राष्ट्रकारणाची आठ वर्षे

विवेक मराठी    10-Jun-2022   
Total Views |
राष्ट्रजीवनात आठ वर्षांचा कालखंड फार मोठा नसला, तरीही नगण्य आहे असे समजण्याचे कारण नाही. या आठ वर्षांत देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांप्रदायिक सूची पूर्णपणे बदलण्याचे काम झालेले आहे. गाडी आता रिव्हर्स गियरमध्ये जाणार नाही. सगळ्याच राजकीय पक्षांना आणि नेत्यांना नवभारताच्या आकांक्षा लक्षात घेऊनच मार्गक्रमण करावे लागेल. नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील राष्ट्रकारण घडवून आणलेले आहे, हा आमच्या मते सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे.
 
modi
नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येऊन मे 26ला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. संख्याशास्त्रात आठ हा आकडा शक्तीचे प्रतीक मानला जातो. आठ हा आकडा हे दाखवितो की येणारे दिवस सुखाचे आणि आनंदाचे असतील. संपत्ती देणारा हा आकडा आहे. आध्यात्मिकदृष्ट्यादेखील आठ या आकड्याचे महत्त्व आहे. आठ हा आकडा आध्यात्मिक अंतर्मुखता देऊन जीवनात परिवर्तन घडवून आणतो. अशा प्रकारे आठ या आकड्याचे महत्त्व सांगितले जाते. देवकीचा आठवा पुत्र कृष्ण आहे आणि या आठव्या पुत्राचा पराक्रम आपल्या सर्वांना माहीत आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ वर्षे सत्तेवर आहेत. एकही दिवस त्यांनी सुट्टी घेतलेली नाही. कर्म हीच त्यांची विश्रांती. जे कर्म त्यांच्या भाग्यात आलेले आहे, ते कर्म ते निष्काम भावाने करीत आहेत. कुणाच्या रागाची किंवा लोभाची, कुणाच्या प्रशंसेची किंवा टीकेची ते चिंता करीत नाहीत. त्यांचे चित्त सम आहे. त्यावर निंदा-स्तुतीचा काहीही परिणाम होत नाही. त्यांनी रागवावे आणि काहीतरी उलटसुलट बोलावे असे प्रयत्न गेल्या आठ वर्षांत अनेक झाले आणि अनेक वेळा झाले. ‘मोदी मौन का?’ असले प्रश्नही अनेक जणांनी विचारले. अशा प्रश्नांना मोदींनी कधीही उत्तर दिले नाही. प्रश्न करणार्‍यांचे हेतू काय आहेत, हे ते चांगल्या प्रकारे जाणून आहेत.
 
 
त्यांनी शाब्दिक उत्तरे दिली नाहीत, पण त्यांच्या कृतीची उत्तरे शब्दांपेक्षादेखील अधिक बोलकी आहेत. सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट हल्ला, घटनेचे 370 कलम रद्द करणेे, नागरिकत्व कायदा, अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन, तीर्थक्षेत्र काशीला उत्तम दर्जा प्राप्त करून देणे ही सर्व त्यांची उत्तरे आहेत. ही उत्तरे देशातील अशिक्षितांपासून सुशिक्षितांपर्यंत सर्वांना उत्तम समजतात. त्यांना शाब्दिक उत्तरे ऐकण्यात काहीही रस नसतो. शब्दाचे बुडबुडे सोडण्यात अनेक राजकारणी आपली हयात घालवितात. महाराष्ट्रात शिवसेनेत असे कोण आणि भाजपातील असे कोण, यांची नावे आपल्या सर्वांना माहीत आहेत. या दोघांच्या शर्यतीत आम्हीदेखील मागे नाही, असे अनेक राष्ट्रवादीचे नेतेदेखील रोज बडबड करून सांगतात. मोदींची गणना या बडबड्या लोकांत होत नाही. मोदी हे कृतिशील नेता आहेत.
 
