मजबूरी का नाम ‘काँग्रेस’

विवेक मराठी    03-Aug-2022   
Total Views |
जिन्होंने 52 सालों तक नागपूर में अपने हेड क्वार्टर में झंडा नही फहराया, वे क्या प्रधानमंत्री की बात मानेंगे?” जयराम रमेश  यांचा संकेत संघाकडे आहे. संघाच्या महाल कार्यालयावर आणि रेशीमबाग कार्यालयावर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सन्मानपूर्वक तिरंगा लावला जातो. जयराम रमेश यांना संघ कार्यालयावर तिरंगा लावला जातो याची माहिती नसावी हे अज्ञान न शोभणारे आहे.
 
RSS
 
‘हर घर तिरंगा’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेला कार्यक्रम आहे. 15 ऑगस्टला प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि दोन ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान सोशल मिडिया अँकाऊटस्वर तिरंग्याचे प्रोफाईल ठेवावे. त्याप्रमाणे काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोशल अँकाऊटस्वरील आपले प्रोफाईल चित्र बदलून तिरंग्याचे चित्र ठेवले. देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी किंवा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना काँग्रेसही त्यात मोदींच्या आव्हाना नुसार सहभागी झाली आहे, याबद्दल काँग्रेसी नेत्यांचे अभिनंदन.
 
 
 
तशी काँग्रेसची सवय मोदी जे काही करतील त्याला विरोध करणे अशी आहे. मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक केला, गलवान खोर्‍यात चीन्यांना रोखले, तेव्हा काँग्रेसचे नेते म्हणाले की, याला पुरावे द्या, आमचा यावर विश्वास नाही. आपले नशीब थोर, यावेळी काँग्रेसचे नेते असे काही म्हणाले नाहीत की, ‘हर घर तिरंगा’, ही मोदींची घोषणा आहे, ती आम्हाला मान्य नाही. तिरंग्याचा स्वीकार राष्ट्रीय काँग्रेसने केला, तेव्हा भाजपा कुठे होता असला बावळट प्रश्नही त्यांनी विचारला नाही.
 
 
पण बावळटपणा करणार नाहीत, तर ते काँग्रेसी कसले? विरोधी पक्ष म्हणून स्वतःची ओळख तर स्वतंत्र ठेवायची आहे, भाजपाने दिलेला कार्यक्रम नाईलाजाने स्वीकारवा लागतो आहे. नाही स्वीकारला तर जनमानसात आपली प्रतिमा चांगली होणार नाही. अगोदरच घसरणीला लागलेला लोकप्रियतेचा आलेख आणखीनच खाली जाईल. पण वेगळेपण व्यक्त केले पाहिजे. ‘मजबूरी का नाम काँग्रेस’ असे म्हणायला पाहिजे.
 
 
वेगळेपण व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे नेते जयराम रमेश पुढे सरसावले. जयराम रमेश यांची प्रतिमा अभ्यासू आणि परिश्रमी राजनेता अशी आहे. ते काही भन्नाट विधाने करणारे नाना पटोले नव्हेत. ते म्हणाले,“हम हाथ में तिरंगा लिये अपने नेता नेहरू की ऊझ लगा रहे हैं। लेकिन लगता है प्रधानमंत्री का संदेश उनके परिवार तक ही नहीं पहुंचा। जिन्होंने 52 सालों तक नागपूर में अपने हेड क्वार्टर में झंडा नही फहराया, वे क्या प्रधानमंत्री की बात मानेंगे?”
 

RSS
 
जयराम यांचा संकेत संघाकडे आहे. संघाच्या महाल कार्यालयावर आणि रेशीमबाग कार्यालयावर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सन्मानपूर्वक तिरंगा लावला जातो. ही प्रथा सुरू होऊन आता किमान पंधरा ते वीस वर्षे झाली आहेत. पूर्वी शासनाचाच नियम होता की, सरकारी कार्यलये सोडून अन्य ठिकाणी तिरंगा लावू नये. जयराम रमेश यांना संघ कार्यालयावर तिरंगा लावला जातो याची माहिती नसावी हे अज्ञान न शोभणारे आहे. एकेकाळी काँग्रेसची निशाणी बैलाची जोडी होती. काँग्रेसचा उपहास करताना आचार्य अत्रे बैलाच्या जोडीवर वक्रोक्ती करीत असत. काँग्रेसचे नेते म्हणजे बैलच आहेत, त्यांना काही बुद्धी नाही, असे तेव्हा म्हटले जाई. नंतर काँग्रेसची निशाणी बदलली, गाय-वासरू ते हाताचा पंजा असा निशाणीचा प्रवास झाला. परंतु बैलाच्या निशाणीचा डीएनए तसाच राहिला, त्यामुळे जयराम रमेशसारखा अभ्यासू नेतादेखील अज्ञानाचे विधान करू शकतो.
 
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.