@अरुणचंद्र शं. पाठक । 9619046069
अश्मयुग, ताम्रपाषाणयुग व सिंधू संस्कृतीचा विकास अभ्यासताना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे भूगर्भातील जलस्रोत शोधून त्याचा उपसा करण्याचे तंत्र ही मानवी जीवनातली मोठी क्रांती होती. वारंवार पडणार्या दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील भूवैशिष्ट्ये लक्षात घेत, भूमिपरीक्षा व भूगर्भातील जलस्रोताचा शोध घेत कुंड, कूप, पुष्करिणी, तडाग व विविध प्रकारच्या बारव बांधल्या गेल्या. जलव्यवस्थापनाच्या या समृद्ध वारशाची माहिती देणारा अभ्यासपूर्ण लेख.
मानवी जीवनामध्ये एक नैसर्गिक गरज म्हणून पाण्याला अत्यंत महत्त्व आहे. आपण जलस्रोताला जीवन असेच म्हणतो. प्रारंभिक माणसाने निसर्गत: उपलब्ध असलेल्या जलप्रवाहाच्या काठावर, नदीच्या काठावर वसाहत केली. सर्व प्रमुख संस्कृतींचा विकास नद्यांच्या खोर्यांतच झाला, ही वस्तुस्थिती आहे. पण मानवी वसाहतीसाठी म्हणून जेव्हा यापेक्षा जास्त भूभाग त्याला आवश्यक वाटला, तेव्हा नैसर्गिक भूस्तररचनेचा अभ्यास करून लहानमोठे बंधारे घालून उपलब्ध जलाच्या अनुषंगाने त्याने शेती करण्यास प्रारंभ केला. अश्मयुग, ताम्रपाषाणयुग व सिंधू संस्कृतीचा विकास पाहत असताना हे लक्षात येते की, जमिनीच्या पोटात असलेले भूगर्भातील जल शोधून त्याचा उपसा करण्याचे तंत्र ही मानवी जीवनातील एक मोठी क्रांती होती. त्याला लागलेल्या चाकाच्या शोधाइतकेच महत्त्व या बाबीला होते. त्यातून वेगवेगळ्या भूप्रदेशांमध्ये वस्ती करण्यास त्याने प्रारंभ केला. सिंधू संस्कृतीच्या संदर्भात ही बाब इसवीसनपूर्व अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी घडली. महाराष्ट्रासारख्या दंडकारण्यप्रवण क्षेत्रात मानवी वसाहतींचा विस्तार मोठ्या प्रमाणात प्रारंभ होण्यासाठी अगदी प्रारंभिक ऐतिहासिक काळाची वाट पाहावी लागली. इसवीसनाच्या प्रारंभीच्या काळात यामध्ये मोठी भर पडली, असे दिसते. नागरीकरणाचा विस्तार सातवाहनकाळात मोठ्या प्रमाणात झाला. यानंतरच्या काळात भूगर्भातील जलस्रोत शोधण्यासाठी निसर्गत: उपलब्ध असणार्या पर्यावरणाचा अगत्याने झालेला अभ्यास, तसेच सूक्ष्म निरीक्षण आणि आचार्य कुलांकडून पारंपरिक शहाणपणाच्या आधारे झालेला विकास लक्षात येतो. यामध्ये वास्तुशास्त्रविषयक ग्रंथांतून भूमिपरीक्षा यासारखे लेखन होऊ लागले. वराहमिहिराने वेगवेगळ्या क्षेत्रांत पडणारा पाऊस याविषयीचे अंदाज व्यक्त केले. मानसार या वास्तुशास्त्रविषयक ग्रंथात काही प्रयोग दिले गेले. समरांगणसूत्रधार, अपराजितपृच्छा याही ग्रंथांमध्ये काही निरीक्षणे नोंदवल्याचे दिसते. साधारण चौथ्या-पाचव्या शतकापासून बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत यात भर पडत गेली. परिसरात उपलब्ध असलेल्या वनस्पती, जमिनीचा स्पर्श, गंध, रंग व नाद याचबरोबर परिसरातील खडकांची घडण, मातीचा पोत, स्थानावरील वनस्पतिजन्य व प्राणिजन्य खुणा यांचा अभ्यास करत अनेक शतकांच्या अनुभवातून काही सूत्रे सिद्ध केली गेली. सहदेव भाडळीसारखे काही तोडगे सांगणारे साहित्यही संग्रहित होऊ लागले. उदाहरणार्थ, जांभूळ वृक्षाच्या पूर्वेस वारूळ असेल तर त्याच्या दक्षिणेस दोन पुरुष खोलीवर गोड पाणी लागते. वड, पळस, उंबर एकत्रित असतील तर तेथे निश्चितपणे उदक आहे. वड व पिंपळ वृक्ष एकत्रित असतील तर त्याच्या उत्तरेस चार हातांवर खणले तर पाणी लागते. तसेच ज्या भूमीवर मुंज, काश व कुश या प्रकारचे गवत उपलब्ध असेल, जमीन खोदली असता निळसर, खडकाळ भाग लागला, किमान काळी व त्याखाली तांबड्या रंगाची माती असेल, तर तेथे गोड पाणी लागते. (पाठक, महाराष्ट्रातील बारव स्थापत्य, पृ. 