26 जानेवारी 2022च्या - अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या वर्षी एकूण 128 लोकांना पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नुकतेच राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक दरबार हॉल येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात संस्कृती आणि संस्कार शब्दांची व्याप्ती एका छोट्याशा कृतीतून बघायला मिळाली. स्वामी शिवानंदांची कृती अनेकांना आपलेपणाची वाटली. पद्म गौरव लेखमालेत आपण या वेळी याच स्वामी शिवानंद यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
स्वामी शिवानंद. वय फक्त 125 वर्षे. पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी हे योगमहर्षी समोर आले, त्या वेळी पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जमिनीवर नतमस्तक होऊन नमस्कार केला. आपल्याप्रती असलेला स्वामी शिवानंद यांचा भाव पाहून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही राहवले नाही आणि तेही आपल्या खुर्चीवरून उठले आणि स्वामीजींच्या समोर जाऊन झुकले. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत आपल्याला पुढे दिसते की मोदींना नमस्कार केल्यानंतर स्वामी शिवानंद यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही अशाच प्रकारे गुडघ्यावर बसून नमस्कार केला. राष्ट्रपती भवनातील हीच सहजता या निमित्ताने संपूर्ण जगाने बघितली आणि भारताचे हे संस्कार आम्हाला युगानुयुगे मिळालेले संचित आहे याचीही ओळख या निमित्ताने झाली. याच पद्मश्री स्वामी शिवानंद यांची दिनचर्या थक्क करणारी आहे.
स्वामी शिवानंद दुर्गापुरी हे वाराणसी येथे राहणारे योगमहर्षी आहेत. आज सर्वात जास्त वय असणारी व्यक्ती म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी स्वामी शिवानंद यांच्या शिष्यांनी नोंदणी केली आहे. स्वामी शिवानंद 125 वर्षांचे असले, तरीही अजूनही तंदुरुस्त आहेत. वयाच्या या टप्प्यावर असतानासुद्धा त्यांची सर्व कामे आणि योग अभ्यास व्यवस्थितपणे करत आहेत.
स्वामी शिवानंद हे काशी येथील दुर्गाकुंड इथे असलेला शिवानंद आश्रम चालवत आहेत. आपल्या प्रदीर्घ जीवनकाळात स्वामी शिवानंद यांना योग आणि धर्म या विषयांमध्ये विशेष रुची होती. आज स्वामीजी आपले आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी समर्पित करत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, योगासारख्या पद्धती लोकांनी आत्मसात केल्या, तर ते निरोगी आणि दीर्घकाळ जीवन जगू शकतात. स्वामीजी आपल्या उद्बोधनात कायम सांगतात, “आज आपल्याला आपली व्यग्र जीवनशैली टाळता येणे शक्य नाही. त्यामुळे हे स्वीकारूनच आपल्याला आपल्या जीवनशैलीत आणि आहारात जितके चांगले बदल करता येणे शक्य आहे आणि तितके बदल प्रयत्नपूर्वक करायचे आहेत.”
स्वामी शिवानंद दुर्गापुरी यांनी कुठलेही शालेय शिक्षण घेतलेले नाही, परंतु ते इंग्लिश, हिंदी आणि बंगाली या भाषा उत्कृष्ट बोलू शकतात. नैसर्गिक आरोग्य चिकित्सेच्या पद्धती शिकवण्यासाठी ते त्यांच्या शिष्यांना घेऊन गोरखपूरच्या आरोग्य मंदिरात कायम जात असतात. इंद्रियांवरील संयम, संतुलित दिनचर्या, साधारण आहार आणि योग अभ्यास हे स्वामी शिवानंद यांच्या आरोग्याचे खरे कारण असल्याचे ते सांगतात. ‘कूल लाइफ, ब्युटिफुल लाइफ आणि नॉट ऑइल ओन्ली बॉइल्ड फूड’ हा त्यांच्या आरोग्याचा मूलमंत्र असल्याचे ते सांगतात. स्वामी शिवानंद आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीत शांत राहतात, तसेच ते रात्री 9 वाजता झोपतात आणि पहाटे तीन वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठतात. न्याहरीमध्ये लाही चुरा आणि दुपारच्या जेवणात डाळ-चपाती आणि उकडलेल्या भाज्या खातात.
स्वामी शिवानंद यांच्या म्हणण्यानुसार, केवळ उकडलेले अन्न खाणे हेच त्यांच्या आरोग्याचे रहस्य आहे आणि आहारात तेलाचा कमीत कमी वापर करणे, तसेच साखर शक्य तितकी कमी प्रमाणात खाणे चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. स्वामीजींचे आईवडील खूप गरीब होते. त्यामुळे त्यांना लहानपणीच एका साधूकडे सोपवले गेले होते. ते त्यांच्यासोबतच वाढले आणि तेव्हापासूनच संयमित आणि योगमय जीवन जगत आहेत. स्वामीजी शिष्यांच्या निमंत्रणावरून अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रिया, इटली, यूके याबरोबरच 50हून अधिक देश फिरले आहेत.
आज या टप्प्यावर असलेल्या स्वामीजींइतके शिस्तबद्ध आणि नियमित आयुष्य जगणे जरी आपल्याला शक्य झाले नाही, तरी त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण आपल्या आरोग्याचा आणि आहारविषयक सवयींचा आधीपेक्षा अधिक गांभीर्याने विचार नक्कीच करू शकतो. योग गुरू जनार्दन स्वामी कायम सांगतात, ते म्हणतात..
समाधानाय सौख्याय, निरोगत्वाय जीवने।
योगमेवाभ्यसेत प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम्।
जीवनात समाधान, सौख्य आणि निरोगित्व मिळवण्यासाठी ज्ञानी माणूस यथाशक्ती आणि निरंतर योगाभ्यास करतो आणि याच सूत्रावर स्वामी शिवानंद यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे, असे वाटून जाते. परमेश्वराने स्वामी शिवानंद यांना निरामय आरोग्य प्रदान करावे, हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे.