युक्रेनचे युद्ध कधी संपेल, याविषयी कुणीही काहीही निश्चितपणे सांगू शकत नाही. झेलेन्स्की आणि पुतिन वाटाघाटी करण्यास तयार आहेत. वाटाघाटीच्या फक्त घोषणा होतात, प्रत्यक्ष वाटाघाटी होत नाहीत. झेलेन्स्कीचे शासन जाण्याऐवजी शक्तिशाली आक्रमक रशियाशी लढणारा शूर नेता अशी त्यांची जगात प्रतिमा झालेली आहे. रशियाने म्हणजे पुतिन यांनी अकाली माघार घेतली तर रशियात ते बदनाम होतील आणि त्यांचे अध्यक्षपद जाईल. हे युक्रेन युद्ध त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे. यातून मार्ग कोणता, हे आजतरी कुणी सांगू शकत नाही.
रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला 24 मे रोजी तीन महिने पूर्ण झाले. या तीन महिन्यांत युक्रेनवर रशियाला निर्णायक विजय मिळविता आलेला नाही. युक्रेनवर रशियाने आक्रमण का केले? त्याची कारणे अशी सांगितली जातात - 1. युक्रेनने नाटो संघटनेत सामील होऊ नये. 2. युक्रेनच्या शासनाने युक्रेनचे नाझीकरण सुरू केले आहे, ज्यात रशियन वंशाच्या लोकांचा खूप छळ केला जात आहे. 3. युक्रेनने पश्चिम युरोपच्या लष्करी गटात सामील न होता तटस्थ राहिले पाहिजे. युक्रेन स्वतंत्र देश आहे हे मानायला व्लादिमीर पुतीन तयार नाहीत.
आम्ही युक्रेनवर आक्रमण केले आहे असे पुतिन म्हणत नाहीत, ते म्हणतात की, ही सैनिकी कारवाई आहे. युक्रेनवर आम्हाला ताबा मिळवायचा नाही. युक्रेनची भूमी आम्हाला नको आहे हे सांगायला पुतिन विसरत नाहीत. झेलेन्स्कीचे शासन बरखास्त करून त्याजागी रशियाला अनुकूल शासन युक्रेनमध्ये बसविणे हे त्यांचे ध्येय होते. तीन महिन्यांत हे ध्येय त्यांना साध्य करता आले नाही. झेलेन्स्कीचे शासन जाण्याऐवजी शक्तिशाली आक्रमक रशियाशी लढणारा शूर नेता अशी त्यांची जगात प्रतिमा झालेली आहे.
“झेलेन्स्कीचे शासन जाण्याऐवजी शक्तिशाली आक्रमक रशियाशी लढणारा शूर नेता अशी त्यांची जगात प्रतिमा झालेली आहे. ”
रशिया लष्करीदृष्ट्या सामर्थ्यसंपन्न आहे. सर्व प्रकारची आधुनिक शस्त्रास्त्रे त्यांच्याकडे आहेत. अणुबाँब आहेत. शक्तिशाली वायुदल आहे. तरीही युक्रेनमधील युद्ध रशियाला जिंकता आले नाही. युक्रेनचे सैन्य त्यांचा कडवा प्रतिकार करीत आहे. लहानसहान लढाया ते हरत असले, तरीही युद्ध आम्हीच जिंकणार हा विश्वास त्यांच्या मनात आहे. नेमकी हीच गोष्ट व्हिएतनाम युद्धात घडली आहे. व्हिएतनाम युद्धात उत्तर व्हिएतनामची जनता अमेेरिकेविरुद्ध लढत होती. एकही लढाई तिला जिंकता आली नाही, परंतु युद्ध मात्र त्या जनतेने जिंकले.
