असंतोष टोकदार केला पाहिजे

विवेक मराठी    20-May-2022   
Total Views |
अडीच-तीन वर्षांच्या काळात ठाकरे सरकार अनेक प्रकारच्या विवादात सापडलेले आहे. सरकारचे मंत्री तुरुंगात आहेत. विकासाच्या नावाने सर्व भक्कास होत आहे. मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होमला प्रधान्य देत असल्याने जनतेत प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेचा विविध प्रकल्पांना विरोध आहे. त्यामुळे तरुणवर्ग रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने नाराज आहे. त्यामुळे सरकारबद्दल जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या असंतोषाचेे प्रचंड मोठे शस्त्र विरोधकांकडे आहे. ते शस्त्र टोकदार केले पाहिजे...

bjp
महाविकास आघाडी शासनाबद्दल, आघाडीत सामील झालेल्या पक्षांचे कार्यकर्ते खूश आहेत. विरोधी बाकावर बसलेले भाजपाचे कार्यकर्ते नाखूश आहेत. सत्ताधारी आणि विरोधी याशिवाय आणखी लहानसहान पक्ष आहेत, त्यांच्या भूमिका वारा फिरेल तशा पाठ फिरविणार्‍या असतात. सत्तेवर बसणार्‍या पक्षांना असे वाटते की, आपले शासन चंद्र-सूर्य असेपर्यंत राहावे आणि विरोधी बाकावर बसलेल्या पार्टीला असे वाटते की लवकरात लवकर या शासनाची अमावस्या व्हावी. सत्तेत असलेले आणि नसलेले यांच्या या भावना चिरस्थायी असतात. विरोधी बाकावर बसलेले उद्या सत्तेवर आले, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना वर दिल्याप्रमाणेच राहतील. सामान्य माणूस काय विचार करतो? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा.

ठाकरे सरकारबद्दल सामान्य माणसाच्या मनात तीव्र नाराजी आहे. ठाकरे सरकार अधिकारावर येऊन जवळजवळ तीन वर्षे होत आली आहेत. या तीन वर्षांत लोकांच्या नजरेत येईल, असे एकही काम ठाकरे शासनामार्फत झालेले नाही. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईत मेट्रो रेल्वेचे काम फडणवीस शासन असताना सुरू झाले. ठाकरे शासनात या कामाची कासवगती झाली. आतापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन मेट्रो धावायला पाहिजे होती. मेट्रो धावण्याऐवजी तोंडाचे पट्टे मात्र वेगाने धावतात.


bjp 

या अडीच-तीन वर्षांच्या काळात ठाकरे सरकार अनेक प्रकारच्या विवादात सापडलेले आहे. सचिन वाझे प्रकरण, कंगना राणावत प्रकरण, अनिल देशमुख आणि त्यांची तुरुंगवारी, नवाब मलिक आणि त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध, सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू, नवनीत राणा दांपत्यांवर राजद्रोहाचा आरोप लावून तुरुंगात टाकणे, रिपब्लिकन टीव्हीचे अर्णव गोस्वामी यांना तुरुंगात टाकणे, नारायण राणे यांना अटक अशी एकामागोमाग एकेक प्रकरणे घडत गेलेली आहेत. या ठाकरे शासनाला हे समजत नाही की, एखाद्या महिलेवर राज्यशक्तीचा वरवंटा फिरविणे आपल्या संस्कृतीत आणि स्वभावात बसत नाही. द्रौपदीमुळे महाभारत घडले आणि सीतेमुळे रामायण, हे लोकांच्या मनात खोलवर रुजलेले आहे. बरे, या दोन स्त्रियांना त्रास दिला त्यांचे अपराध हास्यास्पद आहेत. हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा करणे हा राजद्रोह कसला? हेदेखील या शासनाला समजत नाही, अशा शासनाला काय म्हणावे? अनेक वाईट शब्द येतात, पण आपली सभ्यतेची पातळी सोडू नये, म्हणून लिहीत नाही.

