सर्वार्थाने प्रेरणादायक निवड

विवेक मराठी    21-Jul-2022   
Total Views |

भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतिपदाचे महत्त्व केवळ त्या जनजाती वनवासी समाजातून येतात, एवढ्यापुरते मर्यादित नाही. मुर्मू या भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला लाभलेल्या पहिल्या वनवासी राष्ट्रपती आहेत. थोडक्यात, वनवासी समाजातून देशाचे सर्वोच्च पद भूषवण्यास 75 वर्षे जावी लागली, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि आज एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येत द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतिपदी विराजमान होणे हा राष्ट्रीय एकात्मतेचा व अंत्योदयाचा खूप मोठा संदेशदेखील आहे.

bjp
 
स्पष्ट उद्दिष्ट व त्यास अनुसरून अचूक नियोजन करत लढाईत उतरणारा विरुद्ध कोणतेही उद्दिष्ट नसलेला, केवळ लढावे लागते आहे म्हणून नाइलाजाने लढाईत उतरणारा, अशांच्या लढाईत कोण बाजी मारणार, हे लढाईपूर्वीच स्पष्ट झालेले असते. लढाई ही केवळ औपचारिकता असते. राष्ट्रपती निवडणूक हे याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. केंद्रासह निम्म्याहून अधिक राज्यांत सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष, त्याचे सहकारी पक्ष, या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि यांच्याविरोधातील काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष, या विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यातील लढाई कधी तुल्यबळ नव्हतीच. नाही म्हणायला त्यातल्या त्यात विरोधकांना आपली एकजूट दाखवण्याची, आम्ही संख्येने कमी असलो तरी लढा देऊ शकतो, हा संदेश देण्याची थोडीफार संधी या निवडणुकीने दिली होती. परंतु गेल्या काही वर्षांच्या सवयीला अनुसरून विरोधकांनी ही संधीदेखील गमावली आणि अपेक्षेप्रमाणे या राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला.
 
 
भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतिपदाचे महत्त्व केवळ त्या जनजाती वनवासी समाजातून येतात, एवढ्यापुरते मर्यादित नाही. मुर्मू या भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला लाभलेल्या पहिल्या वनवासी राष्ट्रपती आहेत. थोडक्यात, वनवासी समाजातून देशाचे सर्वोच्च पद भूषवण्यास 75 वर्षे जावी लागली, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि आज एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येत द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतिपदी विराजमान होणे हा राष्ट्रीय एकात्मतेचा व अंत्योदयाचा खूप मोठा संदेशदेखील आहे. त्यामुळे सर्वप्रथम हा संदेश देणार्‍या भारतीय जनता पक्षाचे व या पक्षाच्या नेतृत्वाचे अभिनंदन करायला हवे. राष्ट्रपतीची निवड ही आपल्या कुणा स्पर्धकाला दूर करण्यासाठी, सक्रिय राजकारणातून हटवण्यासाठी वा कुणाचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी, कुणाचे समाधान करण्यासाठी नाही, तर ’राष्ट्र प्रथम’ हे तत्त्व अधिकाधिक रुजवण्यासाठी आहे, हे भाजपाने या निवडणुकीतून पुन्हा एकदा दाखवून दिले. त्यामुळेच 2017 व 2022 अशा दोन्ही निवडणुकांतील संभाव्य उमेदवारांबाबतचे अंदाज, कथित ’मेनस्ट्रीम’ माध्यमांची विविध नावांबाबतची पतंगबाजी पुन्हा एकदा फसल्याचे दिसून आले.
 
