यंदाच्या पद्म पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रामधील कोकणातल्या रायगडमधल्या डॉ. हिम्मतराव बावस्कर यांच्या नावाची घोषणा झाली आणि संशोधक वृत्तीचे असलेले डॉ. बावस्कर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. अत्यंत कष्टाळू आणि कार्यतत्पर असलेले डॉ. हिम्मतराव बावस्कर यांच्याबद्दल पद्म गौरवच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात देहेड या खेडेगावात अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले डॉ. हिम्मतराव यांनी लाकूडतोड, हॉटेलमध्ये कपबशा धुणे यांसह अनेक प्रकारचे कष्ट करून शालेय शिक्षण पूर्ण केले. इंटर सायन्समधील यशानंतर त्यांनी नागपूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या शिक्षणात प्रा. के.डी. शर्मा यांनी दिलेला ’पॅथॉलॉजी इज द मदर ऑफ मेडिकल सायन्स’ हा गुरुमंत्र हिम्मतराव कोळून प्यायले. रोगाच्या मुळाशी जाऊन नोंदींच्या दस्तऐवजीकरणावर त्यांनी भर दिला.
महाडजवळच्या घनदाट अरण्यातील बिरवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 1976च्या सुमारास डॉक्टरांची नियुक्ती झाली. तेव्हापासून सरकारी दवाखान्यातील सेवेचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. खासगी किंवा पैसे घेऊन सेवेला थारा दिला नाही. या भागात विंचूदंशामुळे लोक मृत्यूला समोर जात आहेत, हे समजल्यावर त्यांनी त्याची कारणे, त्याचे परिणाम यांचा सखोल अभ्यास केला. डोळ्यादेखत हृदय पिळवटून टाकणारे मृत्यू ते पाहत होते. 1976-77 या काळातील 20 केसेसचा अहवाल त्यांनी तयार केला व तो हाफकिन, जेजे येथील तज्ज्ञांना दाखवला. हिम्मतरावांच्या नोंदींच्या पुराव्यासह 1978मध्ये सर्वप्रथम ’लॅन्सेट’ या लंडनच्या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकात एक अहवाल प्रसिद्ध तर झाला, परंतु त्यात डॉ. बावस्करांना तिसरे स्थान होते.
त्यानंतर मात्र त्यांनी विंचूदंशाच्या 51 प्रकरणांचा अभ्यास करून स्वतः अडीच पानी शोधनिबंध तयार केला. लॅन्सेटने तो प्रकाशित केला. नंतर औंध येथे राहून त्यांनी एम.डी. केले व त्यादरम्यान विंचूदंशाची पार्श्वभूमी डोळ्यापुढे ठेवून वैद्यकीय संदर्भ ग्रंथांचे वाचन केले. विंचूदंशावर परिणामकारक औषध कोणते, यावर त्यांनी विचार केला. सोडिअम नायट्रोप्रूसाइडचे द्रव्य इंजेक्शनद्वारे प्रभावी ठरेल, असे त्यांनी निश्चित केले. दरम्यान डॉ. प्रमोदिनी यांच्याशी विवाहबद्ध होऊन डॉ. बावस्कर दांपत्य रायगड जिल्ह्यातल्याच पोलादपूर येथे 1982मध्ये गोरगरिबांच्या रुग्णसेवेत रुजू झाले. त्याच काळात प्रथम आठ वर्षांच्या रुग्णाला विंचूदंशावर हे इंजेक्शन लागू पडले. मात्र ते प्राथमिक आरोग्य केंद्रात देणे जोखमीचे होते. तेव्हा याला पर्याय म्हणून तोंडावाटे घ्यावयाच्या प्राझोसीन या औषधाच्या वापराचा शोध त्यांना लागला. हा उपचार प्रभावी ठरल्याचा डॉ. हिम्मतरावांचा प्रबंध 1986 साली लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झाला. या उपचारांची लोकप्रियता इतकी की कोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, गुजराथ या भागातील विंचूदंशाने होणारे मृत्यूंचे प्रमाण 40 टक्क्यांवरून एक टक्क्याखाली आले. 1993मध्ये याच संशोधनाचे सादरीकरण करण्यासाठी सीबा फाउंडेशनने हिम्मतरावांना लंडनमध्ये निमंत्रित केले. 2011मध्ये प्राझोसिन आणि प्रतिलस यांच्या परिणामकारकतेविषयी त्यांचा प्रबंध ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला. फुरसे, कांबळ्या, मण्यार, कोब्रा (नाग) या विषारी सापांच्या दंशातून होणारा वेगवेगळा परिणाम व त्यावरची स्वतंत्र उपचारपद्धती याचा त्यांनी अभ्यास केला. सर्पदंशावरील प्रतिलस कशी द्यावी, कोणते औषध देऊ नये, याचे मार्गदर्शन केले. त्याविषयी ’रॉयल सोसायटी ऑफ लंडन’च्या जर्नलमध्ये त्यांचा प्रबंधही प्रकाशित झाला.
