भीष्म की... शकुनी?

विवेक मराठी    31-Mar-2022
Total Views |
जेमतेम चार खासदार, पन्नासेक आमदार एवढीच पवारांची ताकद. तरी आकांक्षा राष्ट्रीय नेतृत्व म्हणून मिरवण्याची. त्यांची ही आकांक्षा त्यांच्या पक्षातले तरी गांभीर्याने घेतात का, हा प्रश्न आहे. अपवाद फक्त संजय राऊत या शिवसेनेच्या दुसर्‍या फळीतील नेत्याचा. पवारांचे कौतुक करताना त्यांचे भान हरपते. याचे अनेक दाखले आहेत. मात्र पितामह भीष्म म्हणणे हा कडेलोट झाला. अर्थात, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ठराव जितका निरर्थक, तशीच राऊतांनी दिलेली उपमाही. त्यांनी उपमा दिली, म्हणून शकुनीचा भीष्म होत नसतो.

pawar

‘शरद पवार हे सगळ्या विरोधी पक्षांचे आधारस्तंभ आहेत. ते भीष्म पितामह आहेत..’ ही आरती ओवाळली आहे राष्ट्रवादीच्या दरबारात पडीक असलेल्या संजय राऊत यांनी. हा अतिशयोक्तिपूर्ण लाचारीचा कडेलोट आहे. ज्या पितामह भीष्मांनी केवळ प्रतिज्ञेखातर सिंहासनाचा आजन्म त्याग केला, त्यांची उपमा दिल्लीच्या सिंहासनाची अखंड अभिलाषा बाळगणार्‍या पवारांना? उपमा द्यायचीच, तर ज्याचे आयुष्य अखंड कपट कारस्थानात गेले, तो शकुनी आठवायला हवा. पण तो आठवण्याची आणि आठवला तरी बोलण्याची हिंमत या संजयात नाही. या उद्गारांना निमित्त ठरला तो राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पारित केलेला हास्यास्पद ठराव. मात्र त्याहून हास्यास्पद आहे ती संजय राऊतांनी पवारांची केलेली भलामण.

पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालातील भाजपाची घोडदौड पाहून भाजपाविरोधातील सर्व पक्षांना 2024च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सध्या संसदेत विरोधी पक्षाचे अस्तित्व शून्य असलेे, तरी आपापल्या कुवतीनुसार भाजपाच्या विजयाचा अश्वमेध रोखण्याच्या प्रयत्नात सर्व जण आहेत.

रालोआ आणि संपुआ या आघाड्या झाल्या, त्या एका प्रमुख राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वात अन्य प्रादेशिक पक्षांची आघाडी या समीकरणावर आधारित. त्यामुळे या आघाड्यांचे प्रमुख स्तंभ अनुक्रमे भाजपा आणि काँग्रेेस हेच राष्ट्रीय पक्ष आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीचे - संपुआचे सुकाणू सध्या सोनिया गांधी यांच्या हाती असले, तरी राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसचे आता नावापुरतेच अस्तित्व उरल्याने अन्य पक्षांना त्यांचे नेतृत्व मान्य नाही. (जेव्हा भाजपाला आजच्या तुलनेने जनाधारही मर्यादित होता, तेव्हाही रालोआमधील प्रमुख पक्ष भाजपाच होता, हे संपुआतील आजच्या सुंदोपसुंदीच्या पार्श्वभूमीवर लक्षात घेण्याजोगे.)

सोनियांचे नेतृत्व संपुआतील घटक पक्षांना मान्य नसले, तरी त्यापैकी कोणाकडेही या आघाडीचे नेतृत्व करण्याचा आवाका नाही आणि समर्थनही. मात्र पंतप्रधान होण्याच्या अखंड आशेवर असलेल्या शरद पवारांनी, पंतप्रधानपद नाही तर किमान आघाडीचे नेतृत्व तरी कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अलीकडेच दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत शरद पवार यांना संपुआचे अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडून संमतही करण्यात आला. ‘शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखले जाऊ शकते’ असे या ठरावात नमूद केले आहे.

वास्तविक राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही राष्ट्रवादी काँग्रेसची धाकली पाती. आघाडीशी थेट संबंध नसलेली. मग राष्ट्रीय आघाडीच्या नेतृत्वासंदर्भात काही ठरवण्याचा अधिकार त्यांना दिला कोणी? या बैठकीला शरद पवार स्वत: उपस्थित होते, तरी त्यांनी या ठरावाला हरकत घेतली नाही. अशा ठरावाचा उपयोग शून्य हे त्यांना पक्के ठाऊक असणार. मात्र, रात्रंदिवस बातम्यांना हपापलेल्या वृत्तवाहिन्या आणि दैनिके या बातमीचेही गुर्‍हाळ चालवतील आणि त्या दिशेने चर्चा सुरू राहील, या विचाराने पवारांनी अर्थपूर्ण मौन बाळगले असावे.

प्रत्येक पक्षाची वैचारिक बैठक वेगळी आणि पक्षविस्तार हेदेखील प्रत्येकाचे ध्येय असल्याने अशा प्रकारच्या आघाड्यांमध्ये किरकोळ कुरबुरी, मतभेद हे स्वाभाविक असते. तरीही आघाडीच्या नेतृत्वाबाबत संबंध नसलेल्या गटाकडून परस्पर नेतृत्वबदलाबाबत घोषणा होणे हे अभूतपूर्व आहे.

काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबतच्या असलेल्या पक्षांतर्गत नाराजीतून ॠ-23ची निर्मिती झाली असली, तरी प्रसारमाध्यमांतून अधूनमधून होणार्‍या चर्चेव्यतिरिक्त तिला कोणी गांभीर्याने घेतले नाही. कारण सोनिया गांधींच्या मर्यादा स्पष्ट दिसत असल्या, तरी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना ना जनाधार आहे, ना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वलय. त्यामुळे ॠ-23 हा फुसका बार ठरला आहे. तसेच गेल्या 75 वर्षांत काँग्रेसची रचना एका घराण्याला बांधलेला पक्ष अशी झाल्याने त्या परिवारात आज समर्थ नेतृत्व नसले, तरी त्यांना पर्याय देणारा एकही नेता काँग्रेेसकडे नाही, हे वास्तव आहे.

तरीही समर्थ नेतृत्वाअभावी गटांगळ्या खाणारी काँग्रेसच आघाडीचे नेतृत्व करते आहे, कारण संपुआतल्या अन्य घटक पक्षांमध्ये पर्यायाबद्दल एकमत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या पवारांचा अपवाद वगळता वरकरणी सगळे शांत आहेत.

जेमतेम चार खासदार, पन्नासेक आमदार एवढीच पवारांची ताकद. तरी आकांक्षा राष्ट्रीय नेतृत्व म्हणून मिरवण्याची. त्यांची ही आकांक्षा त्यांच्या पक्षातले तरी गांभीर्याने घेतात का, हा प्रश्न आहे. अपवाद फक्त संजय राऊत या शिवसेनेच्या दुसर्‍या फळीतील नेत्याचा. पवारांचे कौतुक करताना त्यांचे भान हरपते. याचे अनेक दाखले आहेत. मात्र पितामह भीष्म म्हणणे हा कडेलोट झाला. अर्थात, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ठराव जितका निरर्थक, तशीच राऊतांनी दिलेली उपमाही. त्यांनी उपमा दिली, म्हणून शकुनीचा भीष्म होत नसतो.