‘द काश्मीर फाइल्स’ हा विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाच्या ट्रेलरनेच अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आग तेव्हाच लागते, जेव्हा आपले पितळ उघडे पडते. त्यामुळेच की काय कोण जाणे, चित्रपट प्रदर्शन रोखण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. तसेच कपिल शर्मा नामक शोमध्ये या चित्रपटाचे प्रमोशनही नाकारण्यात आले. परंतु ज्या ज्या ठिकाणी असे द्वेषमूलक प्रयत्न झाले, ते सुज्ञ नागरिकांमुळेच हाणून पाडले गेले, त्याविरुद्ध आवाज उठविला गेला. याचाच प्रत्यय म्हणजे चित्रपट नुसता रिलीज झाला नाही, तर तुफान हाउसफुल्ल झाला. प्रमोशनचे खर्चीक आणि विविध फंडे न वापरता आणि विरोध होऊनही बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले.
अगदी बत्तीस वर्षांपूर्वीची थरकाप उडवणारी घटना, मानवी मूल्यांचा र्हास करणारी घटना आपल्या भारत देशात घडली, पण त्याविषयी कुणी ब्रदेखील काढला नाही, हे अतिशय खेदजनक आहे. 19-20 जानेवारी 1990 या दोन दिवसांची नोंद भारतीय इतिहासातील काळे दिवसच म्हणून होऊ शकते. धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावरून पेटलेला हा नरसंहार म्हणजे भारतीय संस्कृतीचा विसर, मानवी मूल्यांचा र्हासच म्हणता येईल.
काश्मीर हे जवळजवळ 80%हून अधिक भारतीयांचे आवडते पर्यटन स्थळ असावे. म्हणजे माझ्या बकेट लिस्टमधील तर आहेच आहे. भारतातील स्वर्ग म्हणून काश्मीरकडे पाहिले जाते. ज्ञानाची गंगोत्री, विद्येची अनेक मंदिरे, साधुसंतांच्या तपस्येने पावन झालेली पुण्यभूमी काश्मीर. नरसंहार करणार्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘जन्नत’ - या ‘जन्नत’लाच याच लोकांनी ‘जहाँन्नुम’ कसे केले, ते हा चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच समजेल. चित्रपटात जेएनयूमध्ये शिकत असलेला विद्यार्थी कृष्णा पंडित या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आपण या चित्रपटाचा प्रवास करत असतो.
जेएनयू या विद्यापीठाविषयी न बोललेच बरे. याचा इतिहास सर्वांना माहीतच आहे. अर्थात ‘भारत तेरे तुकडे तुकडे गँग’. कृष्णाचे आजोबा पुष्करनाथ पंडितांना जेव्हा हे कळते की, आपला नातू कृष्णा कॉलेजमध्ये चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, तेव्हा ते त्याला “तुझी दिशाभूल केली जात आहे” हे सांगतात. पण ज्याला ‘खरे सत्य’ काय आहे हे माहीतच नसेल तर त्यात त्याचाही दोष नाही. हो, सत्याच्याही दोन बाजू असतात, एक ‘खरे सत्य’ आणि दुसरे ‘खोटे सत्य’. आणि हे खोटे सत्यच आपण खरे सत्य आहे हे मान्य केले आहे. कारण आतापर्यंत हे खरे सत्य अनेक फाइल्समध्ये बंद करून ठेवले जात होते. अशा अनेक फाइल्स उघड्या होणे गरजेचे आहे. म्हणूनच हे न पचणारे सत्य जे इतके खरे आहे की तेच आपल्याला वर्षानुवर्षे खोटे वाटत आले आहे. विवेक अग्निहोत्री यांनी हे खरे सत्य इतके स्पष्ट दाखविले आहे की, चित्रपटातील काही दृश्ये डोळ्यांना झेपत नाहीत, इतकी विदारक आहेत.
