रा.स्व. संघनिर्मात्याची भूमिका

भागानगर (हैदराबाद) नि:शस्त्र प्रतिकार लेखांक 5

विवेक मराठी    24-Sep-2022   
Total Views |
संघ संघटनात्मकदृष्ट्या तटस्थ राहिला असला, तरी आंदोलनाला पुरेशा संख्येत प्रतिकारक पुरविण्याची काळजी डॉक्टरांनी घेतली. महाराष्ट्र प्रांतिक हिंदुसभेचे कार्यवाह शंकर रामचंद्र दाते हे या आंदोलनाशी अगदी सुरुवातीपासून जोडले गेले होते. दाते यांनी 1933 साली संघाची प्रतिज्ञा घेतली होते. दाते हे निजामशासित मराठवाड्याची गुप्तपणे पाहणी करून तेथील हिंदूंच्या परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती मिळविण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक हिंदुसभेने नेमलेल्या तीन-सदस्य समितीचे एक सदस्य होते. हिंदू युवक परिषदेसाठी मे 1938मध्ये डॉक्टर पुण्याला आलेले असताना दाते यांनी त्यांच्याशी झालेल्या भेटीचे वर्णन केले आहे.
  
rss
 
हैदराबाद संस्थानातील हिंदू जनतेच्या न्याय्य अधिकारांसाठी 1938-1939ला नि:शस्त्र प्रतिकाराचे आंदोलन सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निर्माते डॉ. हेडगेवार यांची भूमिका काय होती? कोणत्याही ऐतिहासिक घटनेबाबत एखाद्या महापुरुषाची भूमिका समजून घ्यावयाची असेल, तर त्या महापुरुषाने स्वत:पुरते ठरविलेले जीवितकार्य, त्या जीवितकार्याविषयीचे त्याचे तत्त्वचिंतन, समकालीन घटनांबाबतचा दृष्टीकोन आणि त्या महापुरुषाच्या मर्यादादेखील लक्षात घ्याव्या लागतात. डॉ.हेडगेवार आणि भागानगर नि:शस्त्र प्रतिकार याबाबत असाच विचार करावा लागेल.
 
 
 
डॉ. हेडगेवारांचे जीवितकार्य
 
स्वातंत्र्यप्राप्तीच्या अनेक प्रवाहांचा आणि संस्थांचा अनुभव घेऊन डॉक्टरांनी 1925 साली रा.स्व. संघाची स्थापना केली, तेव्हा त्यांच्या समोर कोणते उद्दिष्ट होते? डिसेंबर 1938मध्ये नागपूरच्या लष्करी छावणीत (आजच्या परिभाषेत शिबिरात) दिलेल्या भाषणात डॉक्टरांनी त्यांचे जीवितकार्य स्पष्ट केले. त्यांच्याच शब्दांत, ‘हिंदुस्थान हे हिंदूंचे राष्ट्र आहे व हिंदूच त्याचे मालक आहेत... या सत्याला व्यवहारात स्थान मिळवून देण्याची जबाबदारीही आपल्याच शिरावर नाही काय? कारण अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होईल, तेव्हाच आपले तत्त्व आपण कृतीत उतरवू शकू. या कारणासाठीच आपण संघटनेची कास धरली आहे व संघटनेचे बीज देशाच्या कानाकोपर्‍यात रुजावे म्हणून आपण धडपड करत आहोत. सार्‍या देशातला हिंदू समाज संघटित स्वरूपात स्वत:च्या पायावर उभा राहावा, एतदर्थ आपण आपले सारे आयुष्य खर्ची घालवायचा संकल्प केला आहे.’ (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे,RSS Nagpur Lashkari Chhawani 1938 0002 to 0009).
 