bjp

कोरोनाचे संकट आले आणि जसे आले तसे ते आता दूरही झाले. केंद्र सरकारने कोरोनावरची लस तयार केली आणि तिचा पुरवठा केला. लसीकरणाची मोठी मोहीम चालली, श्रेय केंद्राला जाणार म्हणून त्याचे राजकारण खूप झाले. लसीच्या तुटवड्याच्या बातम्या, प्राणवायूच्या तुटवड्याच्या बातम्या फार मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आल्या. जंबो कोविड सेेंटर उभी करताना किती भ्रष्टाचार केला, खासगी रुग्णालयात रुग्णांना कसे लुटले आणि या लुटीतून किती हिस्सा कोणी घेतला, याच्या फारशा बातम्या झाल्या नाहीत. बातम्या झाल्या नसल्या, तरी सामान्य माणसाला त्याची झळ बसली. सामान्य माणूस ही गोष्ट विसरत नाही.
महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य समजले जाते. ठाकरे शासन काळात महाराष्ट्रात गुंतवणूक किती झाली? नवीन उद्योग कोणते सुरू झाले? तरुणांना रोजगार किती मिळाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. छोटे छोटे उद्योजक सक्तवसुलीमुळे हैराण झाले आहेत. नाणारसारखा प्रकल्प हजारो हातांना काम देणारा ठरू शकतो. तेलशुद्धीकरण कारखान्यांची आणि ऊर्जानिर्मितीच्या प्रकल्पाची रोजगारनिर्मितीची क्षमता प्रचंड असते. शिवसेनेचा या प्रकल्पांनाच विरोध आहे. प्रकल्पाला विरोध म्हणजे रोजगाराला विरोध, रोजगाराला विरोध म्हणजे तरुणांना जीवनात स्थिर होण्याची संधी नाकारणे या सर्वाचा असंतोष आहे.

कधी महाराष्ट्र वादळाच्या तडाख्यात सापडतो, तर कधी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडतो. अशा वेळी मुख्यमंत्र्याने सगळी कामे सोडून प्रजेचे अश्रू पुसण्यासाठी धावून जायचे असते. प्रजेला दिलासा द्यायचा असतो. ‘घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ याला राजधर्म म्हणतात. आपले मुख्यमंत्री ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असतात. त्यांनी वर्क फ्रार्म होम करायचे की, वर्क ऑन ग्राउंड करायचे हे त्यांनी ठरवायचे. लोकशाहीत राज्यकर्त्याला जनताभिमुख राहावे लागते. जनतेत मिसळावे लागते. तेव्हा जनतेला राज्य आपले वाटते.
असंतोष हे प्रचंड शस्त्र असते. राज्यकर्त्यांच्या गैरकारभाराविषयी जनतेला सतत जागरूक करून जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण करावा लागतो. इंग्रज शासनाच्या काळात सर्व समाज थंड गोळ्यासारखा निस्तेज झालेला होता. त्याच्या मनात असंतोष निर्माण करण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले, म्हणून त्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे म्हटले जाते. लोकमान्य टिळकांनी असंतोषाचे विषय टोकदार केले आणि काही विषयांना स्वदेशी पर्याय दिले. ती त्यांची प्रतिभा होती. एका माणसाने ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडले आणि म्हणून इंग्रजांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना सहा वर्षे मंडालेला पाठविले. ठाकरे शासनाच्या हातात इंग्रजांचे कायदे नाहीत, नाहीतर त्यांनीदेखील नवनीत राणा, कंगना राणावत, नारायण राणे यांना पाच-सहा वर्षांसाठी तरी काळ्या पाण्याला पाठविले असते.

जोपर्यंत जनअसंतोष चळवळीचे किंवा आंदोलनाचे रूप घेत नाही, तोर्पंत जनअसंतोष हा सुप्तच राहतो. जनता नाराज आहे, ही गोष्ट खरी. खेड्यातील चावडीवर आणि शहरातील कट्ट्यावर, तसेच चहाच्या टपरीवर असंतोषाच्या गप्पा ऐकायला मिळतात. लोकांना समर्थ पर्याय पाहिजे आहेत. असा पर्याय निर्माण होण्यासाठी लोकांच्या मनात जो असंतोष आहे, तो टोकदार करावा लागतो, त्याला सतत फुंकर मारावी लागते आणि ठिणगीचा अग्नी करावा लागतो.

अब्राहम लिंकन म्हणत असत की, ‘यशस्वी राजनेता होण्यासाठी असंतोषाचे विषय शोधावे लागतात, ते तीव्र करावे लागतात आणि समाजात बदलाची जबरदस्त आकांक्षा निर्माण करावी लागते.’ लिंकनच्या काळात निग्रोंच्या गुलामीचा विषय असा होता. या ठिणगीचा लिंकनने अग्नी केला आणि पुढे गुलामीची प्रथा संपवून टाकली, हे लिंकनचे कार्य युगप्रवर्तक कार्य समजले जाते. महाराष्ट्राचा विचार करता एवढ्या टोकाचा हा विषय नाही. आपल्या महाराष्ट्रातील असंतोष हा राजकीय नैतिक मूल्यांसंबंधीचा आणि राजधर्माच्या पालनासंबंधीचा आहे.