 
 
सत्तापरिवर्तन 2014 साली झाले, तेव्हा गार्डियन पत्राने म्हटले की, ‘खर्‍या अर्थाने इंग्रज भारत सोडून गेले, असे म्हणायला पाहिजे.’ हे परिवर्तन म्हणजे लोकशाही मार्गाने झालेली वैचारिक क्रांती आहे. तिचे आकलन किती लोकांना झाले, हा प्रश्न वेगळा. परंतु 2014चे सत्तांतर हे एक पंतप्रधान जाऊन त्याच्याजागी दुसरा पंतप्रधान आला, तेवढ्यापुरते मर्यादित नाही. पं. नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान. त्यांची कारकिर्द फार मोठी. त्यांची लोकप्रियता अफाट. त्यांना एक दृष्टी होती. नवभारताचे स्वप्न त्यांच्यापुढे होते. परंतु शिक्षणाने आणि संस्काराने ते इंग्रजच होते. त्यामुळे भारतीय सनातन विचार काय आहे, आपली मूल्यपरंपरा काय आहे आणि सत्तेच्या माध्यमातून तिचे संवर्धन कसे करायचे, हे त्यांना जमले नाही. त्यामुळे त्यांचे शासन खर्‍या अर्थाने शंभर टक्के भारतीयांचे शासन निर्माण होऊ शकले नाही.
 
 
 
पंतप्रधान मोदींचे तसे नाही. त्यांचे शिक्षण भारतातच झाले आणि संघात त्यांच्यावर देशभक्ती, राष्ट्रसंस्कृती, राष्ट्राचा मूल्यविचार, राष्ट्रीय लक्ष्य, याचे सर्व संस्कार झाले. संघाचे ते प्रचारक होते. प्रचारक म्हणूनच त्यांना भाजपात पाठविण्यात आले. इथून त्यांच्या राजकीय प्रवासाला प्रारंभ झाला. राजकीय जीवनात ‘मला संघविचार रुजवायचा आहे’ या बाबतीत त्यांच्या मनात कसलीही शंका नव्हती. संघविचार म्हणजे राष्ट्र प्रथम, जे काही करायचे ते राष्ट्रासाठी. राष्ट्र म्हणजे भूमी, जन आणि संस्कृती. राजकारणात सर्व जणांचा विचार करायचा. त्यांची धर्मगटात किंवा जातीत विभागणी करायची नाही. भूमीचे रक्षण आणि संवर्धन करायचे. ही भूमी सुजलाम, सुफलाम भूमी आहे. तिचे स्वरूप तसेच ठेवायचे. ही आपली मातृभूमी आहे. तिची सेवा आपल्याला करायची आहे. संस्कृतीचे संवर्धन करून ही सेवा करायची आहे.
 
 
modi
 
आपली संस्कृती म्हणजे मानवामध्ये दैवत पाहण्याची वृत्ती आहे. प्रत्येक मनुष्य हा परमेश्वराचेच एक छोटे रूप आहे असे मानून नरसेवा हीच नारायणसेवा हा भाव जगायचा. नरेंद्र मोदी हे करत आलेले आहेत. त्यांच्या राजकीय टीकाकारांना हे समजत नाही किंवा दिसत नाही. त्यांच्या समजशक्तीच्या मर्यादेला आपण काही करू शकत नाही आणि दृष्टिदोषालाही आपल्याकडे काही उपाय नाही. आपल्या संस्कृतीची शिकवण अशी आहे की, हे सर्व विश्व एक कुटुंब आहे. पृथ्वी आपली माता आहे, म्हणून आपण म्हणतो वसुधैव कुटुंबकम्. सर्व मानवजात एक आहे. मानवजातीचे प्रश्न सारखे आहेत. अज्ञान, भूक, परस्पर ईर्ष्या, द्वेष, गरिबी, पर्यावरण र्‍हास, ऊर्जा संकट हे सगळे मानवजातीचे प्रश्न आहेत.
 
 
 
