जगातील पहिल्या ई-रिक्षाचे संशोधक डॉ. अनिल कुमार राजवंशी

विवेक मराठी    21-Jun-2022   
Total Views |
डॉ. अनिल कुमार राजवंशी हे महाराष्ट्रातील निंबकर कृषी संशोधन संस्थेचे (NARIचे) संचालक म्हणून कार्यरत आहेत आणि ते ई-रिक्षा आणि इथेनॉलपासून कंदील आणि स्टोव्ह जाळण्यासाठी इंधन विकसित करणारे पहिले संशोधक म्हणून ओळखले जातात. 2000 साली जग जेव्हा वायटूकेमध्ये अडकले होते, तेव्हा त्यांनी पहिली ई-रिक्षा बनविली. विज्ञान आणि अभियांत्रिकी कार्यात केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. या वेळी पद्म गौरव लेखमालेत आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

eauto

गेल्या काही वर्षांपासून आपल्याला आपल्या शहरांमध्ये ई-रिक्षा फिरताना दिसत आहेत. आता ई-स्कूटर, ई-कार आदी बरेच प्रकार आलेत. परंतु जगात पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आपल्या महाराष्ट्राच्या मातीत, सातार्‍याच्या फलटण शहरामध्ये पद्मश्री डॉ. अनिल कुमार राजवंशी यांनी विकसित केली आहे.
 
 
डॉ. अनिल कुमार राजवंशी हे महाराष्ट्रातील फलटणमध्ये राहून गेली चार दशके तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गावांतील लोकांचे जीवन सुसह्य बनविण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येकाला अभिमान वाटेल असेच त्यांचे कार्य आहे.
 
 
डॉ. अनिल कुमार राजवंशी हे महाराष्ट्रातील निंबकर कृषी संशोधन संस्थेचे (NARIचे) संचालक म्हणून कार्यरत आहेत आणि ते ई-रिक्षा आणि इथेनॉलपासून कंदील आणि स्टोव्ह जाळण्यासाठी इंधन विकसित करणारे पहिले संशोधक म्हणून ओळखले जातात. उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरामध्ये त्यांचे लहानपण गेले आणि त्यानंतर आयआयटी कानपूरमधून 1972मध्ये बी.टेक. आणि 1974मध्ये एम.टेक. पदवी पूर्ण केल्यानंतर, पीएच.डी करण्यासाठी ते फ्लोरिडा विद्यापीठात गेले. या दरम्यान त्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. वाफेच्या इंजिनांमध्ये काहीतरी करण्याची त्यांची रुची होती. यामुळे त्यांनी फ्लोरिडा गाठले. पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर डॉ. अनिल कुमार राजवंशी यांनी फ्लोरिडा विद्यापीठात काही काळ अध्यापनही केले. पण देशासाठी काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेने ते सुखसोयीचे जीवन सोडून 1981मध्ये भारतात परतले आणि त्यांनी आपल्या देशातील लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यास सुरुवात केली. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे वडील चांगलेच संतापले.

 
डॉ. अनिल कुमार राजवंशी एका मुलाखतीत म्हणतात, “तो काळ असा होता, जेव्हा भारतातील प्रत्येक अभियंत्याला सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपले आयुष्य घालवायचे होते. पण जगाच्या कानाकोपर्‍यातून अनुभव मिळवून मी माझ्या देशासाठी काम करेन, या माझ्या आयुष्यातील ध्येयांबाबत मी नेहमीच स्पष्ट होतो. पण जेव्हा माझ्या वडिलांना समजले की मला भारतात परतायचे आहे, तेव्हा ते खूप संतापले आणि म्हणाले की, आयआयटी कानपूर आणि फ्लोरिडा विद्यापीठ यांसारख्या निवडक संस्थांमध्ये शिकूनही गावी परतणे मूर्खपणाचे आहे.” पण डॉ. अनिल कुमार राजवंशी आपल्या निर्णयावर ठाम होते आणि त्या वेळी त्यांनी फक्त आपल्या मनाचे ऐकले. अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांना आयआयटी मुंबई, भेल आणि टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट यांसारख्या अनेक नामांकित संस्थांकडून ऑफर मिळाल्या, परंतु त्यांनी सर्व नाकारल्या आणि सातारा जिल्ह्यातील फलटण या गावी ’निंबकर कृषी संशोधन संस्था’ या एनजीओमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
 
eauto
 
डॉ. अनिल कुमार राजवंशी म्हणतात, “त्या वेळी येथील जीवन खूप कठीण होते. इथून चार तासांच्या अंतरावर असलेल्या पुण्याला सगळ्या गोष्टींसाठी लोकांना जावं लागायचं. पहिल्या सहा महिन्यांत मला इथल्या वातावरणाशी जुळवून घेणं खूप कठीण वाटलं. पण काहीतरी वेगळं करण्याची जिद्द अशी होती की सगळे त्रास विसरून मी माझं काम करत राहिलो.” गेल्या चार दशकांत अल्कोहोल स्टोव्ह, बायोमास गॅसिफायर आणि ई-रिक्षांसाठी त्यांनी येथूनच सात पेटंट मिळवले आहेत. याशिवाय त्यांनी ’अमेरिका ऑफ 1970’, ’नेचर ऑफ ह्युमन थॉट’, ’रोमान्स ऑफ इनोव्हेशन’ अशी पुस्तकेही लिहिली आहेत. डॉ. अनिल कुमार राजवंशी हे नेहमी काळाच्या पुढचा विचार करणारे आहेत. त्यांनी अशा वेळी ई-रिक्षावर काम करण्यास सुरुवात केली, जेव्हा जगात कोणी त्याचा विचारही करत नव्हते.

