बैल गेला नि झोपा केला..

विवेक मराठी    15-Jul-2022   
Total Views |
द्रौपदी मुर्मू या जनजाती सामाजाच्या आहेत म्हणून त्यांना पाठिंबा देत आहोत अशी त्यांनी कितीही भलामण केली, तरी हा निर्णय म्हणजे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न आहे, हे कोणत्याही सुज्ञ नागरिकाला समजेल. मात्र प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ती वेळ साधता यायला लागते. शिवसेनेची झालेली वाताहत थांबवण्याची वेळ उलटून गेली आहे. उठाव करणार्‍या आपल्याच लोकांची बाजू समजून घेण्याऐवजी, त्यांच्या जिव्हारी लागेल अशा वल्गना करत त्यांना पक्षापासून आणखी दूर लोटण्याचे काम त्यांनी त्या वेळी केले. पक्षाऐवजी स्वत:च्या खुर्चीत आणि दोन सेक्युलर पक्षांच्या प्रेमात त्यांची विचारशक्ती हरपली होती. आता मुर्मूंना दिलेेल्या पाठिंब्यामुळे पक्षासाठी फार काही आश्वासक घडेल असे नाही. वेळ गेल्यावर सुचलेल्या शहाणपणाची बाजारात काही किंमत नसते.
 
