कावा ओळखायला हवा

विवेक मराठी    04-Jan-2023   
Total Views |
 सध्या महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान करण्याची आणि त्या निमित्ताने सामाजिक वातावरण कलुषित करण्याची मोड लागली आहे. राज्यात नव इतिहासकारांचे पेव फुटले असून इतिहासाचे विकृतीकरण करताना सामाजिक विसंवाद निर्माण करून मतपेढी घट्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कधी छत्रपती शिवाजी महाराज, तर कधी छत्रपती संभाजी महाराज केंद्रस्थानी ठेवून भडकाऊ वक्तव्ये केली जातात आणि त्यातून सामाजिक वातावरण दूषित केले जाते. इतिहास हा इतिहास असतो याचाच विसर पडला असल्याने इतिहासातील लढाई आता जातीय लढाया झाल्या आहेत.
 
vivek
 
सध्या महाराष्ट्रात सामाजिक विद्वेष उफाळून आला आहे. नुकत्याच संपलेल्या विधानसभा हिवाळी अधिवेशनात “छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्याची गरज नाही, ते स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर नव्हते” अशा आशयाचे विधान विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केले. स्वाभाविकच याचे पडसाद उमटू लागले. अजितदादा पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी स्वत:ला इतिहासकार म्हणवून घेणारे काही जण मैदानात उतरले. सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी तुंबळ युद्ध सुरू आहे. या निमित्ताने ऐतिहासिक पुराव्यांपासून ते तथाकथित नव इतिहासकारांच्या भूमिकांपर्यंत सारे काही सोशल मीडियावर भरभरून उपलब्ध होत आहे. इतिहास हा इतिहास आहे, तो इतिहास म्हणून समजून घेतला पाहिजे याचेच भान आपण हरवून बसलो आहोत. सर्व गोष्टी राजकीय चश्म्यातून पाहण्याची व्याधी आपणास जडली आहे. त्यामुळे राजकारणातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांनाही सोडायला तयार नाही आहोत.
 
 
 
अजितदादा पवार बोलले, पाठोपाठ मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड बोलले, या मंडळींसाठी इंद्रजित सावंत ऐतिहासिक पुरावे सादर करू लागले. अभिनेते अमोल कोल्हे यांनी याच विषयावर भाष्य केले. एका बाजूला छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असे मांडणारा - म्हणजे अजित पवारांची पाठराखण करणारा गट, तर दुसरीकडे या गटाचे वैचारिक वाभाडे काढणारा छत्रपती संभाजी महाराज प्रेमी गट अशी सोशल मीडियावर साठमारी चालू असताना वरील सर्व जणांचे बोलवते धनी शरद पवारांनी वेगळीच भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे अजित पवार, आव्हाड, सावंत, कोल्हे इत्यादींची अडचण झाली आहे. आपण बोललो त्यावर ठाम राहावे की शरद पवारांनी घेतलेली भूमिका स्वीकारून त्याप्रमाणे स्वत:ला दुरुस्त करावे, हेच या मंडळींना कळत नाही. धर्मवीर संभाजी महाराज या विषयावर बोलताना शरद पवार म्हणाले, “संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं वावगं नाही. धर्मवीर काय किंवा धर्मरक्षक काय? ज्यांना धर्मवीर म्हणायचं त्यांनी धर्मवीर म्हणावं, ज्याला स्वराज्यरक्षक म्हणायचं आहे त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणावं. राज्याचं रक्षण करण्याचं त्यांनी महत्त्वाचं काम केलं, त्याची नोंद आपण घेतली तर त्याची नोंद घेतल्यास चुकीचं नाही, त्यांच्यावरून वाद करण्याची गरज नाही. महापुरुषांवरून अकारण वाद नको.” पवारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अजित पवार आपले वक्तव्य मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र तशी शक्यता अजिबात नाही. अजितदादा पवार विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात बोलले असल्यामुळे त्यांचे वक्तव्य सभागृहाच्या दस्तऐवजात नोंदवले आहे. कदाचित शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार सभागृहाच्या बाहेर आपले वक्तव्य मागे घेतीलही, मात्र सभागृहात झालेल्या नोंदीचे काय? हा प्रश्न शिल्लक राहतोच.
  
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे मुसलमानाविरूद्ध लढले नाहीत, तर ब्राह्मणांविरूद्ध लढले अशा प्रकारची मांडणी केली गेली. त्यासाठी अनेक नव इतिहासकार उभे केले आणि त्यांनी लिहिलेले साहित्य हाच खरा इतिहास आहे असा आभास निर्माण केला गेला. 
 
