वर्तमानाला भविष्यकालीन वळण देणारे ऐतिहासिक भाषण

विवेक मराठी    04-Jun-2022   
Total Views |
 प्रसारमाध्यमांनी या भाषणातील ज्ञानवापी मशिदीचा विषय ठळक बातमीचा करून त्यावर उलटसुलट चर्चा आरंभिल्या. हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना त्यांचा व्यवसाय करू द्यावा, परंतु कोणत्याही ऐतिहासिक भाषणाचा असा तुकड्या तुकड्यात विचार करता येत नाही. ज्ञानवापी मशिदीचा विषय मध्येच अधांतरी आलेला नाही, त्यामागे विचारांचे एक भक्कम सूत्र आहे. ते समजल्याशिवाय सरसंघचालकांना कोणता संदेश द्यायचा आहे, हे समजणार नाही.
 
RSS
 
सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे दोन जूनला तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोपाचे भाषण झाले. तृतीय वर्षातील समारोपाचे सरसंघचालकांचे भाषण ही संघाची एक प्रथा आहे. रेशीमबाग संघस्थानावर पहिल्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गात आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचे समारोपाचे भाषण झाले. ते त्यांचे शेवटचे भाषण होते. हे भाषण संघकार्याचे आत्मतत्त्व हृदयाच्या बोलातून व्यक्त होणारे होते. ते शब्दातित भाषण आहे. याच भाषणातील संघाचे आत्मतत्त्व व्यक्त होणारे मोहनजींचे भाषण आहे.
 
 
या भाषणाचे वर्णन दोन इंग्रजी शब्दात करायचे तर हे भाषण ‘मास्टर स्ट्रोक’ आहे. मास्टर स्ट्रोकचा मराठी अनुवाद ‘श्रेष्ठ प्राविण्य दर्शविणारे’ या शब्दात केला जातो. प्रसारमाध्यमांनी या भाषणातील ज्ञानवापी मशिदीचा विषय ठळक बातमीचा करून त्यावर उलटसुलट चर्चा आरंभिल्या. हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना त्यांचा व्यवसाय करू द्यावा, परंतु कोणत्याही ऐतिहासिक भाषणाचा असा तुकड्या तुकड्यात विचार करता येत नाही. ज्ञानवापी मशिदीचा विषय मध्येच अधांतरी आलेला नाही, त्यामागे विचारांचे एक भक्कम सूत्र आहे. ते समजल्याशिवाय सरसंघचालकांना कोणता संदेश द्यायचा आहे, हे समजणार नाही.
 
 
मोहनजींच्या भाषणाचे चार भाग होतात. प्रास्ताविकात त्यांनी कोरोना काळाचा उल्लेख करून दोन वर्षे संघशिक्षा वर्ग झाले नाहीत, याचा अर्थ संघकार्य बंद होते असे नाही. कार्यक्रमाचे स्वरूप बदलले आणि कोरोनाचा प्रतिबंध करणे हा प्रमुख कार्यक्रम झाला. त्यातही स्वयंसेवकांचे प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणाचा हेतू ‘राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्याची योग्यता’ प्राप्त करण्याचा होता. संघकार्य कशासाठी चालते, हे अगदी थोडक्या शब्दांत मोहनजींनी मांडले. ‘विश्वविजेता बनण्याची भारताची आकांक्षा नाही, आम्हाला कुणाला जिंकायचे नसून जोडायचे आहे. सर्वांना जोडण्यासाठीच भारत जिवीत आहे. हाच आमचा ‘स्व’आहे. हे विश्व म्हणजे एकमेव शाश्वत, अद्वितीय सत्याचा अविष्कार आहे. विश्वात विविधता आहे, पण भेद नाहीत. आपलेपणाच्या भावनेने सर्वांना जोडायचे आहे. सत्य, करूणा, सुचिता, तपस हे धर्माचे चार पाय आहेत. त्या आधारावर आमचे राष्ट्र बनले. ही मूल्ये प्रत्यक्ष आपल्या जीवनात जगावी लागतात आणि स्वतःच्या आचरणातून मानवांना शिक्षण द्यावे लागते. सर्वांना बरोबर घेऊन चालणे हा हिंदू धर्म आहे, तोच मानवधर्म आणि विश्वधर्म आहे.
 