 
 
निजाम हा महमूद गजनवी, तुघलक, औरंगजेब, टिपू अशा पूर्वसुरींप्रमाणे हिंदूंवर अत्याचार करत होता, त्याचा प्रतिकार करणे हे नि:संशय आवश्यक होते. पण एक निजाम गेला, तर त्याच्या जागी दुसरा इस्लामवेडा हिंदूंच्या उरावर बसणार नाही, याची काय शाश्वती होती? हिंदू समाजाची आंतरिक शक्ती वाढविणे हाच या समस्येचा स्थायी उपाय आहे, हे ओळखून डॉक्टर पुढे म्हणतात, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे जे आपले कार्यक्षेत्र आखून घेतले आहे, ते जाणूनबुजून घेतले आहे व म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतर कोणत्याच भानगडीत पडत नाही. आपल्या ध्येयावर नजर ठेवून आपल्याला आपल्या ठरलेल्या मार्गाने पुढे गेले पाहिजे. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्याला या सत्कार्यासाठी कसा खर्च करता येईल, याची काळजी आपल्याला रात्रंदिवस लागली पाहिजे व त्याप्रमाणे आपण कार्य करावयास शिकले पाहिजे.”
 
 
26 September, 2022 | 12:27
 
परकीय आक्रमकांचा उच्छेद करणे आवश्यक यात शंका नाही, पण परकीय समाजांना आपल्या समाजावर आक्रमण करण्याची इच्छाच उत्पन्न होणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणे हेच डॉक्टरांचे अढळ लक्ष्य होते. दीर्घकालीन उद्दिष्ट असलेल्या मनुष्याला तात्कालिक घटनांमध्ये आपली शक्ती किती पणाला लावायची, याचा विवेक करायला लागतो. पुन: डॉक्टरांच्याच शब्दांत, ‘प्रचंड वटवृक्ष काही दोन दिवसांत वाढत नाही. मेथीची भाजी दोन दिवसांत वाढते खरी, पण चार दिवसांत सुकूनही जाते. परंतु वटवृक्ष एकदा उभा राहिला की हजारोंना सावली देतो. त्याच्या शाखा आकाशाला कवटाळू पाहतात, शिर गगनाला भिडते व त्याची पाळेमुळे पाताळगंगेची भेट घेतात. असा स्पृहणीय व मननीय पसारा, हे सारे वैभव प्राप्त करून घेण्यासाठी त्याला खडखडीत जमिनीतून व दगडधोंड्यातून असंख्य मुळे रोवीत रोवीत कित्येक वर्षे धडपडावे लागते. हिंदू राष्ट्राचा प्रचंड वृक्ष कोटीकोटी हिंदूंना सावली देण्याइतका समर्थ करावयाचा असेल, तर धीरानेच घेतले पाहिजे व सारखी संघटना वाढवत गेले पाहिजे.’ (मधुसूदन कुलकर्णी संग्राहक, केशव बळीराम हेडगेवार; संकलन गोपाळ गणेश अधिकारी, महाराष्ट्र प्रकाशन संस्था, 1940.)
 
 
संघाची शक्ती
 
 
युगप्रवर्तक कार्य हाती घेतलेल्या डॉक्टरांच्या संघकामाची 1938-39मध्ये प्रत्यक्ष स्थिती काय होती? स्वत:च्या कार्याचे निर्दयी विश्लेषण डॉक्टरच करू जाणे. सन 1938च्या वर उल्लेखिलेल्या भाषणात डॉक्टर म्हणतात, “आपल्या आज सुमारे 400 शाखा व चाळीस हजार स्वयंसेवक आहेत ही गोष्ट सत्य आहे खरी, पण खरोखरच त्यांपैकी कार्याचा प्रसार करणारे लोक कितीक निघतील, याचा विचार नको का करायला? या चाळीस हजारांतून प्रत्यक्ष कार्याचा प्रसार तत्परतेने करणार्‍या लोकांची संख्या जितकी पाहिजे तितकी नाही, ही गोष्ट आपल्याला कबूल करावी लागेल.”
 
 
हजारों स्वयंसेवकांतून डॉक्टरांची अपेक्षा पूर्ण करतील असे तत्परतेने काम करणार्‍या संघस्वयंसेवकांच्या संख्येचा अंदाज कसा बांधायचा? त्या काळात संघाच्या शिबिरांत किंवा त्यापेक्षाही अधिकारी शिक्षण वर्गांतील प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांची संख्या या दृष्टीने साहाय्यक व्हावी. सन 1937पर्यंत नागपूर जिल्हा कँप व नागपूर कँप एकच होत असून तो नागपूर येथे होत असे. डिसेंबर 1937मध्ये नागपूर केंद्राचा कँप हा जिल्हा कँपपासून वेगळा करून जिल्हा कँप प्रथमच काटोलला घेण्यात आला (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Dr. Hedgewar letters cleaned\1937\November 1937 25-11-37 a, 25-11-37 b).
 
