चिंतातुर पृथ्वीराज चव्हाण

विवेक मराठी    05-May-2022   
Total Views |
congress
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाविषयी आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या भाजपा शासनाविषयी काही मते व्यक्त केली आहेत. ही मते जर अन्य कुणी काँग्रेस नेत्याने व्यक्त केली असती, तर ‘शुभ बोल रे नार्‍या’ असे बोलून त्याकडे दुर्लक्ष करता आले असते. ज्यांचे तोंड सतत अभद्रवाणीच बोलत असते, त्याची गंभीरपणे दखल घेण्याचे काही कारण नसते. पृथ्वीराज यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी  केल्याने त्याची दखल घेणे अपरिहार्य आहे...
पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. यूपीएच्या काळात केंद्र सरकारामध्ये ते मंत्री होेते. सध्या महाराष्ट्रात जी साठमारी चालू आहे, त्यात ते कोठेच नसतात. ते काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेसचे एक नेते म्हणून ते महाराष्ट्रातील राजकीय शिमग्यात भाग घेताना दिसत नाहीत. तसा त्यांचा स्वभाव नसावा आणि राजकीय रणधुमाळीचा चिखल अंगावर घेण्याची त्यांची इच्छाही नसावी. यामुळे ते जेव्हा काही बोलतात, तेव्हा त्यांचे बोलणे गंभीरपणे घ्यावे असे वाटते.

आता त्यांनी काँग्रेस पक्षाविषयी आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या भाजपा शासनाविषयी काही मते व्यक्त केली आहेत. ही मते जर अन्य कुणी काँग्रेस नेत्याने व्यक्त केली असती, तर ‘शुभ बोल रे नार्‍या’ असे बोलून त्याकडे दुर्लक्ष करता आले असते. ज्यांचे तोंड सतत अभद्रवाणीच बोलत असते, त्याची गंभीरपणे दखल घेण्याचे काही कारण नसते. भुंकणार्‍या श्वानांची सवय करून घ्यावी लागते. पृथ्वीराज चव्हाण कारणाशिवाय बोलणारे नेते नाहीत. ते या वेळी भाजपाविषयी ते काय म्हणाले, हे प्रथम थोडक्यात बघू या.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची धार्मिक हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे.

राज्यघटनेनुसार सरकारने सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असताना मोदी सरकारचे वर्तन पाहता या सरकारचा धर्म हिंदू आहे का, असा प्रश्न पडतो.

मोदी सरकार गेल्या आठ वर्षांपासून हिंदुत्वाचे राजकारण करत असले, तरी देशातील 80 टक्के हिंदू मतदारांपैकी 30 ते 40 टक्के हिंदूच भाजपाला मतदान करतात, निम्मे हिंदू भाजपाला मतदान करीत नाहीत.

मोदी सरकारपासून लोकशाहीला धोका आहे. मोदी सरकारचा कारभार पाहता देशात लोकशाही टिकेल की नाही अशी शंका येते.
धार्मिक हुकूमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू आहे. लोकशाही टिकण्यासाठी मोदी आणि भाजपाला पर्याय देण्याची गरज आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाविषयी जशी मते व्यक्त केली, तशी काँग्रेसविषयीही मते व्यक्त केली, ती अशी -
* काँग्रेस पक्षाचे काही निर्णय चुकले. पाच राज्यांच्या निकालानंतर पक्षात नैराश्य आणि वैफल्याची भावना निर्माण झाली.
* पक्षातील परिस्थिती चिंताजनक आहे.
* गुणात्मक बदल केल्यास काँग्रेसमधील चित्र निश्चितच बदलेल.
* उत्तर प्रदेशात काँग्रेसची मते 7.5 टक्क्यावरून 2.3 टक्क्यांवर घटली.
* गेल्या चोवीस वर्षांपासून पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत.
* पूर्वी निवडणुका होत. निवडून आलेल्यांना जनतेची नाडी समजे.
* अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली होती, त्यापूर्वी ए.के. अ‍ॅन्टोनी यांच्या समितीने काही शिफारशी केल्या होत्या. दुर्दैवाने हे अहवाल थंड बस्त्यात जातात.
* आगामी निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्याकरता समविचारी पक्षांना एकत्र आणावे लागेल. त्यासाठी उत्तम समन्वयकाची पक्षाला जरुरी आहे.
* भाजपा मुस्लीमद्वेषाचे राजकारण करीत आहे. नंतर ते ख्रिस्ती धर्मीयांकडे वळतील. नंतर ते उच्च जातींच्या वर्चस्वाची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून भाजपाला आपण पर्याय दिला नाही, तर गुन्हेगार ठरू.
पृथ्वीराज चव्हाण यांची ही सर्व मते राजकीय मते आहेत, असे म्हणून ती निकालात काढता येतील, पण तसे केल्यास त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. प्रथम भाजपाविषयी त्यांनी जे मतप्रद्रर्शन केले आहे, त्याकडे वळू या.
 