डॉ. हिम्मतरावांचे संशोधन विंचू व सर्पदंशापुरते मर्यादित राहिले नाही. बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात रासायनिक खतांमुळे जलस्रोतांमध्ये कॅडमिअम व शिसे यांचा संसर्ग होऊन शेतकर्यांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचे गंभीर आजार दिसून येत होते, हा निष्कर्ष त्यांनी क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजी या आपल्या प्रबंधात मांडला. कूपनलिकांमधील पाण्यामध्ये फ्लुरॉइडचा अंश असल्याने दाताला फ्लुरॉसिसचा आजार जडत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. हायपोथॉयराइड हे अनेकविध आजारांच्या मुळाशी कसे असते, हे त्यांनी सांगितले. या डॉक्टर दांपत्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये असे 108 शोधनिबंध प्रकाशित केले. स्मृतिभ्रंशाच्या आजाराचे वेळेत निदान करण्यासंबंधी त्यांनी संशोधन केले. कानाला पडलेल्या भेगा हे हृदयरोगाचे लक्षण असते, हे त्यांनी 888 रुग्णांच्या तपासणीनंतर अनुमान काढले. बदलत्या जीवनशैलीमुळे होणारी बी-12 जीवनसत्त्वाची कमतरता याविषयी त्यांनी मौलिक विवेचन केले. पेट्रोल पंप, गॅरेज कामगार, सुरमा वापरणारे यांच्या शरीरात शिशाचा अंश जास्त झाल्याने होणारे परिणाम त्यांनी दाखवून दिले.
संशोधक वृत्तीचे डॉक्टर कोविडकाळात स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. मार्च 2020पासूनच डॉ. बावस्कर दांपत्याने महाडमध्ये कोविडचे 1700हून अधिक रुग्ण तपासले व त्यांच्या नोंदीही केल्या. एमएमआर व बीसीजी लस आणि नाकात बेटाडिनचा द्रव घेऊन स्वतःला कवच निर्माण केले व स्टेरॉइड, रेमडेसिवीर न वापरता कोरोना रुग्णांवर उपचार केले. मेथिलीन ब्लू नेब्युलायझरचा वापर केला. ‘’त्यामुळे आमच्या रुग्णाला फायब्रॉसिस, न्यूमोनिया किंवा म्युकरमायकोसिस झाले नाही” असे हिम्मतराव अभिमानाने सांगतात.
हिम्मतरावांनी स्वतःच्या अर्थबळावर त्यांचे सर्व संशोधन केले. सरकारी सेवेत रुग्णाकडून कधी पैसा घेतला नाही, उलट त्यांनाच पैसे दिले. प्रसंगी 24 तास रुग्णाबरोबर जागून काढले. काही वर्षांपूर्वी हिम्मतरावांना एका पॅथॉलॉजी प्रयोगशाळेकडून रुग्ण पाठवल्याबद्दलचा हिस्सा म्हणून एक धनादेश आला. या लॅबने डॉक्टरचे नाव वाचले नसावे. हिम्मतरावांनी हे प्रकरण मेडिकल काउन्सिलपर्यंत नेले व कट प्रॅक्टिसवर हल्लाबोल चढवला. ”मला पुरस्कार मिळाला, तर एक माणूस मोठा होईन, पण आपल्याला अनेक माणसे मोठी करायची आहेत” असे हे निरलस, निरपेक्ष डॉक्टर म्हणतात. ‘’दहा दिवसांनी रुग्ण आपल्या पायावर चालत येतो, याइतका मोठा पुरस्कार नाही. रुग्ण हेच माझे दैवत” असे हिम्मतराव आजही मनोभावे सांगतात. ’बॅरिस्टरचं कार्टं’ हे त्यांचे आत्मचरित्र वाचनीय आणि संग्राह्य असेच आहे. सरकारी व्यवस्थेत राहून त्यांनी विंचूदंशावर जे संशोधन केले, ते केवळ अतुलनीय आहे. बर्याच लोकांना आज कल्पना नसेल, पण एकेकाळी कोकणात विंचूदंशाने अनेक लोक मृत्युमुखी पडत असत. डॉ. बावस्कर ह्यांनी विंचूदंशावर प्राझोसीन ह्या औषधाचा अत्यंत खुबीने उपयोग केला व तो यशस्वी झाला. आज त्यांच्या संशोधनामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले आहेत. विद्यमान केंद्र सरकारचेसुद्धा विशेष आभार आहेत. खरेखुरे काम करणार्या प्रसिद्धिपराङ्मुख व्यक्तींना आज पद्म पुरस्कार मिळत आहेत. त्यांच्या भावी कार्यास मनःपूर्वक सदिच्छा आहेत.