काश्मीर - दहशतवादाचे नवे रूप

विवेक मराठी    10-Jun-2022   
Total Views |
केंद्र सरकारने आतापर्यंत चार हजार पंडितांना काश्मीरच्या खोर्‍यात नोकर्‍या उपलब्ध करून दिल्या आहेत. काश्मीरमध्ये विकासाच्या कामांनीही जोर घेतलेला आहे. त्यामुळेही पाकिस्तानची पोटदुखी वाढलेली आहे. देशभर विखुरलेल्या काश्मिरी पंडितांची संख्या लक्षात घेता केवळ एक टक्का पंडित परतलेले आहेत. त्यांनी काढता पाय घ्यावा लागेल, अशा प्रचारास खोर्‍यात असणारे मुस्लीम बळी पडत असल्याचे दिसते आहे. काही तरुणांची माथी भडकवली गेली आहेत. तसेच पाकिस्तानने ‘हायबी्रड’ दहशतवाद्यांना हाताशी धरून पुन्हा कुरापती काढणे चालू केले आहे.


jamu kashmir
 
काश्मीरच्या खोर्‍यात पंडितांनी येऊन राहावे, त्यांना तिथे त्यांचे संसार उभे करता यावेत यासाठी वाटेल तेवढी मदत केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनेकदा सांगितलेले आहे. पंडितांचे घरी परतणे सुरूही झाले. त्यांना योग्य ती मदत देण्यात येत होती. पंडितांसाठी स्वतंत्र गृहयोजनाही तयार करण्यात आल्या, पण तिथे राहणे पंडितांना किंवा एकूणच विस्थापितांना अवघड वाटत असण्याची शक्यता आहे. त्यांच्यापैकी काही अन्यत्र राहू लागले होते, पण गेल्या काही दिवसांपासून या पंडितांवरच नव्हे, तर बाहेरून येणार्‍या सर्वच समाजावर हल्ले होऊ लागल्याने त्यांचे जिणे अवघड बनते आहे. काश्मिरी पोलिसांवर हल्ले होत आहेत. अलीकडे बडगाममध्ये राहुल पंडित नावाच्या एका सरकारी कर्मचार्‍याला त्याच्या कार्यालयात घुसून ठार करण्यात आले. बँकेत काम करणार्‍या एका राजस्थानी व्यक्तीवर दहशतवाद्यांनी बँकेत शिरून गोळीबार केला आणि त्याला ठार केले. श्रीनगरमध्ये सैफुल्ला काद्री या पोलीस कॉन्स्टेबलला त्याच्या नऊ वर्षांच्या मुलीदेखत गोळ्या घालून ठार करण्यात आले. तो आपल्या मुलीला शाळेत घेऊन चालला होता. मुलगीही गोळीबारात जखमी झाली. पुलवामामध्ये रियाझ अहमद ठोकर या पोलिसाला गोळ्या घालून मारण्यात आले. एका बांधकाम कर्मचार्‍यास ठार करण्यात आले. केवळ परत आलेल्या पंडितांना इथे लक्ष्य केले जात आहे असेही नाही. मात्र घबराट पसरवण्यासाठी सर्व तर्‍हेचे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या या सर्व हत्यासत्राचे पाप, पोपटपंची करणार्‍या काहींनी ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माथ्यावर ठोकून दिले आहे.
 
 
काश्मीरला खास दर्जा देणारे घटनेतले 370वे कलम रद्द केल्यावर - म्हणजे 5 ऑगस्ट 2019नंतर काश्मिरी पंडितांसह एकूण 19 हिंदूंची हत्या करण्यात आली, असे आकडेवारी सांगते. त्याआधीच्या तेवढ्याच कालखंडात 17 हिंदूंची हत्या करण्यात आली. या आकडेवारीत पुलवामात बळी गेलेल्या वा अन्यत्र मारल्या गेलेल्या सुरक्षा रक्षकांचा समावेश नाही.
 
