महाल कार्यालयाची व्यवस्था हा एक जीवनानुभव असतो. व्यवस्था म्हणजे टापटीप, स्वच्छता, झाडलोट या सर्व बाह्य गोष्टी आहेत. आलेल्या कार्यकर्त्यांशी आत्मीय व्यवहार हा फक्त महाल कार्यालयात अनुभवास येतो. कार्यालयाच्या रचनेत काळानुसार थोडे बदल झाले आहेत. काही खोल्या वाढल्या आहेत, एखाद-दोन मजले वाढले आहेत, परंतु आत्मीयतेचा ओलावा अजून आहे तसाच अनुभवास येतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त सा. विवेकने एक ग्रंथ केला पाहिजे, अशी कल्पना पुढे आली. एका बैठकीत त्यावर सर्वांनी आपापली मते मांडली. त्यातून अशी संकल्पना पुढे आली की, संघाच्या संस्थात्मक इतिहासाकडे आपण जाऊ नये, कारण संघ संस्थात्मक शताब्दी साजरी करणार नाही. आपण संघाच्या वैचारिक इतिहासाची मांडणी करावी, असे सर्वानुमते ठरले आणि विवेकमध्ये सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून माझ्याकडे पूजनीय सरसंघचालकांच्या विजयादशमी उत्सवाच्या भाषणावरून वैचारिक टप्प्यांचा आलेख मांडणारा लेख लिहिण्याचे काम आले.
सर्व सरसंघचालकांची विजयादशमी उत्सवाची भाषणे नागपूरच्या महाल कार्यालयात अभिलेखागार विभागात उपलब्ध आहेत, हे मला माहीत होते, म्हणून मी रवी भुसारी यांना फोन करण्यास रवींद्र गोळे यांस सांगितले. रवींद्र गोळे यांनी फोन केला, नागपूरला जाण्याची तारीख नक्की करून टाकली. 2 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर नागपूरच्या महाल कार्यालयात जाण्याचा कार्यक्रम निश्चित झाला.
महाल कार्यालय माझ्यासाठी नवखे नव्हते. 1990 साली या कार्यालयात मी सात-आठ दिवस मुक्काम केला आणि त्यापूर्वीदेखील या कार्यालयात माझा मुक्काम राहिलेला आहे. कार्यालयाच्या रचनेत काळानुसार थोडे बदल झाले आहेत. काही खोल्या वाढल्या आहेत, एखाद-दोन मजले वाढले आहेत, आता ’महाल कार्यालय आणि मोहित्यांच्या पडक्या वाड्यापुढील संघस्थान’ जसे आहे तसेच आहे, फक्त महाल कार्यालयाची साक्ष असलेला शमी वृक्ष या वर्षी आपोआप कोसळला. त्याचे रिक्त स्थान मनात एक रिक्तता निर्माण करून गेले. त्याच्या बुंध्याशी एकेकाळी चौथरा होता, त्यावर बसलेले प्रभाकर अंबुलकर, विलासराव फडणवीस यांचे चेहरे माझ्या डोळ्यापुढे चमकून गेले. प्रभात शाखा, सायम शाखा आणि रात्र शाखा या मैदानावर लागतात.
1 नोव्हेंबरला रवी भुसारी यांचा मला फोन आला. ते मला म्हणाले, “तुम्ही विमानात बसला की मला फोन करा, मी तुम्हाला न्यायला विमानतळावर येतो.” रवी भुसारी क्षेत्रप्रचारक होते, नंतर त्यांच्याकडे भाजपाचे संघटन मंत्री म्हणून जबाबदारी आली. वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संघटन मंत्रिपद सोडले आणि संघकार्यात रुजू झाले. त्यांचा-माझा 20-25 वर्षांपासून अधिक काळाचा परिचय आहे. ते प्रचारक आणि मी स्वयंसेवक असा औपचारिक परिचय नाही, आमची मैत्री आहे. ते माझ्या लिखाणाचे चाहते आहेत, मर्मज्ञ वाचक आहेत आणि लेखनावरील त्यांच्या सूचना किंवा अभिप्राय अतिशय मार्मिक असतात. न वाचता तुमचा लेख खूप छान आहे अशी वायफळ प्रतिक्रिया ते देत नाहीत.
माझे एक पुस्तक वाचता वाचता नागपूर ते अकोला हा प्रवास कधी संपला हे त्यांना कळलेदेखील नाही. त्यांनी मला प्रश्न विचारला, “अकोला स्टेशन आले, हे मला कळले नाही, हा माझा दोष की तुमच्या पुस्तकाचा?” असे आहेत रवी भुसारी. त्यामुळे मी विमानतळावर न्यायला येतो असे म्हटल्यानंतर मी त्यांना तुम्ही कशाला येता.. वगैरे वगैरे काही म्हणालो नाही. आपला मित्र आपल्याला भेटायला येणार आहे याचा मला आनंद झाला. तीन दिवसांचा कार्यक्रम कसा राहणार आहे हे गाडीत बसल्यानंतर त्यांनी मला विचारले. मी त्यांना म्हणालो की, “विजयादशमीची भाषणे आणि आणखी काही सामग्रीचा शोध घेणे असे काम मी करीत बसणार आहे.” त्यावर ते म्हणाले, “माधव नेत्रपेढी आणि नागपूर तरुण भारत या दोन संस्थांच्या भेटीचे कार्यक्रम ठेवले, तर चालेल ना?” मी म्हणालो, “काही हरकत नाही.”
