दिवाळखोरांची संकल्पयात्रा

विवेक मराठी    19-May-2022
Total Views |
अलीकडेच राजस्थानच्या उदयपूर शहरात काँग्रेस पक्षाचे ‘नव संकल्प शिबिर’ नावाचे चिंतन शिबिर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकारने पार पडले. काँग्रेसधार्जिण्या प्रसारमाध्यमांनी त्याचा फार गाजावाजा केला असला, तरी त्यातून पक्षासाठी फार काही बरे घडणार नाही, हे राजकीय घडामोडींची समज असलेला कोणीही सांगेल. पक्षाला लागलेल्या घरघरीचे मूळ पक्षनेतृत्वाच्या वैचारिक व व्यवहारिक दिवाळखोरीत आहे, लोकभावनेच्या त्यांनी केलेल्या अनादरात आहे. या जुनाट दुखण्यावर शिबिराच्या नावाने वरवर मलमपट्टी करून काही साध्य होणार नाही.

congress
गांधीजयंतीपासून जनसंपर्क यात्रेची केलेली घोषणा, ‘गांधी घराण्याचा अपवाद करत एका कुटुंबात एकालाच राजकीय उमेदवारी’ देण्याचा घेतलेला निर्णय, आत्मपरीक्षण करण्याऐवजी पक्षश्रेष्ठींनी प्रादेशिक पक्षांवर घेतलेले तोंडसुख आणि भाजपावर टीका करण्यात मानलेली धन्यता ही या शिबिराची वैशिष्ट्ये. या वैशिष्ट्यांमध्येच पक्ष संदर्भहीन होण्याची कारणे दडलेली आहेत.

कोणत्याही राजकीय पक्षाला रुजण्यासाठी, वाढण्यासाठी जनसंपर्क अत्यावश्यक असतो. आजच्या समाजमाध्यमांच्या काळातही पक्षाचा जनतेशी प्रत्यक्ष संपर्क तुटून चालत नाही. काँग्रेसला तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून जनाधार होता. या देशातले हिंदूही त्यांच्याबरोबर होते, कारण तेव्हा या पक्षाची विचारधारा इथल्या हिंदूंना (नेहरूंचा अपवाद वगळता) जवळची वाटेल अशी होती. तत्कालीन काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी तशी मांडणी आणि त्या मांडणीशी सुसंगत आचरण ठेवले होते. त्यामुळे देशातले बहुसंख्य हिंदू काँग्रेसशी पिढ्यान्पिढ्या एकनिष्ठ होते. यातले काही आजही एकनिष्ठ आहेत. पक्षाची दुरवस्था होत असतानाही देशभरात आज जो काही 15-20 टक्के जनाधार टिकून आहे, त्यात अल्पसंख्याकांबरोबर हिंदूही काही प्रमाणात आहेत. पण स्वातंत्र्यानंतर सत्ता हाती येताच काँग्रेसने ‘सेक्युलॅरिझम’चा पुरस्कार केला आणि तो प्रस्थापित करण्यासाठी जी ध्येयधोरणे राबवली, त्यातून या देशातला हिंदू दुखावला गेला. काँग्रेसपासून मनाने दूर गेला. मग त्याने काही राज्यांत पर्याय म्हणून प्रादेशिक पक्षांना आपले मानले, तर भाजपाची ध्येयधोरणे बहुसंख्य हिंदूंना जवळची वाटल्याने त्यांनी भाजपाची निवड केली. मतदार म्हणून या देशाच्या हिंदूंच्या असलेल्या आशा-आकांक्षा काँग्रेसने कधी गांभीर्याने घेतल्या नाहीत. पक्षाच्या हिंदू जनाधारावर या दुर्लक्षाचा परिणाम झाला. अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणात गढलेल्या काँग्रेस नेतृत्वाने तिकडे दुर्लक्ष केले. ‘जनेऊधारी’ होण्याचे सोंंग घेईपर्यंत इथला हिंदू काँग्रेसपासून खूप दूर गेला होता. अशा नाटकांना फसण्याइतका इथला हिंदू मतदार भोळा नाही आणि युवराजांइतका अपरिपक्वही नाही.

