एके दिवशी बंड झाले. राजाला राजसिंहासन सोडण्याची वेळ आली. बोलक्या पोपटाला काही समजेना की आता काय बोलायचे. ज्यांना कालपर्यंत मी दम मारत बसलो, तेच आता माझे पंख छाटायला निघाले आहेत.. बिचार्याकची वाचाच गेली, चोच बंद झाली, मुख म्लान झाले. रोज वटवट करणारा हा पोपट एकदमच शांत झाला.
एक होता राजा. तो पोपटांचा फार शौकीन होता. विशेषत: माणसाप्रमाणे बोलणारे पोपट त्याला फार आवडत असत. त्यामुळे त्याने खूप पोपट पाळले. हे पोपट राजाची फार स्तुती करीत असत. 'आमचा राजा म्हणजे ‘राजा’ आहे, तो जंगलातील वाघ आहे. त्याचे दात तीक्ष्ण आहेत आणि नखेदेखील धारदार आहेत. आमच्या वाघाशी कुणीदेखील लढू शकत नाही.' त्यात सर्वाधिक बोलणारा पोपट म्हणत असे की, 'तुमची हिम्मत असेल तर आमच्या वाघाशी येऊन लढा, आमच्या वाघाच्या नखांचा प्रसाद घ्या.'
या बोलणार्या् पोपट समूहातील हा पोपट राजाचा फार आवडता होता. राजाने त्याला सर्व सुखसुविधा उत्पन्न करुन दिल्या. कुणाशी बोलायचे असेल तर राजा या पोपटाच्या माध्यमातून बोलत असे. राजाला जनतेशी काही संवाद करायचा असेल तर तोदेखील या पोपटाच्या माध्यमातूनच राजा करीत असे. इतर दुसर्याअ राजांशी बोलायचे असेल, चर्चा करायची असेल, तर राजा या पोपटालाच पाठवीत असे. अशी सगळी कामे हा बोलका पोपट सर्व शक्ती पणाला लावून पूर्ण करीत असे.
अन्य पोपटांना त्याचा हेवा वाटे, परंतु ते काही बोलत नसत. राजाची मर्जी गेली तर आपण स्थानाच्युत होऊ, अशी त्यांना भीती वाटत असे. पोपटाला असे वाटे की, राजानंतर मीच. माझा दरारा केवढा आहे, माझ्यापुढे बोलण्याची कुणाची हिम्मत होत नाही. सगळे कसे खाली मान घालून शांत बसलेले असतात.
यामुळे पोपट कधीकधी मर्यादा सोडूनही बोलत असे. राजाचे वरदान असल्यामुळे त्याला सर्व गुन्हे माफ होते. त्याची नजर बारीक असे. आपला विश्वासघात कुणी केला, कसा केला, हे तो रंगवून रंगवून सांगे. राजालाही सांगे की, राजा म्हणून तुमचा सन्मान झाला पाहिजे. तुम्हाला कुणी अपमानास्पद वागणूक देता कामा नये, ती तुम्ही सहन करता कामा नये. आणि जो अपमानकारक वागणूक देईल, त्याला शासन केले पाहिजे.
पोपटाच्या मानापमानाच्या कल्पना थोड्या वेगळ्या होत्या. त्याची मानपमानाची पहिली कल्पना ही होती की, वनातील सगळ्यांनी माझ्या राजालाच राजा म्हटले पाहिजे. त्याच्या निवासस्थानी जाऊन त्याला सलाम केला पाहिजे. तो जे काही सांगेल ते ऐकले पाहिजे आणि जे करायला सांगले ते केले पाहिजे. यापैकी एखादी गोष्ट जरी कमी झाली, तर आपल्या राजाचा महान अपमान झाला अशी वटवट हा पोपट सतत करीत राही.
पोपटाला असेच वाटत राहिले की, राजाचे राजेपद चंद्र-सूर्य असेपर्यंत राहणार आहे आणि त्यामुळे बोलक्या पोपटाला वाटे की माझेही स्थान अढळ राहणार आहे. आमच्या दोघांच्या स्थानाला कसलाच धोका नाही. पोपटाची बडबड जास्त असली, तरी वाचन थोडे कमी होते. त्याने जर गौतम बुद्धांचे चरित्र वाचले असते, तर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली असती. भगवान गौतम बुद्ध नेहमी सांगत की, 'नामरूपात्मक असे जगात जे जे काही आहे, ते नाशिवंत आहे, ते कायम टिकणारे नाही, सतत बदलत जाणारे आहे. आज एक स्थिती आहे, उद्या ती तशीच राहील याची शक्यता नाही. आपल्या सर्वांना अशा अनित्य जगात जगायचे आहे. म्हणून अनित्यावर श्रद्धा ठेवू नये, ती खरी मानू नये, कायम स्वरूपाची मानू नये, त्यात बदल होणार, हे लक्षात ठेवावे.' बोलक्या पोपटाने हे काही वाचलेले नसल्यामुळे तो अनित्यतेला नित्य मानत गेला आणि एके दिवशी फसला.
राजा म्हणजे राजसत्ता. राजसत्ता म्हणजे राजलक्ष्मी. ही राजलक्ष्मी विष्णूच्या लक्ष्मीपेक्षाही अतिशय मोहक असते. तिच्या मोहात कोण कधी फसेल, हे कुणालाच सांगता येत नाही. म्हणून राजाने आपल्या सहकार्यां विषयी चोवीस तास सावध असले पाहिजे, असा राजनीतिशास्त्राचा सनातन नियम आहे. कोण कधी दगा देईल हे कुणीही सांगू शकत नाही. आपले राजनीतिशास्त्र सांगते की, राजाने मुलावर, एवढेच काय बायकोवरदेखील विश्वास ठेवू नये, सर्वांपासून सावध राहावे.
राजाच्या बोलक्या पोपटाला राजनीतिशास्त्राचे हे नियम माहीत नसावेत. सतत बोलत राहण्याच्या व्यायामामुळे त्याच्याकडे बौद्धिक व्यायाम करण्याची शक्ती राहत नसावी. ज्युलिअस सिझर हा रोम साम्राज्याचा सम्राट होता. त्याचा जिवलग मित्र ब्रूटसने त्याचा खून केला, तेव्हा मरताना सिझर म्हणाला, "ब्रूटस, तूसुद्धा का?" झार निकोलसच्या बायकोनेच त्याला गादीवरून हाकलून लावले आणि स्वतः सम्राज्ञी झाली. तिचे नाव ‘कॅथेरीन दी ग्रेट’. असे इतिहास प्रसिद्ध होते. राजीव गांधी यांचे सहकारी विश्वनाथ प्रताप सिंह यांनीच त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. राजीव गांधी यांचे सरकार गेले. भारताच्या आणि जगाच्या इतिहासात पानोपानी अशी उदाहरणे आहेत. म्हणून म्हटले जाते की, राजाचा सगळ्यात जबरदस्त शत्रू कुणी प्रतिस्पर्धी नसतो, तर तो त्याच्या अत्यंत जवळचा माणूस असतो. पोपटाला याचे आकलन कधीच झाले नाही.
राजलक्ष्मीच्या मोहापोटी राजाचे शूर निष्ठावान सैनिक बंड करतात आणि राजाच्या सिंहासनाचे खांब जमीनदोस्त होतात. अशी बंडे फार गुप्तपणे करावी लागतात. बंड होईपर्यंत त्याचा सुगावा कुणालाच लागत नाही. या कानाचे त्या कानाला कळत नाही. बंडाची तयारी चालू असताना पोपट मात्र ‘याद राखा, गद्दारी कराल तर ठोकून काढू. गद्दारांना राजदरबारात स्थान नाही. आम्ही राजनिष्ठ आहोत. प्राण गेला तरी निष्ठा सोडणार नाही. आमच्या निष्ठा राजाच्या चरणी अर्पित आहेत.' असे म्हणत होता.
पोपटाची बडबड सगळे बंडखोर खाली माना घालून ऐकत होते आणि मनातल्या मनात हसत होते. या पोपटाचे पंख कसे कापयाचे याच्या त्यांच्या योजना पूर्ण झाल्या होत्या, योग्य संधीची ते वाट पाहत होते. अशी संधी अनेक कारणाने प्राप्त होते. राजा विदेशात गेला की बंडखोरांना सुवर्णसंधी प्राप्त होते. घानाचे पंतप्रधान नुक्रुमा विदेश प्रवासाला गेले. त्यांच्या सेनाधिकार्यारने बंड केले आणि त्यांना अध्यक्षपदावरून हाकलून लावले. कधीकधी राजा आजारी पडतो. शहाजहान आजारी पडला, औरंगजेबाने सर्व भावांना ठार करून मुगल सिंहासन बळकावले. पोपटाच्या राजानेदेखील सर्वांना अशी संधी दिली. अनेक कारणांमुळे तो फक्त घरातच बसून असे. घरात बसूनच तो राज्य चालवी. जनतेशी त्याचा संपर्क तुटला आणि सहकार्यां शी त्याचा फारसा संपर्क राहिला नाही. आपले सहकारी काय करतात, हे बंड होईपर्यंत त्याला समजलेच नाही.
एके दिवशी बंड झाले. राजाला राजसिंहासन सोडण्याची वेळ आली. बोलक्या पोपटाला काही समजेना की आता काय बोलायचे. ज्यांना कालपर्यंत मी दम मारत बसलो, तेच आता माझे पंख छाटायला निघाले आहेत.. बिचार्याकची वाचाच गेली, चोच बंद झाली, मुख म्लान झाले. रोज वटवट करणारा हा पोपट एकदमच शांत झाला. लोकांच्या दृष्टीआड होत गेला. त्याचे महत्त्व लयाला गेले. जिंवत असूनही मरण जवळ आले.
तेव्हा त्याच्याच कंपूतील दुसरा पोपट त्याला म्हणाला, ‘‘बाबा रे, एवढा दुःखी होऊ नकोस. अजूनही दुसरे राजे हयात आहेत. शक्तिमान आहेत. त्यांची सेवा कर, पुन्हा चांगले दिवस येतील. पण एक धडा लक्षात ठेव - राजप्रासादाच्या शिखरावर पोपटही बसतो आणि तो आवाजही करीत राहतो. पण राजप्रासादावर बसलेला पोपट कधी गरुड होत नाही, तो पोपटच राहतो, एवढे लक्षात ठेव म्हणजे झाले."