निराकाराची उपासना करतानाच स्वाभाविकपणे जैन व बौद्ध मतांवर येथील बहुसंख्य सगुण साकार उपासना करणार्या भक्तांचा प्रभाव पडत गेला. सामान्य लोक अंधश्रद्धा, अदृष्ट शक्तीची भीती यातून बाहेर पडावी, यासाठी भगवान बुद्ध आणि महावीर यांनी मूर्तिपूजा त्याज्य मानली. परंतु हळूहळू महायान शाखेद्वारे व जीवन्मुक्त पुरुषांना ईश्वर मानण्याच्या जैन परंपरेमुळे दोन्ही मतांमध्ये मूर्तिपूजा सुरू झाली आणि त्यातच प्रथम पूजेचा मान असणारा गणपतीसुद्धा स्थानापन्न झाला.

श्रीगणेश, गणपती हा आज आपल्याला जगभरात आढळतो. गणेशाची लोभसवाणी मूर्ती विविध रूपांमध्ये भारताबाहेरही अनेक ठिकाणी आढळून येते. अभ्यासक ही मूर्ती भारताबाहेर नेण्याचे श्रेय जैन सार्थ अर्थात व्यापार्यांना व बौद्ध भिक्खूंना देतात. अगदी जेथे हत्ती हा प्राणी आढळत नाही, तेथेही आपणांस गजाननाच्या मूर्ती दिसतात. शिवशंकर हा एकमेव असा देव आहे, ज्याचा पूर्ण परिवार पूजला जातो. उत्तरेकडे शिव-पार्वतीची अधिकतर पूजा केली जाते. मध्य भारत महाराष्ट्रात शिवपार्वतीसह गणेशाला विशेष महत्त्व आहे, तर दक्षिणेकडे कार्तिकेय (षडानन) आणि गणपती यांची पूजा केली जाते. शिवमंदिरे सर्वत्र आढळून येतात.
भारतीय समाज एक अनोखा समाज आहे. वरवर भिन्न वाटणारी मते एकमेकांमध्ये मिसळून गेलेली दिसतात. विद्वान लोक, इतिहासकार कालखंडानुसार याविषयीची अभ्यासपूर्ण माहिती लिहीत असतात. वेगवेगळ्या कालखंडांत भारतात उदय होत गेलेली मते, संप्रदाय आणि त्याकडे आपापल्या रुचीनुसार आकृष्ट झालेले जनमानस यावर अनेकांनी अभ्यासपूर्वक लिहिले आहे. हळूहळू पूर्णत: भिन्न वाटणार्या मतांमध्ये स्वाभाविकपणे होत गेलेले सामंजस्य, निराकाराची उपासना करणार्यांनी सुरू केलेले साकाराचे पूजन आणि सगुण उपासना करणार्या मतांमध्ये दिसून येणारी निर्गुणाची सावली हे सारेच मोठे मनोरम आहे. अर्थात, या सगळ्याकडे बघण्याची दृष्टी कशी आहे, यावरही बरेचसे अवलंबून असते.
वैदिक, बौद्ध आणि जैन या मतांविषयी विचार करताना हेच ध्यानात येते. अभ्यासक बौद्ध आणि जैन ही मते नास्तिक आहेत म्हणजे वेदप्रामाण्य न मानणारी आहेत असे प्रतिपादन करीत असतात. अर्थात, हे विधान पूर्णत: सत्यही आहे. जैन मत व बौद्ध मत हे निराकाराची उपासना करणारे संप्रदाय आहेत, हे मतही योग्य आहे. असे असूनही जैन व बौद्ध मतावलंबी आपल्याला मूर्तिपूजा, प्रार्थना याद्वारे साकारोपासना करताना आढळतात. निराकाराची उपासना सर्वच मनुष्यमात्रांना सहजसाध्य गोष्ट नाही. आपल्या डोळ्यांपलीकडे कोणतीतरी अज्ञात शक्ती आहे आणि ती शक्ती सर्व जगताचे नियंत्रण करीत आहे, असे मानणे सर्वसामान्यांना सुलभ वाटते. त्यामुळेच सुरुवातीला निराकाराचा आश्रय घेतलेले संप्रदाय हळूहळू साकारोपासनेकडे झुकताना दिसतात.