भाजपा हा धार्मिक पक्ष आहे.. सर्वधर्मसमभावाचे पालन करीत नाही.. म्हणून लोकशाहीला भाजपापासून धोका आहे.. देश धार्मिक हुकूमशाहीकडे वाटचाल करतो आहे, इत्यादी त्यांची मते, नम्रपणे सांगायचे तर भाजपाच्या विचासरणीच्या अज्ञानातून निर्माण झाली आहेत. हिंदू धर्मीयांचे धर्माधिष्ठित राज्य भारतात निर्माण होणे केवळ अशक्य आहे. याचे कारण असे की, धर्माधिष्ठित राज्य होण्यासाठी सर्व हिंदूंना मान्य होईल असा एक धर्मग्रंथ हवा, उपासनेची एक पद्धती हवी, आणि धर्माचा एकमेव प्रेषित हवा. 33 कोटी देव मानणारा हिंदू कोणत्याही एका देवाला मानत नाही. सर्वांना प्रमाण होईल असा एकही हिंदू धर्मग्रंथ नाही. मग धर्माचे राज्य कशाच्या आधाराने निर्माण होणार? हिंदूंकडे हिंदू कुराण नाही, हिंदू बायबल नाही, हिंदू मार्क्सपोथी नाही. ज्याच्या रक्तातच बहुविधता आहे, तो एकाच धर्ममताची हुकूमशाही कशी निर्माण करणार?
 
 
पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपावर टीका करण्याचा जरुर हक्क आहे, परंतु त्यांनी भाजपाच्या विचारधारेचे अध्ययन केले पाहिजे. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शनाचे वाचन केले पाहिजे. विवेकानंद वाचले पाहिजेत. लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य वाचले पाहिजे. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांची संघसूत्रे वाचली पाहिजेत. ही सर्व संघविचारधारेची पायाभूत पुस्तके आहेत. भाजपा हे संघविचारधारेचे एक अंग आहे. राजसत्तेद्वारे ही विचारधारा आपल्या परीने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, हे समजून घेणे फार आवश्यक आहे. आंधळी टीका जशी वाईट, तशीच अज्ञानी टीकादेखील तेवढीच वाईट. या देशातील डावे विचारवंत, त्या विचारधारेवर पोसलेले साहित्यिक, इतिहासकार गेली कित्येक वर्षे अशी टीका करीत आहेत आणि तिरडीवर झोपेपर्यंत हे काम करीत राहतील. हिंदू माणसावर त्याचा परिणाम अत्यंत नगण्य असतो.
 
 
या देशातील हिंदू राजकीयदृष्ट्या का आणि कसा जागृत होत आहे आणि त्याला आजच्या स्थितीत आणण्यामध्ये काँग्रेसचे योगदान कोणते, हे समजल्याशिवाय काँग्रेसचे पुनरुज्जीवन होणे फार अवघड आहे. काँग्रेसचा वैचारिक इतिहास अत्यंत प्रेरणादायक (काही जण या वाक्यावर डोळे वटारतील) आहे. लोकमान्य टिळक काँग्रेसचे, त्यांचा कर्मयोग काँग्रेसचाच मानला पाहिजे. महात्मा गांधी सनातनी आणि कट्टर हिंदू होते. हिंदू जीवनपद्धती आणि जीवनमूल्ये, हिंदू तत्त्वज्ञान याबद्दल त्यांचे ग्रंथ आहेत. गांधी विरोधकांनी गांधीजींना पाकिस्तानचे निर्माते ठरवून टाकले आहे आणि काँग्रेसवाल्यांनी त्यांना मुस्लीम तुष्टीकरण नीतीचे शिल्पकार ठरवून टाकले आहे. या दोन्ही टोकांतून बाहेर पडून गांधीजींचा अभ्यास केला पाहिजे आणि तो काँग्रेसने केला पाहिजे.
 
 
बिपीनचंद्र पाल हेदेखील काँग्रेसचेच होते. लाला लजपतराय, वल्लभाई पटेल हेदेखील काँग्रेसचे, सुभाषचंद्र बोस हेदेखील काँग्रेसचे, राजेंद्रप्रसादही काँग्रेसचे, राजगोपालचारीदेखील काँग्रेसचेच. ही काही नावे एवढ्यासाठी घेतली की, हे सर्व जण मोदींसारखेच अधिक कट्टर हिंदू होते. डॉ. राधाकृष्णन यांचे पुस्तक आहे - जीवनाविषयीचा हिंदू दृष्टीकोन. हे पुस्तक म्हणजे हिंदू असणे म्हणजे काय याचा जबरदस्त उलगडा करणारे पुस्तक आहे. तेदेखील कधीतरी वाचायला पाहिजे. अशा सर्व वाचनातून आणि अभ्यासातून काँग्रेस म्हणून आपण काय होतो, याचा आत्मबोध होईल. काँग्रेसचे जे सर्वधर्मसमभावी रूप बनविण्यात आले, ते शब्दातच विसंगतीने भरलेले आहे.
 