 
आमचे राष्ट्र ॠषींच्या तपाने उभे राहिले आहे. मोहनजींनी आपल्या भाषणात एका ऋचेचा उल्लेख केला. ‘ओम भ्रद्रमिच्छन्त ऋषय: सर्विदस्तपोदिक्षामुप निषेदुरग्रे । ततो राष्ट्रम् बलमोजश्च जातं तदस्मै देवा उपसनमन्तु ॥’ आपल्या ‘स्व’ तंत्राने राष्ट्र जीवनाच्या सर्व अंगाचा विकास घडवून आणून विश्वाला आपल्या धर्माची अनुभूती द्यायची आहे.’ भाषणाच्या या दुसर्‍या भागात मोहनजींनी आम्ही कोण आहोत आणि आमचे राष्ट्रीय लक्ष्य कोणते आहे, हे सहज सोप्या निःसंदिग्ध भाषेत मांडले आहे. हा भाग समजल्याशिवाय पुढच्या विषयांचे आकलन होणे कठीण आहे.
 
 
भाषणाच्या तिसर्‍या भागात विचार कितीही श्रेष्ठ असला तरीही त्यामागे शक्तीचा आधार लागतो. शक्तीचेदेखील प्रकार आहेत. विद्या, धन, राजशक्ती, यांचा वापर दुसर्‍याला उपद्रव देण्यासाठी जे करतात, त्यांना दुष्ट लोक समजले पाहिजे. परंतु सज्जन शक्ती मात्र या शक्तीचा वापर लोककल्याणासाठी करते. युक्रेन आणि रशियाच्या उल्लेख मोहनजींनी केला. रशियाकडे अणुबाँब आहेत. युक्रेनमध्ये आलात तर अणुबाँब वापरू अशी धमकी रशियाने दिलेली आहे. अन्य देश युक्रेनला मारक शस्त्रे पुरवितात. भारताकडे जर पर्याप्त शक्ती असती तर भारताला हे युद्ध थांबविता आले असते. म्हणून आजच्या काळाचा विचार करता अधिक शक्तिसंपन्न होणे गरजेचे आहे. चीन यावेळी शांत दिसतो, पण तो भविष्यात काहीही गडबड करू शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
 
यानंतर मोहनजी भागवत ज्ञानवापी विवादाकडे वळले. ते म्हणाले, ज्ञानवापी मशिदीचा एक इतिहास आहे, जो आम्ही बदलू शकत नाही. हा इतिहास आम्ही घडविलेला नाही, आजच्या हिंदूंनी घडविलेला नाही, तसेच आजच्या मुसलमानांनीही घडविलेला नाही. हा इतिहास इस्लामी आक्रमकांनी घडविला. त्यांनी देवस्थानांचा विध्वंस केला. आजच्या मुसलमानांचे पूर्वज हिंदूच होते. त्यांचे आणि हिंदूचे मनोबल तोडण्यासाठी मंदिरे तोडण्यात आली. हिंदू समाजातील एका वर्गाला असे वाटते की, तोडलेल्या मंदिरांचे पुर्ननिर्माण झाले पाहिजे. त्यांचीही ही मागणी मुसलमानांनी आपल्या विरोधात आहे असे मानू नये.’
 
 
ज्ञानवापी मशिदीचा विषय गेले तीन-चार महिने गरमागरम चर्चेचा विषय झालेला आहे. अयोध्येतील रामजन्मस्थानाच्या आंदोलनात संघ पूर्ण ताकदीनिशी उतरला होता. संघाला सतत शिव्या घालणार्‍या खूप मोठ्या वर्गाला असे वाटत होते की, काशी विश्वनाथाच्या मंदिराचा विषय घेऊन संघ पुन्हा आंदोलन करील. संघ आंदोलनात उतरला की पुन्हा जुन्या तबकड्या वाजविता येतील. या देशातील मुसलमान किती असुरक्षित आहे, हे सांगणारा पाऊस पाडता येईल. अशी सगळी मंडळी आपली दुकाने उघडून आणि आपापली शस्त्रे बाहेर काढून बसली होती. मोहनजींनी या सर्व दुकानदारांचे दिवाळे काढले आहे.
  