ठाकरे शासन भाजपाचा विश्वासघात करून आणि मतदारांचा विश्वासघात करून सत्तेवर आलेले आहे. निवडणुकीपूर्वी युती केली, 2019च्या मोदी लाटेचा फायदा करून घेतला आणि भाजपाबरोबर सत्ता बनविण्याऐवजी भाजपा आणि शिवसेना दोघांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबर सत्ता केली. हा विश्वासघात लोकांच्या जिव्हारी लागलेला आहे. ही विश्वासघाताची भावना टोकदार केली पाहिजे. भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे विषय आहेत. त्यांची व्याप्ती मर्यादित असते. जे मंत्री भ्रष्टाचारामुळे तुरुंगात गेले आहेत, त्यांचा विषय त्यांच्यापुरता आणि त्यांच्या मतदारसंघापुरता असतो. लोक अशा भ्रष्ट मंत्र्याला पूर्णपणे नाकारतात, असेही आपल्याकडे होत नाही. तसे झाले असते, तर छगन भुजबळ निवडून आले नसते. लालूप्रसाद यादव यांचा पक्ष संपला असता. विश्वासघाताच्या भावनेचे असे नाही.

आपल्या जीवनमूल्यात विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व असते. आपली कुटुंबव्यवस्था विश्वासाच्या पायावरच उभी आहे. पती-पत्नी-मुले-आजी-आजोबा असे सर्व नातेसंबंध परस्पर विश्वासाने घट्ट बांधलेले असतात. या विश्वासाला तडा जाणार नाही, याची प्रत्येक जण काळजी घेतो. मन मानेल तसा व्यवहार करीत नाही. हाच वारसा सांस्कृतिक-सामाजिक आणि राजकीय जीवनातदेखील जातो. हे एक मोठे नैतिक मूल्य आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी हे नैतिक मूल्य पायदळी तुडविले आणि सत्तेच्या क्षणिक लाभासाठी विश्वासघाताचा बिल्ला गळ्यात अडकवून घेतला. लोकशाहीत सत्ता येते आणि जाते. ती कायम एका पक्षाच्या किंवा नेत्याच्या हातात राहत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली, पण मी मुख्यमंत्री होईन असे त्यांनी कधी म्हटले नाही. मला मुख्यमंत्री करण्यासाठी मतदान करा, असे शिवसैनिकांनाही कधी सांगितले नाही. एका अर्थाने त्यांनी महात्मा गांधींच्या या एका गुणाचे अनुसरण केले आहे. गांधी काँग्रेस पक्षाचे सर्वसत्ताधीश होते, पण ते राष्ट्रपती झाले नाहीत की पंतप्रधान झाले नाहीत. सत्तेवर अंकुश ठेवणारी व्यक्ती म्हणून त्यांचे स्थान राहिले.

 
बाळासाहेब ठाकरे यांचे लोकमनातील स्थान अढळ आहे. अनेक लोक त्याची विविध कारणे देतात, पण त्याचे एकमेव कारण असे आहे की, जबरदस्त राजकीय शक्ती हाती असतानाही स्वत:साठी किंवा स्वत:च्या परिवारासाठी त्यांनी सत्तेतील सहभाग कधी मागितला नाही. अशी व्यक्ती ही भारतीय जनमनाचा ठाव घेते. कालानुरूप अशा व्यक्तींचे स्वरूप बदलत जाते. चंद्रगुप्त मौर्यांच्या काळी चाणक्यांचे जे स्थान होते आणि काँग्रेसच्या काळात गांधींचे जे स्थान होते, महाराष्ट्रात बाळासाहेबांनी ते स्थान प्राप्त केले, म्हणून त्यांना महान म्हणायचे.

बाळासाहेबांविषयी श्रद्धाभाव ठेवून जनआक्रोश टोकदार करता आला पाहिजे. महाराष्ट्राला आज दुसर्‍या गोपिनाथराव मुंडेंची आवश्यकता आहे. त्यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीविरुद्ध युद्ध पुकारले. आंदोलने केली, संघर्ष यात्रा काढली आणि लोकांचा असंतोष टोकदार केला. आजदेखील अकार्यक्षम, सक्तवसुलीच्या मागे लागलेल्या आणि जो विरोध करील त्याला तुरुंगात पाठविणार्‍या, विकासाच्या नावाने ठणठणाट असलेल्या या सरकारविरुद्ध असंतोष टोकदार करायला पाहिजे आणि त्यासाठी जनआंदोलनाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. एक काळ असा होता की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीवरून लादला जाई. काँग्रेस दुर्बळ झाल्यानंतर हा प्रकारदेखील कमी झाला, आता जनतेने निवडलेला मुख्यमंत्री असतो. उद्धव ठाकरे हे जनतेने निवडून दिलेले मुख्यमंत्री आहेत, असे कोणी म्हणत नाहीत. लोकांना लोकांनी पसंत केलेला मुख्यमंत्री हवा आहे, आणि तो जनआंदोलनाच्या रेट्यातूनच निर्माण होईल.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.