हा चित्रपट पाहताना आपली ही अवस्था होत असेल, तर ज्यांनी हे भोगले असेल त्यांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पना येते. सुन्न आणि हादरून टाकणारा हा चित्रपट विचार करायला नक्कीच भाग पाडतो. चित्रपट म्हटले की केवळ मनोरंजन हा आतापर्यंतच्या सिनेसृष्टीतील लोकांनी आपल्याला दाखविलेले गोंडस चित्र आहे. पण हा चित्रपट थिएटरमधून बाहेर आल्यानंतर तर त्याविषयीचे विचारचक्र सतत चालू ठेवते. चित्रपट खरे तर रविवारी पाहिला, पण अनेक प्रश्न मनात निर्माण होत होते. तसेच सोशल मीडियावर अनेक मतमतांतरे वाचायला मिळत होती. हा चित्रपट पाहून फक्त सोडून न देता या विषयावर चर्चा आणि जनजागृती होणे गरजेचे आहे. तेव्हाच ‘भारत तेरे तुकडे तुकडे हो’, ‘फ्री काश्मीर- आजादी’, ‘अफजल हम शर्मिंदा है’, आपल्या संघटनेचा मोर्हक्या हाच आपला मसिहा, मृत्यूनंतर जन्नत असे म्हणणार्या बांडगुळांना चाप बसेल. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतर त्यांचा बुरखा फाडला जात आहे, तर ते तरी गप्प कसे बसणार? कारण तो त्यांचा स्वभाव आहे. पण त्यांच्या स्वभावाला विनासंकोच दाद द्यायला हवी. कारण त्यांच्यात एकी आहे. एक अल्लाचा बंदा दुसर्या अल्लाच्या बंद्याची साथ कधी सोडत नाही. ही साथच त्यांचे बळ वाढविणारी आहे.
हिंदू धर्माला हजारो वर्षांची संस्कृती आहे. या आपल्या संस्कृतीत ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही शिकवण आहे. अर्थात सारे विश्व हे कुटुंब आहे, म्हणजेच सर्वांशी बंधुतेप्रमाणे व्यवहार करणे होय. पण आपल्या संस्कृतीचा र्हास आणि आपले क्षात्रतेज हरवल्यामुळे आपल्याला परकीयांचा सामना करावा लागला. स्वार्थाचा विचार केल्यामुळे संघशक्ती, तिचे बळ हिंदू गमावून बसला. या व्यवहाराची अजूनही उपरती होताना दिसत नाही.
याचेच उदाहरण म्हणजे विवेक अग्निहोत्री या शूर व्यक्तीने धाडस करून, लपलेले खरे सत्य आज जगासामोर तडफेने, जीव धोक्यात घालून दाखविण्याचे जे धाडस केले, त्यांच्या या धाडसाला पाठिंबा तर सोडाच, काही मंडळी त्याबद्दल शंकाकुशंका व्यक्त करतानाही दिसत आहेत. आज बत्तीस वर्षांनी हे प्रकरण उकरून काढण्याची काय गरज? झाले-गेले विसरून जा, एवढी धमक होती तर तेव्हाच का नाही एकत्र येऊन लढले या सार्याशी, तेव्हाच आवाज उठवायला पाहिजे होता, वगैरे वगैरे.
अगदी बरोबर! आवाज उठवायला पाहिजे होता हे खरे, पण त्यांचा आवाज ऐकणारे होते कोण? मुस्लिमांकडे आधुनिक शस्त्रे, मशीन गन्स आणि काश्मिरी पंडित नि:शस्त्र. ‘रलीव, गलीव, चलीव’चे नारे देत सुटलेले, याचा अर्थ ‘इस्लाम स्वीकारा, काश्मीरमधून निघून जा, नाहीतर मरा’ अशी धमकीवजा नारेबाजी आणि पोस्टरबाजी त्या वेळेला चालू होती. जवळजवळ कत्तलखाना चालू केला होता. हिंदूंचे अस्तित्व संपवून मुसलमानांचे साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि या सर्व प्रकारात जगाने व भारतातील त्या वेळच्या यूथ नेत्याच्या हाती असलेल्या सरकारने चकार शब्दही काढला नाही. पांढरशुभ्र, शांत, प्रसन्न अशा काश्मीरवर या दोन दिवसांत काश्मिरी पंडितांच्या लाल रक्ताने हिरवी चादर घालण्याचे क्रूर, निर्दयी कृत्य केले गेले. किड्यामुंग्यांनाही इतक वाईट मरण येत नसेल इतकी लाखो हिंदूंची घृणास्पद हत्या केली गेली, हे पाहताना आज बत्तीस वर्षांनी तळपायाची आग मस्तकात जात होती. तर मग तेव्हाचे शासन षंढच समजले पाहिजे. हिंदू-मुस्लीम हा वेगळाच मुद्दा राहतो, पण एका मनुष्यजिवाचे असे हाल होणे, इतक्या क्रूरतेने त्याची हत्या करणे, आबाल-वृद्धांवर केलेले छळ, स्त्रियांवर अमानुष अत्याचार कसे काय सहन करू शकतात?
विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटात जी स्टारकास्ट निवडली आहे, त्यांच्या अभिनयाला तोड नाही. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि चिन्मय मांडलेकर या प्रत्येक पात्राने आपापला अभिनय चोख बजावला आहे. चित्रपटाचे गांभीर्य यातील प्रत्येक पात्राने राखून ठेवले. मुस्लीम संघटनेचा मोर्हक्या फारुक बिट्टा याची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर याने ज्या रितीने साकारली आहे, की हुबेहूब एखादा दहशतवादी आपल्या समोर उभा ठाकला आहे, इतकी त्याची दहशत वाटते.. हॅट्स ऑफ चिन्मयच्या अभिनयासाठी!
जोपर्यंत एखादी झळ आपल्याला लागत नाही, तोपर्यंत त्याचे गांभीर्य कळत नाही, हे सोशल मीडियावर शांतिदूत बनवून फिरणार्या चेहर्यांसाठी. मी स्वत: मुस्लीमबहुल भागात राहते. अर्थात आमचा भाग तसा सुरक्षित आहे. परंतु आमच्याच अगदी थोड्या अंतरावर आमचे नातेवाईक राहतात. तिथली परिस्थिती पाहिली तर त्यांच्या बिल्डिंगमध्ये जिथे हिंदू बहुसंख्य होते, परंतु काही कारणास्तव, शिवाय अधिक पैसे देऊ केल्यामुळे आणि दूर जाऊन याहीपेक्षा अधिक जागा मिळण्याच्या हव्यासापोटी का होईना, आपले राहते घर मुस्लीम समुदायातील बांधवांना विकून जाऊ लागले. इ.स.पूर्वीची गोष्ट नाही बरे का, अलीकडच्या पाच-सहा वर्षांपूर्वीची. तर आता तिथली परिस्थिती अशी झाली आहे की हाताच्या बोटावर मोजण्याइतके हिंदू राहिले आहेत, आणि त्यातीलही काही आपले राहते घर सोडून जाण्याच्या मानसिकतेत आले आहेत.
आता त्यांच्या बिल्डिंगमध्ये अजान देण्यासाठीचा भोंगा, बकरी ईदसाठी हलाल करण्यासाठी प्रत्येक मजल्याच्या दारात बकर्या बांधलेल्या असतात. तिथेच त्या बकर्यांचे ओरडणे, त्यांचा चारा आणि त्यांची विष्ठा असे किळसवाणे दृश्य पाहायला मिळते. याचाच अर्थ की हिंदू संघटित नाही. हा चित्रपट का बघायचा? तर हिंदूंनी संघटित का व्हायला पाहिजे, नाही तर 1990 साली जे काश्मिरी पंडितांबरोबर झाले, ती वेळ उद्या आपल्यावर येऊ नये म्हणून. 370 कलम हटविले जाणे का गरजेचे होते, याची सगळी उत्तरे या चित्रपटातून मिळतात. त्यामुळे अशा चित्रपटांना प्राधान्यक्रम देऊन चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा चित्रपटांचा आवाज बंद करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही.
या चित्रपटातील लहान मुलाच्या तोंडातील एक वाक्य ‘अल सफा.. पंडित दफा’ असे आहे. मुलाचे वय साधारण सहा-सात वर्षे. या नखाएवढ्या मुलाच्या तोंडी हे शब्द, म्हणजे लहानपणापासून धर्माचे किती कडवे डोस यांना दिले जातात, ते बघा. तथाकथित उदारमतवादी, पुरोगामी, बुद्धिवादी लोक, मीडिया हाउस, पब्लिकेशन हाउस हे सगळे मिळून येथील शिक्षण संस्थात जाऊन कसे तरुणांचे ब्रेनवॉशिंग करून स्वतंत्र भारताच्या आजादीला सुरुंग लावतात हे चित्रपट जसजसा पुढे जातो, तसे भारतात चाललेले वास्तव स्क्रीनवर आभासी स्वरूपात दिसत असले तरी हेच वास्तव आहे याची जाणीव होते.
भारतात सत्तापरिवर्तनानंतर आपल्या सभोवतालचे जळजळीत वास्तव मांडण्याचे धैर्य आले आहे. काश्मिरी पंडितांनी बघितलेले स्वप्न (कलम 370 रद्द) मोदी सरकारने पूर्ण केले. काश्मिरी पंडित हे निर्वासित नसून भारतीय आहेत आणि ते आपल्या जन्मभूमीत, कर्मभूमीत जाऊन पुन्हा नव्याने आपले आयुष्य जगतील, तेव्हा काश्मीर हे पुन्हा नंदनवन बनेल, यात काही शंका नाही.
सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.