काशी देवदिवाळी

विवेक मराठी    16-Dec-2023   
Total Views |
काशी हे भारतातील अत्यंत प्राचीन शहरांपैकीं एक शहर होय. ज्ञानाची नगरी म्हणूनही काशीची ओळख आहे. सर्व भारतात हे शहर अत्यंत पवित्र असे यात्रेचे ठिकाण मानले गेले. नुकतेच या काशी शहरात देवदिवाळीनिमित्त जाणे झाले. त्या अंतर्बाह्य अनुभवसंपन्न करणार्‍या काशीयात्रेचे आणि देवदिवाळीचे हे शब्दचित्रण..

kashi
 
श्री गंगा जी का तट हो,

यमुना का वंशीवट हो,
 
मेरा सांवरा निकट हो,
 
जब प्राण तन से निकले,
 
इतना तों करना स्वामी जब प्राण..॥
 
काशीच्या दशाश्वमेध घाटावर या ओळींनी मनात वेगळेच गारूड निर्माण केले होते. देवदिवाळीच्या दिवशी काशी शहर नववधूसारखे सजले होते. गंगेच्या घाटावरील देवदुर्लभ अशी दिवाळी अनुभवली. त्या वेळी काशीचे स्वरूप आणि आताचे बदलेले काशी बघून आनंद वाटला. खरे तर देवदिवाळीचा हा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यावा असे मनापासून वाटते, कारण या पर्वकाळात काशी शहरच नाही, तर गंगेचे सगळे घाट दिव्यांनी प्रकाशित झालेले असतात. काशी आणि देवदिवाळी समानार्थी असून या वर्षीचा उत्सव भव्यदिव्य झाला. नमो घाटावर राजकीय सोहळा होता, पण बाकी घाटांवरसुद्धा भाविकांच्या उपस्थितीत दिव्यांच्या प्रकाशाने सगळे गंगा घाट प्रकाशून गेले होते. पणतीने उजळून जाणारे घाट बघून उपस्थित प्रत्येकाच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडताना दिसला, तो म्हणजे “वाह..”
 
 
काशी येथील देवदिवाळीची अशी कथा प्रचलित आहे की, त्रिपुरासुर राक्षस पृथ्वीवरील लोकांना त्रास द्यायचा. त्रस्त देवीदेवता त्याच्याविषयीची तक्रार घेऊन महादेवाजवळ पोहोचले. महादेवांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या राक्षसाचा वध केला. त्याच्यापासून मुक्ती मिळाल्यानंतर सगळ्यांनी महादेवाचे देवस्थान म्हणजेच काशी गाठली. तेथे हा आनंदोत्सव म्हणून दीपप्रज्वलन करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत हा देवदिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी देवीदेवता पृथ्वीवर अवतरतात आणि काशीमध्ये दिवाळी साजरी करतात, असे म्हटले जाते. त्यामुळे या उत्सवाला देवदिवाळी असेही म्हटले जाते. या दिवशी काशी आणि गंगेचे घाट गर्दीने फुलून गेलेले असतात आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी येथे दीपदान केले जाते.
 
 

kashi
 
काशी म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशाने उजळणारी भूमी. काशी शहराला काशी हे नाव पडण्यापूर्वी ‘वाराणसी’ हे नाव असावे, असे दिसते. वरणा व असी या दोन नद्यांमधील प्रदेशात हे शहर वसले असल्याने या शहराला वाराणसी हे नाव पडले असावे, अशीही समजूत आहे. काशीमधील सर्व मंदिरांचे यथार्थ वर्णन करावयाचे म्हणजे एक मोठा ग्रंथच होईल. कारण इथे पाऊल पडेल तिथे मंदिर बघायला मिळते. मंदिरांचे शहर म्हणूनही काशीचे आपले ऐतिहासिक महत्त्व आहे. या काशीतील सर्वांत प्रमुख मंदिर म्हणजे काशी विश्वनाथाचे मंदिर होय. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे मंदिर या शहराचे वैशिष्ट्य जपणारे आहे. पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आज हेच मंदिर दिमाखात उभे आहे. हे संपूर्ण मंदिर सोन्याने मढवले आहे. या देवळात विश्वेश्वररूपी शिवाची मूर्ती असून ही मूर्ती सर्व शहरांचे संरक्षण करते, असे मानण्यात येते. लिंगात्मक असलेल्या विश्वनाथांच्या या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनार्थ भाविक काशीत कायम येत असतात. परदेशी पाहुण्यांनीसुद्धा हे शहर गजबजलेले दिसते. दिवाळी नुकतीच झालेली असल्याने वातावरणात गारवा जाणवतो. प्रसंगी थंडीची चाहूल लागलेली असताना परदेशी पर्यटकांनाही काशी खुणावत असते आणि या निमित्ताने देवदिवाळीही अनुभवास येते.
 