 
हायब्रीड दहशतवादी
 
गेल्या काही महिन्यांमध्ये ‘हायब्रीड’ दहशतवाद्यांचे प्रमाण खोर्‍यात वाढल्याचे सांगण्यात येते. हे दहशतवादी कोण? तर दहशतवादी म्हणून त्यांची ओळख झालेली नाही. ते दहशतवादी संघटनांचे सदस्यही नाहीत, पण त्यांच्याकडून काम करवून घेतले जात असते. पोलिसांमध्ये वा गुप्तचर खात्याकडे त्यांची नोंद नाही, असे हे दहशतवादी प्रत्यक्षात समाजात मिळून मिसळून राहतात. मध्येच केव्हातरी डोके वर काढून दहशतवादी कृत्यात सहभागी होतात आणि कोणताही धागा मागे न ठेवता परत मागे फिरून समाजात वावरतात. जे दहशतवादी कारवाया करू शकतात, पण ज्यांनी आजवर कोणतेही दहशतवादी कृत्य केलेले नाही, असे तरुण निवडून पाकिस्तानी हस्तकांनी दहशतवादी कारवायांसाठी त्यांची मानसिकता तयार केली आहे. ‘हायब्रीड’चा अर्थ लावायचा झाला तर हे ‘संकरित’ दहशतवादी आपले नित्याचे जिणे जगत असतात आणि त्यांना जर तुम्ही बाजारात किंवा बागेत भेटलात तर ते दहशतवादी आहेत, अशी पुसटशीही शंका तुम्हाला येणार नाही. ते त्यांच्या घरातून काम करत राहतात, तेव्हा त्यांच्या आसपासच्यांनाही त्यांच्याविषयी काहीही शंका येत नाही. ते महाविद्यालयांमध्ये शिकणारे पण ज्यांचे अशा पद्धतीचे ‘परिवर्तन’ झालेले आहे असाच एक नवा वर्ग या मार्गाने चालल्याचे दिसते आहे. स्वाभाविकच त्यांना शोधून त्यांचा छडा लावणे अवघड झाले आहे. 2021मध्ये या संकरित दहशतवाद्यांनी अतिशय सौम्य अशा व्यक्तींना लक्ष्य केले होते - म्हणजे सुट्टीवर किंवा रजेवर असलेले सुरक्षा कर्मचारी, नागरी कर्मचारी, सर्वसाधारण जीवन जगणारे असे सामान्यजन यांना त्यांनी निवडले होते. मारल्या गेलेल्यांमध्ये काही राजकीय कार्यकर्तेही होते. आपल्या शेजारच्याच घरात असा एखादा दहशतवादी राहतो आहे याची त्या मारल्या गेलेल्याला कल्पनाही असत नाही. पण त्याला मारणार्‍या दहशतवाद्याला त्याची इत्थंभूत माहिती पुरवली गेलेली असते. तो कोणत्या वेळी घरात असतो इथपासूनची ही माहिती असते. ज्या बँक कर्मचार्‍याला मारण्यात आले, त्याच्याबद्दलची माहिती त्याच्याच सहकार्‍याकडून किंवा आसपासच्यांकडून दिली गेली असली पाहिजे, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे.
 


jamu kashmir 
 
 
 