29, 2017.) अग्निपुराण तसेच कृषीपाराशर व अन्य स्मृतिग्रंथांतून याविषयीच्या नोंदी मिळतात. अर्थात जमिनीखालील पाण्याला आपण भूजल म्हणतो, त्याचा अचूक शोध घेणे हे बारव बांधण्यापूर्वी किंवा विहीर खोदण्यापूर्वी आवश्यक ठरते. महाराष्ट्रात डेक्कन ट्रॅप किंवा बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. त्याची सच्छिद्रता एक ते तीन टक्क्यांहून जास्त नाही. यातून तसेच चिकणमातीच्या थरातून सहसा पाणी झिरपत नाही. उलट वालुकास्तर किंवा चुनखडी यासारख्या खडकांतून पाणी मिळते. जमिनीखाली काही विशिष्ट खोलीवर सर्व प्रकारच्या सच्छिद्र भेगांनी युक्त खडक असतात. ते भूजलाने ओतप्रोत भरलेले आढळतात. (देशपांडे, महाराष्ट्राचा सांस्कृतिक भूगोल, पृ. 25, 1976.) असे असले, तरी पारंपरिक शहाणपण व सूक्ष्म निरीक्षण यांशिवाय बदलते पर्यावरण, लहरी निसर्ग, पडणारे दुष्काळ यांमुळे माणसाला भूमिपरीक्षा व भूमीअंतर्गत जलाचा शोध घेणे यासाठी जाणीवपूर्वक काम करावे लागले. महाराष्ट्रात दुर्गादेवीचा दुष्काळ हा मोठा दुष्काळ होता. साधारणपणे आठव्या ते तेराव्या शतकामध्ये विविध क्षेत्रांत कुंड, कूप, पुष्करिणी, तडाग व विविध आकारप्रकारांच्या बारवा बांधल्या गेल्या. एकीकडे स्मृतिग्रंथ व पुराणे यांच्यामुळे मानवी वसाहतीबरोबर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व निसर्गत: उपयुक्त ठरणार्या स्थानांवर विविध मंदिरांचा विकास होत होता. यापाठीमागे एक विशिष्ट दिशा असलेल्या आचार्यांची मोठी परंपरा होती. सामान्य माणसाबरोबर धनिक व्यापारी, सामंत व राजवंश अशा निर्मितीसाठी सढळ हाताने मदत करत असत. मंदिर व बारव स्थापत्याचा विकास बरोबरच होत होता. जलाशयांचे पावित्र्य राखले जावे व नगराच्या वैभवात भर पडावी, या दृष्टीने अशा वास्तूमधून विविध देवतांची प्रतिष्ठापना केली जाई. दहा द दहा आकाराच्या लहान कुंडापासून एकावर एक विकसित झालेले चार ते सात टप्पे आपणाला बारव स्थापत्यात दिसतात. एका बाजूने प्रवेश असणे, चारही बाजूंनी प्रवेश असणे, तसेच बारवेच्याच वास्तूमध्ये या भव्य जलकुंडात शेवटच्या टप्प्यावर किंवा काही ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांवर माड, मंडप (पोर्च) बांधले जात. पाण्याची गरज तर निश्चितपणे भागवली जाई. शोधलेले जलस्रोत अगदी मोठ्या दुष्काळातही जिवंत राहत. या उपयुक्ततेबरोबरच सांस्कृतिक विकासामध्ये अशा जलाशयांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान होते आणि त्यातून वेगवेगळ्या आकारांचे मंडप, देवकोष्ठ निर्माण होत. यात शेषशायी विष्णू, सप्तमातृका, गणेश, एकादश रुद्र, उमामहेश्वर, महिषासुरमर्दिनी, भैरव तसेच विष्णूचे चोवीस अवतार यांची स्थापना होई. इथपासून नागदेवता व अनेक आचार्य, अप्सरा व मानवी जीवनातील काही प्रसंग खोदलेली शिल्पे तेथे बसवली जात. या परिसरात विविध ज्ञानशाखांचा विकास होत होता, तर चौसष्ट कलांपैकी अनेक कलांची साधना होत होती.
