@शीतल खोत
विक्रमगड तालुक्यातील जनजाती महिलांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केशवसृष्टीच्या माध्यमातून 2019मध्ये त्यांना बांबूच्या राख्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या महिलांनी केळीच्या सोपापासून तिरंगा राख्यांची निर्मिती केली व या राख्या सीमेवर लढणार्या जवानांसाठी पाठवण्यात आल्या.
यंदाच्या 15 ऑगस्टला संपूर्ण देशभर स्वातंत्र्याची पंचाहत्तरी जल्लोशात साजरी झाली. हा आनंद आणखी द्विगुणित करणारी घटना म्हणजे, आतापर्यंत मागास समजल्या जाणार्या जनजातीतील महिलांचे एक पाऊल खर्या अर्थाने स्वावलंबनाकडे पडले आहे. म्हणजे त्यांनी बनविलेल्या केळीच्या सोपाच्या ‘तिरंगा राख्या’ या वर्षी आपल्या सैनिकांच्या हातावर मानाने विराजमान झाल्या आहेत. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त, सीमेवर लढणार्या आपल्या बांधवांसाठी आपण या ‘तिरंगा राख्या’ बनवत आहोत, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असल्याचे वाडा जिल्ह्यातील तुसे गावच्या मयुरी नायक यांनी सांगितले. त्यांचा हा आनंद त्यांच्या बोलण्यात जाणवत होता.
1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत स्वातंत्र्य पोहोचले का? आपल्या देशात अशा अनेक जनजाती आहेत, ज्यांच्यापर्यंत ‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा अर्थच पोहोचलेला नाही. त्यांना नेहमी समाजापासून दूरच ठेवण्यात आले. साध्या मूलभूत सुविधाही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या. ही बाब लक्षात घेऊन या जनजातीतील लोकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला आणि उत्तन येथे ‘केशवसृष्टी’ हा प्रकल्प सुरू केला.
‘कुणी न राहो दुबळा येथे’ हे ब्रीद घेऊन केशवसृष्टीच्या माध्यमातून 2017पासून ‘ग्राम विकास योजना’ राबविण्यात आली. पालघर जिल्ह्याच्या वाडा, विक्रमगड व जव्हार या तालुक्यांतील 42 गावांमध्ये या योजनेअंतर्गत दर महिन्याला वेगवेगळे विषय हाताळले जातात. त्यात शेती, पाणी, आरोग्य, उद्योग, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार, सौर ऊर्जा, सरकारी योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे या विषयांवर काम केले जाते.
महिला सक्षमीकरण हा विषय घेऊन केशवसृष्टीचे विमलजी केडिया, गौरवजी श्रीवास्तव, मुकेशजी पाध्या आणि मितेश पाटील यांनी पुढाकार घेतला. घरातील सर्व कामे आटपली की या महिलांकडे मोकळा वेळ असायचा. पण त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचे ज्ञान त्यांच्याकडे नव्हते. घराबाहेर, गावाबाहेर कधीही न पडल्याने त्या दुर्बळ होत्या. त्यांच्या हातात कला होती, पण त्या कलेविषयी त्या अनभिज्ञ होत्या. त्यांच्यातील ही कला ओळखून त्यांना सक्षम करण्यासाठी केशवसृष्टीने पुढाकार घेतला आणि महिलांना स्वावलंबी करण्यासाठी 2018 साली बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर 2019मध्ये ‘बांबूच्या राख्या’ हा अभिनव उपक्रम ‘ग्राम विकास योजने’च्या माध्यमातून सुरू करण्यात आला. सुरुवातीला या महिलांकडे कोणतेही प्रशिक्षण नव्हते. पण तरीही त्यांनी स्वत:च्या कल्पनेने बांबूपासून विविध वस्तू तयार केल्या. त्यांचे ही कलाकौशल्य पाहून विक्रमगड तालुक्यातील 9 गावांतील 300 महिलांना जानेवारी 2020मध्ये ‘प्रोजेक्ट ग्रीन गोल्ड’च्या माध्यमातून बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले. आज या उपक्रमाअंतर्गत जवळपास 500 महिला सक्षम झाल्या आहेत.
