स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सतरा वर्षांच्या कालखंडात उद्यमान भारताचे बीजारोपण झाले. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, रोजगार, अवकाश संशोधन, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत पंडित नेहरूंनी देशाच्या भविष्याचा विचार करून कामाला सुुरुवात केली आणि प्रखर राष्ट्रवादाच्या पायावर त्या त्या विषयांना आकार दिला. त्यांच्या कार्यकाळात भारताने उद्योग आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची धरलेली कास आजही सोडली नाही. उलट या क्षेत्रांमध्ये देश प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत आहे.
15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंनी शपथ घेतली. त्या वेळी ते 57 वर्षांचे होते. ते भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांच्यासमोर विविध समस्या होत्या आणि एकेका समस्येचे स्वरूप अतिशय गुंतागुंतीचे व अजस्र होते. या सर्वांतून मार्ग काढून पंडित नेहरूंना भारत नावाचे राष्ट्र उभे करायचे होते. त्याची धुरा वाहायची होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वात प्रथम देश स्थिर करून देशाचे आंतरराष्ट्रीय धोरण निश्चित करायचे होते. ज्या काळात आपला देश स्वतंत्र झाला, त्याच काळात जग एका बिकट कालखंडातून मार्गक्रमण करत होते. या पार्श्वभूमीवर पंडित नेहरूंनी आपल्या प्रतिभेतून नवी नीती तयार केली. एका अर्थाने ती पंडित नेहरूंची दूरदृष्टी होती. आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी समजून घेऊन राष्ट्राची नीती ठरविण्यासाठी लागणारी कणखर अशी राष्ट्रनिष्ठा नेहरूंच्या ठायी होती. नेहरू हे मानवतावादी होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मुत्सद्दी होते. त्याही आधी ते कट्टर राष्ट्रभक्त होते. आपल्या राष्ट्रीय गरजांच्या व्यापक आकलनातून ते आंतरराष्ट्रीयवादी झालेले होते.
गांधीजी हे दरिद्री जनतेचे आणि भारतीय खेडुतांचे प्रतिनिधी होते. त्यांच्यापाठी भारताचे स्वातंत्र्य म्हणजे खेड्यांचे स्वातंत्र्य होते. नेहरूंना गांधींचा खेड्यावरील भर मान्य होता. त्यांचा तातडीचा कार्यक्रम मान्य होता, पण यंत्राकडे पाहण्याची गांधींची पद्धत मान्य नव्हती. ग्रामोद्योग व चरखा या बाबी तातडीच्या आणि व्यवहार्य म्हणून मान्य होत्या, पण तिथे नेहरू थांबण्यास तयार नव्हते. ते मोठ्या यंत्रांना अनुकूल होते. त्यांना शेतीमध्येसुद्धा ट्रॅक्टरसारखे यंत्र आवश्यक वाटत असे. जनतेच्या समोरचा तातडीचा प्रश्न दारिद्य्राचा आहे. हा प्रश्न सोडवायचा असेल तर शेती उद्योगात असणारे लोकसंख्येचे आधिक्य कमी केले पाहिजे, असे नेहरूंना वाटे. सर्वांचेच जीवनमान उंचवायचे असेल, शेतीवरील माणसांची संख्या कमी करायची असेल आणि जनतेचे बहुतेक प्रश्न सोडवायचे असतील, तर देशात वेगाने औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरण झाले पाहिजे, असे नेहरूंचे मत होते.
देशात खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरणाचा प्रारंभ पंडित नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली झाला. त्यांनी अजस्र कारखान्यांची उभारणी केली. ‘हीच नवसमाजाच्या विकासाची मंदिरे आहेत’ अशी त्यांची भूमिका होती. नेहरूंनी स्वातंत्र्योत्तर काळात शक्य तितक्या वेगाने मोठ्या उद्योगधंद्यांची उभारणी करण्याचा प्रयत्न केला. या उभारणीमागे सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्याची त्यांची उत्कट इच्छा तर होतीच, पण त्याचबरोबर आर्थिक साम्राज्यवादाला भारत बळी पडू नये, त्याचे स्वातंत्र्य बलवान असावे, अशी प्रबळ राष्ट्रवादी इच्छाही होती. त्यामुळे पंडितजींनी भाक्रा-नानगलसारख्या मोठ्या योजना आखल्या आणि त्या प्रत्यक्षात आणल्या. पंडित नेहरूंनी श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले. ‘आराम हराम है’ अशी घोषणा देऊन सर्व भारतीयांना भारताला सामर्थ्यशाली करण्यास प्रवृत्त केले. भारताचे नवनंदनवन उभारण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे, असे ते सातत्याने सांगत असत.
आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे, राष्ट्राला उभे करायचे, तर मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव पंडित नेहरूंना होती. औद्योगिक क्रांतीनंतर काही गंभीर स्वरूपाचे प्रश्न उत्पन्न होतात. त्यांची उत्तरे कशी शोधायची? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरेतून शोधले होते. औद्योगिकीकरणाचे बरे-वाईट परिणाम सांगताना ते म्हणाले होते, “औद्योगिक दृष्टीने समृद्ध झालेल्या आणि म्हणून समृद्ध जीवन जनतेलाही उपलब्ध करून देणार्या मोठ्या राष्ट्रांच्या समोर क्रमाने नवे प्रश्न निर्माण होताहेत. विशेषत: अमेरिकेसमोर रिकामपणाचा योग्य वापर कसा करावा, हाच एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. दररोज तरुणांमधील वाढत्या गुन्हेगारीच्या कथा ऐकू येत आहेत. या कथा एकट्या अमेरिकेच्या नाहीत. त्या सर्वच समृद्ध देशांतील तरुणांच्या आहेत. समृद्ध जीवनात होणारी गुन्हेगारीची वाढ नैतिक प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यामुळे झालेली आहे. या परिस्थितीला अध्यात्माच्या आधारे काही उत्तर हुडकावे लागेल. नुसती भौतिक समृद्धी कवडीमोलाची होईल. मी धार्मिक माणूस कधीच नव्हतो, पण जीवनाला श्रद्धा असाव्यात यावर माझा विश्वास आहे. मी श्रद्धांची जपणूक केलेली आहे. सामान्य पातळीवरच्या दैनंदिन जीवनापासून वर उचलून व्यक्तिमत्त्वाला एक नवा नैतिक दर्जा आणि आध्यात्मिक परिणाम देणार्या श्रद्धा मला अभिप्रेत आहेत.”
एका बाजूला आधुनिकता आणि दुसर्या बाजूला इथल्या मातीतील रूढी, परंपरा आणि संस्कार यांच्याबाबतचा आदर आणि अंगीकाराची भूमिका अशा दुहेरी मार्गाने पंडित नेहरू स्वतंत्र भारताला राष्ट्र म्हणून उभे करत होते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘भारत’ या राष्ट्राचे अस्तित्व अधोरेखित करत होते. भारताच्या समृद्ध इतिहासाच्या अध्ययनामुळे पंडितजी अशा प्रकारचे विचार मांडत होते. या अध्ययनामुळे त्यांना वाटे की, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सम्यक आणि समृद्ध असला पाहिजे. केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन हा जीवनाचा सम्यक दृष्टिकोन असू शकत नाही. जीवनाचा सर्वांगीण विकास केवळ विज्ञानामुळे होऊ शकणार नाही. विज्ञानाखेरीज कला, तत्त्वज्ञान, नीतिमूल्ये, परंपरा यांनीही व्यापलेला जीवनाचा फार मोठा भाग आहे. म्हणून सम्यक जीवनदृष्टीत विज्ञानाबरोबर तत्त्वज्ञान असले पाहिजे.
जवळजवळ सतरा वर्षे पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते. तितकाच काळ ते देशाचे परराष्ट्रमंत्रीही होते. पंडित नेहरूंच्या या सतरा वर्षांच्या कालखंडात उद्यमान भारताचे बीजारोपण झाले. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, रोजगार, अवकाश संशोधन, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत पंडित नेहरूंनी देशाच्या भविष्याचा विचार करून कामाला सुुरुवात केली आणि प्रखर राष्ट्रवादाच्या पायावर त्या त्या विषयांना आकार दिला. भारतात उद्यमीकरण करून बुद्धिवाद आणि विज्ञान यांना श्रेष्ठत्व मिळवून दिले.
पंतप्रधान म्हणून नेहरूंनी देशाच्या भविष्याचा विचार केला. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील उंच भरारीसाठी आवश्यक असणार्या मूलभूत गोष्टींची मुहूर्तमेढ नेहरूंनीच घातली. अवकाश तंत्रज्ञान संशोधन संस्था, अणुउर्जा, आयआयटी अशा महत्त्वाच्या संस्थांची स्थापना त्यांनी केली. त्याचा आज आपल्या देशाला फायदा होत आहे. या नेहरूंच्या दूरदृष्टीचे कौतुक करायलाच हवे.
या पार्श्वभूमीवर आजच्या औद्योगिककीरणाचा विचार करायचा तर ‘स्टार्ट अप्स’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या नव सकंल्पनांना मूर्त रूपात येण्यासाठी विद्यमान सरकारकडून सातत्याने दिलेले प्रोत्साहन आणि पाठिंबा यातून भारताच्या उद्योगक्षेत्राला नवी झळाळी प्राप्त होते आहे.
अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात इस्रो स्वतःचा वेगळा ठसा उमटवते आहे. विकसित देशही भारताच्या कामगिरीबद्दल कौतुकोद्गार काढत आहेत. त्याचबरोबर, विज्ञान तंत्रज्ञानाविषयीची ओढ आणि आवड विद्यार्थीदशेतच रूजावी यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे सुरू झालेल्या योजनेतून गावोगावी बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन दिले जाते आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेण्यासाठी धडपड करू नये तर त्यातील काहींनी शुद्ध विज्ञानाचा अभ्यास करावा, संशोधन करावे यासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येत आहेत.
थोडक्यात काय तर, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात भारताने उद्योग आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची धरलेली कास आजही सोडली नाही. उलट या क्षेत्रांमध्ये देश प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत आहे.