मतपरिवर्तन की मनपरिवर्तन?

विवेक मराठी    18-Nov-2023   
Total Views |
 आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही जोरदार मोर्चेबांधणी करण्यात सोरोस आणि मंडळी, आणि भारतातले त्यांच्या हुकमाचे ताबेदार असलेले तथाकथित डावे मग्न असतानाच एक अतिशय अनपेक्षित घटना घडली आहे, ती म्हणजे डाव्यांच्या कंपूतली जेएनयूची माजी विद्यार्थिनी असलेली मोदी-भाजपाची कट्टर विरोधक शेहला रशीद हिने गेले काही दिवस मोदीनीतीची स्तुती आरंभली आहे. कलम 370 आणि 35 अ हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांचे दृश्य परिणाम बघून तिचे हे मतपरिवर्तन झाल्याचे तिने म्हटले आहे.
 
vivek
 
2024च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदी, भाजपा आणि आघाडीचा पराभव व्हावा, यासाठी भारतात ‘इंडिया’ नावाची मोट काही महिन्यांपूर्वी बांधली गेली. मात्र पराभव करणे ही फार लांबची गोष्ट, लोकसभा निवडणुकीपर्यंत ती किती शाबूत राहते, याबाबतच मोठे प्रश्नचिन्ह आहे. आत्ता चार राज्यांत चाललेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यानच या ‘इंडिया’ आघाडीची वीण सैल होऊ लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही जोरदार मोर्चेबांधणी करण्यात सोरोस आणि मंडळी, आणि भारतातले त्यांच्या हुकमाचे ताबेदार असलेले तथाकथित डावे मग्न असतानाच एक अतिशय अनपेक्षित घटना घडली आहे, ती म्हणजे डाव्यांच्या कंपूतली जेएनयूची माजी विद्यार्थिनी असलेली मोदी-भाजपाची कट्टर विरोधक शेहला रशीद हिने गेले काही दिवस मोदीनीतीची स्तुती आरंभली आहे. कलम 370 आणि 35 अ हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांचे दृश्य परिणाम बघून तिचे हे मतपरिवर्तन झाल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या भूमिकेत, विचारांत झालेल्या या परिवर्तनामुळे आणि ती उघडपणे पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक करू लागल्याने डाव्यांनी तिच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. समाजमाध्यमातील एका सुप्रसिद्ध खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या परिवर्तनाची कारणमीमांसाही दिली आहे.
 
याच शेहला रशीदने देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैय्याकुमारची जोरदार पाठराखण केली होती, ही गोष्ट तशी अलीकडची. त्यामुळे ती लोकांच्या स्मरणात आहे. त्या वेळी ती जेएनयूमध्ये पीएच.डी.ची विद्यार्थिनी होती. डाव्यांच्या कंपूतली ती एक भरवशाची कार्यकर्ती होती. अशा कार्यकर्तीवर मोदींच्या कामाने गारूड केल्यावर डाव्या तंबूत अस्वस्थता येणे साहजिक आहे. डावीकडे झुकलेल्या मराठीतल्या प्रसारमाध्यमांनी नेहमीप्रमाणेच त्यांच्यासाठी गैरसोयीच्या असलेल्या या बातमीला अनुल्लेखाने टाळून आपली संकुचित मानसिकता उघड केली आहे.
 
