कर्तव्यबोध आणि आत्मबोध

विवेक मराठी    16-Aug-2022   
Total Views |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी प्रथेप्रमाणे लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधून भाषण झाले. त्यांच्या चाहत्या वर्गाच्या नजरेतून हे भाषण उत्तम भाषण होते आणि त्यांच्या विरोधकांच्या नजरेतून हे भाषण लोकांची दिशाभूल करणारे भाषण होते. या दोन्ही प्रतिक्रिया बाजूला ठेवून या भाषणाचा विचार केला पाहिजे.
 
bjp
 
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान एका वर्षात आमच्या शासनाने काय केले आणि पुढे काय करणार आहोत, हे जनतेला सांगतात. कामाचा ताळेबंद मांडणारे असे भाषण तात्कालिक असते. दीर्घकाळ स्मरण ठेवावे असे त्यात काही नसते.
 
 
या वेळचे मोदी यांचे भाषण याला अपवाद समजले पाहिजे. त्यांनी आपल्या कामाचा ताळेबंद मांडला नाही. त्याऐवजी त्यांनी देशापुढे पुढील पंचवीस वर्षांची दिशा ठेवली. आम्ही कोण आहोत याची ओळख करून घेऊन आम्हाला कुठे जायचे आहे, याचा पथदर्शक नकाशा त्यांनी लोकांपुढे ठेवलेला आहे.
 
 
दोन वर्षांनंतर निवडणुका आहेत. पुन्हा निवडून येणे आवश्यक आहे. पंचवीस वर्षांच्या पथदर्शक नकाशात रंग भरायचा असेल, तर दिल्लीचे शासन आवश्यक आहे. 125च्या आसपास खासदार अनुसूचित जाती-जमातीच्या राखीव मतदारसंघातून निवडून येतात. नरेंद्र मोदी यांनी एकापाठोपाठ एक वनवासी भागातील स्त्री-पुरुष स्वातंत्र्ययोद्ध्यांचे नावानिशी स्मरण केले. वनवासी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आहेत, संदेश स्पष्ट आहे.
 
 
‘कर्तव्याशिवाय अधिकार निरर्थक आहेत’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. लोकमान्य टिळकांनी कर्मयोगाच्या माध्यमातून आणि महात्मा गांधींनी भक्तियोगाच्या माध्यमातून हाच कर्तव्य विचार देशापुढे मांडलेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्वांना कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.
 
 
स्वराज्य, स्वातंत्र्य याचे नेमके अर्थ कोणते, हे टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महामानवांनी फार पूर्वीच स्पष्ट केले आहे. आपण गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त झालो पाहिजे, कष्टाला पर्याय नाही, ‘सबका साथ, सबका विकास, सबका परिश्रम’ हे मोदी यांनी सांगितले. स्त्रीशक्तीचा गौरव केला. स्त्री सन्मानाची अपेक्षा सर्वांकडून व्यक्त केली. कर्तव्यबोध आणि आत्मबोध करून देणारे हे भाषण झाले.
 
 
लाल किल्ल्यावरून आणखी एक भाषण या सदरात हे भाषण गणले जाणार नाही. या भाषणामध्ये विचारांची स्पष्टता आहे, कार्यक्रमांची रूपरेखा आहे, देशातील सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा संदेश आहे, आत्मभानजागृतीची तीव्र आँच आहे. यामुळे हे भाषण दीर्घकाळ स्मरणात राहील. जगातील राष्ट्रांत भारताला आपले स्वतंत्र स्थान निर्माण करायचे आहे, शांतता आणि विश्वबंधुत्व यांचे नेतृत्व करायचे आहे, हे स्वातंत्र्य आंदोलनात आपल्या थोर नेत्यांनी वारंवार सांगितलेले आहे. मोदींचे भाषण त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आहे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.