नवी शस्त्रास्त्रे
 
 
हे नवे दहशतवादी एके-47चा वापर करत नाहीत. त्यांचे लक्ष्य एखाददुसर्‍या व्यक्तीपुरतेच असल्याने ते पिस्तुलांचा वापर करतात. ही पिस्तुले त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे काम पाकिस्तानच्या ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ या लष्करी गुप्तचर संघटनेकडून करण्यात येत असते. त्याही पलीकडे पाकिस्तानकडून नवनवीन स्फोटकांचा वापर केला जातो, तो वेगळाच. पाकिस्तानसाठी काम करणार्‍या दहशतवाद्यांकडून हा वापर होत असतो. अगदी अलीकडे कठुआमधल्या जनतेने पाकिस्तानच्या बाजूने एक ड्रोन येत असल्याचे पाहिले. त्यांनी तसे सुरक्षा यंत्रणांना कळवले. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने ते पाडले, तेव्हा त्या ड्रोनमध्ये अनेक स्फोटकांचा साठा असल्याचे उघड झाले. त्यातच काही ‘स्टिकी बाँब’ उर्फ चिकटे बाँब होते. ते कोणत्याही वाहनाच्या मागे चिकटवून त्या वाहनास उडवून देता येऊ शकते. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये आणि इराकमध्ये असे बाँब वापरले होते. इराणी दहशतवाद्यांनी नवी दिल्लीमध्ये 2012मध्ये इस्रायली राजकीय प्रतिनिधीला संपवण्यासाठी अशा तर्‍हेचा बाँब सर्वप्रथम वापरला होता. हे असे चिकटे बाँब जर काश्मीरमध्ये आता येऊन दाखल झाले असतील, तर भविष्यात काय घडेल हा प्रश्नच आहे. सुदैवाने दहशतवादी संघटना अजून तरी पर्यटकांना लक्ष्य करत नाहीत, हे आपणा सर्वांचेच भाग्य होय. आता अगदी लवकरच अमरनाथची यात्रा सुरू होईल. सरकारने अजून तरी या यात्रेवर बंदी घातलेली नाही. स्वाभाविकच कोरोनानंतरच्या काळात खुल्या वातावरणात ही यात्रा होऊ दिली, तर तिचा ताण सर्वस्वी सुरक्षा यंत्रणांवरच पडणार आहे. या वर्षी ही यात्रा 30 जूनला सुरू होईल आणि 11 ऑगस्ट रोजी संपेल.
 
 
अलीकडच्या काळात 1 मे रोजी दोघा ‘हायब्रीड’ दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी हँडग्रेनेड्स, दारूगोळा, पिस्तूल आणि दहशतवादी कारवायांमध्ये वापरले जाणारे काही साहित्य हस्तगत केले. हे दहशतवादी कुलगाम आणि श्रीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये राहणारे होते. बांदिपुरामध्ये 8 मे रोजी आणखी दोन दहशतवादी पकडण्यात आले. ते हिज्बुल मुजाहिदीन संघटनेशी संबंधित होते. नाकेबंदीच्या काळात ते दोघेही आपली ओळख लपवत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांची चौकशी करायला घेतली, तेव्हा त्यांच्याकडून बरीच माहिती उपलब्ध झाली. त्यांनी नाकेबंदीला चुकवून पळून जाण्याचाही प्रयत्न केलेला होता. आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे, तो सुरक्षा यंत्रणांच्या अपेक्षेबरहुकूम होता. अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य माघार घेतल्यावर अमेरिकेने तिथे जी शस्त्रास्त्रे टाकून दिली, त्यापैकी अनेक शस्त्रे अलीकडे पकडण्यात आलेल्या या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आली आहेत. 15 फेब्रुवारी 1989 रोजी तेव्हाच्या कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यावर असेच दृश्य आपल्याला पाहायला मिळाले होते. तेव्हाही सोव्हिएत सैन्याविरुद्ध वापरण्यासाठी तथाकथित अफगाण ‘मुजाहिदीनां’ना अमेरिकेने जी शस्त्रास्त्रे पुरवली होती, त्यातील बरीचशी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये सहा दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी विविध कारवायांमध्ये ठार केले. त्यांच्याकडून मिळवण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये एम4 कार्बाइन रायफली सापडल्या. त्या अमेरिकन बनावटीच्या आणि अफगाणिस्तानमध्ये वापरलेल्या होत्या. अनेक दहशतवादी एम249 स्वयंचलित रायफली, 509 ‘टॅक्टिकल गन्स’, एम1911 पिस्तुले आणि एम4 कार्बाइन रायफली वापरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही सर्व शस्त्रास्त्रे अफगाणिस्तानमध्ये तालिबानांकडून खुलेआम बाजारामध्ये विकली जात आहेत. पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना ती शस्त्रास्त्रे विकत घेत आहेत आणि त्यांना भारतात काश्मीरच्या सरहद्दीवर पाठवले जात आहे.