 
ते एका मुलाखतीत म्हणतात, “मी 1985मध्ये इलेक्ट्रिक रिक्षांवर काम करायला सुरुवात केली. त्या वेळी भारतातच नव्हे, तर जगातील कोणत्याही देशात याचा विचार केला जात नव्हता. त्यानंतर 1995मध्ये मी याबद्दल काही शोधनिबंध लिहिले आणि काही परिषदांमध्ये भागही घेतला. यादरम्यान माझ्या प्रकल्पाबाबत एमआयटी बोस्टनच्या रिसर्च जर्नलमध्ये एक लेखही प्रकाशित झाला.” पण फलटणसारख्या गावात काम करत असताना त्या वेळी ही संकल्पना प्रत्यक्षात साकारता आली नाही आणि हळूहळू त्यांची संकल्पना चोरून अनेक कंपन्या काम करू लागल्या.
 
2000 साली जग जेव्हा वायटूकेमध्ये अडकले होते, तेव्हा त्यांनी पहिली ई-रिक्षा बनविली. ही ई-रिक्षाPermanent Magnet DC motorवर चालणारी होती. आज भल्याभल्या कंपन्या रेंजसाठी झगडत असताना त्यांनी तेव्हा तीन पॅसेंजर, एक ड्रायव्हर आणि रिक्षाचा भार असा घेऊन जाणारी एका चार्जमध्ये 60 ते 70 कि.मी.ची रेंज देणारी रिक्षा बनविली. या रिक्षाचा वेग ताशी 35 ते 40 कि.मी. होता.
 
NARIबद्दल ते म्हणतात, “आमची संस्था खूपच लहान आहे आणि आमच्याकडे कंपन्यांशी कायदेशीर लढाई लढण्यासाठी पुरेशी संसाधने नाहीत. पण 2003च्या सुमारास मीडियामध्ये कंपन्यांनी माझी कल्पना चोरल्याच्या बातम्या आल्या आणि लोकांना सत्य कळू लागले.” त्यानंतर, ई-रिक्षाच्या शोधासाठी त्यांना 2004मध्ये प्रतिष्ठित ’एनर्जी ग्लोबल अवॉर्ड’नेही गौरविण्यात आले. त्याच वेळी, 2014मध्ये, फ्लोरिडा विद्यापीठाकडून प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.
डॉ. अनिल कुमार राजवंशी स्वतःला आध्यात्मिक अभियंता समजतात. ते म्हणतात, भारत प्राचीन काळापासून एक महान आणि सुसंस्कृत राष्ट्र आहे. तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांना एका धाग्यात बांधून देशाला एका नव्या उंचीवर नेऊ शकतो, यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. ते म्हणतात की ग्रामीण भारत आज अनेक आर्थिक आणि सामाजिक संकटांना तोंड देत आहे. पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांचे जीवन खूप सोपे केले जाऊ शकते. त्यासाठी तरुणांनी पुढे यावे. आज श्रीमंत देशांतील श्रीमंत लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी, तरुण अभियंत्यांना त्यांच्या देशातील गरीब आणि असाहाय्य लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा लागेल आणि हे तेव्हाच होईल, जेव्हा ते त्यांच्या असुरक्षिततेच्या भावनेतून बाहेर येतील.


eauto 
डॉ. अनिल कुमार राजवंशी गेली अनेक वर्षे विविध संशोधनांच्या माध्यमातून खेड्यातील नागरिकांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यमान केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देत त्यांच्या विविध संशोधनांचा गौरव केला आहे. त्यांच्या कार्याची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे, कारण अशा प्रसिद्धिपराङ्मुख व्यक्ती या सतत कार्यमग्न असताना विद्यमान केंद्र सरकार अशा व्यक्तींना पुरस्कृत करत त्याची उंची वाढवत आहे, त्याबद्दल केंद्र सरकारचे कौतुक करावे ते कमीच आहे.

श्री सर्वेश फडणवीस

युवा लेखक सामाजिक ,सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक,तरुण भारत नागपूर येथे २ वर्ष स्तंभ लेखन केले आहे. मुंबई तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स,पुण्यनगरी या वृत्तपत्रासाठी विविध विषयांवर लेखन सुरू असते. मध्य प्रदेश येथील इंदोर येथून एक पाक्षिक निघतं मराठी गौरवयात ही अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. प्रज्ञालोक ह्या त्रैमासिकात ही लेखन सुरू आहे. आणि प्रज्ञालोक अभ्यासक मंडळात संपादकीय मंडळात सक्रिय आहे. मुंबई तरुण भारताने "कालजयी सावरकर" या नावाने सावरकर विशेषांक प्रसिद्ध केला त्यात 'सावरकर आणि युद्धशास्त्र' ह्या विषयावर लेख प्रकाशित झाला आहे. अनेक दिवाळी अंकांसाठी लेखन सुरू असते. साप्ताहिक विवेक साठी लिहितांना कायमच आनंद मिळत असतो. विवेकचा वाचक लेखकांना समृद्ध करणारा आहे.