कुठल्या थोर पुरुषाचे नाव घेतले असता लोकांना आनंद वाटेल हे ते जाणून असतात. म्हणून त्यांच्या मुखात कधी बाळासाहेब ठाकरे येतील, तर कधी बाबसाहेब आंबेडकर येतील, कधी महात्मा फुले येतील, तर कधी छत्रपती शिवाजी महाराज येतील. वारंवार पक्षबदल करून आपण या महापुरूषांनी घालून दिलेल्या आदर्शांना पायदळी तुडवीत आहोत, असे चुकूनही त्यांना वाटत नाही. परंतु आपल्यालाही वाटू नये असे थोडेच आहे. म्हणून मतदारांनी या प्रकारे राजकीय टुरिझम करणार्या नेत्यांना डोक्यावर घ्यायचे की आणखी कुठे ठेवायचे, याचा विचार केला पाहिजे.
कोणी कोणत्या पक्षात सामील व्हावे, हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न असला तरी एक पक्ष सोडून जेव्हा एखादा राजकारणी दुसर्या पक्षात जातो तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न निर्माण होतो की, इतकी वर्षे ज्या पक्षात काम केले आणि ज्या विचारांची बांधिलकी स्वीकारली, त्या विचारांचे काय झाले? आणि दुसरा प्रश्न निर्माण होतो की, पक्षनिष्ठा, सिद्धांतनिष्ठा याचे काय होते? असे पक्षांतर करणारे नेते यशस्वी राजकारणी होतात का? जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते का?
यातील काही प्रश्नांची उत्तरे फार सोपी आहेत आणि काही प्रश्नांची उत्तरे फार अवघड आहेत. दुय्यम आणि तिय्यम दर्जाचे राजकारणी व्यक्तीगत महत्त्वाकांक्षेसाठी राजकारण करतात. त्यांच्या दृष्टीने राजकारण म्हणजे नगरसेवकपद, आमदारकी, खासदारकी मिळविणे आणि जमल्यास मंत्रीपद मिळविणे. हे मिळण्याची शक्यता ज्या पक्षात असेल, त्या पक्षाचे कुंकू कपळाला लावायचे.
असे राजकारणी भाषण ठोकत असतात. आपण पक्ष बदलला म्हणजे जनसेवेचे व्रत सोडले नाही हे ते सांगणार. तो जर कुठल्या विचारधारेच्या पक्षात असेल तर तो हे सांगणार की मी पक्षाचा विचार सोडला नाही. आंबेडकरी चळवळीतील असेल तर तो सांगणार, मी चळवळीचा विचार सोडला नाही, मी आंबेडकरवादी आहे, मरेपर्यंत आंबेडकरवादी विचार सोडणार नाही. मी शिवसेनेत गेलो काय की काँग्रेसमध्ये गेलो काय, माझा विचार संपत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा कुणी भाजपात गेला की तोदेखील हेच सांगणार की मी सर्वधर्मसमभावी आहे. हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांचा आहे, भटा-ब्राह्मणांचा नाही, हा विचार मी सोडलेला नाही. तो फक्त एवढेच बोलत नाही की मी पक्षनिष्ठा सोडली आहे आणि पदनिष्ठेला जवळ केले आहे. मला राजकारणात टिकून राहायचे आहे आणि राजकारणात टिकून राहण्यासाठी पदाची माळ गळ्यात असणे आवश्यक आहे.
सुषमा आंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याक्षणी सोशल मिडियावर जाहीर सभेतून सुषमा आंधारे यांनी घणाघाती भाषणे करून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची कशी खिल्ली उडविली होती, याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे व्हिडिओ व्हायरल करणारे ठार अज्ञानी दिसतात. त्यांना राजकारणातील काही समजत नाही. अशा राजकीय नेत्यांचा एक सिद्धांत असतो, मी काल काय बोललो याला काही महत्त्व नाही. काल हा भूतकाळ झाला, आज वर्तमान काळ आहे, म्हणून मी आज काय बोलतो हे महत्त्वाचे, हे प्रमाण मानले पाहिजे.
तशी ही सगळी मंडळी भाषणाने पुरोगामी असतात. पुरोगामी नेत्यांचा एक आवडीचा सिद्धांत आहे. ते म्हणतात की, सुसंगत वागणे हा गाढवाचा गुण आहे. गाढव काल जसा वागला तसा आज वागणार, तसाच तो उद्या वागणार आणि आम्ही गाढव नसल्यामुळे आम्ही काल काय बोललो, कोणाला निष्ठा अर्पण केल्या, कुणाला शिव्या घातल्या, याला काही महत्त्व नाही. ही गोष्ट व्हिडिओ व्हायरल करणार्यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही. ‘ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी’ ही म्हण सर्वांना माहीत असेल, त्यामुळे जो आज आपला मायबाप आहे, त्याच्या स्तुतीची भाषणे करणे आवश्यक ठरणार आहे. खालेल्या पोळीचे ऋण फेडावे लागते.
काहीवेळेला पक्षात बंड करणे अपरिहार्य होते. पक्षाचे दोन तुकडे करणे ही काळाची गरज होते. जेव्हा पक्षात साचलेपण येते, प्रस्थापित मंडळी कोणताही बदल करायला तयार नसतात, सिद्धांताला पायाशी तुडवून तडजोडी करतात तेव्हा पक्ष वाचविण्यासाठी आणि विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी पक्ष सोडावा लागतो. या प्रकारचे पक्षबदल हे स्वार्थामुळे झालेले नसतात, तर त्यामागे काही ना काही सैद्धांतिक भूमिका असते. व्यक्तीगत पक्षांतर आणि सामूहिक पक्षांतर यातील हा मूलभूत फरक आहे.