ते म्हणाले, रामजन्मभूमी आंदोलनात काही ऐतिहासिक कारणांमुळे आम्ही सहभागी झालो. ते कार्य आता पूर्ण झाले आहे. आता यानंतर संघाला कोणतेही नवीन आंदोलन करायचे नाही. मोहनजींना हे सांगायचे आहे की, संघाचे मूलभूत कार्य व्यक्तिनिर्माणाचे आहे. व्यक्तिनिर्माणातून राष्ट्राला परमवैभवसंपन्न करण्याचे आहे. आंदोलन करणे हे संघाचे काम होऊ शकत नाही.
  
आणखी एका मुद्याला त्यांनी स्पर्श केला. ते म्हणाले, प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध घेण्याची आवश्यकता नाही. मशीद हे पूजास्थान आहे. जे हिंदू आता मुसलमान झाले आहेत, त्यांना मुस्लीम पूजापद्धतीची सवय झाली आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीचे पूजास्वातंत्र्य दिले पाहिजे आणि ज्या कुणाला मूळ धर्मात परत यायचे असेल त्यांचे स्वागत आहे. आणि ज्या कुणाला मुसलमान धर्मात राहायचे आहे, त्यांना विरोध नाही. विवादाचे मुद्दे वाढवत नेता कामा नये, हे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
संघविचारधारेची मंडळी सत्तेवर आल्यानंतर देशातील अनेक हिंदूना भलतेच बळ चढलेले आहे. मुसलमानांचा बंदोबस्त केल्याशिवाय आपले हिंदूपण सिद्ध होत नाही, असे त्यांना वाटते. अशी मंडळी राजापेक्षा अधिक राजनिष्ठ बनून आक्रमक भाषेत वाट्टेल ते लिहित व बोलत असतात. त्यांना मोहनजींचे म्हणजे संघाचे विचार पचविणे फारच कठीण आहे. अशांपैकी काही लोकांनी सरसंघचालकांचा एकेरी उल्लेख करून त्यांना वेड्यात काढलेले आहे. अशा ओवेसींच्या अवतारांपासून आपण शेकडो हात दूर असले पाहिजे. त्यांची ओझी आपल्या खांद्यावर घेऊ नयेत. जे मनुष्यधन परधर्माच्या गुलामीत गेलेले आहे ते धन प्रेमाने आणि विश्वासाने आपल्याला परत मिळवायचे आहे. विवाद आणि संघर्ष हे त्याचे मार्ग नाहीत. मोहनजींच्या वक्तव्याचा मला समजलेला असा अर्थ आहे.
 
 
सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी शेवटी आपल्या संविधानाचा उल्लेख केला. म्हटलं तर ते एकच वाक्य आहे, पण त्या वाक्यात तीन-चार पानांचा लेख करण्याचे सामर्थ्य आहे. वाक्य असे आहे, ‘अपनी संविधान संमत न्यायव्यवस्था को पवित्र, सर्वश्रेष्ठ मानकर उसके निर्णय हम को पालन करने चाहिये. उनके निर्णयों पर प्रश्नचिन्ह नही लगाना चाहिये.’ भारत संविधानाप्रमाणे चालणार, संविधानाने निर्माण केलेल्या व्यवस्था स्वीकारून आपल्याला कार्य करायचे आहे. न्यायव्यवस्था पवित्र आहे आणि विवादाच्या विषयाचे निर्णय न्यायव्यवस्थेने करायचे आहेत. निर्णयाचा आदर आणि पालन सर्वांनी म्हणजे हिंदू आणि मुसलमानांनीही करायचे आहे.
 

 
देशाच्या वर्तमानाला भविष्यकालीन वळण देणारे हे ऐतिहासिक भाषण आहे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.