पाकिस्तानने आपल्या परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून ज्या दहशतवादाचा वापर केला, ज्या दहशतवादाच्या माध्यमातून पाकिस्तानने भारतात असुरक्षितता-अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तोच दहशतवाद आज पाकिस्तानला गिळंकृत करायला निघाला आहे. याची परिणती पाकिस्तानच्या फुटीतून दिसून येणार, हे अटळ आहे.
अमेरिकेच्या नेत्या हिलेरी क्लिटंन यांनी 2011मध्ये केलेले एक अत्यंत प्रसिद्ध वक्तव्य जगभर गाजले. त्या असे म्हणाल्या होत्या की, “तुम्ही सापांना दूध पाजत आहात आणि हे पाळलेले साप तुम्हाला चावणार नाहीत अशी तुमची जी अपेक्षा आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे.” हे वक्तव्य त्यांनी पाकिस्तानसंदर्भात केले होते. आज पाकिस्तानला याची प्रचिती येताना दिसत आहे. दहशतवादाच्या रूपाने पाकिस्तानने जी विषवल्ली पोसली होती, ती आता त्यांनाच डंख मारू लागली आहे. ज्या पाकिस्तानने एक हत्यार म्हणून दहशतवादाचा वापर केला, दहशतवादाची निर्यात करणारी फॅक्टरी म्हणून जो पाकिस्तान जगभरात कुप्रसिद्ध आहे, तोच पाकिस्तान आज दहशतवादाला बळी पडला आहे. पाकिस्तानने केलेल्या कर्माची ही फलनिष्पत्ती आहे. दहशतवादाचे भूत आज पाकिस्तानच्या मानगुटीवर अत्यंत घट्ट पकड घेऊन बसले आहे. परिणामी, जगभरातील अभ्यासक आता असे म्हणत आहेत की, ‘1971मध्ये ज्याप्रमाणे पूर्व बंगाल फुटून पाकिस्तानमधून बाहेर पडला आणि स्वतंत्र बांगला देश म्हणून उदयाला आला, तशाच प्रकारे पश्चिम पाकिस्तान आता फुटण्याच्या मार्गावर आहे.’ थोडक्यात, पाकिस्तानचे तुकडे होण्याची वेळ आता आली आहे. आधीच दिवाळखोरीमुळे भिकेकंगाल झालेल्या पाकिस्तानसाठी हा दुष्काळात चौदावा महिना आहे. विशेष म्हणजे, अत्यंत बिकट बनलेल्या या अवस्थेतून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीला अमेरिकाही सोबतीला नाहीये. कारण अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतलेली आहे. दुसरीकडे, चीनही अलीकडील काळात पाकिस्तानबाबत सावध पावले उचलू लागला आहे. त्यामुळे पाकिस्तान आता पूर्णपणे एकाकी पडला आहे. परिणामी पाकिस्तानचे विभाजन अटळ असल्याचे मानले जात आहे.
काय आहे यामागचे कारण?
तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तान ही दहशतवादी संघटना पाकिस्तानात पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे. या संघटनेने पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले सुरू केले आहेत. नोव्हेंबर महिन्यात या संघटनेने 100हून अधिक दहशतवादी हल्ले केले असून डिसेंबर महिन्यात 60 हल्ले घडवून आणले आहेत. 2022मध्ये या दहशतवादी संघटनेने केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे जवळपास 2000 सुरक्षा कर्मचारी ठार झाले आहेत. या संघटनेची ताकद आता इतकी वाढली आहे की, तिने पाकिस्तानच्या अंतर्गत असणार्या काही क्षेत्रांवर आपला दावा सांगितला आहे. केवळ दावा सांगून न थांबता तिथे त्यांनी स्वतंत्र सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे एकीकडे शाहबाज शरीफ यांचे सरकार आणि दुसरीकडे तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तानचे सरकार अशी दोन सरकारे पाकिस्तानात आजघडीला दिसताहेत. पाकिस्तानच्या आजवरच्या 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जून 2022मध्ये तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तान या संघटनेबरोबर पाकिस्तानने युद्धबंदीचा एक करार केला होता. तो करार नोव्हेंबर 2022मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर या संघटनेने पाकिस्तानात मोठ्या संख्येने दहशतवादी हल्ले सुरू केले. युद्धबंदीच्या सहा महिन्यांच्या काळात या तालिबानी संघटनेचे हल्ले थांबलेले होते, परंतु आता मात्र त्यांनी अत्यंत हिंसक पद्धतीने दहशतवादी हल्ल्यांची मालिकाच सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ही युद्धबंदी का संपुष्टात आली हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यामध्ये अफगाणिस्तानातील तालिबान शासनाने मध्यस्थी केलेली होती. परंतु पाकिस्तानने याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तानच्या अनेक नेत्यांना पाकिस्तानी लष्कराने यमसदनी धाडले. परिणामी, या युद्धबंदीचा फायदा पाकिस्तानी सरकारलाच अधिक झाला. दरम्यानच्या काळात, या संघटनेची अफगाणिस्तानातील प्रशिक्षण स्थळे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता युद्धबंदी संपल्यानंतर ही संघटना कमालीची आक्रमक झालेली दिसत आहे.