26 September, 2022 | 12:28
 
दि.17 सप्टेंबर 1935ला अकोला जिल्हा संघचालक गोपाळ कृष्ण उपाख्य बाबासाहेब चितळे यांना लिहिलेल्या पत्रात, ‘आजच्या घटकेला उमरावती जिल्हा मुळीच संघटित नाही, एवढेच नव्हे, तर खास उमरावतीचा (अमरावतीचा - लेखक) संघ हासुद्धा नाव घेण्यासारखा संघ नाही. बुलढाणा जिल्यातील मुख्य शाखा कोणती हे अजून ठरलेले नाही व जिल्हा चालकांची त्या जिल्ह्याकरिता योजना झालेली नाही. सबंध वर्‍हाडचा वर्‍हाड संघचालक अजूनपर्यंत नियुक्त झालेला नाही’ असे वर्‍हाडमधील संघकामाचे परखड विश्लेषण डॉक्टर करतात. (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Dr. Hedgewar letters cleaned\1935\September 1935 17-9-35 a). अधिवक्ता श्रीधर अनंत उपाख्य बापूसाहेब सोहोनी यांच्या रूपाने डिसेंबर 1936मध्ये वर्‍हाड प्रांताला आणि अधिवक्ता रामचंद्र नारायण उपाख्य बाबासाहेब पाध्ये यांच्या रूपाने मध्य प्रांताला दि. 12 फेब्रुवारी 1938 रोजी प्रांत संघचालक मिळाला! फेब्रुवारी 1936ध्ये बाबासाहेब चितळे यांना लिहिलेल्या पत्रात, ‘हल्ली नागपूर संघाजवळ एक पैसाही शिल्लक राहिलेला नाही’ अशी व्यथा डॉक्टर व्यक्त करतात. (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Dr. Hedgewar letters cleaned\1936\April 1936 undated a.)
 
 
26 September, 2022 | 12:29
 
ज्या पुण्यातून भागानगर नि:शस्त्र लढ्याचे प्रामुख्याने सूत्रसंचालन झाले, त्या पुण्यात महाराष्ट्र प्रांताच्या संघाचा पहिलावहिला अधिकारी शिक्षण वर्ग झाला तो 1935 साली. त्या वर्गात पुण्याचे 20, कोल्हापूरचे 10, चिपळूणचे 6, सांगलीचे 2 व अन्य असे एकूण 50 स्वयंसेवक होते. दि. 8 जून 1938ला नागपूर येथील ऑफिसर्स ट्रेनिंग कँपच्या समारोप समारंभात बोलताना कँपचे सर्वाधिकारी प्रा. माधवराव गोळवलकर गुरुजींनी ‘’मुंबई, वर्‍हाड, नागपूर, महाकोशल, उत्तर हिंदुस्थान व पंजाब इत्यादी प्रांतातील व निरनिराळ्या संस्थानांतील संघशाखांतून सुमारे 525 स्वयंसेवकांनी भाग घेतला” अशी माहिती दिली होती. (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, OTC Nagpur Samapam Samaroh - 1938.)
 
 
 
संघस्थापनेला उशीर झाला
 
 
नि:शस्त्र प्रतिकार लढा सुरू झाला, तेव्हा जागतिक परिस्थिती स्फोटक असून दुसरे महायुद्ध उंबरठ्यावर होते. पुढे महायुद्ध होणार, असे डॉक्टरांना साधारण 1922च्या सुमारासच वाटत होते आणि 1932 साली झालेल्या संभाषणात, “काळ आपण व्यर्थ घालविला. आगामी दहा-पाच वर्षांत युद्धाची जागतिक परिस्थिती निर्माण होईल, पूर्वीच्या युद्धापेक्षा या युद्धात (स्वातंत्र्यासाठी) विशेष लाभाची संधी असेल” असे डॉक्टरांच्या बोलण्यात आल्याची आठवण 1930-34 या काळात चंद्रपूरचे संघचालक राहिलेले अधिवक्ता रामचंद्र राजेश्वर उपाख्य तात्याजी देशमुख यांनी लिहून ठेवली आहे. (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Tribute to Dr. Hedgewar Hastlikhit Lekh\ - 1, 0007). सन 1925पूर्वी दहा वर्षे अगोदर तरी संघ निघावयास पाहिजे होता, असा विचार डॉक्टरांच्या बोलण्यातून युद्ध सुरू झाल्यावर विशेष येत असे. (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Nana Palkar\Hedgewar notes - 4_106).
 