लढाई न जिंकता युद्ध कसे जिंकता येते? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचे उत्तर असेे की, लढाईमध्ये प्रतिपक्षाकडे मारक शक्ती मोठी असते, अशा वेळी लढाई जिंकता येत नाही. पण पराभव न स्वीकारता सतत लढत राहायचे, शत्रूचा दम उखडेपर्यंत लढत राहायचे, त्याचा दम उखडला की तो माघार घ्यायला सुरुवात करतो. व्हिएतनाममध्ये अमेरिकन सैन्याचे असे झाले. लष्करी सामर्थ्याने अमेरिकन सैन्य प्रचंड शक्तिशाली होते आणि निश्चयाच्या सामर्थ्याने व्हिएतनामची जनता सामर्थ्यशाली होती, त्यात व्हिएतनामची जनता जिंकली.
“रशियाने म्हणजे पुतिन यांनी अकाली माघार घेतली तर रशियात ते बदनाम होतील आणि त्यांचे अध्यक्षपद जाईल. हे युक्रेन युद्ध त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे. ”
युक्रेन हा रशियाचा व्हिएतनाम होणार काय, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू आहे. ‘युक्रेन हा पुतिन यांचा व्हिएतनाम होणार’ या शीर्षकाचा हरलान उलमन यांचा लेख आहे. तोे The Hill यामध्ये प्रकाशित झालेला आहे. या लेखात त्यांनी 1963-64ची अमेरिकेची मानसिकता आणि 2021-22 सालातील पुतिन व रशियाची मानसिकता यातील साम्य दाखविलेले आहे. एखादा देश कम्युनिस्ट झाला की, आजूबाजूचे देश कम्युनिस्ट व्हायला लागतात आणि म्हणून देश कम्युनिस्ट होत असताना तेेथे हस्तक्षेप केला पाहिजे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा डोमिनो सिद्धान्त होता. डोमिनो हा एक खेळ आहे. त्यात एक सोंगटी कोसळली की अन्य सोंगट्या कोसळतात. व्हिएतनाम कम्युनिस्ट होऊ नये म्हणून अमेरिकेने आपले सैन्य तेथे घुसविले.
सैन्य घुसविण्याची खोटी कारणे जगाला आणि अमेरिकन जनतेला दिली. कम्युनिस्टांच्या बोटींनी नाविक दलावर हल्ला केला आणि त्याचा प्रतिकार केला पाहिजे असा ठराव काँग्रेसकडून पास करून घेण्यात आला. असे काही घडले नव्हते. पुतिन जसे खोटे सांगतात की युक्रेनमध्ये नाझीफिकेशन चालू आहे, रशियन वंशाच्या लोकांचा छळ होतो, हे सर्व खोटे आहे. पुतिनची भीती नाटोची आहे. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर स्वतंत्र झालेले अनेक देश नाटोचे सभासद झाले. नाटोचे आधुनिक सैन्य आणि शस्त्रे रशियाच्या सीमेवर आली. रशियाला याची जबरदस्त भीती वाटली.
नाटोला वेळीच रोखले पाहिजे. नाटोला रोखले नाही, तर सीमेवरील नाटो रशियाच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करायला लागेल, जनतेत असंतोष निर्माण करील आणि रशियाचे विघटन घडवून आणेल. एक देश नाटोच्या नादी लागला की, रशियाच्या सीमेवरील अन्य देशही नाटोचा पदर धरतील. अमेरिकेची डोमिनो थिअरी ही वेगळ्या रूपाने पुतिन यांच्या बोकांडी बसली आहे.
युक्रेनमधील युद्ध अमेरिकेची आधुनिक शस्त्रास्त्रेे आणि रशियाची शस्त्रे यांच्यात चालू आहे. युक्रेनला अमेरिकेने हवाई संरक्षणाची यंत्रणा दिली आहे. रणगाड्यांचा वेध घेणारी आधुनिक रडार यंत्रणा दिली आहे. चिलखती गाड्या आणि रणगाडे उद्ध्वस्त करणारी क्षेपणास्त्रे दिली आहेत. त्यांचा सतत पुरवठा चालू असतो. ज्या देशात युद्ध चालू आहे, त्या देशाला विध्वंसाचा सामना करावा लागतो आणि जे शस्त्रपुरवठा करतात, त्यांना आर्थिक सुबत्तेचा प्रसाद प्राप्त होत असतो. शस्त्रे करखान्यात निर्माण होत असतात, कारखान्यातून रोजगार निर्माण होतात, रोजगारातून आर्थिक सुबत्ता येते, असे अमेरिकेला त्याचे भरपूर लाभ आहेत.