जैन आणि बौद्ध मतांमध्ये असलेले गणपतीचे स्थान याचा विचार करताना या बाबींना आधारभूत मानले पाहिजे.

जैनमत आणि बौद्धमत हेदेखील अत्यंत प्राचीन विचार आहेत. मात्र इतिहासाच्या पटलावर इसवीसनपूर्व 600च्या आसपास होऊन गेलेल्या वर्धमान महावीर व भगवान गौतम बुद्ध यांच्यापासून जैन व बौद्ध संप्रदायांचा विचार केला जातो.
गणपतीचा उल्लेख जरी यजुर्वेदात आढळून येत असला, तरी देवता म्हणून गणपतीचे पूजन पाचव्या-सहाव्या शतकापासून सुरू झाले. याचा अर्थ भगवान बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या कालखंडात देवांच्या यादीमध्ये गणेशाचे नाव नव्हते. त्यामुळेच आपल्या उपदेशांमध्ये गौतम बुद्धांनी ब्रह्मदेव, इंद्र आदी देवतांचे नाव घेतलेले आढळते, पण त्यात शिव आणि गणेश यांची नावे नाहीत. जैनांचे 24वे तीर्थंकर महावीर यांच्या वाणीमध्येही गणपतीचा उल्लेख आढळत नाही. परंतु उत्तरवर्ती जैन आणि बौद्ध धर्मांमध्ये मात्र गणेशाचा उल्लेख, गणेशमूर्तींचा वापर आढळून येतो. परदेशांमध्ये गणेशमूर्ती पोहोचवण्याचे श्रेय कित्येक अभ्यासक बौद्ध भिक्खूंना देतात.
बौद्ध धर्मातील महायान या शाखेमध्ये विघ्नेश, विघ्नराज या नावाने अनुष्ठानाच्या आरंभी गणपती पूजन करण्याची प्रथा आहे. ही महायान शाखा बौद्ध धम्माच्या अनेक पर्णांना एकत्रित जोडून घेणारी समन्वयाची शाखा आहे. गौतम बुद्धांनंतर अनेक शतकांनी भरलेल्या महासंगितीमध्ये (परिषदेमध्ये) जे दोन प्रमुख गट निर्माण झाले, त्यातील मतसांघिक या गटाने ठिकठिकाणच्या लोकसमुदायाच्या समजुती, आचार-विचार यांनाही बौद्ध धम्माच्या चौकटीत बसवावे, थोडे व्यापक व्हावे असा विचार मांडला. यातूनच महायान शाखा निर्माण झाली. त्यात स्थानिक धार्मिक बाबी अंतर्भूत झाल्या. पूजाअर्चा, मूर्तिपूजेस मान्यता इ. मिळाल्या आणि त्यातूनच पुढे प्रथमेश गणपतीचे बौद्ध धम्मात आगमन झाले.
बौद्धांमध्ये जसेजसे तंत्राचाराचे प्राबल्य वाढले, तसेतसे तंत्रसाधनेत हठयोगाच्या संकल्पनांचा वापरही सुरू झाला. यामध्ये मूलाधारात गणेश आणि सहस्रारात शिवशंकर ही चक्रांची संकल्पना आहे. या संकल्पनांबरोबरच बौद्ध धम्मात गणेशाचे व शिव-शक्तीचे पूजन सुरू झाले.