 
congress
सर्व धर्म कधी सारखे असू शकत नाहीत. काफरांना ठार करा हे सांगणारा इस्लाम आणि हिदन लोकांना जिवंत जाळा हे सांगणारा ख्रिस्ती संप्रदाय, तसेच प्रत्येक माणूस हे ईश्वराचेच रूप आहे हे सांगणारा वेदान्त विचार हे एक कसे असू शकतील? त्यात समभाव कसा असेल? आपली राज्यघटना फक्त एवढेच सांगते की धर्माच्या आणि उपासनेच्या आधारावर राज्य नागरिकांत भेदभाव करणार नाही. प्रत्येकाला त्याच्या आवडीप्रमाणे उपासनेचे स्वातंत्र्य राहील. हा विचार राज्यघटनेत आल्यामुळे पवित्र आहे असे नाही. हा पवित्र विचार ही भारताची जीवननिष्ठा आहे आणि ती राज्यघटनेत आल्यामुळे राज्यघटना पवित्र झाली आहे. या संकल्पनेच्या निर्मितीचे श्रेय कुणाला देता येत नाही, ती आपली पाच हजार वर्षांची परंपरा आहे. ती मोडण्याची शक्ती ना मोदींत आहे, ना संघात आहे, ना भाजपात आहे, हे ज्याला समजले त्याला भाजपाची विचारधारा समजली असे म्हणावेे लागेल.
 
 
भाजपामुळे लोकशाहीला धोका असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणत असताना काँग्रेस पक्षात गेल्या चोवीस वर्षांत निवडणुका झाल्या नाहीत असेही म्हटले. जो पक्ष पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवू शकत नाही, तो पक्ष देशात लोकशाही कशी जिवंत ठेवणार किंवा लोकशाही जिवंत ठेवण्याचे दायित्व या पक्षाकडेच आहे असे कोणत्या आधारावर म्हणणार? हे असे झाले की, व्यासपीठावरून स्त्री सन्मानाची भाषणे द्यायची आणि घरी आल्यानंतर बायोकाला शिव्या घालायच्या, मुलींना अत्यंत हीन वागणूक द्यायची. अशा माणसाची भाषणे परिणामाला शून्य असतात, म्हणून देशाच्या लोकशाहीची चिंता जरूर करा, परंतु त्यापूर्वी पक्षांतर्गत लोकशाही निर्माण करा. लोकशाही, घराणेशाहीवर चालत नाही. जो पक्ष एका घराण्याची बटीक झालेला आहे, तो पक्ष कोणत्या तोंडाने लोकशाही रक्षणाची भाषा करणार? म्हणून प्रथम लोकशाही मार्गाने पक्षाध्याक्ष निवडून आणला पाहिजे. अमित शहा एका बूथवर कार्य करणारे कार्यकर्ते होते, ते नंतर पक्षाचे अध्यक्ष झाले. हे काँग्रेसमध्ये शक्य आहे का? पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रश्नाचा विचार केला पाहिजे.
 
 
या देशातील हिंदू जागृत झालेला आहे. राजकीयदृष्ट्या तो आग्रही आणि मुखर झालेला आहे. याचे कारण असे की, काँग्रेसने सत्तर वर्षांच्या काळात पोटभर मुस्लीम तुष्टीकरण केले. ख्रिश्चन मिशनर्‍यांना भारत मोकळा करून दिला. हिंदू देवस्थाने ताब्यात घेतली. हजला सबसिडी दिली आणि हिंदू यात्रांवर कर बसविले, अशी यादी खूप मोठी आहे. कधीतरी असा विचार करायला पाहिजे होता की, ही तुष्टीकरण नीती आपल्याला महागात पडेल. काही लोकांना काही काळ ठकविता येते, सर्व लोकांना काही काळ ठकविता येते, परंतु सर्व लोकांना तुम्ही सर्व काळ ठकवू शकत नाही. रामजन्मभूमी मुक्तिआंदोलन खूप गहन अभ्यासाचा विषय आहे, तो डाव्या लेखकांच्या लेखांनी समजणार नाही. हे सर्व लेखक भारत समजण्याच्या दृष्टीने घोर अज्ञानी आहेत आणि म्हणून त्यांचे अज्ञानमूलक लेखन काहीही विचार करण्याच्या लायकीचे नसते. दुर्दैवाने काँग्रेसची सगळी मंडळी नेहरू, इंदिरा गांधींच्या काळापासून अंगावर खादी, डोक्यात डावी विचारसरणी असे झालेले आहे. त्यांनी डोक्यातील डावी विचारसरणी काढून तिथे टिळक-गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांना आणले पाहिजे.
 
 
असे झाले, तर एक दृष्टी प्राप्त होईल. जी दिव्य दृष्टी असेल. मार्ग दिसेल आणि काय करायला पाहिजे याचे सम्यक आकलन होईल. पृथ्वीराज चव्हाण यांचे विचार ऐकल्यानंतर मनात जे विचारतरंग उठले, ते इथे शब्दबद्ध केले आहेत.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.