 
दि. 15 ऑगस्ट 1934ला यवतमाळ जिल्हा संघचालक भि.ह. उपाख्य अण्णासाहेब जतकर यांना लिहिलेल्या पत्रात ‘संघाचे कार्य हे दिरंगाईने करण्याचे कार्य नसून आपला अखिल महाराष्ट्र आपल्याला शक्य तितक्या लवकर संघटित करून व हा महाराष्ट्राचा नमुना इतर प्रांतांपुढे ठेवून पाच-दहा वर्षांत संबंध हिंदुस्थान संघटित करावयाचा आहे’ अशी संघाच्या भविष्यकालीन व्याप्तीची आणि शक्तीची कल्पना डॉक्टर सांगतात (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Dr. Hedgewar letters cleaned\1934\August 1934 15-8-34 a, 15-8-34 b). लाहोर, जबलपूर, लखनऊ, दिल्लीला संघकाम सुरू करण्यासाठी डॉक्टरांनी पाठविलेल्या विद्यार्थी प्रचारकांनी नागपूर सोडले ते 28 जून ते 1 जुलै 1937 या काळात.
 
 
26 September, 2022 | 12:30

 
आपले जीवितकार्य पूर्ण झाल्याचे बघण्याची संधी त्या जगन्नियंत्याने डॉक्टरांना दिली नाही, ही महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे. ‘सन 1939चे युद्ध सुरू झाल्यानंतर आपले कार्य पुरेसे उभे राहिले नाही याची बोच डॉक्टरांना होती, असे मला त्यांच्या वागणुकीतून जाणवे’ अशी आठवण वर्‍हाड प्रांताचे संघचालक बापूसाहेब सोहोनी यांनी सांगितली आहे (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Nana Palkar\Hedgewar notes -2 2_215.) मे 1940मध्ये घडलेल्या एका प्रसंगाचे वर्णन पुढे जनसंघाचे अध्यक्ष झालेल्या पंडित बच्छराज व्यास यांनी केले आहे. व्यास सांगतात, ‘डॉक्टरांना भेटावयास गेलेले असताना डॉक्टर म्हणाले - युरोपमधल्या राष्ट्रांनी दहा-पंधरा वर्षांत केवढी प्रगती केली व आपण पंधरा वर्षे प्रयत्न करूनही अजून कित्येक प्रांतांतून आपले कामसुद्धा नाही, हे पाहून हृदयाचे पाणी होते. पण प्रयत्न करण्याखेरीज दुसरा मार्ग नाही. एका जन्मात आपल्या देशाच्या उद्धाराचे काम व्हावे अशी परमेश्वरी इच्छा नसेल. कितीही दिवस करावे लागले तरी या मार्गाखेरीज तरणोपाय नाही, कारण याच मार्गाने यश मिळेल याची खात्री आहे. (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Nana Palkar\Hedgewar notes -3 3_109.) पुढील महिन्यात, म्हणजे दि. 21 जून 1940ला डॉक्टरांची इहयात्रा संपली.
 
 
संघ अलिप्त, पण संघस्वयंसेवक भाग घेण्यास मोकळे
 
 
हिंदू संघटनेच्या नित्य कार्याकडे जराही लक्ष ढळू न देता नि:शस्त्र प्रतिकारासारख्या आवश्यक पण नैमित्तिक आंदोलनला हातभार लावणे हे डॉक्टरांसमोर आव्हान होते. संघाला आंदोलनापासून अलिप्त ठेवून पण त्याला व्यक्तिगत पाठिंबा देत संघस्वयंसेवकांना त्यात भाग घेण्याची मोकळीक देण्याची भूमिका डॉक्टरांनी घेतली. हाती घेतलेले जीवितकार्य आपण या जन्मी पूर्णत्वास नेऊ शकणार नाही ही रुखरुख मनात ठेवून त्यांनी हे सर्व केले, हे विशेष!
 