निसर्गत: काळाच्या ओघात अशा काही वास्तूंची क्षती झाली. पण तेराव्या शतकापासून झालेल्या इस्लामी आक्रमणांचा परिणाम म्हणून विविध नगरांतील मठ-मंदिरे व बारवा उद्ध्वस्त केल्या गेल्या. बारव ही निसर्गत: उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी सर्वच धर्मांच्या व जातींच्या माणसांची गरज होती, म्हणून त्याचे पावित्र्य खंडित करण्यासाठी प्रत्येक देवकोष्ठातील मूर्ती शोधून त्या नष्ट केल्या गेल्या. परिसरातील मंदिरेही उद्ध्वस्त केली गेली. या वास्तूंचे शिलाखंड किल्ल्यांच्या, इदगाहच्या व मशिदींच्या बांधकामासाठी वापरले गेले. आज उपलब्ध असलेल्या मंदिरांच्या व जलाशयांच्या वास्तू या मूळ वास्तूपैकी काही अवशिष्ट भाग आहे. या संदर्भात विल डुरांट याने लिहिलेल्या ‘द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन’ या ग्रंथमालेतील ‘अवर ओरिएंटल हेरिटेज’ या प्रथम खंडातील एक भाग ‘भारतीय संस्कृती’ या नावाखाली मा.प. शिखरे यांनी अनुवादित केला. विशेषत्वाने ‘इंडिया अँड हर नेबर’ या भागाचा हा अनुवाद आहे. त्यात औरंगजेबाच्या संदर्भात केलेली नोंद अशी - ‘हिंदूंची त्याचप्रमाणे ख्रिस्त्यांची सर्व मंदिरे जमीनदोस्त करण्याचा, प्रत्येक कृती फोडून टाकण्याचा आणि हिंदूंची प्रत्येक पाठशाला बंद करण्याचा हुकूम त्याने आपल्या प्रांतिक सुभेदारांना आणि त्यांच्या हाताखालील अधिकार्यांना दिला. एका वर्षात, म्हणजे 1679-80 फक्त अंबर येथील सहासष्ट, चितोडमधील त्रेसष्ट आणि उदयपूर येथील तेवीस मंदिरांची मोडतोड करण्यात आली. वाराणसी येथील एका मंदिराच्या वास्तूवर मशीद बांधून त्याने हिंदू भावनांचा उपमर्द केला. सार्वजनिक पूजाविधींवर त्याने बंदी घातली व हिंदूंवर जिझिया कर बसवला.’ या परिच्छेदात शेवटी डुरांट नोंदवतो की, ‘पिसाट धोरणाची परिणती म्हणजे गेल्या हजार वर्षांत हिंदुस्थानातील कलेचे प्रतिनिधित्व करणार्या किंवा तिचे आश्रयस्थान बनलेल्या हजारो मंदिरांचा नाश झाला. हिंदुस्थान हा देश एकेकाळी किती सुंदर आणि वैभवशाली होता, याची कल्पना आज त्याच्याकडे पाहणार्याला कधीच येणार नाही.’ (विल डुरांट, अनुवाद - मा.प. शिखरे, भारतीय संस्कृती, पृ. 