 
 
काशी शहरात आपल्याला गंगेचे वेगळे रूप बघायला मिळते. हिमालयातून उगम पावणारी गंगा हरिद्वारला जशी खळखळ वाहते, तशी काशीला हीच गंगा शांत आणि आल्हाददायक वाटते. इथल्या घाटावर बसून गंगेकडे बघितले, तरी मन:शांती लाभते आणि या गंगेच्या कुशीत तासन्तास बसूनसुद्धा विलक्षण ओढ लावण्याचे सामर्थ्य या गंगाकिनारी आहे. अनेक संत-महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि येथील गंगेचे घाट. खरे तर गंगा म्हणजे गंगाच आहे. तिचे मंत्रमय, काव्यमय वर्णन करणे तसे सोपे नाही. अशी ही गंगा स्वच्छ, निर्मळ, अविरत वाहते आहे. प्रत्येकाला तिच्या भेटीची ओढ विलक्षण अशीच आहे. आताही गंगामैय्याने बोलावले आणि देवदिवाळीच्या निमित्ताने तिचे दर्शन घडले. खरे तर वैज्ञानिक दृष्टीनेही पाहून झाले, की गंगेचे साठवलेले पाणी दूषित होत नाही. गंगा म्हणजे पावित्र्याचा प्रेमळ प्रवाह आहे. प्रोराणिक कथेनुसार प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या चरणकमलातून निघालेले पावित्र्य शंकराच्या मस्तकावर अवतरले आणि तेथून सेवेची दीक्षा घेऊन प्रवाह रूपात पृथ्वीवर वाहू लागले. असे म्हणतात की, ज्ञानाचा परिपाक म्हणजे सेवा आणि सेवेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गंगा. गंगेचा हा उसळता प्रेमप्रवाह पाहून गंगेच्या आवतीभोवती असणार्‍या प्रत्येकाच्या ओठावर सहज शब्द येतात - ’गंगा मैय्या की जय!’ आणि नकळत समोरचाही जोरात दाद देतो - ’गंगा मैय्या की जय!’
 
 
kashi
 
मला कायम वाटते, गंगा प्रत्येक भारतीयाचे श्रद्धास्थान आहे. भारतीयाच्या अंगात धमन्यातून रक्त वाहते, तर मनात गंगेच्या धारा वाहत असतात. ’काशीस जावे नित्य वदावे’ असे आपल्याकडे म्हटले जाते. पण त्या काशीत गेल्यावर आणि गंगेच्या दृष्टिदर्शनानेसुद्धा आपले मन प्रसन्न होते. दशाश्वमेध घाटावरील गंगा आरती बघण्यासाठी रोज लाखो भाविक येत असतात. घाटावर बांधलेल्या चौथर्‍यावर उभे राहून गुरुजी अतिशय शिस्तबद्ध रितीने गंगेची आरती करत असतात. गंगेची आरती होते. शंखध्वनी घुमतो आणि भक्तांनी केलेल्या गंगेच्या जयजयकाराने वातावरण भारावून जाते. खरेच, अनुपम सुखसोहळ्याची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे ही गंगा आरती. आज अनेक परदेशी पाहुणेसुद्धा या गंगा आरतीच्या भक्तीत आकंठ बुडालेले बघून अभिमान वाटला. सनातन आणि नित्यनूतन अशी आपली संस्कृती वर्धिष्णू होते आहे, हीच भावना मनात निर्माण झाली.
 
 
 
आज काशी विश्वनाथाचे स्वरूप बघून क्षणभर अचंबित व्हायला होते. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला तो भव्य असा कॉरिडॉर, जनतेने निवडून दिलेल्या नेतृत्वाची इच्छाशक्ती असेल तर एखाद्या नगरीचा कायापालट कसा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण ठरलेली नगरी म्हणजे काशीनगरी आहे. आणखी बराच बदल अपेक्षित आहे, तो कालांतराने होईलच; पण आज तेथील स्वच्छ घाटांबद्दल आणि या काशीबद्दल कितीही लिहिले, तरी शब्द थिटे होतील इतके काशी माहात्म्य आनंददायक आहे. आज काशी हे विद्यमान प्रधानसेवक अर्थात विकासपुरुष नरेंद्र मोदी यांच्या संसदीय क्षेत्रात येत असल्याने जे बदल होत आहेत ते अभिनंदनीय आणि आनंददायक आहेत. एका शहराचा कायापालट कशा पद्धतीने होऊ शकतो, हे पाहण्यासाठी एकदा तरी काशीला जायला हवे. शक्य झाल्यास देवदिवाळीनिमित्त प्रकाशमय झालेले काशी शहर अनुभवायला हवे. सगळे नगर गंगेच्या विस्तीर्ण घाटांवर उपस्थित झालेले बघताना हा अनुपम प्रकाशसोहळा डोळे भरून बघणे ही वेगळीच अनुभूती असते.

श्री सर्वेश फडणवीस

युवा लेखक सामाजिक ,सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक,तरुण भारत नागपूर येथे २ वर्ष स्तंभ लेखन केले आहे. मुंबई तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स,पुण्यनगरी या वृत्तपत्रासाठी विविध विषयांवर लेखन सुरू असते. मध्य प्रदेश येथील इंदोर येथून एक पाक्षिक निघतं मराठी गौरवयात ही अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. प्रज्ञालोक ह्या त्रैमासिकात ही लेखन सुरू आहे. आणि प्रज्ञालोक अभ्यासक मंडळात संपादकीय मंडळात सक्रिय आहे. मुंबई तरुण भारताने "कालजयी सावरकर" या नावाने सावरकर विशेषांक प्रसिद्ध केला त्यात 'सावरकर आणि युद्धशास्त्र' ह्या विषयावर लेख प्रकाशित झाला आहे. अनेक दिवाळी अंकांसाठी लेखन सुरू असते. साप्ताहिक विवेक साठी लिहितांना कायमच आनंद मिळत असतो. विवेकचा वाचक लेखकांना समृद्ध करणारा आहे.