मूळची काश्मिरी असलेली शेहला रशीद जेव्हा कन्हैय्याकुमारची पाठराखण करत होती, तेव्हा सगळे डावे तिची तळी उचलत असले, तरी तिच्या वडिलांनी - अब्दुल रशीद शौरा यांनी मात्र तिच्या या कृत्याचा कडाडून विरोध केला होता. कॅमेर्‍यासमोर येत त्यांनी आपल्या मुलीला चार खडे बोल सुनावले होते. विदेशातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीमुळे आणि समर्थनामुळे शेहला अशी देशविरोधी विधाने करण्याची हिंमत करते आहे, असे त्यांनी म्हटले होते. “जेएनयूमध्ये गेल्यापासून शेहलाचे वर्तन बदलायला लागले होते. 2017च्या दरम्यान ती काश्मीरच्या राजकारणात सक्रिय झाली असली, तरी त्याआधी कम्युनिस्ट पार्टीत सक्रिय होती. त्यांची ती अधिकृत कार्ड होल्डरही होती. मेरठमधून तिने निवडणूक लढवायची हेसुद्धा नक्की झाले होते. त्यासाठी मेरठमधल्या एका मुलाशी तिचा निकाह लावला जाणार होता. वडील म्हणून मला हे मान्य नव्हते. त्यानंतर 2017दरम्यान तिने काश्मीरच्या राजकारणात पाऊल टाकले. हे मला अनपेक्षित होते. भारताचे तुकडे व्हावेत यासाठी ज्या विदेशी शक्ती कार्यरत आहेत, त्यांनी शेहलाला हाताशी धरले आहे. या सगळ्याला मी सातत्याने विरोध केला, तेव्हा माझ्या जिवालाही धोका उत्पन्न झाला“ असे त्यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. विद्यापीठात शिकत असलेली मुलगी इतका खर्च कसा करू शकते याचा तपास केला जायला हवा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली होती. एवढेच नव्हे, तर शेहलाला तिच्या या उद्योगात आईचा, बहिणीचा पाठिंबा असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
 
याच शेहला रशीदने याआधी कठुआ प्रकरणातही सरकारविरोधी भूमिका घेतली होती. त्या वेळीही विदेशी शक्तींचे आर्थिक बळ तिच्यामागे असल्याची चर्चा होती.
 
जम्मू-काश्मीरमधून 370 आणि 35अ हटवण्यात आल्यानंतर आणि तिथे नायब राज्यपालांच्या माध्यमातून केंद्र सरकारने सर्व सूत्रे हातात घेतल्यानंतर बिथरलेल्या अन्य विरोधकांसारखीच शेहलाही बिथरली होती. पंतप्रधान मोदींवर आणि सर्व संबंधितांवर ती सातत्याने टीका करत होती.
 
असा पूर्वेतिहास, तोही अगदी अलीकडच्या काळातला असलेल्या शेहलाने जम्मू-काश्मीरमधल्या केंद्र सरकारच्या कामांची वाखाणणी करणे, पंतप्रधानांना सचोटीचे प्रशस्तिपत्र देणे आणि विरोधकांना ते ज्या समर्थपणे तोंड देत देशहिताची कामे करत आहेत त्याची प्रशंसा करणे.. हे सगळे भुवया उंचावणारे आहे. तिच्या या बदललेल्या भूमिकेमुळे डाव्यांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देतानाच, “मी पंतप्रधानांची प्रशंसा करते आहे म्हणून जे माझ्यावर टीका करत आहेत, त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये झालेले सकारात्मक बदल स्वत:च्या डोळ्यांनी पाहावेत” अशी पुस्तीही ती जोडते आहे. इतकेच नव्हे, तर इस्रायल आणि हमासमध्ये चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेहलाने ‘काश्मीर म्हणजे गाझा नाही’ असे विधान केले आहे.
 
शेहलामध्ये झालेले हे मतपरिवर्तन हा नव्याने चढवलेला मुखवटा तर नाही ना, अशी शंका यायला वाव आहे. मोदी-शहांसारखे सदा सावध असलेले मुरब्बी राजकारणी अशा स्तुतीने हरखून जाणार नाहीत, उलट ते या मतपरिवर्तनामागची कारणे शोधतीलच.
आणि जर काश्मीरमधील विकासकामांनी, होत असलेल्या आणि डोळ्यांना दिसणार्‍या सकारात्मक बदलांनी मूळच्या काश्मिरी शेहलाचे मनपरिवर्तन होऊन त्यातून मतपरिवर्तन झाले असेल, तर काश्मीरमधील नव्या पिढीत होऊ घातलेल्या सकारात्मक परिवर्तनाचे हे प्रातिनिधिक आणि ठळक उदाहरण ठरावे.