88.) महाराष्ट्राच्या संदर्भात काही वेगळे घडले नाही. इ. स. 1680च्या सुमारास नाशिक परिसरातील 25 महत्त्वपूर्ण मंदिरे पाडली गेली, तर जुन्या किल्ल्यातील महालक्ष्मी मंदिर जामा मशिदीत परिवर्तित केले गेले. (ब्रिटिश गॅझेटिअर, नाशिक जिल्हा, खंड दतख, पृ. 503.) महानुभाव स्थानपोथीमध्ये अनेक स्थानांचे तपशील मिळतात. ते नंतरच्या काळात दिसत नाहीत. पैठण (जिल्हा औरंगाबाद) येथे यादव काळापर्यंतच निर्माण झालेली 42 मोठी व 19 लहान देवळे होती. त्यापैकी काहींवर अकबराचा पुत्र दानियाल याच्या विवाहाप्रसंगी मशीद व मोहल्ले इस्लाम उभारण्यात आले. शहाजहानच्या काळात शहाजहानपुरा वसवला. औरंगजेबाच्या काळात चक्रपाणी मंदिराचे रूपांतर मस्जिद-ए-कोट व जुम्मा मस्जिद यांच्यात झाले. सेतुमाधवराव पगडी यांनी सूफी संप्रदायाबद्दल लिहिताना या विषयीच्या नोंदी विस्ताराने केल्या आहेत. एकूण आज पैठणमध्ये दोन-चार मूर्तींव्यतिरिक्त एकही वास्तू मूळ रूपात उभी नाही. मंदिराबरोबरच जलव्यवस्थापनाचा भाग म्हणून उभ्या राहिलेल्या वास्तू नंदा, भद्रा, जया, विजया या प्रकारातील मोठाल्या बारवा होत्या. आज या काळातील दोन-अडीचशे गावांपैकी अपवादात्मकरित्या पिंगळी (जिल्हा परभणी), इडोळी (जिल्हा जालना), जागजी (जिल्हा उस्मानाबाद), अंबाजोगाई, मानूर (जिल्हा बीड) या स्थानांवर असलेल्या देवकोष्ठांमध्ये देवतांच्या मूर्ती उपलब्ध आहेत. अन्य स्थानांबाबत पाण्याची गरज म्हणून बारवा शिल्लक राहिल्या, मात्र देवकोष्ठे रिक्त झाली. उत्तरकाळात, विशेषत: पेशवाईत, पेशवे व त्यांचे सरदार नारो शंकर, ओक, चंद्रचूड, औंढेकर, थोरल्या माधवरावांची आई गोपिकाबाई यांच्या प्रेरणेतून मूळ प्राचीन वास्तुशास्त्राचा वारसा लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर, नाशिक, कायगाव टोके या ठिकाणी मंदिरे, घाट यांची पुन्हा निर्मिती झाली. अहल्याबाई होळकर यांचे या बाबतीतील काम अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरास खेटूनच असलेले कुंड जाणीवपूर्वक पाहावे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ मुद्दाम पाहावे असेच आहे. पेशवाईच्या अस्तानंतर एकही उल्लेखनीय वास्तू उभी राहिली नाही.
