चिरंजीव स्वरसुगंध

विवेक मराठी    07-Feb-2022   
Total Views |
@रमेश पतंगे
लता हा भारतीय जीवनाचा स्वरसुगंध आहे. फुलाच्या सुगंधाला काळाची मर्यादा असते. पण लतादीदींचा स्वरसुगंध सूर्याच्या अस्तित्वासारखा आहे, त्याला काळाच्या मर्यादा नाहीत. ‘हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा’, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’, भा.रा. तांबे यांची भावगीते, मीराबाईंची भजने, तुकोबांचे अभंग, ज्ञानदेवांचे पसायदान आणि धम्मपद इत्यादी रचना लतादीदींच्या स्वराने सुगंधित झाल्या आहेत. हा एक अद्भुत चमत्कार आहे.


lata mangeshkar

लता मंगेशकर आज पार्थिवाने आपल्यात नाहीत, पण सप्तस्वरांच्या रूपाने त्या चिरंजीव आहेत. जोपर्यंत संगीत ऐकणारे कान आहेत, व्याकूळ मन आहे, हृदयात कोमल भावना आहेत, तोपर्यंत लतादीदींना मरण नाही.

चित्रपट संगीतातील त्यांचे योगदान कालातीत आहे. त्यांची हजारो गाणी अजरामर आहेत. शब्द, सूर आणि भावना यांचा अनोखा संगम त्यांच्या गाण्यातून आठ दशके आपण अनुभवलेला आहे. चित्रपट संगीतातील त्यांचे स्थान अढळ आहे. नजीकच्या भविष्यात ते कोणी कदाचित भरून काढीलही. पण स्वतंत्र भारतातील त्यांचे राष्ट्रीय योगदान मात्र हिमालयासारखे अढळ राहील.
 
 
आपण एक राष्ट्र आहोत. राष्ट्र भावनिक बंधनाने निर्माण होते. समान इतिहास, समान संस्कृती, समान शत्रू-मित्र भावना, समान जीवनमूल्ये यामुळे राष्ट्रबंध घट्ट होतात. हे राष्ट्रबंध घट्ट करण्याचे काम हजारो वर्षांपूर्वी व्यास आणि वाल्मिकी यांनी केले आहे. लता मंगेशकर त्यांच्या पंक्तीत जाऊन बसतात. भाषा, पंथ, धर्म, जाती-वर्ण, इत्यादी सार्‍या सीमा ओलांडून त्या प्रत्येक भारतीयांच्या मनात जाऊन बसल्या आहेत. व्यासांचे महाभारत आणि महाभारतातील कृष्ण ज्याप्रमाणे प्रत्येक घरात आहे, वाल्मिकींचे रामायण आणि रामायणातील राम-सीता ज्याप्रमाणे प्रत्येक घरात आहे, त्याप्रमाणे लतादीदी काल प्रत्येक घरात होत्या, आज आहेत, आणि उद्याही असणार आहेत, त्या चिरंजीव आहेत.

 
त्यांना मरण नाही. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यावर अधिराज्य गाजविणार्‍याला यमदेखील मारू शकत नाही. ईश्वरी कायद्याप्रमाणे जो जन्मला, तो कधी ना कधी हे शरीर सोडून जाणारच. लतादीदींचे जाणे हे शाश्वत कायद्याचे अनुसरणच आहे. संवेदनशील मनाला त्याचे दु:ख होणे स्वाभाविक आहे.

पण या दु:खालाही शाश्वततेची झालर आहे. चिरंजीवित्वाचे कोंदण आहे. लता आमच्या सनातन राष्ट्राचा श्वास आहे, अमर चेतना आहे. आम्हा सर्वांना एक भारतीयत्वाची ओळख सतत करून देणारा आरसा आहे. त्यांनी गायलेल्या गीताच्या पंक्तीत सांगायचे, तर ‘रहे ना रहे हम मेहेका करेंगे....’

लता हा भारतीय जीवनाचा स्वरसुगंध आहे. फुलाच्या सुगंधाला काळाची मर्यादा असते. पण लतादीदींचा स्वरसुगंध सूर्याच्या अस्तित्वासारखा आहे, त्याला काळाच्या मर्यादा नाहीत. ‘हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा’, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’, भा.रा. तांबे यांची भावगीते, मीराबाईंची भजने, तुकोबांचे अभंग, ज्ञानदेवांचे पसायदान आणि धम्मपद  इत्यादी रचना  लतादीदींच्या स्वराने सुगंधित झाल्या  आहेत. हा एक अद्भुत चमत्कार आहे.

स्वरसुगंधाचे हे अक्षय्य भांडार लतादीदींना चिरंजीव करून गेले. लतादीदींचे स्वर जीवनाच्या प्रत्येक वळणावर जीवन उन्नत करणारे, जीवन समृद्ध करणारे आणि सात्त्विक जीवनानंद देणारे आहेत.

हा स्वरसुगंध एक राष्ट्रीयत्व निर्माण करणार्‍या अनेक बंधातील आधुनिक काळातील सर्वात मोठा आणि बलवान बंध आहे. लतादीदींना अनेक उपाध्या लावल्या जातात - स्वरसम्राज्ञी, गानतपस्विनी, गानकोकिळा, इत्यादी. त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारांची तर मालिकाच आहे. परंतु राष्ट्रजीवनातील त्यांचे स्थान या सर्व उपाध्यांपलीकडचे आहे. त्या आपल्या राष्ट्राच्या पंचमस्वर आहेत. आपल्या राष्ट्राच्या कोमल भावनांचे शाश्वत रूप आहे. त्या आपल्या राष्ट्राच्या अमर संगीतशक्ती आहेत. विश्वाला देण्यासारख्या आपल्याकडे ज्या अनेक गोष्टी आहेत, त्यातील संगीत ही एक गोष्ट आहे. आणि लतादीदी संगीतातील भावमधुर गीतांचा आविष्कार आहेत. या संस्कृती शक्तीनेच मानवजातीला भारताने उन्नत करायचे आहे. ती आपली नियती आहे आणि तो आपला सनातन वारसा आहे. लतादीदी या वारशातील गीतसंगीत मुक्तहस्ताने आपल्याला देऊन गेल्या आहेत. या वारशाने त्या चिरंजीव आहेत.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.