jamu kashmir
 
 
 
 
काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न
 
 
काश्मीरमध्ये पंडित आणि बाहेरून आलेले श्रमजीवी यांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात असल्याचे पाहून केंद्रानेही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याचे स्वरूप येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. काश्मीरसाठी लागू करण्यात आलेले 370वे कलम आणि 35-अ कलम हटवल्यानंतर काही काळ परिस्थिती बरी होती. तिच्याकडे पाहून काश्मीरमधला पर्यटन व्यवसायही फुलायला लागला होता. काश्मीरमध्ये जाऊन आलेले सांगत होते की, श्रीनगरच्या लाल चौकात प्रथमच राष्ट्रध्वज फडकताना पाहून आम्हाला अवर्णनीय असा आनंद मिळाला. वातावरणात गेल्या 20 वर्षांमध्ये प्रथमच बदल झाल्याचे त्यांना जाणवले. बातम्या तशा उत्साहवर्धक होत्या. तेवढ्यात एका बँक कर्मचार्‍याला मारण्यात आल्याची बातमी आली. एकामागोमाग एक घटना घडत गेल्या आणि या स्थितीने पुन्हा एकदा स्फोटक वळण घेतले असल्याचे उघड झाले. ज्या पंडितांनी विस्थापित होऊन आपली घरेदारे सोडून जम्मूत किंवा भारताच्या अन्य भागात पलायन केले, ते काश्मीरच्या खोर्‍यात परत यावेत यासाठी मोदी सरकारने योजलेल्या उपायांमध्ये त्यांच्या पुनर्वसनाच्या काही योजना जाहीर केल्या. त्यात घरटी तरुणास वा तरुणीस प्रत्येकी 12 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यांचे पूर्ण वा अर्धवट उद्ध्वस्त झालेले घर परत बांधून घेण्यासाठी प्रत्येकी साडेसात लाख रुपये मदत देण्यात येत असते. जे घर वापरात नाही तेही परत उभारण्यासाठी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येत असते. गृहबांधणी संस्थांमध्ये घर घेण्यासाठी वा अशा संस्थांचे सदस्यत्व मिळवून घरांचे बांधकाम करण्यासाठीही साडेसात लाख रुपयांची मदत दिली जाते. ही मदत पुरेशी नाही, याची कल्पना असल्याने त्यांना बँकांमार्फत कमी व्याजदराने कर्जही उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन काही पंडित कुटुंबे माघारी परतली, काही माघारी परतण्याच्या तयारीत आहेत, हे लक्षात घेऊन पाकिस्तानने अशा ‘हायब्रीड’ दहशतवाद्यांना हाताशी धरून पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
 