आज महाराष्ट्रात उभ्या असलेल्या बारवा किमान 800 वर्षापूर्वींचा जलव्यवस्थापनाचा वारसा सांगतात. त्या आपण जाणीवपूर्वक जतन केल्या, तर हे सांस्कृतिक वैभव पुढच्या पिढीकडे मूळ स्वरूपात हस्तांतरित करता येईल. यासाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे - उपलब्ध बारवा नियमितपणे साफ करणे, अनावश्यक वाढलेली झाडे व्यवस्थितपणे काढून घेणे, निखळलेले चिरे मूळ स्वरूपात बसवणे. बारव जतन करताना प्रामुख्याने सर्वात खालच्या पातळीवरील कुंड असते, तेथील निखळलेले चिरे मूळ जलप्रवाह अखंडितपणे सुरू राहील याची दक्षता घेऊन बसवावे. अनावश्यक रंगरंगोटी न करता त्याचे मूळ स्वरूप कायम ठेवून निखळलेला भाग व्यवस्थितपणे जतन केला गेला पाहिजे. बारवेसभोवताली सगळ्या बाजूंनी किमान दीड मीटर रुंदीचा एक दगडी चौथरा करून घ्यावा. त्याच्यामुळे वरील पट्टा ढासळणार नाही. या चौथर्याच्या सभोवताली एक फूटभर रुंद व दोन फूट खोल अशा मापाची नाली व्यवस्थित बांधली, तर बाहेरून खराब पाणी आत जाणार नाही. याशिवाय उपलब्ध होईल तेवढ्या परिसरात उद्यान विकसित करता येईल. वारंवार पाण्याचा उपसा करणे, पाण्यात वाढणार्या वनस्पती व शेवाळ काढून टाकणे, मत्स्योत्पादन करणे, याबरोबरच विहिरीतील पाणी बाहेर एका टाकीत घेऊन ते पाणी तहान भागवण्यासाठी, कपडे धुण्यासाठी व इतर उपयोगासाठी वापरता येईल. प्रामुख्याने लहान मोठी मुले व तरुण बारवेत पोहत असतात. पाण्यात जाण्यापूर्वी त्यांनी स्वत:चे शरीर स्वच्छ करण्याची जबाबदारी घ्यावी. सर्वसाधारणपणे या बाबी पाळत असताना स्थानिक वारशाविषयी एक लहानशी माहिती पुस्तिका उपलब्ध असावी, तेथील माहिती देणारा फलक तेथे असावा, नव्या पिढीला आपल्या वारशाविषयीची जाणीव होण्यासाठी स्थानिक शाळा व महाविद्यालये येथे विद्यार्थ्यांना त्याची जाणीव करून देण्यात यावी. परिसरातील एखादी संस्था किंवा गट यांनी या वारशाची जोपासना करावी, दैनंदिन स्वच्छता कायम ठेवावी. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून या स्थानापर्यंत येणारा मार्ग चांगला राहील याची काळजी घेणे आवश्यक ठरते.
याशिवाय जर आपणाला हे वारसा वैभव - मग ते मंदिराचे, प्राचीन जलाशयाचे किंवा विविध आकारप्रकारांच्या बारवांचे असो, त्यांचे जतन, संवर्धन व भावी पिढीकडे हस्तांतरण करायचे असेल, तर अशा बारवेत असलेल्या एकूण देवकोष्ठांची (देवळ्यांची) संख्या लक्षात घ्यायला हवी. प्रशस्त अशी तीन फूट रुंदीचे देवकोष्ठ असेल तर तेथे शेषशायी विष्णू किंवा सप्तमातृकापट असतो. संख्या सात असेल त्यात मातृका देवतेची स्थापना केलेली असते. अकरा किंवा बारा देवकोष्ठे असतील तर एकादश रुद्राची व स्वतंत्र उमामहेश्वरांची प्रतिमा असते. याशिवाय चोवीस देवकोष्ठे असतील तर विष्णूच्या चोवीस विभव (मूर्ती) असतात. याशिवाय ब्रह्मा, भैरव, नागदेवता यांच्याही मूर्ती असतात. आज आपण प्रतीकात्मकरित्या एक ते पाचपर्यंत मूर्ती बसवू शकतो. यात गणेश, शिव, विष्णू, मातृका व सूर्यदेवता असू शकतात. मात्र असे करताना ज्या दगडात ही वास्तू बांधली आहे, त्याच दगडात व वास्तूला साजेशी अशी मूर्ती असावी. बारवांचे उद्यापन व वार्षिकोत्सव प्रतिवर्षी साजरे करण्याची पद्धत आपल्याकडे रूढ होती. तसेच होळीच्या सुमारास प्रतिवर्षी हे जलाशय सामुदायिक सहभागाने स्वच्छ करण्याचीही पद्धत होती.
याशिवाय परिसरातील पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करून परिसरात निसर्गत: असलेला ओढा रुंद करणे, त्याच्या मूळ स्वरूपात प्रवाहित करणे, आवश्यक तेथे वृक्षारोपण करणे यांसारखे विषयही हाताळले जाऊ शकतात. कुठल्याही जलसाठ्याचे सातत्य हे त्याच्या निसर्गदत्त पुनर्भरण व्यवस्थेवर अवलंबून असते. आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी परिश्रम घेऊन निर्माण केलेला हा वारसा आपण जतन करण्याचा सामूहिक वसा स्वीकारायला हवा.