुढचा टप्पा म्हणजे अर्थातच रामांचा जन्म झाल्याचे स्थान! रामजन्मभूमी. प्रभू रामचंद्रांशी विवाह झाल्यावर सीतेला कैकेयीने कनक महाल दिला होता, असा समज आहे. राम-सीता विवाहानंतर लगेच वनवासात गेले नाहीत का? असा प्रश्न लेखक पुजारी रामसेवक दास यांना विचारला, तेव्हा ‘’नाही, बारा वर्षे ते अयोध्येत वास्तव्याला होते आणि नंतर ते वनवासाला गेले.. किंबहुना कनक महाल हा अयोध्येमधील एकेकाळचा केंद्रबिंदू होता” असे उत्तर मिळाले. लेखकांचा पुढचा शोध होता तो चाकिया पूर्वा गावाचा. वनवासाला निघाल्यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण यांनी अयोध्येबाहेर पहिली रात्र इथे मुक्काम केला होता. प्रभू रामचंद्रांनी अयोध्या सोडून जाऊ नये म्हणून अयोध्यावासीयांनी एकच टाहो फोडला. त्यांना समजावणे अवघड आहे, म्हणून प्रभू रामचंद्रांनी एक युक्ती केली. सारथी सुमंत यांना त्यांनी सांगितले की पुढच्या गावाच्या दिशेने तू रथ ने आणि रथ गेल्याच्या खुणा जमिनीवर उमटू दे, पण तू मग तेथून पुन्हा फीर आणि बरोबर उलट्या दिशेच्या गावी आम्हाला पुन्हा भेट.. अशाने प्रभू रामचंद्र भेटलेच नाहीत आणि अगदी खिन्न मनाने ते सगळे जण अयोध्येला परतले. एका अर्थाने प्रभू रामचंद्रांनी चकवा दिला आणि जेथे मुक्काम केला तेथून ते गाव पूर्वेला आहे, म्हणून या जागेला चाकिया पूर्वा असे नाव मिळाले, अशी रंजक माहिती लेखक पुरवितात.
भरतभेटीचा प्रसंग जेथे घडला, येथपासून सुवर्णमृगाचे रूप घेऊन आलेल्या मारिचाचा वध जेथे झाला, ती सर्व स्थळे लेखकांनी पालथी घातली आहेत. भारद्वाज ऋषींच्या सल्ल्यावरून चित्रकूट हे प्रभू रामचंद्रांनी वनवासातील मुक्कामाचे ठिकाण बनविले. चित्रकूटमध्ये प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण हे अकरा वर्षे अकरा महिने अकरा दिवस राहिले आणि मग अगस्त्य मुनींच्या सांगण्यावरून ते दंडकारण्यात गेले. बुलढाण्यात असणार्या लोणार सरोवराचीही कहाणी लेखक सांगतात. रामायणातदेखील ते होते. उल्कापातामुळे हे सरोवर निर्माण झाले. दंडाकारण्यातून नाशिकला जाताना या सरोवराकडे प्रभू रामचंद्र आकृष्ट झाले होते. या सगळ्या परिसरात असंख्य मंदिरे आहेत, मात्र आता बहुतांशी मंदिरांचे भग्नावशेष राहिलेले आहेत. त्यातील अनेक मंदिरे शिवमंदिरे आहेत आणि हेमाडपंथी शैलीत बांधलेली आहेत. वनवासात असताना भरत आणि प्रभू रामचंद्रांची भेट जेथे झाली, तेथे असणार्या भरत मिलाप मंदिराचा उल्लेख लेखक करतात. तेथील दगडांवर पावलांचे ठसे आढळतात आणि ते रामायणकालीन आहेत असे मानले जाते.