 
काही हिंदुत्वनिष्ठांना त्यांच्या या भूमिकेचे आकलन न झाल्यामुळे डॉक्टरांवर टीका झाली. डॉक्टरांच्या भूमिकेवर कडवट टीका करणारे बारा लेख दि. 14 मे 1939ला मुंबईत स्थापन झालेल्या हिंदू सैनिक दलाचे उपाध्यक्ष गोपाळ गोविंद उपाख्य दादासाहेब अधिकारी या संघस्वयंसेवक असलेल्या संपादकाने त्यांच्या ’वंदे मातरम’ साप्ताहिकात लिहिले. (पुढे डॉक्टर गेल्यावर अधिकारी यांनी अतिशय हृद्य श्रद्धांजलीपर लेख लिहिला.) या टीकेला हिंदुत्वनिष्ठ ’सावधान’ साप्ताहिकाने (27 मे 1939) पुढील उत्तर दिले - ‘राष्ट्रविमोचनाकरिता अखेरचा एकच घाव घालायचा असतो, त्या अंतिम समरक्षणाच्या आगमनाची पूर्वतयारी हे राष्ट्रविमोचनाचे नित्यकार्य होय व भागानगर आंदोलनासारखी आंदोलने ही राष्ट्रविमोचनाची नैमित्तिक कार्ये होत. ही भिन्न कार्ये करणार्‍या संस्था परतंत्र राष्ट्रात असतात, असाव्या लागतात. व यद्यपि ही दोन्ही कार्ये समांतरतेने चालू असली, चालू ठेवावी लागली, तरी नित्यकार्यात व्यत्यय उत्पन्न होईल अशा रितीने आपले वैशिष्ट्य व शक्तिसर्वस्व नित्य संस्थेला नैमित्तिक कार्याला वाहता येत नाही.’ (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Nana Palkar\Hedgewar notes - 5, 5_151).
 
 
संघाला समाजापासून पृथक अस्तित्व नाही
 
 
नि:शस्त्र प्रतिकार लढ्यात जाण्यास अनुमती देणारी पत्रे डॉक्टरांनी संघशाखांना पाठविली नाहीत, तर ज्यांनी इच्छा प्रदर्शित केली, त्यांना डॉक्टरांनी व्यक्तिश: पत्रातून धन्यवाद देऊन त्यांचे अभिनंदनच केले. रा.स्व. संघाचा स्वयंसेवक म्हणजे हिंदू समाजाचा एक घटकच, त्याने काही संघात येताना आपल्या समाजघटकत्वाचा राजीनामा दिलेला नसतो. तेव्हा हिंदू समाजाच्या प्रत्येक घटकाने अशा चळवळीबाबत जे करणे आवश्यक, ते करण्यास स्वयंसेवकही मोकळाच आहे, अशी डॉक्टरांची भूमिका होती. (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे,registers\Register 1 DSC_0056.) देशहिताच्या कोणत्याही आंदोलनात संघस्वयंसेवकांनी आपले संस्थागत अस्तित्व समाजात विलीन करून समाजघटक म्हणून स्वाभाविकपणे भाग घ्यावा, हा मूलभूत विचारही डॉक्टरांच्या भूमिकेमागे होता.
 
 
 
