युद्धाचे ढग युरोपच्या भूमीवर

विवेक मराठी    07-Feb-2022   
Total Views |
 
युक्रेनच्या सीमेवर रशियाचे एक लाख खडे सैन्य आहे. ते सर्व प्रकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. क्षेपणास्त्रे सोडणारी यंत्रणा, आधुनिक रणगाडा दल सीमेवर युक्रेनमध्ये घुसण्यासाठी वाट पाहत आहे. युरोप युद्धाच्या किनार्‍यावर उभा आहे. रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केल्यास नाटोतर्फे त्याचा प्रतिकार केला जाईल आणि हे युद्ध आधुनिक शस्त्रांमुळे प्रचंड विध्वंस करणारे ठरेल. युक्रेन आणि रशिया हे दोन्ही देश युद्धाचा आकाशाला भिडणारा खर्च सहन करू शकतील का? याचा विचार दोन्ही देश करतच असतील.
 
UKREN

यु
क्रेन, रशिया, अमेरिका आणि नाटो यांच्या बातम्या रोजच वर्तमानपत्रात असतात. युक्रेन हा पूर्व युरोपातील रशियाखालोखाल, क्षेत्रफळाच्या संदर्भात सगळ्यात मोठा देश आहे. 1991 सालापर्यंत तो रशियन साम्राज्याचा भाग होता. 1991 साली रशियन साम्राज्य कोसळले. रशियन संघराज्यात सामील झालेले आणि सामील करून घेतलेले देश एकापाठोपाठ एक स्वतंत्र झाले. त्यात युक्रेनही स्वतंत्र झाला.

रशियन राज्यकर्ते - मग ते रुरीक वंशाचे असोत की रोमोनोव्ह वंशाचे असोत की कम्युनिस्ट असोत की आताप्रमाणे प्रजासत्ताकाचा मुखवटा घेणारे असोत, हे सर्व साम्राज्यवादी असतात. रशियन साम्राज्य हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. आठव्या-नवव्या शतकापासून रशियाच्या इतिहासाला प्रारंभ होतो आणि प्रारंभापासूनच रशियाचा विकास साम्राज्य म्हणूनच होत गेलेला आहे. रशियन राज्यकर्ते ठरवतील त्या या साम्राज्याच्या सीमा असतात. युरोपचा विचार करता पूर्व युरोपातील बहुतेक सगळे देश इतिहासकाळापासून रशियन साम्राज्याचा भाग राहिलेले आहेत. युक्रेनदेखील रशियन साम्राज्याचाच भाग होता.

रशियन साम्राज्याचे अन्य देश, उदा., ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान (इत्यादी मध्य आशियातील देश) 1991पर्यंत रशियन साम्राज्याचाच भाग होते. युक्रेन आणि मध्य आशियातील हे देश आणि त्यांचा रशियाशी असलेला संबंध यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. युक्रेन ही आजच्या रशियाची जन्मभूमी आहे. युक्रेनच्या राजधानीचे नाव आहे किव. नवव्या-दहाव्या शतकात तिथे ज्याचे राज्य निर्माण झाले, त्यांना ‘किवन रस’ असे म्हणतात. हे राजघराणे आजच्या रशियाचे जन्मदाते राजघराणेे आहे. तेराव्या शतकापर्यंत त्यांचे राज्य कधी किवमध्ये तर कधी मॉस्कोमध्ये अस्तित्वात आले. ‘किवन रस’वरून रशिया या शब्दाचा जन्म झालेला आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एक वर्षापूर्वी  "On the Historical Unity of Russians and Ukraianians'  या शीर्षकाचा दीर्घ लेख लिहिलेला आहे. त्यात ते म्हणतात की, रशियन्स आणि युक्रेनियन्स हे एकच लोक आहेत. त्यांचा शब्द आहे, सिंगल होल. त्याचा अर्थ होतो, ज्याचे विभाजन करता येणार नाही असे अस्तित्व. या संपूर्ण लेखात त्यांनी युक्रेन आणि रशिया यांचे अविभाज्य नाते इतिहासकाळापासून कसे आहे हे मांडले आहे. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांत या दोन्ही लोकांची भाषा एक आहे, इतिहास एक आहे, संस्कृती एक आहे, ऑर्थोडॉक्स ख्रिश्चानिटी हा धर्म एक आहे आणि हा ऑर्थोडॉक्स ख्रिश्चानिटीचा धर्म किवन रस वंशातील राजा व्लादिमीर याने स्वीकारला आणि तो रशियाचा अधिकृत धर्म झाला. अनेक युक्रेनियन्स योद्धे हे संपूर्ण रशियाचे नायक समजले जातात. तसेच मेझप्पा नावाचा कोसॅक दलाचा प्रमुख शत्रूला फितूर झाला. आज त्याचे नाव रशियातील फितूर म्हणून घेतले जाते. अशा अनेक गोष्टी पुतीन यांनी आपल्या लेखात मांडलेल्या आहेत.

