अक्षय... एक न सुटणारं कोडं!

विवेक मराठी    12-Aug-2022   
Total Views |
@वर्षा भावे
अक्षय माटेगावकर या तरूण, गुणी, उदयोन्मुख गायकाची काही दिवसांपूर्वी दुर्दैवी अखेर झाली. वरकरणी उत्साही, मनमिळावू असलेला आणि एका सुसंस्कृत, विचारी घरात जन्मलेल्या अक्षयला आपलं जीवन संपवावं असं का वाटलं असेल, हे न सुटणारं कोडं आहे. गायनाच्या क्षेत्रातील त्याच्या मार्गदर्शक, अनेक वर्षांच्या परिचित असलेल्या ज्येष्ठ गायिका वर्षा भावे यांनी अक्षयच्या अकाली जाण्यानंतर व्यक्त केलेल्या भावना

suicide
आज काय करणार? असं आपण सकाळी ठरवतो आणि साधारणपणे तो दिवस 20-30% इकडे-तिकडे होत अपेक्षेप्रमाणे पारही पडतो. पण एखादा दिवस असा येतो की सुरुवात आणि दिवसाचा शेवट यात प्रचंड तफावत असते. दिनांक 15 जुलै हा दिवस 15 तासांसाठी परत एकदा मागे जावा आणि जे विदारक घडलं आहे ते तसंच न घडता विरून जावं, दिवस सरळ पार पडावा असं वाटणारा भीषण, भयावह, हृदय भग्न करणारा तो दिवस!
 
 
रात्री 9च्या सुमारास दार उघडून घरी आले आणि फोन.... ’‘तुला कळलं का मावशी”... हुंदके आणि शांतता... ‘’अगं काय, सांग तरी” मी. ‘’मावशी, अक्षय गेला गं.. अक्षय माटेगावकर..” ’‘काहीही... नीट माहिती नसताना काहीतरी बोलू नकोस.” मी. ’‘नाही गं” हुंदके देत ती म्हणाली, ‘’अक्षयच, खरोखर!” मग तिने ती बातमी कशी खरी आहे आणि तिला कशी अगदी खात्रीच्या व्यक्तीकडून कळली आहे, ते मला सांगायला सुरुवात केली. आणि अचानक नक्की काय झालंय ते मला जाणवून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मेंदू जागा झाला आणि कुणीतरी काळीज कापत आहे अशी जाणीव होऊन मी अनावर रडायला लागले. समोरून बोलणारीची काही वेगळी अवस्था नव्हती. पण तरीही तिने माझी समजूत घालायला सुरुवात केली. मी फोन ठेवला, तेव्हा मला आठवत नाही माझी काय स्थिती होती. मी घरात एकटीच होते. दु:खाचा महापूर.. काळीज फाटून जाईल अशी वेदना..
 
 
अक्षयचं वय पाहता त्याचं या जगातून निघून जाणं तसंही अनैसर्गिकच होतं. डोकं ठिकाणावर आलं, तेव्हा अ‍ॅक्सिडेंट असेल, हार्ट अटॅक असेल.. अरे रे.. असं मन म्हणत असतानाच हा आत्मघात आहे, आत्महत्या आहे ही बातमी एखादा विजेचा लोळ अंगावर यावा तशी कानावर पडली आणि नंतर तर अशक्य भयानक, काळीज हलवून टाकणार्‍या बातम्यांचं पेवच फुटलं.
 
 
अक्षय आणि आकांक्षा ही दोन जुळी मुलं! गाण्यावर अत्यंत प्रेम! शाळेतही छान प्रगती! वयाच्या दहाव्या वर्षी जी जोडली गेली, ती आजतागायत! अतिशय गोड, लाघवी मुलं.. त्यांच्याबद्दल अत्यंत प्रेम, कौतुक आणि विलक्षण वात्सल्यभाव!
 
