गो साक्षरतेचा प्रामाणिक प्रयत्न

विवेक मराठी    28-Oct-2023   
Total Views |
 
vivek
 
 
गाय हे पावित्र्याचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गायीला महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत गायीला ‘गोेमाता’ म्हणून संबोधले जाते. गायीपासून मिळणारे दूध ते गोमूत्र अशा सर्वच घटकांचा मानवजातीच्या कल्याणासाठी उपयोग होतो. हे गायीचे माहात्म्य जाणूनच वसंत गडम या लेखकाने गो साक्षरतेचा उद्देश ठेवून ‘समृद्धीचा आधार - गौ संस्कृती’ ही छोटेखानी पुस्तिका लिहिली आहे.
 
 
गाय जशी मानवास उपयुक्त आहे, तशी ती वसुंधरेसही उपयुक्त आहे. मानवाच्या आरोग्यासाठी आणि वसुंधरेच्या पोषणासाठी पूरक घटक गायीच्या माध्यमातून मिळत असतात. लेखकाने गो-साक्षरता या पहिल्याच प्रकरणात गाय कुणास म्हणावे, याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच गायीचे दूध आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ जसे अमृतासमान आहेत, तसेच शेतीसाठी (वसुंधरेसाठी) गोमय व गोमूत्र अमृतासमान आहे, हेही नमूद केले आहे.
 
 
 
पुस्तकासाठी संपर्क

vivek
वसंत गडम - 7972805510
 
गायीच्या दुधाला संपूर्ण आहार म्हटले गेले आहे, ते त्यात असलेल्या पोषक घटकांमुळे. या पुस्तिकेत गायीच्या दूधातून मिळणार्‍या पोषक घटकांचा तक्तादेखील दिला आहे. तसेच दूध कशाबरोबर घ्यावे आणि कशाबरोबर घेऊ नये, हे विस्ताराने दिले आहे. सर्वान्न म्हणून गायीच्या दुधाला मान्यता असली, तरी बदलत्या जीवनशैलीनुसार गायीच्या संवर्धनातही बदल झाले आहेत आणि त्याचे दुष्परिणाम गायीच्या दुधावर झालेले दिसतात. संवर्धनाची पूर्वापार चालत आलेली दोहन पद्धती (दूध काढण्याची पद्धत) कमी होत चाललेली आहे असेही लेखकाने सांगितले आहे. त्याचबरोबर दोहन पद्धतीची माहिती व त्याची महत्ता विशद केली आहे. अ1/अ2 दूध यातील फरक, आरोग्यास असणारे फायदे, दुर्धर आजारावर प्रभावी उपाय म्हणून गायीचे दूध आणि इतर घटक कसे परिणामकारक ठरतात यावर माहिती दिली आहे.
 
 
गायीचे दूध जसे अमृत आहे, तसेच दुधापासून तयार झालेले दही, ताक, लोणी आणि तूप यांचे फायदेही विशद केले आहेत. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या उक्तीनुसार सृष्टीतील पाच तत्त्वांपासून ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे. याच पाच तत्त्वांपासून मानवाच्या शरीराची व गायीच्याही शरीराची निर्मिती झाली आहे. म्हणूनच पंचगव्याला अनन्यसाधारण महत्त्व कसे आहे, यावरही या पुस्तिकेत भाष्य केले आहे.
 
 
या पुस्तिकेत वसुंधरेच्या पोषणालाही कसे महत्त्व आहे, तेे विस्तृत माहितीसह स्पष्ट केले आहे. सेंद्रिय कर्बाचे महत्त्व, गायीच्या शेणाचे महत्त्व, गोमूत्राचे महत्त्व, वसुंधरेसाठी असलेली उपयुक्तता जाणून त्याचे शेतजमिनीसाठी लागणारे प्रमाणही सांगितले आहे. जीवामृताचे उपयोग, त्याची कृती, वापर करण्याची पद्धती याचीदेखील इंत्थभूत माहिती दिली आहे, जेणेकरून अन्नदाता बळीराजाला त्याचा लाभ होईल.
 
 
गोआधारित शेती, तसेच पंचगव्य आधारित उत्पादने यांचा वापर करून विषमुक्त अन्न प्राप्त करू शकतो, शिवाय आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो. पुस्तिकेच्या समारोपात राज्य सरकारने केलेल्या कामधेनू आयोगाचाही ओझरता उल्लेख केला आहे. तसेच गाय संवर्धनाविषयी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्दल थोडक्यात स्पष्टता केली आहे.
 
 
पुस्तिकेच्या अगदी शेवटी संदर्भसूची दिली आहे. यावरून समजते की, मुखपृष्ठ ते मलपृष्ठ मिळून केवळ 24 पृष्ठसंख्या असलेली ही छोटेखानी पुस्तिका किती मौलिक आहे. सृष्टी, मानवजातीचे कल्याण, वसुंधरेचे कल्याण अशी सर्वांगांनी विचार करणारी ही पुस्तिका ‘सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया’ याचे स्मरण करून देते.

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.