झुंड भिंत... अल्याडपल्याडची

विवेक मराठी    09-Mar-2022   
Total Views |
@रवींद्र गोळे 9594961860
नागराज मंजुळे यांनी याच झुंडीला कलात्मक रूपात मांडले आहे. हे काम करताना ते वास्तव आणि त्यांचा विचारव्यूह यांची सरमिसळ करत नाहीत. जसे आहे तसेच मांडतात. यामुळे नागराज मंजुळे यांच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा अनुभव झुंडच्या निमित्ताने येतो. या अल्याडपल्याडमधली भिंत पाडली पाहिजे. ही भिंत दृश्य आणि अदृश्य स्वरूपात आहे. दृश्य स्वरूपातील भिंत ओलांडून पुढे जाणे तुलनेने सोपे आहे. मात्र दोन्ही बाजूंकडील माणसाच्या मनातील अदृश्य भिंत कशी ओलांडून पुढे जाता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. दोन्हीकडील झुंडीमध्ये माणूसपण जागले पाहिजे, हा संदेश नागराज मंजुळे देऊ पाहतात.

zund
नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘झुंड’ चार मार्च रोजी प्रदर्शित झाला. त्या दिवसापासून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. स्वाभाविकपणे त्याला जातीचे, अहंकाराचे रंग लागलेले होते. सोशल मीडियावरच्या या कोलाहलात चित्रपटाचा मूळ विषय दुर्लक्षित राहिला, असे म्हणायला हरकत नाही. नागराज मंजुळे यांनी याआधी ‘पिस्तुल्या’, ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ इत्यादी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. एका विशिष्ट वर्गाला, समूहाला केंद्रस्थानी ठेवून ते चित्रपट तयार करतात. त्या वर्गाच्या/समूहाच्या वेदना, समस्या अधोरेखित करण्याचा नागराज मंजुळे यांचा प्रयत्न असतो. त्या वेदना आणि जातवास्तव नागराज मंजुळे यांनी अनुभवलेले असते. ते स्वप्नाच्या जगात न रमता वास्तवाचे चटके देत राहतात. मात्र झुंड त्याला अपवाद आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपट पाहून / न पाहून ज्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या, त्या वाचून आपणही झुंड या चित्रपटावर लिहावे असे वाटले. नागराज मंजुळे यांचा चित्रपट पाहण्यासाठी कोणता तरी एक चश्मा घातलाच पाहिजे (समर्थन किंवा विरोध) अशी सामाजिक मानसिकता असणार्‍या समूहात वावरताना विनाचश्मा हा चित्रपट पाहिला, तरी माझ्यातला कार्यकर्ता सजग होता आणि चित्रपटाची एक एक फ्रेम पुढे जाताना मी जे काम करतो आहे, ज्यासाठी अट्टाहास करतो आहे, तेच नागराज मंजुळे वेगळ्या शब्दात सांगत आहेत हे जाणवत राहिले. “आपुन की बस्ती गटर मे है... पर तुम्हारे मन मे गंद है”.. झुंडमधील हा संवाद ऐकताना परमपूजनीय श्रीगुरुजींचे वाक्य आठवत राहिले - “स्पृश्यांच्या मनातील संकुचित भावना म्हणजे अस्पृश्यता होय.” मनाचा तळ ढवळत तळाशी साचलेला गाळ उकरण्याचा, त्याला वाट मोकळी करून देऊन नवा प्रवाह सुरू करण्याचा प्रयत्न झुंडमधून नागराज मंजुळे करताना दिसतात, तेव्हा हा प्रयत्न कोणत्या एका जातीचा न राहता मानवतेचा होतो. माणूस म्हणून जगण्याच्या संधीचा, अंगभूत कौशल्याच्या नवउन्मेषाचा होतो. माणसाने माणसाला माणसाचे प्रेम द्यावे, ही भावना निर्माण करण्यासाठीचा विषय होतो.
 