‘गांधी घराण्याचा अपवाद करत एका कुटुंबात एकालाच राजकीय उमेदवारी’ ही घोषणा तर पक्षांतर्गत मुरलेल्या गुलामगिरीच्या मानसिकतेचे द्योतक म्हणावे लागेल. अगदी मोजके अपवाद वगळता, ‘जी हुजूर’ करण्यात हयात घालवलेल्या आणि त्याआड सदैव लपत स्वत:मधील नेतृत्वगुण कधीही विकसित न केलेल्या काँग्रेस नेत्यांना स्वकर्तृत्वावर कधीही जनाधार कमावता आलेला नाही. तेव्हा गांधी घराण्याशिवाय अन्य कोणतेही नेतृत्व सर्वसामान्य काँग्रेसी मतदार स्वीकारत नाही, याला गांधी घराण्याइतकेच पक्षातील परप्रकाशी नेतेही जबाबदार आहेत. जनतेतून निवडून आलेल्या नेत्यापेक्षा घराणेशाहीचे समर्थन करत या नेत्यांनी कायम सर्वसामान्य मतदारांना गृहीत धरले. त्याचेच माप त्यांच्या पदरात पडते आहे.


congress

अलीकडे काही वर्षे हंगामी अध्यक्ष घेऊन पक्ष चालवावा लागणे ही या पक्षाची नामुश्की आहे. गांधी घराण्यातले कोणाचीही - योग्यता असो वा नसो, त्याची पक्षाध्यक्षपदी प्राणप्रतिष्ठा करण्याची हाडीमांसी मुरलेली सवय त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे पक्ष चालवण्याच्या जबाबदारीतून अन्यांची कायमच सुटका झाली आणि त्यांच्या नेतृत्वगुणांचीही कधी कसोटी लागली नाही. नेतृत्व घडवण्यासाठी खूप टक्केटोणपे खावे लागतात, मानहानीचे हलाहल पचवून ध्येयनिष्ठ राहत वाटचाल सुरू ठेवावी लागते, हे किती काँग्रेसजनांना ठाऊक आहे? जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला देश चालवण्यासाठी घराणेशाहीची तळी उचलणारा पक्ष यापुढे चालणार नाही, हे त्यांच्या अजूनही लक्षात येत नाही, हे त्या पक्षाचे दुर्दैव आहे.
 
सक्रिय राजकारण ही पूर्णवेळाची जबाबदारी असावी लागते. त्यासाठी व्यक्ती ध्येयनिष्ठ आणि जनहिताची चाड असलेली असावी लागते. सत्तेच्या राजकारणातही हे गरजेचे असते. मात्र काँग्रेसने राजकारणाचे व्यापारीकरण केले. तेही प्रभाव ओसरण्याचे एका कारण आहे.

प्रादेशिक पक्षांवर टीका करण्यापेक्षा वा स्वार्थापुरती त्यांच्याशी जवळीक करण्यापेक्षा अनेक राज्यांमध्ये मतदारांनी प्रादेशिक पक्षांना का झुकते माप दिले, यावर विचार करून झालेल्या चुका सुधारल्या, तरी पक्षात धुगधुगी राहील. राष्ट्रवादी आणि झारखंड मुक्ती मोर्चा वगळता अन्य प्रादेशिक पक्षांना काँग्रेसबरोबर जाण्यात रस नाही. भरवशाचा साथीदार अशी त्याची प्रतिमा नाही, याला कारण या पक्षाचे गांधी घराण्यातील तरुण (?) पिढीचे निष्प्रभ आणि बेभरवशी नेतृत्व.

तेव्हा वास्तवाचा स्वीकार करत, मुळाशी जाऊन चुका शोधल्या तर निष्प्रभ आणि संदर्भहीन होत चाललेला या दीर्घायुषी पक्षाला काही उपाय सापडायची शक्यता आहे. अन्यथा हे शिबिर म्हणजे पक्षाने सामूहिक चिंतन केल्याचा आभास, प्रत्यक्षात दिवाळखोर मानसिकतेचे चालतेबोलते प्रदर्शन.