विश्वनेतृत्वाच्या दिशेने आणखी एक पाऊल

विवेक मराठी    18-Aug-2022   
Total Views |
‘जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी जागतिक युद्धविरामाची गरज आहे. त्याकरिता 5 वर्षांच्या मुदतीच्या एका आयोगाचे गठन करण्यात यावे.’ तसा लेखी प्रस्तावही ते लवकरच संयुक्त राष्ट्राकडे सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेक्सिकोच्या अध्यक्षांनी सुचवलेल्या या त्रिसदस्यीय आयोगात पोप फ्रान्सिस, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेस यांच्यासमवेत भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नावाची शिफारस केली आहे. अशी शिफारस होणे हे जागतिक स्तरावर भारताच्या विद्यमान पंतप्रधानांची आणि देशाची प्रतिमा कशी उजळत आहे, याचे द्योतक आहे. मात्र निव्वळ एक वृत्त म्हणून त्याची दखल घेण्यापलीकडे आपल्या प्रसारमाध्यमांनी अद्याप काही केल्याचे ऐकीवात वा वाचनात नाही.

modi
 
जगावर परिणाम करत असलेले, कल्पनेपेक्षाही दीर्घकाळ चालू असलेले रशिया-युक्रेन यांच्यामधील युद्ध आणि चीन-तैवान यांच्यामधला वाढत चाललेला तणाव यामुळे जगभरातल्या महत्त्वाच्या राजकीय नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ही युद्धखोर मानसिकता संपूर्ण जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन उभी करेल याविषयीची अस्वस्थता जागतिक राजकारणाचा, समाजकारणाचा अभ्यास करणार्‍या विचारवंतांच्याही मनात आहे. म्हणूनच या गंभीर समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्रित चिंतन व्हायला हवे, त्यातून जगाच्या भल्यासाठी निर्णय घेऊन ठोस पावले उचलली जायला हवीत, त्यासाठी एका आयोगाचे गठन व्हायला हवे या विचारातून मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी सर्व जगासमोर एक विचार ठेवला आहे. त्यांच्या मते, ‘जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी जागतिक युद्धविरामाची गरज आहे. त्याकरिता 5 वर्षांच्या मुदतीच्या एका आयोगाचे गठन करण्यात यावे.’ तसा लेखी प्रस्तावही ते लवकरच संयुक्त राष्ट्राकडे सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेक्सिकोच्या अध्यक्षांनी सुचवलेल्या या त्रिसदस्यीय आयोगात पोप फ्रान्सिस, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेस यांच्यासमवेत भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नावाची शिफारस केली आहे. अशी शिफारस होणे हे जागतिक स्तरावर भारताच्या विद्यमान पंतप्रधानांची आणि देशाची प्रतिमा कशी उजळत आहे, याचे द्योतक आहे. वास्तविक प्रत्येक देशवासीयाला अभिमान वाटावा अशी ही बातमी. ती प्रसारमाध्यमांत येऊनही आठवडा होऊन गेला. मात्र निव्वळ एक वृत्त म्हणून त्याची दखल घेण्यापलीकडे आपल्या प्रसारमाध्यमांनी अद्याप काही केल्याचे ऐकीवात वा वाचनात नाही. हा थंड प्रतिसाद इथल्या प्रसारमाध्यमांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो.
 
 
विश्वशांतीसाठी जागतिक स्तरावरच्या प्रस्तावित त्रिसदस्यीय आयोगात भारताचे पंतप्रधान असावेत, अशी शिफारस अमेरिकेच्या शेजारी राष्ट्राकडून होते आहे, हेही विशेष दखल घेण्याजोगे. या शिफारशीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विचारपूर्वक उचललेली पावले, आवश्यक तिथे देश म्हणून कणखर व सडेतोड भूमिका घेतानाच जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांशी (त्यात पाकिस्तान, चीन यांसारखी शेजारी राष्ट्रेही आली) राखलेले सौहार्दाचे संबंध कारणीभूत आहेत यात शंकाच नाही. पण त्याचबरोबर या देशाला विश्वशांतीची असलेली आसही पुरातन आहे. त्याचे अनेक दाखले आपल्या परंपरेत आहेत. संत ज्ञानदेवांनी जे पसायदान मागितले ते विश्वकल्याणासाठी. नरेंद्र मोदी या विचार परंपरेचे पाईक आहेत आणि त्यांना त्याचा विलक्षण अभिमान आहे, याची साक्ष त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्तनातून ठळकपणे व सदैव अधोरेखित होते. त्याचाच परिणाम म्हणून भारतासारख्या विकसनशील देशाच्या पंतप्रधानांकडे विश्वशांती प्रस्थापित होण्यासाठी जग आशेने बघते.
 
अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता करणार्‍या यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधानांनी देशाच्या विकासासाठी सांगितलेली पंचसूत्री ही त्यांच्या द्रष्टेपणाचे प्रतीक आहे. आणखी 25 वर्षांनी स्वांतत्र्याचे शतक साजरे होईल, तेव्हा देशाने प्रगतीचा कोणता टप्पा गाठावा, याचा विचार त्या मांडणीत आहे. ते राजकीय भाषण नव्हते, तर ते चिंतकाचे भाषण होते. आपला देश विश्वनेतृत्वासाठी सज्ज झाल्याचे स्वप्न पाहत असलेल्या चिंतकांची ती मांडणी आहे. आणि हे त्यांनी काही पहिल्यांदाच मांडले असे नाही. भारताने जगाचे नेतृत्व करावे यात विश्वाचे कल्याण आहे, असे ते कायम मांडत असतात. कारण आपला देश विश्वबंधुत्वाचा विचार मांडणारा आहे. ती इथली हजारो वर्षांची परंपरा आहे. म्हणूनच देश पारतंत्र्यात असतानाही स्वामी विवेकानंदांसारख्या त्याच्या महान सुपुत्राने अमेरिकेत विश्वबंधुत्वाची संकल्पना अतिशय प्रभावीपणे मांडली होती. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचाराचे सिंचन इथल्या पिढ्यान्पिढ्यांवर झाले आहे. ते इथल्या डी.एन.ए.मध्येच आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
 
जगाचे लक्ष वेधून घेणार्‍या आपल्या परराष्ट्र धोरणावरही त्याची छाया आहे. त्यामुळेच पंतप्रधान आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वदेशहित जपतानादेखील विश्वकल्याणाच्या अंतिम ध्येयापासून ते कधी दूर गेले नाहीत. शेजारी राष्ट्रांचे मनसुबे, त्यांची कुटिल कारस्थाने माहीत असूनही त्यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला. अफगाणिस्थानच्या दौर्‍यावरून परतताना पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची लाहोर इथे त्यांच्या निवासस्थानी अचानक घेतलेली भेट आठवावी. किंवा सर्व आंतरराष्ट्रीय संकेत दूर सारत, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीन पिंग यांची साबरमतीच्या तिरावर घेतलेली भेट आठवावी. या भेटी केवळ सनसनाटी करण्याच्या हेतूने घेतलेल्या नव्हत्या, तर त्यामागे निश्चित विचार होता. म्हणूनच त्या त्या वेळी एतद्देशीय आणि जागतिक स्तरावरच्या डाव्यांच्या प्रभावाखालील प्रसारमाध्यमांनी टीकेची राळ उडवली, तरी ती त्यांनी प्रतिवाद न करता झेलली.
दुबळ्याच्या सहिष्णुतेला किंमत शून्य असते, याचे भान असलेले पंतप्रधान जेव्हा इथल्या युवा पिढीसमोर बोलतात, तेव्हा ते जगाचे नेतृत्व करण्यासाठी व जगात शांतता राखण्यासाठी आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा देतात. त्यांचे झापडबंद टीकाकार कितीही टीका करोत; बदलणार्‍या भारताची आणि त्याच्या विवेकी नेतृत्वाची दखल जगाने घेतली आहे. रशिया-युक्रेन प्रकरणी नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी असा विचार जागतिक स्तरावर पुढे आला तो त्यामुळेच. आणि मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांना विश्वशांतीसाठीच्या त्रिसदस्यीय आयोगात नरेंद्र मोदींचे नाव असावे असे वाटलेे, तेही त्यामुळेच. विश्वनेतृत्वाच्या दिशेने देशाचे आणखी एक पाऊल पडले आहे, असा याचा अर्थ. इतके याचे महत्त्व.