गप्पा मारता मारता महाल कार्यालयाच्या गेटपुढे गाडी उभी राहिली. महाल कार्यालयाला सुरक्षा दलाचा वेढा असतो. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या रडारवर हे कार्यालय आहे. यापूर्वी महाल कार्यालयात अशी सुरक्षा नव्हती. दशहतवाद्यांना पोसणार्या पूर्वीच्या शासनामुळे दहशतवादी फार निर्ढावले आहेत, त्याचा हा परिणाम. कच्छला बैठक असल्यामुळे कार्यालयनिवासी व प्रमुख कार्यकर्ते बैठकीला गेले होते. त्यामुळे कार्यालय रिकामे होते. रामभाऊ बोंडाळे - वय वर्षे 93 - यांच्याबरोबर मी ठाणे कारागृहात होतो. विदेश विभागाचे दीर्घकाळ काम करणारे शंकरराव तत्त्ववादी, विश्व हिंदू परिषदेचे हरताळकर अशी काही प्रमुख कार्यकर्ता मंडळी कार्यालयात होती.
रवी भुसारी यांनी दुस़र्या दिवशी अभिलेखागारातील महेश दासवंत आणि लक्ष्मण भट या दोन कार्यकर्त्यांशी माझा परिचय करून दिला. त्यांना माझ्या कामाचे स्वरूप सांगितले. त्यांनी एका तासाभरात माझ्यापुढे कॉम्प्युटरचे पेज उघडून ठेवले. त्या पेजवर 1930 सालापासून 2023पर्यंत विजयादशमी उत्सवातील बौद्धिक वर्ग होते. एवढ्या लवकर सर्व बौद्धिक वर्ग माझ्यासमोर येतील याची मला कल्पना नव्हती. सगळेच बौद्धिक वर्ग तपशीलवार वाचणे शक्य नव्हते़; परंतु मला जे पाहिजे, ते सर्व मी वाचत गेलो.
महाल कार्यालयाची व्यवस्था हा एक जीवनानुभव असतो. व्यवस्था म्हणजे टापटीप, स्वच्छता, झाडलोट या सर्व बाह्य गोष्टी आहेत. आलेल्या कार्यकर्त्यांशी आत्मीय व्यवहार हा फक्त महाल कार्यालयात अनुभवास येतो. अनेक संघकार्यालयात मी जाऊन-राहून आलेलो आहे आणि आयुष्यातील पंधरा वर्षे नवयुग कार्यालयात गेली आहेत. सर्व ठिकाणी व्यवस्था असतात. भोजन-चहापान सर्व काही असते. महाल कार्यालयातही हे सर्व काही असते. अधिकची गोष्ट म्हणजे आत्मीयता. रवी भुसारी तिन्ही दिवस सावलीसारखे आमच्याबरोबर होते. म्हटले तर काही गरज नव्हती. ते म्हणू शकत होते, ‘अभिलेखागारातील हे दोन कायर्र्कर्ते तुम्हाला मदत करतील. दुपारी बारा वाजता भोजन असते आणि साडेतीनला चहा असतो. तिथे आपण भेटू.’ पण रवीजी सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या भोजनापर्यंत बरोबर होते. कार्यालयातील भोजन साधेच असते, पण त्याला आस्थेची फोडणी असते. पानात पडणारी पोळी आत्मीयतेची असते. वाटीत पडणारे ताक स्नेहमय असते. बाहेर कुठे काही खाण्याची इच्छाच होत नाही.
ठरल्याप्रमाणे रवीजींबरोबर माधव नेत्रपेढीत गेलो, नागपूर तरुण भारतमध्ये गेलो. पद्मश्रीचे भोग भोगत बसलो - म्हणजे आदरातिथ्य, सन्मान, शब्दगौरव, शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह वगैरे वगैरे. हे रवीजींना कमी वाटले म्हणून की काय, 5 तारखेच्या रात्री त्यांनी कार्यालयातील सर्वांना एकत्र केले. आमचे येण्याचे प्रयोजन सांगितले आणि रवींद्र गोळे यांना व मला शाल आणि स्वामी विवेकानंदांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिले. आम्ही गप्पा मारत बसलो. सकाळी लवकरचे विमान असल्यामुळे सर्व तयारी करून दुसर्या दिवशी खाली आलो. कार्यालयातील सर्व जण निरोप देण्यासाठी खाली आले होते. “परत या लवकर” हे शब्दधन घेऊन मी विमानतळाच्या दिशेने रवाना झालो.