 
केंद्र सरकारने आतापर्यंत चार हजार पंडितांना काश्मीरच्या खोर्‍यात नोकर्‍या उपलब्ध करून दिल्या आहेत. काश्मीरमध्ये विकासाच्या कामांनीही जोर घेतलेला आहे. त्यामुळेही पाकिस्तानची पोटदुखी वाढलेली आहे. देशभर विखुरलेल्या काश्मिरी पंडितांची संख्या लक्षात घेता केवळ एक टक्का पंडित परतलेले आहेत, असे म्हणता येईल. ते परततील आणि आपल्या नोकर्‍यांवर गदा येईल, या किंवा आपल्याला येथून काढता पाय घ्यावा लागेल, अशा प्रचारास खोर्‍यात असणारे मुस्लीम बळी पडत असल्याचे दिसते आहे. ते अस्वस्थ आहेत. त्याने काही तरुणांची माथी भडकवली गेली आहेत. दहशतवाद्यांनी अलीकडेच एका हिंदू सोनाराचा बळी घेतला. तसेच श्रीनगरमध्ये प्रसिद्ध ‘बिंद्रू मेडिकल शॉप’ चालवणारे माखनलाल बिंद्रू यांची हत्याही याच गैरसमजुतीतून घडवण्यात आली असली पाहिजे, असे सुरक्षा यंत्रणांना वाटते. या हत्या हेतुत: घडवल्या जात आहेत आणि त्या पाकिस्तानच्या इशार्‍यांवर केल्या जात आहेत. मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, डॉ. फारूख अब्दुल्ला यांच्यापासून काही महिन्यांपूर्वी निधन पावलेले सैद अली शाह गिलानी, यासिन मलिक यांच्यापर्यंत प्रत्येकाने पंडितांनी खोर्‍यात परतावे यासाठी आवाहन केले होते. यामध्ये दोन्ही अब्दुल्लांची सरकारे येऊन गेली आणि मेहबूबाही सत्तेवर होत्या, पण त्यांनी पंडितांसाठी एकही पाऊल उचलल्याचे दिसले नाही. त्यांना कोणी अडवणार नाही, असे ते सगळेच सांगत होते, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळ्याच दिशेने जात होती. आता गेल्या एक-दोन वर्षांत परतलेल्या पंडितांमध्ये घबराट निर्माण झाली की ते परत एकदा देशाच्या अन्य भागात विखुरले जातील आणि मग आपल्या मतपेढीवरही परिणाम होणार नाही, या हेतूने राजकीय मंडळी या दहशतवाद्यांमागे आपला चेहरा लपवत आहेत.
 
 
अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न

भोपाळमध्ये दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले होते की, नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या आठ वर्षांच्या काळात त्यांनी महत्त्वाच्या तीन प्रश्नांवर कायमस्वरूपी मात केली. हे प्रश्न अर्थातच काश्मीरमधला दहशतवाद, डाव्या नक्षलवाद्यांचे थैमान आणि मादक पदार्थांची ने-आण, तसेच ईशान्येत चालणारे सशस्त्र हल्ले. गेल्या अनेक वर्षांपासून असलेले हे प्रश्न अंतर्गत सुरक्षेला मोठे आव्हान होते. अमित शाहांनी पाठ थोपटून घेतल्यावर लगेचच पुढल्याच महिन्यात काश्मीरच्या खोर्‍यात सरकारला आव्हान वाटावे असे दहशतवादी हल्ले सुरू झाले. सरहद्दीपलीकडून त्याचे नियोजन होत होते, यात काडीमात्र संदेह नाही. अमित शाह यांच्यासारख्या व्यक्तीला आव्हान वाटावे असे हे हल्ले आहेत, हे नाकबूल करता येणार नाही. दक्षिण आशियाच्या दहशतवादासंदर्भात एक पोर्टल आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार 26 मे 2014 रोजी जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्या वर्षी 5 हजार 944 जण दहशतवादाचे बळी पडले होते. त्यात 1140 हे सुरक्षा रक्षक होते. 3 हजार 346 दहशतवादी किंवा घुसखोर होते. 8 जण हे अज्ञात वर्गापैकी होते. आदल्या वर्षी, म्हणजे 2013मध्ये 11 हजार 200 दहशतवादाचे बळी होते. त्यात 3 हजार 883 सामान्य नागरिक होते. 1950 सुरक्षा रक्षक होते, तर 5 हजार 159 दहशतवादी आणि घुसखोर होते. 208 जण कोणत्याच वर्गात न मोडणारे होते; म्हणजेच ते दहशतवादी नसतील, पण ते सामान्य नागरिकही नसण्याची शक्यता आहे. 2013पासून 2022पर्यंत दहशतवादग्रस्त जिल्ह्यांची संख्या 103वरून 68वर आली. यात नक्षलवादग्रस्त जिल्हे आहेत. या पोर्टलने दिलेली आकडेवारी हिंसाचारग्रस्त भागांची असून 2013 आणि 2021 या वर्षांची तुलनाही करण्यात आली आहे. ईशान्येतील हिंसाचारग्रस्त 20 जिल्ह्यांत 2013मध्ये 253 जणांचे बळी गेले होते. त्याच भागात 2021मध्ये 38 जिल्ह्यांतून 72 बळी गेले होते. 2013मध्ये 47 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचे एकूण बळी 418 होते, तर 2021मध्ये 33 जिल्ह्यांत 237 बळी गेले. जम्मू आणि काश्मीरमध्ये 2013मध्ये 14 जिल्ह्यांत 172 बळी गेले, तर 2021मध्ये 13 जिल्ह्यांत 274 बळी गेले. म्हणजेच नक्षलवाद, ईशान्येतला हिंसाचार आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेला दहशतवाद समूळ उखडून टाकण्यात आला, असे म्हणता येत नाही. तसे विधान कोणीही केलेले नाही, आणि तसे समूळ नष्ट केले जाणे सहज शक्यही नाही. विशेषत: कलम 370 हटवण्याच्या अत्यंत धाडसी निर्णयानंतर दहशतवाद आपोआपच हटेल ही राज्यकर्त्यांचीही अपेक्षा नव्हती, तरीही तो आटोक्यात आणण्यासाठी जबरदस्त प्रयत्न केले जाणे गरजेचे होते आणि तसे केले जात आहेत यात शंका नाही. अगदी आताच्या काळात जो काश्मीरमध्ये दहशतवाद वाढलेला दिसतो, त्याची कारणे आपण तपासून घेतली पाहिजेत. मात्र पूर्वी तो नव्हता आणि आताच तो एकदम उद्भवला आहे असे जे सांगत आहेत, त्यांच्यासाठी वरील आकडेवारी पुरेशी आहे असे वाटते. काश्मीरपुरता प्रश्न हा आहे की, तिथल्या जनतेला सातत्याने प्रचाराच्या चरकात घालून पिळून काढले जाते, त्यावर मलमपट्टी केली जाण्याची आणि ज्यांच्या प्रचारमोहिमा आहेत त्यांना धडा शिकवायची जास्त गरज आहे. आपण मुख्य प्रवाहापासून दूर फेकले जात आहोत, असे एका समाजाला वाटणेही चुकीचे आहे.
 