 
शरद पवारांनी जरी वरवरची समन्वयाची भूमिका घेतली असली, तरी मुळात त्यांना काय अपेक्षित आहे हे समजून घेतले पाहिजे. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा अभ्यास केला, तर विरोधाभासी वक्तव्य करणार्‍यांमध्ये शरद पवार यांचा पहिला नंबर लागेल. स्वत: शरद पवारांनी “छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही” असे विधान केले होते. शरद पवारांचे पट्टशिष्य जितेंद्र आव्हाड यांनी “अफजलखान त्यांच्या राज्याच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आला होता”असे विधान केले होते, तेच आव्हाड आता औरंगजेबाचे गुणगान गाण्यात रममाण झाले आहे. आव्हाड औरंगजेबाचे महिमामंडन करताना नव इतिहास सांगत आहेत. पवार काय किंवा आव्हाड काय.. असे का बोलतात, हे उघड गुपित आहे. अशा वक्तव्यामागे दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे मुस्लीम लांगूलचालन आणि दुसरे हिंदू अस्मितावर घाला घालते होय. पवार फरची टोपी घालून मिरवताना दिसतात, पण हिंदू अस्मितेचे त्यांना कायम वावडे आहे. हिंदू समाजाला उपदेश करताना ते फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाचा उद्घोष करतात आणि हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती यावर टीका करताना दिसतात. मात्र त्यांची ही टीकेची तोफ मुस्लीम समाजावर कधीही डागली गेली नाही. उलट पवित्र कुराणाच्या आदेशानुसार मुस्लीम समाजाला जगता यावे असा आग्रह ते करत असतात. मुस्लीम समाज हा संविधानाच्या कक्षेत येत नाही. असेच अप्रत्यक्षपणे ते सुचवत असतात. या पार्श्वभूमीवर हिंदू धर्म, अस्मिता यांच्याबाबत उठवळपणा करण्यामागे काय उद्देश आहे, हे जाणून घेतले पाहिजे.
 
 
 
महाराष्ट्रात एकूणच हिंदू अस्मिता आणि महापुरुष यांच्या अवमूल्यनाची जरी होड लागली असली तरी त्यामागे सूत्रधार कोण आहे? हे समजून घेणे आवश्यक आहे. मागील दोन-तीन दशकांपासून महाराष्ट्राचा इतिहास जातीय स्वरूपात मांडण्यास सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ एका जातीपुरते मर्यादित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि बहुजन विरुद्ध ब्राह्मण अशी त्याची परिणती झाली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे मुसलमानाविरूद्ध लढले नाहीत, तर ब्राह्मणांविरूद्ध लढले अशा प्रकारची मांडणी केली गेली. त्यासाठी अनेक नव इतिहासकार उभे केले आणि त्यांनी लिहिलेले साहित्य हाच खरा इतिहास आहे असा आभास निर्माण केला गेला. आता याच मार्गाने पुढे जात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या संबंधात हिंदू समाजाला वाटणारे प्रेम, श्रद्धा यांच्यावर आघात करत अस्मिताहीन हिंदू समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका असे विधान करणे हा या प्रयत्नांचाच भाग आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. हिंदू समाज श्रद्धाहीन झाला की आपोआपच तो धर्महीन होईल. त्यामुळे हिंदूंच्या श्रद्धेचे स्थान असेल त्यावर आघात करा. इतिहासाची मोडतोड करून धर्म आणि संस्कृतीपासून महापुरुषांना दूर करा ही कार्यपद्धती अवलंबून महाराष्ट्रात सामाजिक पातळीवर बखेडे निर्माण केले जात आहेत. त्यामुळे हिंदूंच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तो आपला इतिहास, धर्म, संस्कृती यापासून दूर लोटला जाईल अशी योजना करून जाणीवपूर्वक वाद निर्माण केले जात आहेत. या वादातून तात्कालिक स्वरूपात समाजमन अस्वस्थ होत असले आणि तशाच तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी यातून मार्ग निघणार नाही. सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडल्या जातील. आज ही मंडळी महापुरुषांचा अवमान करत असली, तर त्यांचे लक्ष्य हिंदू धर्म आणि संस्कृती आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. अशा प्रकरणात तत्काळ उत्तर देतानाच पुढील पिढी या भ्रमजाळात फसणार नाही यांची काळजी घ्यावी लागेल आणि इतिहास म्हणून खरा इतिहास सांगावा लागेल.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001