वझिरीस्तान आणि स्वात या दोन प्रांतांत या संघटनेने स्वत:चे शासन स्थापन केले आहे. त्यामुळे या भागात पाकिस्तानातील लोकशाही शासन नसून शरीयावर आधारित कट्टर इस्लामी शासन प्रस्थापित करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी आता सर्व तालिबान्यांना आमंत्रित केले असून त्यांच्याकडे प्रचंड मोठा शस्त्रास्त्रसाठाही आहे. त्यामुळे पाकिस्तानने पोसलेला भस्मासूर त्यांच्यावर उलटला आहे.
या संघर्षाच्या निमित्ताने तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तानचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. ही संघटना 2007मध्ये पाकिस्तानात अस्तित्वात आली. अमेरिकेने 2001मध्ये अफगाणिस्तानात लष्करी हस्तक्षेप केला आणि अल् कायदा व तालिबान्यांविरुद्ध लष्करी मोहीम हाती घेतली. या मोहिमेला पाकिस्तानने समर्थन दिले. त्यामुळे नाराज झालेल्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तान हा गट स्थापन केला. हा गट प्रामुख्याने अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषेवरील - जिला ड्युरंड लाइन म्हणतात - फेडरली अॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरियामध्ये म्हणजेच ‘फटा’मध्ये अत्यंत प्रभावी आहे. खरे तर हा संपूर्ण भाग पख्तुनिस्तान म्हणून ओळखला जातो. कारण तेथे पख्तुनी समुदायाचे प्राबल्य अधिक आहे. तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तानला ही ड्युरंड लाइन मान्य नाहीये. त्यांना पख्तुनिस्तानचा पूर्ण प्रदेश पाकिस्तानातून वेगळा काढायचा आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊ नये यासाठीच पाकिस्तानने अफगाणिस्तानात तालिबान शासन आणले. पाकिस्ताननेच तालिबान्यांना मदत केली आणि अफगाणिस्तान अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपातून मुक्त केला. सध्या अफगाणिस्तानातील सरकारमध्ये असणारे जवळपास सर्व तालिबानी नेते त्या काळात पाकिस्तानात आश्रयाला होते. परंतु आता याच तालिबान शासनाविरुद्ध पाकिस्तानने युद्ध पुकारल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. अलीकडेच पाकिस्तान सरकारकडून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. त्यानुसार आम्ही कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही आणि दहशतवादाला समर्थन देणार्या देशाविरोधात आम्ही हल्ले करू असे सांगितले गेले. हा इशारा त्यांनी अफगाणिस्तानला दिलेला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे पाकिस्तान आणि तालिबान हे आजवरचे मित्र आता एकमेकांचे वैरी बनले आहेत. एकूणच पाकिस्तानची धोरणे त्यांच्यावरच उलटली आहेत.
वस्तुत:, 2010मध्ये तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तान ही संघटना फुटून तिचे दहा तुकडे झाले होते. पण आता हे दहाही तुकडे एकत्र झाले असून त्यांनी पाकिस्तानविरुद्ध एल्गार पुकारला आहे. या संघटनेने बलुचिस्तानातील बलुच लिबरेशन आर्मीलाही समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही आर्मी प्रबळ बनली असून पुन्हा एकदा स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी जोर धरू लागली आहे. परिणामी येणार्या काळात एकीकडे बलुचिस्तान आणि दुसरीकडे पख्तुनिस्तान पाकिस्तानपासून वेगळे होऊ शकतात. अशा प्रकारची अत्यंत भीषण परिस्थिती पाकिस्तानात उद्भवली आहे.
या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला पुन्हा एकदा ‘टीटीपी’बरोबर शस्त्रसंधी करावी लागेल. यासाठी पाकिस्तानला त्यांच्यापुढे झुकावे लागेल. परंतु असे करण्याने पाकिस्तानची प्रचंड मोठ्या प्रमाणावर नाचक्की होईल. त्यामुळे शाहबाज सरकार किंवा पाकिस्तानी लष्कर यासाठी तयार होणार नाही. दुसरीकडे पाकिस्तानला चीनची मदत मिळणे अवघड दिसत आहे. अमेरिका या प्रश्नापासून पूर्णत: अलिप्त राहण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे येत्या काळात टीपीपीचे हल्ले वाढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पाकिस्तानपुढील अडचणी कमालीच्या वाढतील. टीपीपीचा सामना करण्यासाठी आणि दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी पाकिस्तानी शासनाला लष्करावर अधिक खर्च करावा लागेल. त्यातून पाकिस्तानचा आर्थिक पाय अधिक खोलवर रुतला जाईल. दुसरीकडे, दहशतवादी हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या अशांतता आणि असुरक्षिततेमुळे पाकिस्तानातील गुंतवणूक कमी होईल. या सर्वांचा परिणाम म्हणजे पाकिस्तान हा दुभंगलेला आणि कंगाल झालेला देश बनेल.
पाकिस्तानने आपल्या परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून ज्या दहशतवादाचा वापर केला, ज्या दहशतवादाच्या माध्यमातून पाकिस्तानने भारतात असुरक्षितता-अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तोच दहशतवाद आज पाकिस्तानला गिळंकृत करायला निघाला आहे. याची परिणती पाकिस्तानच्या फुटीतून दिसून येणार, हे अटळ आहे.
लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.