नेपाळच्या बौद्ध मंदिरांमध्ये गणपतीची मूर्ती आढळते. येथे विनायक या नावाने गणपतीला ओळखले जाते. चीन, श्रीलंका, जपान, कोरिया या देशांमध्ये बौद्ध स्तूपांच्या परिसरात अनेक देवदेवतांच्या मूर्ती आढळतात. त्यात गणेशाच्या मूर्तीही आढळून येतात. एकूणच गणेशाचे लोभस रूप जगभरात पोहोचवणार्यांमध्ये जसे भारतीय सार्थवाहांना (व्यापार्यांना) श्रेय जाते, तितकेच धम्माच्या प्रचारकांनाही जाते.
काही अभ्यासक अष्टविनायक आणि गौतमबुद्धांचे आठ विनय इत्यादींचा संबंध लावून, तसेच लेण्याद्री आदी ठिकाणच्या स्तूपाकार रचनांचा विचार करून गणपतीची ही आठ मंदिरे प्राचीन बौद्धस्थाने आहेत असा दावाही करताना आढळतात. मात्र त्याविषयी सखोल संशोधन व पुरावे अद्याप उपलब्ध नाही.
जैनांच्या वाङ्मयात ॠषभदेव आणि शिवशंकर यांच्या व्यक्तित्वांत समानता आढळते. जैनमत हे अत्यंत प्राचीन मत आहे. ॠग्वेदातही ॠषभदेवांचा उल्लेख अत्यंत आदराने केला गेला आहे. या ॠषभदेवांना कैलासपती महादेव या नावानेही ओळखले जाते. आदियोगी शिवशंकराचा शैवपंथ आणि जैन यांच्यामध्ये अगदी उगमापाशी असलेले हे एकत्व अभ्यासकांना अचंबित करून जाते. कदाचित या दोन्ही साधनापद्धती पुरातन काळात एकाच स्रोतापासून उगम पावल्या असाव्यात, असेही मानण्यास वाव आहे. या शिवाचा पुत्र गणेश याच्यासंबंधी अनेक श्लोकांमध्ये जैन आगम ग्रंथांत उल्लेख आढळतात.
गणेश विघ्नहर्तारं, वीतरामकल्पषम्।
प्रणम्य परया भक्त्या, यत्नमेतं सभारभे॥
अर्थात, विघ्नहर्त्या गणेशाला परमभक्तीने वंदन करीत आहे, जो वैराग्य आणि पुण्य देतो. त्यामुळे सुरुवातीलाच त्याला वंदन करीत आहे.
आणखी एका ठिकाणी म्हटले आहे,
व्यपास्य चिन्तां गुरुशोकजातं
गणेशमानम्य विनम्र मौलि:।
निन्दन्नपारां निजभोग तृष्णां
चक्री विभूत्या स्वधुरं गणेश:॥
जैन साधना प्रामुख्याने अहिंसा आणि त्याग, वैराग्य यावर आधारित आहे. त्यामुळे श्रीगणेशाला वंदन करताना ऐहिक भोग-कामाच्या मागण्यांऐवजी वैराग्य, भोगतृष्णेपासून विरक्ती यांची मागणी केली आहे.
असा हा गणेश जैनमतांमध्ये गणदेव म्हणून ओळखला जातो.
प्राग्दिग्विदिगंतरि केवली-जिन-सिद्ध-साधु गणदेवा॥
नमो ॠषभसेनादि गौतमानय गणशिनै॥
निराकाराची उपासना करतानाच स्वाभाविकपणे जैन व बौद्ध मतांवर येथील सगुण साकार उपासना करणार्या बहुसंख्य भक्तांचा प्रभाव पडत गेला.
अंधश्रद्धा, अदृष्ट शक्तीची भीती यातून सामान्य लोक बाहेर पडावे, यासाठी भगवान बुद्ध आणि महावीर यांनी मूर्तिपूजा त्याज्य मानली. परंतु हळूहळू महायान शाखेद्वारे व जीवन्मुक्त पुरुषांना ईश्वर मानण्याच्या जैन परंपरेमुळे दोन्ही मतांमध्ये मूर्तिपूजा सुरू झाली आणि त्यातच प्रथम पूजेचा मान असणारा गणपतीसुद्धा स्थानापन्न झाला.