रशिया फुटल्याचे दु:ख पुतीन यांना झालेले आहे. या फुटीचा सर्व दोष ते बोल्शेविकांनी केलेल्या संविधानावर टाकतात. या संविधानाने संघराज्यातील घटक राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार दिला. जोपर्यंत कम्युनिस्ट शासन प्रबळ होते, तोपर्यंत संघराज्य टिकले. 1991 साली केंद्रसत्ता दुर्बळ झाली आणि रशियाचे तुकडे झाले. युक्रेन रशियापासून दूर होऊ शकत नाही. त्याची अर्थव्यवस्था रशियावरच अवलंबून आहे. युक्रेन स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभा राहू इच्छितो याबद्दल पुतीन यांनी आक्षेप व्यक्त केला नाही. त्यांचे म्हणणे असे आहे की, युक्रेनने नाटोमध्ये सामील होता कामा नये. युक्रेनने नाटोचे सभासदत्व स्वीकारलेले आहे, पण अजूनपर्यंत नाटोने युक्रेनला पूर्ण सभासदत्व दिले आहे असे नाही, रशियाचा त्याला जबरदस्त विरोध आहे.
 
रशियाला रोखण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने युरोपातील देशांची संघटना बांधण्यात आली. या संघटनेला नाटो म्हणतात. या नाटोच्या कराराप्रमाणे नाटोत सामील झालेल्या सर्व युरोपीय देशांना अमेरिकेने अणुबाँबचे संरक्षण कवच दिलेले आहे. युरोपमध्ये अमेरिकेचे खडे सैन्य आहे आणि अनेक देशांत अमेरिकेने अणुबाँब आणून ठेवलेले आहेत. इंग्लिशमध्ये याला ‘न्यूक्लिअर अंब्रेला’ असे म्हणतात. नाटो कराराला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने पूर्व युरोपातील देशांचा वार्सा करार केला. नाटो आणि वार्सा करारातील देश यांच्यात 1946पासून शीतयुद्धाला प्रारंभ झाला. 1991 साली रशिया कोसळण्यानंतर त्याची समाप्ती झाली.

UKREN 
 
नाटो संघटनेची शक्ती प्रचंड आहे. या शक्तीमुळे कम्युनिस्ट रशियाला जर्मनीवरदेखील आपले अधिराज्य निर्माण करता आले नाही. त्यांनी पूर्व जर्मनी बळकाविला, पण पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन यांना विभागणारी भिंत जर्मन लोकांनी 1990 साली पाडून टाकली आणि जर्मनी एक झाला. अमेरिकेशी आणि अमेरिकेच्या दोस्त देशांशी संघर्ष करण्याचे शीतयुद्धाच्या काळात काही प्रसंग आले. त्यातील एक प्रसंग क्युबामध्ये क्षेपणास्त्र बसविण्याचा होता. तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांनी रशियन जहाजे अडविण्याचा आणि ठरवून दिलेल्या सीमेच्या बाहेर आल्यास त्यांच्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला. रशियाला माघार घ्यावी लागली. ‘क्यूबन मिसाइल क्रायसेस’ या नावाने हे प्रकरण प्रसिद्ध आहे. नंतर अफगाणिस्तानमध्ये रशियन सेना गेल्या. अमेरिकेने जिहादी तालिबानी उभे केले. अफगाणिस्तानात रशियाचा पराभव झाला. आज रशिया अमेरिकेशी पुन्हा दोन हात करण्याची भाषा करीत आहे.

युक्रेनशी आमचे जैविक संबंध आहेत असे सांगून युक्रेनने नाटोत सामील होऊ नये, नाटोने युक्रेनला सामील करून घेऊ नये, नाटोने युक्रेनला लष्करी मदत देऊ नये, पूर्वी रशियन साम्राज्याचे भाग असलेल्या देशांमध्ये नाटोने आपले सैन्य ठेवू नये, अशा रशियाच्या मागण्या आहेत. यापैकी कोणतीही मागणी मान्य करायला अमेरिका आणि नाटोही तयार नाही. युक्रेनमध्ये 2014 साली सत्तांतर झाले. तेव्हा सत्तेवर असलेले राष्ट्राध्यक्ष हे रशियाधार्जिणे होते. त्यांनी युरोपीय युनियनमध्ये सामील होण्याचा अगोदरच्या शासनाने घेतलेला निर्णय फिरविला. युरोपीय युनियनप्रमाणे रशियाच्या ताब्यात असलेल्या युरोपातील देशांतील युनियन रशियाने निर्माण केली होती. त्यात युक्रेनने सामील व्हावे, असा त्यांनी निर्णय घेतला.