संघटनात्मकदृष्ट्या संघ तटस्थ राहिला असला, तरी आंदोलनाला पुरेशा संख्येत प्रतिकारक पुरविण्याची काळजी डॉक्टरांनी घेतली. महाराष्ट्र प्रांतिक हिंदुसभेचे कार्यवाह शंकर रामचंद्र दाते हे या आंदोलनाशी अगदी सुरुवातीपासून जोडले गेले होते. दाते यांनी 1933 साली संघाची प्रतिज्ञा घेतली होते. दाते हे निजामशासित मराठवाड्याची गुप्तपणे पाहणी करून तेथील हिंदूंच्या परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती मिळविण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक हिंदुसभेने नेमलेल्या तीन-सदस्य समितीचे एक सदस्य होते. हिंदू युवक परिषदेसाठी मे 1938मध्ये डॉक्टर पुण्याला आलेले असताना दाते यांनी त्यांच्याशी झालेल्या भेटीचे वर्णन केले आहे. ’सौजन्य व ध्येयवादित्व यांची जणू मूर्ती’ असे डॉक्टरांचे वर्णन करत दाते लिहितात, ‘महाराष्ट्रातून निदान 500 तरी नि:शस्त्र प्रतिकारक यावेत असे त्यांनी (स्टेट काँग्रेसचे प्रतिनिधी, आर्य समाजी आणि हिंदुसभावादी) सुचविले. मोगलाईतून हजारावर लोक सत्याग्रहात भाग घेतील असा त्यांचा अंदाज होता. त्यांच्या सूचनेस आम्ही होकार दिला. पण या वेळेपर्यंत आम्ही सत्याग्रहाची अशी मोठ्या प्रमाणावर कोणतीच चळवळ केली नव्हती.
 
 
त्यामुळे व आमच्याजवळ तशी सुव्यवस्थित संघटना नसल्यामुळे आम्ही हेडगेवार यांच्याजवळ हा प्रश्न काढण्याचे ठरविले. त्याप्रमाणे ते पुण्यास आले असता त्यांची आम्ही त्रिवर्गांनी भेट घेतली व मोगलाईतील आमच्या पाहणीत दिसून आलेली परिस्थिती त्यांना सांगितली व तेथील पुढार्‍यांबरोबर झालेल्या बोलण्याचा निष्कर्षही सांगितला. आमच्या म्हणण्याचा आशय त्यांनी तेव्हाच हेरून विश्वासाने असे उद्गार काढले की “पाचशे लोक सत्याग्रहात भाग घेण्यासाठी पाठवायचे एवढेच ना, त्याची काळजी नको. बाकीचे तंत्र तुम्ही सांभाळा.” हे सर्व ते ज्या आत्मविश्वासाने बोलले व त्यांनी जी संवेदना व्यक्त केली, तिचे स्मरण मला आजही होते.. (चळवळीची) सुरुवात करण्यापूर्वी हेडगेवार यांनी या चळवळीला पाठिंबा दिला व आत्मविश्वासाने पुढे काम सुरू करण्यास दिले.’ (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Dr Hedgewar Athavani 2 0001-A to 0001-D; दाते यांनी दि. 11 जुलै 1955ला प्रस्तुत आठवण लिहिली आहे).
 
 
नि:शस्त्र प्रतिकारात हिरिरीने भाग घेणारे आणि त्याचा इतिहास लिहिणारे औरंगाबादचे अधिवक्ता दत्तात्रेय ग. देशपांडे उपाख्य बाबूराव जाफराबादकर यांनी ’डॉ. हेडगेवार, सरसंघचालक यांच्या धोरणानुसार व आदेशानुसार शेकडो नि:शस्त्र प्रतिकारक व्यक्तिश: नि:शस्त्र प्रतिकार करण्यास तयार झाले नि त्यांनी गटागटाने संस्थानात घुसून सत्याग्रह केला व तुरुंगवास भोगला. नागपूर विभागात हिंदुसभेचे कार्यकर्ते आणि रा.स्व. संघाचे स्वयंसेवक यांत भेदभाव नव्हता, अभेद्य हृदये असाच प्रकार त्या वेळी होता. प्रौढ स्वयंसेवक तर हिंदुसभेचा सदस्य कार्यकर्ता असे’ हे नमूद केले आहे (द.ग. देशपांडे, हैदराबाद-वर्‍हाड मुक्तिसंग्राम, नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई, 1987, पृ. 84, 85.)
 