  
‘जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट’चा प्रमुख यासिन मलिक याला गेल्या महिन्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. हे त्याचे प्रकरण दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याचे असल्याने त्याला खास न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली नाही. ही संघटना म्हणजे काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या ‘जम्मू आणि काश्मीर प्लेबिसाइट फ्रंट’ची दुसरी फळी. ‘जेकेएलएफ’ची स्थापना प्रत्यक्षात अमानुल्ला खानने केली. यासिन मलिक हा त्या संघटनेचा भारतीय चेहरा. त्याने न्यायालयात आपले गुन्हे जरी कबूल केले असले, तरी त्याने गेल्या काही वर्षात आपण अगदी साध्या आणि गांधीवादी सरळ मार्गाने चाललो आहोत, असे जे न्यायालयात सांगितले, ते ढोंगीपणाचे होते. तो स्वत:ला शांततावादी म्हणवून घेतो हे सर्वाधिक हास्यास्पद आहे. यासिन मलिकला शिक्षा झाल्यावर काश्मीरच्या खोर्‍यात गडबड होईल आणि काहीतरी भयंकर घडेल, असे जे वाटत होते ते मात्र चुकीचे ठरले. मलिकला फाशी होणार, असे आधीपासूनच जाहीर करणार्‍या प्रसारमाध्यमांनी हे वातावरण तयार केले होते, ही वस्तुस्थिती. त्यांनीच काश्मीर पुन्हा स्फोटक बनेल असे आधीच जाहीर करून टाकले होते. मलिकला जन्मठेप झाल्याचे जाहीर होताच माध्यमेही एकदम चिडीचूप झाली. गल्लीबोळातून तुरळक दगडफेक झाली, पण ती लाल चौकाच्या परिसरापुरतीच मर्यादित होती. सांगायचा मुद्दा हा की, परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, पण ती पुन्हा वेगळे वळण घेणार नाही हे डोळ्यात तेल घालून पाहणे गरजेचे आहे.