 
सुसंस्कारित, उच्चविद्याविभूषित, शिक्षण आणि उत्तम संगीत यांचा समतोल जपणारे, गाणारे, वादन करणारे जबाबदार आईवडील! अतिशय संवेदनशीलतेने दोन्ही मुलांना वाढवत त्यांच्या शरीर-मनाची मशागत करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला छान विकासाची दिशा दाखवणारे आई बाबा! कलांगणच्या प्रत्येक कॅम्पला गेली 10 वर्षं सातत्याने येणारी ही मुलं! दरम्यान 10वी-12वीतसुद्धा कॅम्पला येत राहिली. एखाद्या वर्षी कॉलेजमध्ये नेमकी परीक्षाच मध्ये आली म्हणून येता आलं नाही, तर हळहळत राहिली. कलांगणचे नियमित विद्यार्थी नसूनही अनेक कार्यक्रमांना केवळ लरलज्ञीींरसशला मदत करायलासुद्धा येत राहिली.
 
 
अक्षय आवडीने इंजीनियरिंगला गेला, तर आकांक्षा डिझायनिंगला. दोघे शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याला गेले. सर्व माटेगावकर परिवार एकमेकांशी अतिशय बांधलेला. त्यामुळे पुण्यात काका-काकू असल्याने स्वाभाविक असा अतूट बंध होता.
 
 
 
हे असं सगळं नीटनेटकं असताना अक्षय असा तडकाफडकी का निघून गेला? कुणाशीही एक अक्षरही का बोलला नाही? त्याच्या मनात खूप काही साचलेलं होतं का? की नव्हतं.. आणि एका क्षणाच्या वेड्या निर्णयाने त्याने स्वत:चं जीवन संपवून टाकलं? तो आमच्या सहवासात गेल्याच महिन्यात 4 जून ते 10 जून रोज होता 24 तास, सात दिवस सलग! आम्ही खूप गायलो, खूप बोललो, शास्त्रीय गाण्याबद्दल, गाण्याशिवाय अनेक विषयांवर! तिथे असलेली समवयस्क, गाणारी 11 तरुण मुलं किती चर्चा करत, किती हसत, गप्पा मारत, चेष्टामस्करी करत आणि मनसोक्त गात.. एकमेकांचं गाणं ऐकून समीक्षा करत. एक अत्यंत सुंदर सांगीतिक नातं निर्माण झालं होतं एकमेकांबरोबर!
 
 
गेली तीन वर्षं - म्हणजे 2017, 2018 आणि 2022मध्ये जरा अधिक चांगलं गाणारे, अधिक अभ्यास करू इच्छिणारे 10-12 विद्यार्थी एकत्र येऊन गाण्याचा अभ्यास करतात. अहोरात्र गातात. चर्चा करतात. छान सकारात्मक असतात. या वर्षीसुद्धा सगळे जमलो.. गायलो.. आणि पुढच्या बरोबर एक महिन्याच्या अंतराने हा फक्त 21 वर्षांचा मुलगा हे जगच सोडून गेला, स्वत:होऊन! का? कशामुळे? काय कमतरता वाटत होती स्वत:मध्ये? कोणाशी काहीच बोललं पाहिजे असं का नाही वाटलं? विचार करून करून मन आणि बुद्धी शिणून गेली. मी त्याच्या आईबाबांना अगदी जवळून ओळखते. आई, बाबा आणि अक्षय, आकांक्षा यांचं आपापसात असलेलं लेपवळपस अक्षयनेच तर मला कित्येक वेळा सांगितलं होतं. मी ते पाहिलं ही होतंच की.. आघाडीचे शास्त्रीय गायक निषाद बाक्रे यांच्याकडे तो गेली काही वर्षं गाणं शिकत होता. छान गायला लागला होता. तो आणि त्याचे बाबा निषाद बाक्रे यांनी शास्त्रीय गायनासाठी निर्माण केलेल्या ’सुरंजन’ या संस्थेचे महत्त्वाचे खांब होते. बाबांना भरपूर मदत! कोरोना काळात ऑनलाइन कार्यक्रम होत होते. विविध मैफिली, स्पर्धा, सेमिनार्स, उपक्रम.. सर्वत्र अक्षयचा संचार. आता प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाल्यावरही सतत सहभाग, स्वत: पुढे होऊन काम करणं, सगळं अगदी नीट चाललं होतं. अगदी 14 तारखेच्या रात्रीपर्यंत! 22 जुलैला ठरत असलेल्या एका शास्त्रीय कार्यक्रमाची जोरदार पूर्वतयारी चाललेली तर मला माहीतच होती. मित्रमंडळी रोज झूम मीटिंगवर आयोजन करत असत तासन्तास. नवीन बाइक घेतलेली, नवीन फ्लॅट ज्यामध्ये या वर्षी तो आणि त्याचे मित्र राहणार होते, किंबहुना राहायला गेलाच होता तो.. मित्रांबरोबर नवीन गाडीचे फोटो, घरातून नेलेल्या सामानाचे सगळे हसरे, उत्सवी फोटो..
 