 
 
2017मध्येही अशाच प्रकारे रालोआचा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार कोण असणार, यावरून भरपूर अंदाज-आडाखे बांधले गेले होते. मात्र या सर्वांना धक्का देत भाजपाने रामनाथ कोविंद यांचे नाव घोषित केले. दलित समाजातून पुढे आलेले नेतृत्व ही जशी कोविंद यांची ओळख होती, त्याचप्रमाणे कायदा व सामाजिक क्षेत्रातील काम हेदेखील त्यांच्या कारकिर्दीचे ठळक वैशिष्ट्य होते. देशाचा प्रथम नागरिक कसा असावा, याचा एक आदर्श मापदंडच कोविंद यांनी गेल्या पाच वर्षांत प्रस्थापित केला. त्यानंतर पुन्हा एकदा भाजपाने धक्कातंत्र वापरत, सर्व अंदाज खोटे ठरवत द्रौपदी मुर्मू यांचे नाव घोषित केले. कोविंद यांच्याप्रमाणेच मुर्मू यांचीही ओळख जितकी त्यांच्या समाजामुळे आहे, तितकीच स्वकर्तृत्वामुळेही आहे. मुर्मू यांचा वैयक्तिक जीवनातील संघर्ष देशातील शेवटच्या स्तरातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे. त्याचप्रमाणे त्यांचे राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यही महत्त्वाचे आहे. त्यामुळेच मुर्मू यांची राष्ट्रपतिपदी झालेली निवड सर्वार्थाने महत्वाची ठरते.
 
 
 
वर उल्लेखल्याप्रमाणे, संख्याबळाच्या दृष्टीने ही लढाई विषम होतीच, परंतु त्यातही आपले अस्तित्व दाखवण्याची संधी विरोधकांकडे होती. मात्र ’मोदीविरोध’ हे एकच तत्त्व मानणार्‍या काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना याही निवडणुकीत हा एकच मुद्दा अजेंड्यावर घेता आला. उमेदवार निवडीतही त्याचेच प्रतिबिंब जाणवले. यशवंत सिन्हा यांच्या कर्तृत्वाविषयी, अनुभवाविषयी शंका घेण्याचे अर्थातच काही कारण नाही. परंतु गेल्या काही वर्षांत केवळ मोदींच्या दुस्वासातून त्यांनी ज्या प्रकारे पावले उचलली, ज्या प्रकारे बेताल विधाने केली, ती त्यांच्या आधीच्या कारकिर्दीला साजेशी नव्हती. परंतु त्यांच्या आधीच्या कारकिर्दीपेक्षा गेल्या 7-8 वर्षांतील कामगिरीच विरोधी पक्षांना महत्त्वाची वाटली असावी. मोदीविरोध आणि भाजपाविरोध या कथित संयुक्त विरोधी आघाडीमध्ये इतका भिनला आहे की या विरोधापायी त्यांना उमेदवारही भाजपाकडून आयात केलेला निवडावा लागला. काँग्रेससारख्या स्वत:ला राष्ट्रीय पक्ष म्हणवणार्‍या आणि स्वत:च्या शंभर-सव्वाशे वर्षांच्या इतिहासाची टिमकी वाजवणार्‍या पक्षाला राष्ट्रपतिपदासाठी योग्य असा एकही उमेदवार मिळाला नाही. कोणाचा तरी विरोध करण्याचा एकमेव अजेंडा हाती घेऊन काम करणारी व्यक्ती देशाचा प्रथम नागरिक होऊ शकत नाही. त्या देशासाठीदेखील असे होणे हितावह नसते. परंतु ही बाबदेखील लक्षात न येणारे विरोधी पक्ष आज इतकी पडझड होऊनही अद्याप कोणत्या विश्वात वावरत आहेत, हे या निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केले.
 
 
 
 
अशा रितीने द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशाला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 15व्या राष्ट्रपती लाभल्या आहेत. मुर्मू यांची संघर्षाने व कर्तृत्वाने उजळलेली गेल्या तीस-पस्तीस वर्षांची कारकिर्द राष्ट्रपती म्हणून आणखी उजळावी व त्यातून देशातील शेवटच्या स्तरातील प्रत्येक घटकास ऊर्जा मिळावी, ही साप्ताहिक विवेक परिवाराच्या वतीने शुभेच्छा!