त्याविरुद्ध मोठे आंदोलन झाले आणि 2014 साली रशियाधार्जिण्या राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोवाइच याची सत्ता गेली आणि अमेरिकाधार्जिणी सत्ता युक्रेनमध्ये आली. 2014च्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध उग्र आंदोलने झाली. अशी आंदोलने घडवून आणण्यात अमेरिकेची सीआयए ही तज्ज्ञ समजली जाते. नको असलेल्या भुट्टोविरुद्ध पाकिस्तानात अशीच उग्र आंदोलने झाली होती. पंजाबात झालेले शेतकरी आंदोलन स्थानिक शेतकर्‍यांचे असले, तरी त्याची सूत्रे कॅनडातून हलविली जात होती. पण आपल्या देशात भुट्टो होणे किंवा आपल्या देशाचा युक्रेन होणे त्या मानाने अवघड आहे.

 
पुतीन यांनी आपल्या लेखात, पाश्चात्त्य देश ‘फोडा आणि झोडा’ या नीतीचा अवलंब कसा करतात आणि युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा कसा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे, याची उदाहरणेही देतात. द्वेषाचे राजकारण देशाचे वाटोळे करील, असे मत ते नोंदवून जातात. ते वाचताना अनेक वेळा पाकिस्तानची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

युक्रेनच्या सीमेवर रशियाचे एक लाख खडे सैन्य आहे. ते सर्व प्रकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. क्षेपणास्त्रे सोडणारी यंत्रणा, आधुनिक रणगाडा दल सीमेवर युक्रेनमध्ये घुसण्यासाठी वाट पाहत आहे. युरोप युद्धाच्या किनार्‍यावर उभा आहे. रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केल्यास नाटोतर्फे त्याचा प्रतिकार केला जाईल आणि हे युद्ध आधुनिक शस्त्रांमुळे प्रचंड विध्वंस करणारे ठरेल. आता सीमेवर आणि युक्रेनमध्ये पाण्याचा बर्फ करणारी थंडी आहे. अशा थंडीत लढायला जाणार्‍या सैनिकाला थंडीचा बचाव करणारे कपडे, बूट इत्यादी सामग्री द्यावी लागते. हे अफाट खर्चाचे काम आहे. युक्रेन आणि रशिया हे दोन्ही देश युद्धाचा आकाशाला भिडणारा खर्च सहन करू शकतील का? याचा विचार दोन्ही देश करतच असतील.
 
युद्ध होऊ नये म्हणून युनोच्या सुरक्षा परिषदेने तोडगा काढण्यासाठी सभा बोलाविली. रशियाने तिच्यावर बहिष्कार टाकला. शेवटी ही बैठक झाली. भारताने कोणत्याही गटात सामील न होण्याची भूमिका घेतली आणि प्रत्येक देशाच्या सुरक्षेचे रक्षण झाले पाहिजे अशी भूमिका घेतली. भारताचे वीस हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये शिकायला गेले आहेत. उद्या युद्ध भडकले तर त्यांचे जीवन धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. भारताला त्याची चिंता आहे, म्हणून भारताने त्या सर्व विद्यार्थ्यांना वकिलातीशी संपर्क साधायला सांगितला आहे.
 
 
युक्रेन संघर्षात भारत नाजूक परिस्थितीत आहे. अमेरिका आणि नाटो संघटनेतील देशांशी भारताचे व्यापारी हितसंबंध गुंतलेले आहेत, आर्थिक संबंध गुंतलेले आहेत. रशिया हा भारताला लष्करी सामग्री पुरविणारा महत्त्वाचा देश आहे. आधुनिक क्षेपणास्त्रे प्रणालीसाठी रशियाबरोबर भारताचा करार झाला आहे. भारताला रशियालाही दुखावता येणार नाही आणि अमेरिका आणि युरोपातील देशांनाही दुखावता येणार नाही, म्हणून भारताला अत्यंत सावध भूमिका घ्याव्या लागतात. भारताने आता तशा भूमिका घेतलेल्या आहेत. किलोमीटरच्या भाषेत युक्रेन आणि भारत यांच्यामध्ये 5235 किलोमीटरचे अंतर आहे. परंतु तंत्रज्ञानामुळे दोन देशांतील अंतर जमिनीवरून कितीही असले, तरीही त्याला काही अर्थ नसतो. तेथे युद्ध झाल्यास त्याचे बरे-वाईट परिणाम भारतालाही भोगावे लागतील. आपले राज्यकर्ते या दृष्टीने सावध आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.