जागतिक स्तरावर रशिया एकाकी पडला आहे. भारताने रशियाचा निषेध केलेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि रशिया नेहमीच एकमेकांना साहाय्य करीत राहिलेले आहेत. भारताचे धोरण तसे तटस्थतेचे आहे. शासकीय पातळीवर काय होते हा भाग वेगळा आणि जनतेच्या पातळीवर काय होते हा दुसरा विषय असतो. सर्व जगाने व्लादिमीर पुतिन यांना आक्रमक आणि युद्ध गुन्हेगार ठरवून टाकलेले आहे. युक्रेनमधील शहरांचा रशियन सेनेने केलेला विध्वंस, दुसर्या महायुद्धातील विध्वंसासारखाच अतिशय भयानक आहे. युक्रेनमधील एक कोटी तीस लाख (13 million) लोक या युद्धामुळे विस्थापित झाले आहेत.
रशियातून युरोपातील देशांना इंधनाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो. युरोपातील अनेक देशांनी तो बंद केला आहे, तर काही देशांचा पुरवठा रशियाने बंद केला आहे. रशियाला याचे आर्थिक परिणाम भोगावे लागत आहेत. रशियाचे सकल घरेलू उत्पादन 12%नी घटलेले आहे. रशियन जनतेला त्याचे आर्थिक चटके बसायला लागले आहेत.
युक्रेन युद्धाचे जागतिक परिणामदेखील फार तीव्र आहेत. युक्रेनला युरोपचे धान्याचे कोठार म्हटले जाते. ते कोठार आता आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे. जगभर गव्हाची आणि तांदळाची मागणी वाढत चालली आहे. भारतातून गव्हाची निर्यात होत असे. आपल्या बाजारातील गव्हाच्या किमती वाढू लागल्यावर शासनाने ती बंद केली. खाद्यतेल, खनिज तेल, अन्नधान्य या सर्वांचे भाव वाढत चालले आहेत. युरोपातील सर्व देशांना या महागाईचा सामना करावा लागतो आणि युद्धाशी काहीही संबंध नसलेल्या भारतालाही महागाईचे चटके जाणवू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्माण होणारी महागाई केंद्रातील कोणत्याही शासनाच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे असे म्हणता येत नाही. असे म्हणणे हे झाले राजकारण. ते आपल्या देशात फार उत्तम चालू असते.
युक्रेनचे युद्ध कधी संपेल, याविषयी कुणीही काहीही निश्चितपणे सांगू शकत नाही. झेलेन्स्की आणि पुतिन वाटाघाटी करण्यास तयार आहेत. वाटाघाटीच्या फक्त घोषणा होतात, प्रत्यक्ष वाटाघाटी होत नाहीत. झेलेन्स्की यांनी जाहीरपणे सांगितले की, युक्रेन नाटोचा सदस्य होणार नाही. युरोपियन युनियनचा तो सदस्य होईल. युरोपियन युनियन ही आर्थिक संघटना आहे. त्यांनी असेही म्हटले की, आम्ही अणुबाँब बनविणार नाही, त्या बदल्यात काही प्रमुख देशांनी युक्रेनच्या संरक्षणाची हमी द्यावी. युक्रेनवर आक्रमण झाल्यास तत्काळ मदतीला धावून यावे. अशा अटी-तटीच्या वाटाघाटीच्या दौर्यातून युक्रेनचे युद्ध चाललेले आहे. रशिया म्हणजे पुतिन यांनी अकाली माघार घेतली तर रशियात ते बदनाम होतील आणि त्यांचे अध्यक्षपद जाईल. हे युक्रेन युद्ध त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे. यातून मार्ग कोणता, हे आजतरी कुणी सांगू शकत नाही.
रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.