 
सावरकर-हेडगेवार सामंजस्य
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकर नि:शस्त्र प्रतिकार लढ्याचे प्रेरणापुरुष होते. हिंदुराष्ट्रपती बॅ. सावरकर आणि सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्यामध्ये कमालीचा जिव्हाळा, आदर आणि सामंजस्य होते. डॉक्टरांच्या भूमिकेविषयी सावरकरांचे काय मत होते? याचा अंदाज डॉक्टर गेल्यावर सावरकरांनी हिंदुमहासभेचे अध्यक्ष या नात्याने दि.13 जुलै 1940ला सरसंघचालक गोळवलकर गुरुजींना लिहिलेल्या मूळ इंग्लिशमधील पत्रावरून बांधता येतो. डॉक्टरांविषयी वाटत असलेल्या अतीव प्रेमाचा उल्लेख करत सावरकर लिहितात, ‘डॉ. हेडगेवारांच्या जीवनकाळात हिंदुस्थानभर शेकडोंच्या संख्येत उपस्थित राहावे लागलेल्या संघाच्या सभांना मी उपदेश करायचो. (पण) संघाच्या बाबतीत बोलायचे तर कोणत्याही प्रश्नाबाबत डॉ. हेडगेवार यांचाच शब्द अंतिम असायला हवा आणि त्या बाबतीत मला त्यांच्या विवेकबुद्धीवर पूर्ण आत्मविश्वास होता.’ (संघ अभिलेखागार, हेडगेवार कागदपत्रे, Dr. Hedgewar Miscellaneus\Mumbai\VD Savarkar 0001).
 
 
 
महाराष्ट्र प्रांत संघचालक काशिनाथ भास्कर उपाख्य काका लिमये, सातारा जिल्हा संघचालक शिवराम विष्णू उपाख्य भाऊराव मोडक, सोलापूर जिल्हा संघचालक रामचंद्र शंकर उपाख्य रामभाऊ राजवाडे, (अहमद)नगरचे संघचालक चिंतामण मोहिनीराज उपाख्य नानाराव सप्तर्षी, वणी संघचालक डॉ. यादव श्रीहरी उपाख्य तात्याजी अणे, सावनेर संघचालक नारायण कृष्णाजी उपाख्य नानाजी आंबोकर आणि डॉ. ल.वा. परांजपे, विश्वनाथराव केळकर, मुंबईचे डॉ. नारायणराव सावरकर, उमरखेडचे नानासाहेब नाईक हे सर्व प्रमुख संघस्वयंसेवक हिंदुसभेचे कार्यकर्ते असून त्यांनी नि:शस्त्र प्रतिकारात महत्त्वाची भूमिका निभावली. डॉक्टरांचे पाठबळ घेऊन कोणत्या संघस्वयंसेवकांनी नि:शस्त्र प्रतिकारात भाग घेतला, ते पुढील लेखात.
 
(क्रमश:)

डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले

शिक्षण व व्यवसाय

एमबीबीएस व एमडी (मेडिसिन) - सेठ जीएस मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालय मुंबई; डीएनबी (एण्डोक्रायनॉलॉजी) - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली; पुणे-स्थित मधुमेह व ग्रंथीविकार तज्ज्ञ

 

लेखन: मराठी पुस्तके

'मधुमेह' (सहलेखन), 'अहिंदू लोकसंख्येचा विस्फोट', 'इस्लामचे अंतरंग', ‘बौद्ध-मुस्लिम संबंध: आजच्या संदर्भात', 'मार्सेलीसचा पराक्रम: सावरकरांची शौर्यगाथा', ‘मागोवा खिलाफत चळवळीचा’

 

लेखन: हिंदी पुस्तके

‘शुद्धि आंदोलन का संक्षिप्त इतिहास: सन ७१२ से १९४७ तक’, ‘ईसाइयत: सिद्धान्त एवं स्वरूप’

 

लेखन: इंग्रजी पुस्तके

‘Full Life with Diabetes' (co-author), Savarkar’s leap at Marseilles: A Heroic Saga, ‘Krantiveer Babarao Savarkar’ (online), ‘Khilafat Movement in India (1919-1924)’

 

ग्रंथ संपादन

'हिंदू संघटक स्वा. सावरकर', 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार','द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस'

 

ग्रंथ अनुवाद

'जिहाद: निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धांत' (सह-अनुवादक, मूळ इंग्रजीतून मराठीत), ‘Love jihad’ (मूळ मराठीतून इंग्रजीत)   

 

संकेतस्थळ निर्मिती सहभाग
www.savarkar.org , www.golwalkarguruji.org    

मधुमेह व हॉर्मोनविकार या विषयांसंबंधी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये शोधनिबंध; सामाजिक विषयांवर स्फुट व स्तंभलेखन