शहनाईवादक डॉ. एस. बालेश भजंत्री

विवेक मराठी    16-Aug-2022   
Total Views |
पद्म गौरव लेखमालेत या वेळी आपण तमिळनाडूमधील पंडित डॉ. एस. बालेश भजंत्री यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. पंडित डॉ. एस. बालेश प्रसिद्ध शहनाईवादक आणि हिंदुस्थानी संगीत गायक आहेत. जगप्रसिद्ध शहनाईवादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे ते शिष्य आहेत. आज बनारस घराण्याचा वारसा ते पुढे नेत आहेत. ते ऑल इंडिया रेडिओचे आणि दूरदर्शनचे ए ग्रेड कलाकारदेखील आहेत. याच कलाक्षेत्रातील शहनाई वाद्यवादनासाठी विद्यमान सरकारने त्यांना पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला आहे.
 
padmshree
 
शहनाई हे भारतातील एक प्रसिद्ध वाद्य आहे. लग्न आणि शुभकार्यप्रसंगी हे वाद्य वापरले जाते. शास्त्रीय संगीतामध्ये याचा अधिक वापर केला जातो. शहनाई म्हटली की आपल्यासमोर भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे नाव येते. त्यांचेच शिष्य असलेले पं. बालेश भजंत्री यांनी गुरुकुल पद्धतीने बनारस येथे उस्तादजींकडून शास्त्रीय शिक्षण घेतले आहे.
 
 
1 एप्रिल 1958 रोजी पं. बालेश यांचा जन्म झाला. कित्तूर तालुक्यातील बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध शहनाईवादक एम.के. हुबळी यांच्या कुटुंबातील ते एक आहेत. बेळगाव येथेच त्यांचे लहानपण गेले आहे. लहानपणापासून त्यांना शहनाई हे वाद्य वाजवण्याची इच्छा होती. प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे शहनाईचे उस्ताद भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्याकडे बनारस येथे गेले. त्यांची आवड आणि तीव्र इच्छा बघून उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी त्यांना आपले शिष्य म्हणून स्वीकारले, आणि बिस्मिल्ला खान या आपल्या गुरूंच्या पाच शिष्यांपैकी ते आज एकमेव हयात शिष्य आहेत. पुढे उस्ताद बिस्मिल्ला खान यांनीही त्यांना अनेक कार्याप्रसंगी साथसंगत करण्यासाठी बोलावले. उस्तादजींबरोबर त्यांनी अनेक मैफिली गाजवल्या आहेत आणि भारतरत्न असलेल्या आपल्या गुरूप्रमाणे त्यांनासुद्धा त्यांच्या या कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.शिष्याने गुरूला दिलेली ही गुरुदक्षिणा आहे. उस्तादजींनी पं. बालेश यांना ‘दक्षिण भारताचे बिस्मिल्ला खान’ ही मानद पदवीदेखील दिली होती.
वयाच्या 11व्या वर्षीपासून त्यांनी शहनाई वाद्य वाजवायला सुरुवात केली. पंडितजी हे प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि गझल गायकदेखील आहेत आणि नौशाद अली, च.ड. विश्वनाथन, इलैयाराजा, ऑस्कर विजेते ए.आर. रहमान आणि एम.एम. किरवानी यांच्यासारख्या बॉलीवूड, टॉलीवूड आणि भारतभरातील 16 भाषांमध्ये अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी शहनाईवादन केले आहे. सर्व भाषांमधील 9000हून अधिक चित्रपट संगीतासाठी आणि 45000 चित्रपट गाणी आणि काही धर्मांतील भक्तिगीते प्रसंगी गायली आणि शहनाईवादनही केले आहे.
 
 
पंडितजींनी हॉलीवूडच्या संगीत दिग्दर्शकांसाठीही शहनाईवादन केले आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय संगीतकारांबरोबर ध्वनिमुद्रणाध्येही सहभाग घेतला आहे.
 
 
या निमित्ताने त्यांनी भारतात आणि भारताबाहेर प्रवास केला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय संगीत नाटक अकादमी, संगीत संगम, आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव नवी दिल्ली, इंडिया टूरिझम, सबरंग उत्सव बनारस, अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारत महोत्सवात व अन्य अनेक महोत्सवात त्यांनी आपल्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. पं. बालेश आज माजी विद्यार्थी म्हणून बनारस येथे आश्रमात सेवा देण्यासाठी आवर्जून वेळ काढतात. ते तेथे अपंग तरुणांना शास्त्रीय आणि वाद्यसंगीत शिकवत आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील आहेत. आज या संगीत कौशल्याने त्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यात पं. बालेश यांना यश आले आहे. त्यांनी स्थापन केलेल्या तानसेन अकादमीत ऑटिस्टिक, अपंग आणि विशेष अपंग मुलांकडून, तसेच जन्मांध असलेल्या मुलांकडून गुरुदक्षिणा घेतली जात नाही. त्यांना नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाते. प्रसंगी त्यांच्यासाठी वेगवेगळे वर्गदेखील आयोजित केले जातात. आज तानसेन अकादमीत पंडितजींची तिन्ही मुले त्यांच्याबरोबरच गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवत आहेत.
 
 
 
 
पं. बालेश यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, त्यापैकी काही प्रमुख पुरस्कार म्हणजे उस्ताद बिस्मिल्ला खान कलारत्न सन्मान 2021, कलामणी 2020 - तामिळनाडू राज्य पुरस्कार, कर्नाटक कलाश्री 2019 या आणि विविध पुरस्कारांची श्रीमंती त्यांच्यामागे आहे. विद्यमान सरकारनेही पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. पंडित डॉ. एस. बालेश भजंत्री यांच्या भावी वाटचालीस मनापासून सदिच्छा आहेत.

श्री सर्वेश फडणवीस

युवा लेखक सामाजिक ,सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक,तरुण भारत नागपूर येथे २ वर्ष स्तंभ लेखन केले आहे. मुंबई तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स,पुण्यनगरी या वृत्तपत्रासाठी विविध विषयांवर लेखन सुरू असते. मध्य प्रदेश येथील इंदोर येथून एक पाक्षिक निघतं मराठी गौरवयात ही अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. प्रज्ञालोक ह्या त्रैमासिकात ही लेखन सुरू आहे. आणि प्रज्ञालोक अभ्यासक मंडळात संपादकीय मंडळात सक्रिय आहे. मुंबई तरुण भारताने "कालजयी सावरकर" या नावाने सावरकर विशेषांक प्रसिद्ध केला त्यात 'सावरकर आणि युद्धशास्त्र' ह्या विषयावर लेख प्रकाशित झाला आहे. अनेक दिवाळी अंकांसाठी लेखन सुरू असते. साप्ताहिक विवेक साठी लिहितांना कायमच आनंद मिळत असतो. विवेकचा वाचक लेखकांना समृद्ध करणारा आहे.