 
एका रात्रीत, किंवा सकाळी केवळ तासा-दोन तासात मनोवृत्तीने इतका नकारात्मक वादळी झोका घेतला तरी कसा? काय घडलं? काय कारण? आणि मन मन म्हणतात ते इतकं भयावह पाऊल उचलायला असं कसं धैर्य देतं? तेच धैर्य, तेच मन ज्या गोष्टीत विलक्षण निराशा आहे त्याचं आशेत रूपांतर करण्याचं धैर्य का देत नाही? देत असेल अनेकांना नक्कीच.. पण त्यात अक्षय नव्हता, एवढं खरं. त्याचं पाऊल पुढेच पडलं.. जिथे निव्वळ आत्मघात होता.
 
 
आपले आई-बाबा, शिक्षक, जिवाला जीव देणारे मित्र यांचं काय होईल, हा विचार हे लोक करत नाहीत का? की तसे विचारच टाळतात? या विचाराने आपण पाऊल मागे घेऊ असं भय वाटतं का त्यांना? मरण्यापेक्षा जगणं इतकं अवघड असतं? खूप प्रश्न...सगळे अनुत्तरित!
 
 
घराघरात पालक-मुलांची भांडणं होतात, सगळे एकमेकांना अगदी जिव्हारी लागेल असं बोलतातही. पण काही वेळात किंवा काही दिवसांतच पुन्हा समेट आणि पुन्हा नव्या वादाची तयारी. पण या नात्याच्या मागे एक ऊबदार अस्तर असतं. नेहमी माहीत असतं की आपण सगळे एकमेकांसाठी आहोत. इथेही काहीच वेगळं नव्हतं. पण अक्षयच्या स्वभावाबद्दल, त्याच्या विचारसरणीबद्दल आता मात्र तो प्रश्न उभे करून गेला आहे. दिसायला गोड, वागणं गोड, मदतीला सतत तत्पर, गुणग्राहक, शास्त्रीय आणि चांगल्या संगीताची आवड असणारा, हुशार, लोभस असलेला हा मुलगा नेहमी सर्वांबद्दल चांगलं बोलायचा. इतरही सगळे अर्थातच त्याचं कौतुक करायचे. अगदी त्याचे आईवडीलसुद्धा. पण या वेड्या मुलाने स्वत:बद्दल बहुतेक काही स्वत:ची अपेक्षांची उंच किंवा त्याची म्हणून स्टँडर्ड्स निश्चित केली होती. त्यासाठी त्याने कधीच कुणाचाही सल्ला घेतलाच नसावा. वरकरणी आनंदी दिसणारा हा मुलगा अंतरंगात मात्र सदैव स्वत:साठी असमाधानी आणि दु:खी होता. तो स्वत:बद्दलचे प्रश्न, शंका बोलत नसे असं नाही. तो मोकळा आहे स्वभावाने असा माझा समज होत असतानाच तो तितकं मोकळं बोलत नाही असाही अनुभव काही वेळा येत असे. पण त्यात काय इतकं, असंही वाटायचं. त्याच्या अंतर्मनातला स्वत:बद्दलच्या असमाधानाचा प्रवाह इतका झंझावाती होता की त्याला जगणंही अशक्य वाटत होतं? हे कधीही कुणालाच कळलं नाही.. ना त्याच्या आई वडिलांना, ना जवळच्या माणसांना. खरंच, हा निर्णय आधीपासून घेतलेला होता की काही मिनिटांचा, हे अजूनही समजत नाहीये.
 
 
पण जेव्हा अशी कोवळ्या वयातील मुलं या जगाचा स्वत:होऊन निरोप घेतात, तेव्हा समाज पहिलं बोट दाखवतो जन्मदात्यांकडे.. इथेही तसंच झालं. पण त्यात काहीही तथ्य नाही, हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. त्याच्या आईवडिलांनी त्याला निगुतीने वाढवलं तर होतंच, त्याचबरोबर ते त्याला वारंवार सांगत असत की, ‘’तुला जे आवडतं ते कर. तू आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहेस. तुझं गाणं आम्हाला खूप आवडतं, आनंद देतं... त्यातही तू चांगलं यश मिळवू शकतोस.” बाबांबरोबर त्याने काही इंजीनियरिंग प्रोजेक्ट्सही केले होते, त्यातही त्याने आपला बौद्धिक कस व्यवस्थित दाखवला होता. हे सगळं त्याच्या आईबाबांशी प्रत्यक्ष बोलण्यातून कळलेलं..
 
 
 
एखादा युवक असा जेव्हा आत्मघात करतो, तेव्हा समाज चटकन पालकांकडे बोट दाखवतो. प्रश्नाचं उत्तर म्हणून ते सोपंही असतं. अक्षयने आत्मघात करण्यापूर्वी जे लिहून ठेवलं, ते पत्र जगासमोर आलं आणि जगाला आईवडिलांना ब्लेम करणं अधिक सोपं गेलं. 21 वर्षाच्या त्या मुलाने, अज्ञात मनोवस्थेत लिहिलेलं ते पत्र! एकतर इतकं फक्त त्याच्या कुटुंबापुरतं मर्यादित असलेलं ते पत्र त्याने नेमकं काय केलं आहे हे कळायच्या आत असं इतकं व्हायरल होऊ कसं शकतं? कोण करतं हे? आपली सिस्टिम इतकी कशी असंवेदनशील आहे? आणखी एक गोष्ट.. त्याच्या नात्यातली प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे केतकी माटेगावकर! ज्या क्षणी अक्षयबद्दलची दुर्घटना घडली, ती कळताच केतकीशी जोडून त्याच्याबद्दलची बातमी अनेक माध्यमांतून मीडियावर प्रसिद्ध झाली, व्हायरल झाली.. तिला स्वत:लासुद्धा आपला चुलत भाऊ अक्षय या जगात नाही हे त्यानंतर कितीतरी उशिरा कळलं, कारण ती इथे नव्हतीच!
 
 
 
मीडियावर ऐकू येणारे काही आवाज, त्यांची अशुद्ध आणि उग्र भाषा, त्यांचा टोन हे सगळंच इतकं दुर्दैवी आणि क्लेशदायक असतं की ही माणसं एकतर भावनाशून्य तरी आहेत किंवा अमरत्व घेऊन जन्माला आली आहेत असं वाटावं..
 
 
आधी माहीत होतंच, पण अगदी अलीकडेच त्याच्या सहवासात काही दिवस राहिल्याने त्याला कुठलंही व्यसन नाही, हेही नक्की माहीत होतं!
 
 
असे मृत्यू होतात, तेव्हा अर्थातच आपलं जीवन मौल्यवान न वाटणार्‍या, ते असं उधळू देणार्‍या मुलांबद्दल खूप राग दाटून येतो.अक्षयला कल्पनाही नाही की आपल्या पालकांचा जसा तो अभिमान होता, तसाच आपल्या समाजाचाही! त्याने जे हे आत्मघातकी, मूर्ख पाऊल उचललं आहे, त्यामुळे उद्याचा समाज एका चांगल्या माणसाला, एका चांगल्या कलावंताला मुकला आहे.
 