या उपक्रमामुळे वनवासी महिला सक्षम झाल्या, रोजगारप्राप्तीमुळे त्या स्वावलंबी झाल्या. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला. आपले घर चालविण्यासाठी आता त्या कोणापुढे हात पसरत नाहीत. संसाराला, मुलांच्या शिक्षणाला हातभार लावता आला. संघशक्तीचे दर्शन आपल्याला इथे पाहायला मिळते.
मुकेशजी पाध्या यांच्या कल्पक डोक्यातून राख्यांची कल्पना आली आणि वनवासी महिला भगिनींनी आपल्या कलेच्या साहाय्याने ती प्रत्यक्षात उतरविली. आपल्या कामात काही तरी नावीन्य पाहिजे, हे लक्षात घेऊन स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त मुकेशजी पाध्या यांनी ‘केळीच्या सोपापासून तिरंगा राखी’ तयार करण्याची नावीन्यपूर्ण कल्पना काढली.
या भागात केळीचे उप्तादन मोठ्या प्रमाणावर होते. केळी विकली जातात, पण केळीच्या खांबांचे करायचे काय? त्याची विल्हेवाट कशी लावायची? हा व्यापार्यांसमोरील प्रश्न होताच. बांबूपासून वस्तू बनू शकतात, मग केळीच्या सोपापासून का नाही? असा विचार झाला आणि केळीच्या सोपापासून वस्तू बनू लागल्या. केळीचे खांब हे आपल्याकडे शुभ मानले जातात. हिंदू संस्कृतीत मंगल प्रसंगी ते वापरले जातात. त्यामुळे ‘मंगल फायबर’ असे या उत्पादनाचे नामकरण करण्यात आले. सुरुवातीला यापासून पुरुषांसाठी पाकीट, महिलांसाठी आकर्षक पर्स बनविल्या गेल्या. 2021मध्ये केळीच्या सोपापासून पहिल्यांदा राखी बनविण्यात आली. या सर्व राख्या पर्यावरणस्नेही असतात. या राख्या पूर्ण करण्यासाठी 5 गावांतील 35 महिला काम करत होत्या.
गेल्या वर्षी चार हजार राख्यांची मागणी होती, ती या वर्षी वाढून 14 हजारांवर गेली. यावरून लोकांचा स्वदेशी उत्पादनाकडे वळण्याचा कल लक्षात येतो. चिनी राख्यांव्यतिरिक्त अस्सल स्वदेशी, बांबूच्या, केळीच्या सोपाच्या राख्या बाजारात उपलब्ध असतात याविषयी जनजागृती व्हायला हवी. या आगळ्यावेगळ्या राख्यांचे मार्केटिंग ‘केशवकुटिर’द्वारा होत असतेच, त्याचबरोबर आपणही या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने पुढे येऊन अशा पर्यावरणस्नेही राख्यांचा स्वीकार केला पाहिजे. या राख्यांची मागणी जेवढी वाढेल, तेवढा वनवासी भगिनींच्या चेहर्यावरचा आनंद वाढेल. या वर्षीच्या स्वदेशी राख्यांचा आकडा पुढील वर्षी किती वाढू शकतो, हे आपल्या प्रत्येकावर ठरणार आहे.
देशाला ‘आत्मनिर्भर’ बनविण्यासाठी आणि स्थानिक उप्तादनांचा वापर वाढण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक संकल्प, एक लक्ष्य - आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना राबविली, जी येणार्या काळात भारताला विश्वाचे नेतृत्व करण्याचा मार्ग मोकळा करेल. केशवसृष्टीची ‘ग्राम विकास योजना’ याच मार्गावर मार्गक्रमण करीत आहे.