shivsena
 
आधी पक्षाच्या 40 आमदारांनी केलेल्या उठावामुळे महाविकास आघाडीला भगदाड पडले. मुख्यमंत्रिपद गेले आणि पक्षाच्या वाताहतीलाही मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. त्यानंतर, दिल्लीतल्या 18 खासदारांपैकी जवळजवळ डझनभर खासदारांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे निमित्त साधत बंडाचे निशाण उभारले. या खासदारांनी भाजपाप्रणीत रालोआच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या खासदारांना अशी मागणी करण्याचे बळ एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे मिळाले, हे निश्चित! पण या उठावाला गांभीर्याने घेण्याऐवजी तो करणार्‍यांची संभावना केली गेली. मात्र जेव्हा उद्धव ठाकरे यांना सोडून जाणार्‍या आमदारांची, नगरसेवकांची, सर्वसामान्य शिवसैनिकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली, पक्षाचे चिन्हही गमावण्याची शक्यता दिसू लागली, तेव्हा कुठे पक्षप्रमुखांना जाग आली. त्यानंतर त्यांनी खासदारांची मागणी मान्य करत द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला. या निर्णयामुळे गेल्या अडीच वर्षांत झालेल्या वैचारिक अधोगतीला (की अध:पतनाला?) रोखता येईल का? त्याने खरोखरच पक्षप्रतिमा सुधारायला मदत होईल का? की हे म्हणजे, बैल गेला नि झोपा केला ठरेल?
हेकेखोर आणि सत्तेच्या राजकारणात अननुभवी असलेले नेतृत्व जेव्हा चुकीचे सल्ले देणार्‍या चांडाळचौकटीच्या अधीन होते, तेव्हा पक्षाची कशी धूळधाण होते याचे उदाहरण म्हणजे शिवसेनेचा गेल्या अडीच वर्षांतला प्रवास होय. दिशाभूल करणारे पक्षातील सल्लागार-सहकारी आणि पक्षाच्या मूळ ध्येयधोरणाशी विसंगत असलेल्या अन्य राजकीय पक्षांशी सत्तेच्या लोभापायी केलेला अविचारी संग, हे दोन प्रमुख घटक याला कारणीभूत आहेत. बेगडी सेक्युलॅरिझमचे तुणतुणे वाजवण्यात ज्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने धन्यता मानली, अशांशी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाने आघाडी केली. ती पूर्णत: अनैसर्गिक तर होतीच, शिवाय ती तोवरच्या सहकारी पक्षाचा विश्वासघात करणारी होती. विश्वासघात जसा सहकारी पक्षाचा होता, तसा दीर्घकाळ शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या अनेक सहकार्‍यांचाही होता. नेतृत्वाच्या या निर्णयाने एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते नाराज होते. युतीतील सहकारी पक्ष, पक्षातील सहकारी यांच्याइतकाच हा मतदारांचाही विश्वासघात होता. पण यापैकी काहीही समजून घेण्याची उद्धव ठाकरेंची मानसिकता नव्हती. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ या उक्तीप्रमाणे त्यांचा सगळा व्यवहार होता. केवळ मुख्यमंत्रिपदी बसवले म्हणजे हाती सत्तेची सूत्रे येत नाहीत, हेही महाविकास आघाडीतील दोन्ही घटक पक्षांनी विविध प्रकारे दाखवून दिले. मुख्यमंत्रिपदाचे गाजर देऊन सिल्व्हर ओक सत्ताकेंद्र झाले. अगदी खातेवाटप, निधींचे वाटप यातही स्वत:च्या पक्षाशी सवतासुभा केला गेला, तरीही डोळ्यांवर बांधलेली पट्टी उतरवायला काही उद्धव ठाकरे तयार नव्हते. भोवतीचे कोंडाळे आधीच त्यांना निष्ठावंतांपासून दूर ठेवत होते, त्यात भर पडली ती कोविडची, त्यांच्या प्रकृतिअस्वास्थ्याची. यातून दुरावा, पक्षातील अस्वस्थता वाढत गेली, तेव्हा सर्वार्थाने बधीर झालेल्या नेतृत्वाला जागे करण्यासाठी सर्व प्रकारचा धोका, जोखीम पत्करून उठाव करणे इतकाच पर्याय बाळासाहेबांच्या निष्ठावंतांपाशी उरला.
एका वेळेस चाळीस जणांनी उठाव करणे ही पक्षाच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा आहे इतकीही विचारशक्ती उरलेली नसलेल्या उद्धव ठाकरे यांनी त्यानंतरही भावनिक आवाहनासारख्या भंपकबाजीत वेळ घालवला. यातून काही डागडुजी होण्याऐवजी त्यांच्या नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब झाले. तरीही उद्धव ठाकरे यांच्याभोवतीचा बदसल्लागारांचा वेढा उठण्याची चिन्हे नव्हती.
मात्र जेव्हा शिवसेनेचे निवडून आलेले 18 खासदार (मोदीलाटेच्या कृपेने आलेले) पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशी शक्यता निर्माण झाली, तेव्हा मातोश्रीवरून बैठकीसाठी बोलावणे आले. या बैठकीत खासदारांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रालोआच्या द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी मागणी केली. संजय राऊतांनी त्यालाही विरोध केला, तेव्हा बहुधा प्रथमच उद्धव ठाकरेंना आपल्या नेतेपदाची जाणीव झाली आणि त्यांनी राऊतांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. भगदाड कसले, आभाळ फाटल्याची जाणीव झाल्यावरची पश्चातबुद्धी होती ही. मात्र ते करताना, ‘कोणत्याही दबावामुळे हा निर्णय घेतलेला नाही’ हे साळसूदपणे सांगायला ते विसरले नाहीत. राऊतांनीही मग कोलांट उडी मारत, ‘हा पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा नाही’ असे सांगत नसलेली पत सावरायचा केविलवाणा प्रयत्न केला.
द्रौपदी मुर्मू या जनजाती सामाजाच्या आहेत म्हणून त्यांना पाठिंबा देत आहोत अशी त्यांनी कितीही भलामण केली, तरी हा निर्णय म्हणजे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न आहे, हे कोणत्याही सुज्ञ नागरिकाला समजेल. मात्र प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ती वेळ साधता यायला लागते. शिवसेनेची झालेली वाताहत थांबवण्याची वेळ उलटून गेली आहे. उठाव करणार्‍या आपल्याच लोकांची बाजू समजून घेण्याऐवजी, त्यांच्या जिव्हारी लागेल अशा वल्गना करत त्यांना पक्षापासून आणखी दूर लोटण्याचे काम त्यांनी त्या वेळी केले. पक्षाऐवजी स्वत:च्या खुर्चीत आणि दोन सेक्युलर पक्षांच्या प्रेमात त्यांची विचारशक्ती हरपली होती. आता मुर्मूंना दिलेेल्या पाठिंब्यामुळे पक्षासाठी फार काही आश्वासक घडेल असे नाही. वेळ गेल्यावर सुचलेल्या शहाणपणाची बाजारात काही किंमत नसते.