एवढीशी ही कथा; पण ती कथा पडद्यावर पुढे जाताना मला स्वरूपवर्धिनीचे किशाभाऊ पटवर्धन (पुणे), समरसता गुरुकुलमचे गिरीश प्रभुणे (चिंचवड), लहुजी साळवे आरोग्य केंद्राचे डॉ. दिवाकर कुलकर्णी (संभाजीनगर), भगीरथ विकास प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर (झाराप), सर्वांगीण विकास प्रकल्पाचे विजय शिवले (येरवडा), गोपाळ महाराज विकास प्रतिष्ठानचे नरसिंग झरे (अनसरवाडा), समतोल फाउंडेशनचे विजय जाधव (ठाणे/कल्याण) अशी असंख्य मंडळी अभिताभ बच्चन यांच्या भूमिकेत दिसू लागली. स्वयंप्रेरणेने स्वीकारलेले काम या मंडळींनी अर्धवट सोडले नाही. अनेक आपदा आणि अपमानास्पद प्रसंग पचवत त्यांनी झुंडीचा सामना केला.  
वास्तवाचे चित्र 
झुंज चित्रपटाची कथा सांगायची, तर नागपूरच्या गडीगोदाम झोपडपट्टीत विजय बोरुडे नावाचा क्रीडा शिक्षक येतो आणि तेथील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जातो.. एवढीशी ही कथा; पण ती कथा पडद्यावर पुढे जाताना मला स्वरूपवर्धिनीचे किशाभाऊ पटवर्धन (पुणे), समरसता गुरुकुलमचे गिरीश प्रभुणे (चिंचवड), लहुजी साळवे आरोग्य केंद्राचे डॉ. दिवाकर कुलकर्णी (संभाजीनगर), भगीरथ विकास प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर (झाराप), सर्वांगीण विकास प्रकल्पाचे विजय शिवले (येरवडा), गोपाळ महाराज विकास प्रतिष्ठानचे नरसिंग झरे (अनसरवाडा), समतोल फाउंडेशनचे विजय जाधव (ठाणे/कल्याण) अशी असंख्य मंडळी अभिताभ बच्चन यांच्या भूमिकेत दिसू लागली. स्वयंप्रेरणेने स्वीकारलेले काम या मंडळींनी अर्धवट सोडले नाही. अनेक आपदा आणि अपमानास्पद प्रसंग पचवत त्यांनी झुंडीचा सामना केला. अगदी विजय बोरुडेही याच मार्गाने आणि तडफेने आपले ध्येय साध्य करण्यासाठी कार्यरत राहतो आणि भिंतीअल्याडपल्याडच्या झुंडींशी झुंजतो. एका बाजूला झोपडपट्टी आहे, जिथे दैन्य आहे, बेरोजगारी आहे, अज्ञान आहे, नशाबाजी आहे, असुरक्षितता आहे आणि या सार्‍या गोष्टींची झुंड आपले अस्तित्व जागोजागी दाखवते; त्याचबरोबर सळसळती ऊर्जा आहे, जिला दिशेची आणि संधीची गरज आहे. भिंतीच्या दुसर्‍याच बाजूला सर्वोत्तम म्हणावे असे महाविद्यालय असून तेथे उच्चभ्रू कल्चर आपला मुखवटा सांभाळत उभे आहे. तेथेही श्रीमंतीचा अहंकार आहे, शासकीय अनास्था आहे, गरजवंताला नाडण्याचा रिवाज आहे, सत्तेचा माज आहे, सामाजिक जाणिवेचा अभाव आहे आणि दुसर्‍या बाजूकडे तुच्छतेने पाहण्याची विखारी दृष्टी यांची झुंड थैमान घालते आहे. या दोन्ही बाजूंच्या झुंडी वास्तवात आहेत. नागराज मंजुळे यांनी याच झुंडीला कलात्मक रूपात मांडले आहे. हे काम करताना ते वास्तव आणि त्यांचा विचारव्यूह यांची सरमिसळ करत नाहीत. जसे आहे तसेच मांडतात. यामुळे नागराज मंजुळे यांच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा अनुभव झुंडच्या निमित्ताने येतो. या अल्याडपल्याडमधली भिंत पाडली पाहिजे. ही भिंत दृश्य आणि अदृश्य स्वरूपात आहे. दृश्य स्वरूपातील भिंत ओलांडून पुढे जाणे तुलनेने सोपे आहे. मात्र दोन्ही बाजूंकडील माणसाच्या मनातील अदृश्य भिंत कशी ओलांडून पुढे जाता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. दोन्हीकडील झुंडीमध्ये माणूसपण जागले पाहिजे, हा संदेश नागराज मंजुळे देऊ पाहतात.

समता आणायची, तर

झुंड पाहिल्यावर थिएटरमधून बाहेर पडताना माझ्या मित्राला विचारले, “कसा वाटला नागराजचा चित्रपट?” तेव्हा तो म्हणाला होता, “झुंड विद्रोह नाही, संधी आहे. जोपर्यंत तुम्ही झुंडीचे घटक आहात, तोपर्यंत संधी उपलब्ध नाही. झुंडीतून बाहेर पडा, संधी प्राप्त करा.” अज्ञान, बेरोजगारी, असुरक्षितता, गुन्हेगारी यांच्या झुंडीतून बाहेर पडत माणूसपण सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून घेणे म्हणजे झुंडीला नकार देणे होय. साहित्य, चित्रपट यांच्या माध्यमातून समस्या अधोरेखित केल्या जातात. समस्यांची उत्तरे माणसांना शोधावी लागतात. आपल्या सुदैवाने, उत्तर शोधणार्‍यांचा खूप मोठा वारसा आपल्याला लाभला आहे. वन स्टेप डाउन आणि वन स्टेप अप अशा दोन्ही पातळ्यांवर काम करणारे महापुरुष आपल्या समाजातूनच निर्माण झाले आहेत. या महापुरुषांचे काम एका विशिष्ट गटाचे, समूहाचे, संप्रदायाचे नव्हते, तर संपूर्ण समाजाला कवेत घेत त्यांनी मानवतेसाठी काम केले. आपण त्यांचे वारसदार आहोत ना? महापुरुषांच्या विचारांचे गटातटात विभाजन करून आपण सामाजिक समता आणणार आहोत का? हे लक्षात घ्यायला हवे. आपला समाज व्याधिमुक्त व्हावा, यासाठी आज असंख्य कार्यकर्ते काम करत आहेत. दोन्ही बाजूंच्या झुंडी अशा कार्यकर्त्यांच्या कामात अवरोध निर्माण करतात आणि यातून सामाजिक ताणाबाणा अधिक उसवत जातो, हे समजून घ्यायला हवे. सामाजिक कामावर वैयक्तिक मत-मतांतरांचा काही परिणाम होतो, याचे भान बाळगायला हवे. आपली प्राथमिकता समतेची आहे, बंधुतेची आहे, न्यायाची आहे आणि झुंडमध्ये अधोरेखित केलेल्या संधीची आहे, हे विसरून चालणार नाही.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001