आता थोडे गंभीर होऊया. म्हणजे, लोकशाही आणि राजकीय पक्ष यांचा विचार करूया. लोकशाही राजवट राजकीय पक्षांशिवाय चालू शकत नाही. राजेशाही आणि एकपक्षीय हुकूमशाही यांना राजकीय पक्षांची आवश्यकता नसते. लोकशाही राजवटीचे दोन प्रकार आहेत. 1. संसदीय पद्धत आणि 2.अध्यक्षीय पद्धत. या दोन्ही राज्यपद्धतीत राजकीय पक्ष अनिर्वाय असतात.
निकोप लोकशाहीसाठी राजकीय पक्ष विचारधारेवर उभे असावे लागतात. सर्वांची एक समान विचारभूमिका असावी लागते. समान विचारभूमिकेचे मुद्दे आहेत, 1. संविधाननिष्ठा 2. राष्ट्रनिष्ठा 3. जननिष्ठा. या तीन मुद्द्यांवर कुठल्याही राजकीय पक्षाची तडजोड असता कामा नये. राजकीय पक्षांची विचारसरणी प्रामुख्याने आर्थिक कार्यक्रमावर आधारित असावी लागते. सत्तेवर आल्यानंतर आपण काय करणार आहोत, याचे स्पष्ट चित्र राजकीय पक्षांपुढे असावे लागते. हे आर्थिक कार्यक्रम पक्षाच्या सैद्धांतिक भूमिकेतून निर्माण होतात. म्हणून पक्षाची सैद्धांतिक भूमिकादेखील पक्की आणि स्वतंत्र असावी लागते.
पक्षाची उभारणी निष्ठांवत कार्यकर्त्यांच्या आधारावर करावी लागते. कार्यकर्त्यांचे सतत प्रशिक्षण घ्यावे लागते. चोवीस तास पक्षाचे काम करणारे पूर्णवेळ कार्यकर्ते उभे करावे लागतात. पक्ष संघटनेच्या माध्यमातून जनसंवाद सातत्याने करावे लागते. ज्याप्रमाणे लोकशाही राजवटीला वर दिलेल्या गुणवत्तेचे पक्ष लागतात त्याप्रमाणे पुढारी किंवा राजनेते लागतात. सामान्य माणूस, सामान्य कार्यकर्ता आणि नेता यांच्यामध्ये हा फार मोठा फरक असतो.
नेता हा जहाजाच्या कप्तानाचे काम करतो. वादळ-वार्यातून पक्षाचे तारू तो सुखरूप किनार्याला घेऊन जातो. निवडणुकींच्या काळात कोणती भूमिका घ्यावी, जनतेपुढे कोणते विषय मांडावेत, अन्य पक्षांशी गठबंधन करायचे असेल तर ते कोणत्या मुद्यांवर करावे, याचे निर्णय असे नेते करीत असतात. चांगले नेते समाजाला दिशा देण्याचे काम करीत असतात. लोकशाही राज्यव्यवस्था यशस्वी व्हायची असेल तर लोकशाहीतील राजनेत्यांकडे 1. सचोटी 2. प्रामाणिकपणा 3. सिद्धांतनिष्ठा 4. पक्षनिष्ठा 5. निर्णयक्षमता 6. विचार योग्य शब्दात मांडण्याची क्षमता, असे गुण असावे लागतात. ते सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडे अनिवार्यपणे असावे लागतात. संसदीय लोकशाही असो की अध्यक्षीय लोकशाही असो, या व्यवस्थेत एकाच पक्षाची राजवट बसत नाही. म्हणून आपल्यासारख्या सामान्य माणसांनी सगळ्या पक्षनेतृत्वाकडे या भूमिकेतून बघितले पाहिजे.
आपल्या व्यक्तीगत महत्त्वाकांक्षेसाठी पक्षबदलाचा राजकीय टुरिझम करणारे नेते जनतेचे कोणतेही भले करू शकत नाहीत. तो त्यांचा हेतूदेखील नसतो. स्वतःचे भले करणे, स्वतःचे स्थान निश्चित करणे हेच त्यांचे लक्ष्य असते. ते आपल्या घणाघाती भाषणांनी ऐकणार्या श्रोत्यांचे मनोरंजन भरपूर करतील, पण प्रबोधन शून्य करतील. तेव्हा मनोरंजनासाठी त्यांची भाषणे ऐकायला जरूर गेले पाहिजे, गर्दीही केली पाहिजे, टाळ्याही वाजविल्या पाहिजेत. परंतु असले राजकीय टुरिझम करणारे नेते आपल्या काही उपयोगाचे नाहीत, हे लक्षात ठेवायला पाहिजे.
असे नेते फार चतुर असतात. कुठल्या थोर पुरुषाचे नाव घेतले असता लोकांना आनंद वाटेल हे ते जाणून असतात. म्हणून त्यांच्या मुखात कधी बाळासाहेब ठाकरे येतील, तर कधी बाबसाहेब आंबेडकर येतील, कधी महात्मा फुले येतील, तर कधी छत्रपती शिवाजी महाराज येतील. वारंवार पक्षबदल करून आपण या महापुरूषांनी घालून दिलेल्या आदर्शांना पायदळी तुडवीत आहोत, असे चुकूनही त्यांना वाटत नाही. परंतु आपल्यालाही वाटू नये असे थोडेच आहे. म्हणून मतदारांनी या प्रकारे राजकीय टुरिझम करणार्या नेत्यांना डोक्यावर घ्यायचे की आणखी कुठे ठेवायचे, याचा विचार केला पाहिजे.