टिळकांच्या मृत्यूनंतर देशातील युवकांना स्वातंत्र्यचळवळीसाठी तयार करणे हा उद्देश ठेवून 1921 साली हिंदुस्थानी सेवा दलाची स्थापना झाली. हुबळी ह्या संग्रामाचे केंद्र बनले. उमाबाई महिला सेवा दलाच्या प्रमुख झाल्या. उमाबाईंनी काम करता करता व्यवस्थापनाचे धडे घेतले. त्यांचे छोटेसे घर अनेक क्रांतिकारकांचे लपण्याचे ठिकाण झाले. उमाबाईंनी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि पुढच्या कामासाठी लागणारे धनसुद्धा पुरवले.
कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता शेवटच्या श्वासापर्यंत सतत काम करत राहणे, हा वसा सोपा नाही. Selfless serviceचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उमाबाई कुंदापूर.
1892 साली मंगलोर येथे गोलिकेरी परिवारात उमाबाईंचा जन्म झाला. स्त्रीसाठी पोषक नसलेल्या काळात त्यांच्या जन्म झाला खरा; पण त्यांनी जी कामगिरी केली, त्यातून ही परिस्थिती कुठेच दिसत नाही, उलटपक्षी परिस्थिती तुमच्या ध्येयाच्या, तुमच्या कामाच्या आड येत नाही, हेच त्यांचा जीवनपट उलगडून पाहताना जाणवते.
काही समजायच्या वयात यायच्या आत - म्हणजे अगदी 13व्या वर्षी संजीवराव कुंदापूर ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आनंदराव कुंदापूर - उमाबाईंचे सासरे प्रवाहाविरुद्ध विचार करणारे होते. त्यांनी उमाबाईंचे शिक्षण 10वीपर्यंत पूर्ण केले. इथून उमाबाईंच्या सामाजिक जीवनाला सुरुवात झाली. आपल्याचसारखे इतर महिलांनासुद्धा शिक्षणाचा आनंद देण्याचे काम त्या आपल्या सासर्यांच्या हाताखाली करू लागल्या. 1920 साली स्वातंत्र्यचळवळीचा सूर्य मावळला.. लोकमान्य टिळकांना देवाज्ञा झाली. त्यांची अंत्ययात्रा उमाबाईंच्या मनावर खोलवर स्पर्श करून गेली. इतका मोठा जनसमुदाय आणि त्यांना सांभाळायला अगदी बोटावर मोजण्याइतके पोलीस कर्मचारी. त्या काळच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन कौशल्य वाखाणण्यासारखे होते. उमाबाईंना मार्ग सापडला. त्या काँग्रेस कार्यकर्त्या झाल्या. खादीचा प्रचार-प्रसार, स्वदेशीबाबत जनजागृती, महिलावर्गामध्ये स्वातंत्र्यचळवळीबद्दलची जागरूकता निर्माण करणे ह्यासाठी त्या दारोदारी फिरू लागल्या. कामाला सुरुवात झाली आणि दैवाचा पहिला फटका बसला.. वयाच्या 25व्या वर्षी त्यांना वैधव्य आले. संजीवराव कुंदापूर ह्यांचे देहावसान झाले. त्यांचे सासरे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी मुंबई सोडले आणि हुबळीत आले. तिथे आनंदरावांनी प्रेस सुरू केली, तर त्याच्या आवारात ’टिळक कन्या शाळा’ सुरू करून उमाबाई त्याच्या सर्वेसर्वा झाल्या.
टिळकांच्या मृत्यूनंतर देशातील युवकांना स्वातंत्र्यचळवळीसाठी तयार करणे हा उद्देश ठेवून 1921 साली हिंदुस्थानी सेवा दलाची स्थापना झाली. हुबळी ह्या संग्रामाचे केंद्र बनले. उमाबाई महिला सेवा दलाच्या प्रमुख झाल्या. उमाबाईंनी काम करता करता व्यवस्थापनाचे धडे घेतले. बेळगावला 1924 साली काँग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन ठरले. गांधीजी त्यासाठी येणार होते. व्यवस्था चोख लागणार होती. उमाबाईंनी पूर्ण क्षेत्र पालथे घातले, 150 महिला कार्यकर्त्या तयार केल्या. 1932 साली उमाबाईंनी अटक झाली, 4 महिन्यांचा सश्रम कारावास. तिथे दैवाचा दुसरा झटका बसला. त्यांचे पितृतुल्य सासरे गेले. तुरुंगवासातून बाहेर आल्यावर त्यांना कळले की त्यांची प्रेस जप्त करण्यात आली होती आणि शाळेला टाळे लावण्यात आले आहे, त्यांनीच तयार केलेले ’भगिनी मंडळ’ बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे. उमाबाई हरल्या नाहीत. त्यांची देशसेवा सुरूच राहिली. आता त्यांचे छोटेसे घर अनेक क्रांतिकारकांचे लपण्याचे ठिकाण झाले. कर भरणा नाही आणि मिठाचा सत्याग्रह संपूर्ण भारतभर सुरू होता. इंग्रजांची धरपकड मोहीमसुद्धा. वाटेल तसे क्रांतिकारक पुरुष-महिलांना पकडले जाई आणि मग त्यांना सोडले की त्यांच्या घरावर पाळत असे, ती टाळण्यासाठी अशा सगळ्या क्रांतिकारकांचे ठिकाण म्हणजे उमाबाईंचे घर. उमाबाईंनी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि पुढच्या कामासाठी लागणारे धनसुद्धा पुरवले.
बिहारमधील भूकंपग्रस्त क्षेत्र असो किंवा चले जाव आंदोलनाचे क्रांतिकारक, उमाबाईंचे घर सगळ्यांसाठी हक्काचा निवारा होता. त्यांचे हात हक्काची मदत करणारे होते. 1946 साली गांधीजींनी त्यांना कस्तुरबा ट्रस्टच्या कर्नाटक शाखेचे प्रमुख म्हणून नेमले. ग्रामसेविकांचे प्रशिक्षण, गावातील वस्त्यांचे उत्थान अशी सगळी कामे त्यांनी पार पाडली. सरकारकडून कुठल्याच प्रकारची मदत नसताना त्यांनी अगदी दारोदार हिंडून निधी गोळा केला आणि काम मोठे केले.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. उमादेवींना राजकारणात उडी घेऊन मोठ्या हुद्द्यावर काम करता आले असते, पण त्यांनी ’कार्यकर्ता’ म्हणून जीवन जगणे पसंत केले. त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांकडून मिळणारे पेन्शन नाकारले, त्याचबरोबर ताम्रपत्र पुरस्कारसुद्धा नाकारला. ’आनंदस्मृती’ ह्या त्यांच्या पितृतुल्य सासर्यांच्या स्मृतीत बांधलेल्या छोट्याशा झोपडीवजा घरात त्यांनी आपले उर्वरित आयुष्य काढले आणि 1992 साली ह्या जगाचा निरोप घेतला.
’मोही फसता मुकशील वीरा, मुक्तीच्या मार्गा’ हेच बहुतेक त्यांचे जीवनाचे ब्रीद असावे, अशा मुक्त तेजस्वी शलाकेला माझे शब्दसुमन अर्पण करते.
॥ वंदे मातरम् ॥