नरेंद्र मोदी, भारतमातेचे सुपुत्र या नात्याने जगातील मानवसमूहाला संबोधन करतात. त्यांचे विदेश दौरे हे ‘विदेश पर्यटन दौरे’ नसतात. हे दौरे ‘विश्वमानवाला भातृत्वाच्या भावनेने आलिंगन देण्यासाठी’ केलेले असतात. आम्ही केवळ भारताचा विचार करणारे नसून संपूर्ण मानवजातीचा विचार करणारे आहोत, तुम्ही आम्हाला परके नाहीत, आपण सर्व एका चैतन्याची विविध रूपे आहोत, हा भारतीय विचार नरेंद्र मोदी सर्व जगभर घेऊन जातात. स्वातंत्र्यानंतर हे काम पहिल्या वर्षापासून सुरू व्हायला पाहिजे होते. आपल्या संविधान सभेत आपल्या वैश्विक भूमिकेविषयी अनेक सन्माननीय सभासदांनी फार श्रेष्ठ विचार मांडलेले आहेत. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे, का तर जगातील सर्व मानवांना सुखी करण्यासाठी स्वातंत्र्य हवे आहे, हा भारताचा सनातन आवाज आहे. परराष्ट्र नीतीमध्ये नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी घाबरत घाबरत त्याचे प्रकटीकरण होत गेले. नरेंद्र मोदी मान खाली करून नाही किंवा नजर उंच करून नाही, तर डोळ्याला डोळा भिडवून परदेशातील सशक्त राजनेत्यांशी संवाद करतात.
 
 
हे आत्मबल त्यांना दोन कारणांनी प्राप्त झालेले आहे. पहिले कारण असे की, संघाचा मूलगामी विचार त्यांनी पूर्णपणे आत्मसात केलेला आहे आणि दुसरे कारण असे की, या विचारापुढे त्यांनी स्वत:ला पूर्णपणे समर्पित केलेले आहे. विचार आणि समर्पण यांच्या संयोगातून साधना निर्माण होते आणि साधनेतून आपोआप काही सिद्धी प्राप्त होतात. सिद्धीसाठी साधना करायची नसते. साधनेचे आनुषांगिक फळ म्हणजे सिद्धी आहे.
 
 
 
नरेंद्र मोदी यांना वाणीची सिद्धी प्राप्त झालेली आहे. त्यांचे भाषण किंवा संभाषण ऐकणार्‍याच्या मनावर खोलवरचा परिणाम करून जाते. जनमानसाचे अंतरंग जाणण्याची शक्ती त्यांना प्राप्त झालेली आहे. सर्वसामान्य जनतेला काय हवे आहे, हे त्यांना उत्तम समजते. योग्य वेळी योग्य ती कृती करण्याची शक्तीदेखील त्यांना प्राप्त झालेली आहे. त्यांची निर्णयक्षमता अफाट आहे. अशी सर्व गुणसंपदा ज्याच्याकडे आहे, त्याला विजय प्राप्त होत असतो. म्हणून नरेंद्र मोदी विजय देणारे नेता झालेले आहेत, हीदेखील त्यांची मोठी अंगभूत शक्ती झालेली आहे.
 
 
राष्ट्रजीवनात आठ वर्षांचा कालखंड फार मोठा नसला, तरीही नगण्य आहे असे समजण्याचे कारण नाही. या आठ वर्षांत देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांप्रदायिक सूची पूर्णपणे बदलण्याचे काम झालेले आहे. गाडी आता रिव्हर्स गियरमध्ये जाणार नाही. सगळ्याच राजकीय पक्षांना आणि नेत्यांना नवभारताच्या आकांक्षा लक्षात घेऊनच मार्गक्रमण करावे लागेल. राजकीय विश्लेषक, नेते मोदींच्या राजकारणाला हिंदुत्वाचे राजकारण म्हणतात आणि हिंदुत्व शब्द आल्याबरोबर गेल्या सत्तर वर्षांत या शब्दाला ज्या हीन भावना चिटकवलेल्या आहेत, त्यांची उजळणी सुरू होते. नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारण करतात, म्हणून जी काही चर्चा करायची असेल ती राष्ट्रीय या शब्दाभोवतीच केली पाहिजे. हे एक राष्ट्र आहे, हे सनातन राष्ट्र आहे, हे राष्ट्र सबळ असले पाहिजे आणि या राष्ट्राचे एक जागतिक लक्ष्य आहे, याचे भान सर्वांना असले पाहिजे. आठ वर्षांत किती आर्थिक बदल झाले, किती लाख किलोमीटर रस्त्यांचे काम झाले, उत्पादनात किती वाढ झाली, गरिबांच्या कल्याणकारक योजना कोणत्या, असे अनेक विषय असले तरी नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील राष्ट्रकारण घडवून आणलेले आहे, हा आमच्या मते सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे.
 
 
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.