 
आपल्या समाजात साधारणपणे मुलगे किंवा पुरुष यांचं आत्महत्येचं प्रमाण मुली किंवा स्त्रिया यांच्यापेक्षा जास्त असतं. स्त्रिया अधिक खोलवर मन मोकळं करतात का? मनातलं सांगायला त्यांना अधिक जागा असतात की ती त्यांची प्रवृत्तीच असते? किंवा या विशिष्ट संदर्भातला त्यांचा इगो कमी असतो? मुलगे किंवा पुरुष आपल्यातल्या कमतरता, असमाधान, दु:ख सांगतच नाहीत, कारण त्यांना त्यात कमीपणा वाटतो, आपण हे ारपरसश करू शकू असं वाटतं की आपल्याला लोक हसतील असं वाटतं?
लोक आणि समाज हाही विषय महत्त्वाचा आहेच की.. म्हणजे आपण! जीवन अमूल्य आहे आणि ते जरी संघर्षानी भरलेलं असलं, तरीही सुंदर आहे, हे पुस्तकी वाक्य आपण अनेक वेळा फेकतो; पण छोट्या छोट्या गोष्टींतून समोरच्याला तुझं जीवन काही फार चांगलं नाही चाललेलं बाबा, असे संकेतही देतो का? रूढ कल्पनेच्या बाहेरची एखाद्याची वागणूक आपण रद्दबातल करतो का? एका विशिष्ट चौकोनी जगण्याला आपण जास्त उचलून धरतो का? काही नवीन, वेगळं, समाजाला चाकोरीबाहेरचं वाटेल असं वागणार्‍या व्यक्तीला आपण दावणीला बांधून रूढ मार्गावर आणण्याची सक्ती तर करत नाही ना?.. काही वेगळे लोक बेदरकार असतात, काहींचा स्वत:च्या वेगळेपणावर विश्वास असतो.. पण काही जण गोंधळलेले असू शकतात.
 
 
 
त्यांना समजून घेण्याची जबाबदारी आपली असायला हवी. जेव्हा असा प्रसंग घडतो, तेव्हा सगळ्यात आधी समाजव्यवस्थेच्या मनाला लागायला हवं. मीडियाच्या मनाला लागायला हवं. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला, पोलिसांना, न्यायव्यवस्थेला आणि तत्पर मीडियालासुद्धा असा प्रसंग पुन्हा न घडण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याचा सतत ध्यास वाटायला हवा. ज्या तत्परतेने पत्र व्हायरल केलं, तीच तत्परता आता समाजात अशी एकही घटना घडणार नाही यासाठीसुद्धा सर्व समाजव्यवस्थांनी कटिबद्ध व्हायला हवं.
 
 
 
अक्षय काय किंवा कोणीही अशी व्यक्ती काय, त्यांचे स्वभाव, त्यांचं विश्व, त्यांचे वेदनेचे विषय सगळं नक्कीच वेगळं असणार.. पण त्यासाठी उचललं जाणारं पाऊल हे असंच भयकारी असणार..त्याआधीच त्या व्यक्तीला योग्य समुपदेशन करून वाचवायला हवं! त्यासाठी दक्ष राहायला हवं. त्यांचं मन वाचत राहायला हवं. त्यांच्या कल्पनांना दिशा देणारी, त्यांची मन:शक्ती, मनोबल वाढवणार्‍या अनेक मोहिमा सुरू व्हायला हव्यात. आपण सर्वांनी आणि समाजातील सर्व व्यवस्थांनी, विशेषत: मीडियाने नकाराने भरलेलं, सतत गॉसिप करून लोकांचा गोंधळ उडवणारं आपलं रूप बदलून आपल्याच मुलांचं, भावी पिढीचं भलं करण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी.
 
 
अक्षय आम्हाला कळला नाही. खरं तर हीच मोठी शोकांतिका आहे. आम्ही हरलो अक्षय बाळा...