मारिचाने सुवर्णमृगाचे रूप घेतले आणि त्याने प्रभू रामचंद्रदेखील हरखून गेले. त्यांनी त्या मृगाचा पाठलाग सुरू केला. नाशिकच्या परिसरात असलेल्या एका ठिकाणी हे सुवर्णमृग प्रभू रामचंद्रांच्या नजरेस पडले. ते मृग म्हणजे अगदी चंद्रकोरीसारखे दिसत होते आणि म्हणून त्या गावाला नाव पडले चांदोर.. इत्यादी माहिती पुस्तकाची खुमारी वाढविते. टाकेडच्या येथे जटायूचे मंदिर आहे. जटायू गरुड होता का? याचे उत्तर तेथील एक स्थानिक देतो - “असूही शकतो, पण वाल्मिकींनी जटायू म्हणजे गिधाड असल्याचे म्हटले आहे.” रामेश्वरच्या कोदंड रामस्वामी मंदिराची कथा अफलातून. असे मानतात की रावणाचा वध करून बिभीषणाला सिंहासनावर बसविल्यानंतर दुसर्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी या मूळ मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली. साहजिकच दसर्याच्या दिवशी हे मंदिर नव्हते आणि म्हणून दर वर्षी बिभीषणाच्या राज्यारोहणाच्या दिवशी हे मंदिर बंद ठेवण्यात येते. आदि जगन्नाथ पेरुमल मंदिराचे वैशिष्ट्य आगळेच. हे मंदिर प्रभू रामचंद्रांपूर्वीपासून आहे असे मानले जाते. तेथील पुजारी सांगतात - ‘या मंदिराची खासियत अशी की दशरथ राजा पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी याच ठिकाणी आला होता. प्रभू रामचंद्रांनी येथेच जगन्नाथाला प्रार्थना करून असा ’रामबाण’ मिळविला, ज्याने रावणाचा वध झाला. प्रभू रामचंद्रांनी गवतावर तीन दिवस झोपून सागराची प्रार्थना केली, ज्यायोगे लंकेला जाता यावे. दर्भ म्हणजे गवत आणि शयनं म्हणजे झोपणे. म्हणून या मंदिराला दर्भशयनम मंदिर असेही म्हणण्यात येते’ असे लेखकांनी कथन केले आहे.
अशोक वाटिका ही लंकेत, पण तेथेही सीतेचे मंदिर जतन करण्यात आले आहे, हे विशेष. कोलंबो ते कँडी रस्त्यावर रॅम्बोडा हिलवर भक्त हनुमान मंदिर आहे. रॅम्बोडा हा ‘रामबोधा’चा अपभ्रंश. रावणाच्या दहा तोंडांचे निराळेच विश्लेषण लेखकांना तेथे ऐकायला मिळाले. त्याच्या राज्याची विभागणी दहा प्रांतांत करण्यात आली होती आणि जेव्हा रावण त्याच्या सिंहासनावर बसत असे, तेव्हा त्या दहा प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे दहा मुकुट त्याच्या शेजारी ठेवण्यात येत. त्यातून रावणाला दहा तोंडे होती असा समज पसरला. लंकेत रावणाविषयी कोणीही अपशब्द काढीत नाही, असे निरीक्षण लेखकांनी नोंदविले आहे. श्रीलंकेत प्रभू रामचंद्रांची मंदिरे आहेतच, पण रावणाचीही आहेत. लंकेत असणारे बिभीषणाचे मंदिर हे जगातील एकमेव. रामेश्वरमधील कोदंड रामस्वामी आणि दर्भशयनम मंदिरात बिभीषणाची मूर्ती आहे; पण लंकेतील एकट्या बिभीषणाचे हे अनोखे मंदिर, जेथे केवळ बिभीषणाची भक्ती केली जाते.
पुस्तक प्रभू रामचंद्रांच्या वनवासाच्या काळातल्या पाऊलवाटा शोधणारे आहे आणि साहजिकच तुलसीदासांचा उल्लेख करणे आवश्यक. चित्रकूटपासून 45 कि.मी. अंतरावर राजापूर आहे. यमुनेच्या काठावर असणारे हे गाव म्हणजे तुलसीदास यांचे जन्मगाव. तेथे लेखकांची भेट झाली ती पंडित ॐकारनाथ चतुर्वेदी यांच्याशी. तुलसीदास यांचे शिष्य पंडित गणपती उपाध्याय यांचे ते वंशज. उपाध्याय माहिती देतात - ‘तुलसीदास यांना 126 वर्षांचे आयुष्य लाभले. तुलसीदास यांना श्रीरामचरितमानस लिहिण्यास 2 वर्षे, 7 महिने आणि 26 दिवस लागले. त्या वेळी त्यांचे वय 76 वर्षांचे होते.’ रामायणाच्या संदर्भाने असलेल्या स्थळांचा हा अनोखा प्रवास आहे. पुस्तकातील वर्णने इतकी प्रत्ययकारक आहेत की वाचकाला ते मंदिर, तो परिसर आणि कदाचित रामायणाचा तो काळही दिसायला लागेल. कुठेही अंशभरही कंटाळवाणे न होऊ देता वाचकाची उत्कंठा पुस्तकभर कायम ठेवण्यात लेखक यशस्वी ठरले आहेत. राम मंदिराचे उदघाटन होत असताना प्रभू रामचंद्रांच्या वनवासातील मार्गाचा मागोवा घेणारे हे पुस्तक वाचकांना समयोचित वाटेल!